Posts

Showing posts with the label किंडल

पुस्तक परिचय : US AGAINST YOU (Frederik Backman)

Image
BEARTOWN या पुस्तकाबद्दल मागे लिहिलं होतं.  ही तीन कादंबर्‍यांची मालिका आहे. त्यातला दुसरा भाग US AGAINST YOU वाचला. पहिल्या कादंबरीत हॉकी आणि तरुण हॉकी खेळाडू ही प्रमुख पात्रं होती. त्यांची एनर्जी होती. दुसर्‍या भागात खेळाभोवतीची इतर परिस्थिती, राजकारण, पैसा, हेवेदावे, चढाओढ, खेळाचं मॉनेटायझेशन या बाबी येतात. आज कोणत्याही व्यावसायिक खेळासोबत या गोष्टी असतात, होतातच, घडतातच. तो प्रश्न नाही. पण या गोष्टींबद्दल बोलताना हॉकी आणि तरुण मुलं काहीशी बाजूला सारलेली आहेत. पहिल्या भागात जी एक भूतो न भविष्यति घटना घडते, त्याचे पडसाद सर्व कोनांमधून दुसर्‍या भागात मांडलेले आहेत. त्यात अनेक बॅकस्टोरीज आहेत. खेळाशी निगडीत, तसंच घरगुती नातेसंबंधांच्या पातळीवरच्याही आहेत. लेखकाच्या शैलीमुळे पुस्तक पुढे पुढे वाचलं जातं. पण कुठलंच पात्र खणखणीतपणे समोर येत नाही. किंबहुना, या भागाचा तो उद्देशच नसावा. त्या घटनेमुळे बेअरटाऊनला आलेली मरगळ, एकसाचीपणा, गावातल्या हॉकीचं लटकतं भविष्य, संघबांधणीला बसलेला झटका असं सगळं अगदी धीम्या गतीने मांडलेलं आहे. मुलांच्या संघाची नवीन कोच - हे एक नवीन पात्र आहे....

पुस्तक परिचय : CARELESS PEOPLE (Sarah Wynn-Williams)

Image
लेखिका फेसबुकमध्ये ७ वर्षं पब्लिक पॉलिसी डायरेक्टर होती. ती मूळची न्यूझीलंडची. अमेरिकेत नोकरी करत असताना ख्राइस्टचर्चचा भूकंप झाला. त्यात तिचे घरचे सापडले. आई-वडिलांशी काही दिवसांत सम्पर्क झाला, पण बहीण बेपत्ता होती. पुढे बहिणीशीही संपर्क झाला तो फेसबुकच्या मदतीने. तोपर्यंत लेखिकेला फेसबुकबद्दल फारसं माहिती नव्हतं. या निमित्ताने फेसबुकसारख्या माध्यमाची ताकद तिला समजली. आपण इथे नोकरी करायलाच हवी असं तिच्या मनाने घेतलं. तोवर ती डिप्लोमॅटिक क्षेत्राशी संबंधितच काम करत होती. तिच्या स्किल्सचा, 'पब्लिक पॉलिसी' या गोष्टीचा फेसबुकमध्ये काय उपयोग, मुळात गरजच काय, असं फेसबुकच्या टॉप ब्रासचं मत होतं. पण आपल्या अनुभवाचा फेसबुकला उपयोग होईल हे तिने त्यांच्या गळी उतरवलं. त्यांच्या खनपटीला बसून तिच्यासाठी वेगळी पोस्ट निर्माण करायला लावली. हा सगळा भाग रंजक, क्रिस्प आहे. तिच्या द्रष्टेपणाचं कौतुक वाटतं. झुकरबर्गने आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संबंध वाढवायला हवेत हा विचार तिने पहिल्यांदा फेसबुकमध्ये मांडला. त्यासाठी जमेल तो सगळा आटापिटा केला. या टप्प्यावर पुस्तक अधूनमधून रटाळ व्हायला सुर...

पुस्तक परिचय : Permanent Record (Edward Snowden)

Image
एडवर्ड स्नोडेननं २०१३ साली केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल मला जुजबी माहिती होती. तेव्हाच्या पेपरात आलेल्या बातम्या काही दिवस मी फॉलो केल्या असतील, नसतील. मात्र नंतर त्याबद्दल विसरायला झालं होतं. पण नुकतंच हे पुस्तक वाचलं.  मला आवडलं. त्यात प्रत्यक्ष गौप्यस्फोटाचा भाग शेवटच्या ७०-८० पानांमध्ये येत असेल. ते थ्रिलिंग आहेच. पण त्यापूर्वीची शाळकरी वयापासूनची त्याची जडणघडण, कम्प्युटर आणि इंटरनेटवर त्याचं बालपण, teens पोसलं जाणं, त्यातून त्याचं geek बनत जाणं, देशासाठी काहीतरी करायचं या प्रेरणेनं सुरू केलेली नोकरी - हा भागही खूप वाचण्यासारखा आहे. त्यानं तो अगदी प्रामाणिकपणे, प्रांजळपणे, आडपडदा न ठेवता लिहिलाय. तो वाचकांच्या पुढ्यात बसून गप्पा मारतोय असं वाटतं. कम्प्युटर, इंटरनेट, त्याच्याशी जोडलेलं तंत्रज्ञान, माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याचा होणारा अधिकाधिक वापर, या सगळ्याबद्दल सांगताना त्यानं जागोजागी तात्विक पातळीवर भाष्य केलं आहे. ते शोधायला, वाचायला खूप मजा आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं माणसाच्या जीवनातलं महत्व काय याचा तात्विक पातळीवर विचार स्नोडेनच्या मनात सतत नकळत सुरू होता, की या पुस्तक...

पुस्तक परिचय : The Naturalist (Andrew Mayne)

Image
एका विज्ञान संशोधक विद्यार्थिनीचा जंगलात अभ्यासासाठी गेलेली असताना मृत्यू होतो. पोस्टमार्टेममध्ये दिसतं की हा अस्वलाने केलेला हल्ला आहे. पोलीस हादरतात. जोरदार शोधमोहिम सुरू करतात. आणि अखेर त्या अस्वलाला गाठून ठार मारतात. आधी पोलिसांना ही खुनाची घटना वाटत असते. त्या संशोधक विद्यार्थिनीचा जुना विज्ञान प्रोफेसर हा पोलिसांचा प्राइम सस्पेक्ट असतो. पोलीस त्याला चौकशीसाठी धरतात. पण पुरेशा पुराव्याअभावी त्याला जाऊ देतात. त्यामुळे प्रोफेसरचा या प्रकरणातला इंटरेस्ट वाढतो. नाहीतर त्याचा त्या मुलीशी आता काहीही संपर्क उरलेला नसतो. प्रोफेसरचं विज्ञान संशोधक डोकं त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो इंटरनेटवर या केसशी संबंधित तपशील शोधतो. आपल्या परीने डॉट्स जोडायला लागतो. त्यासाठी लॉजिक, ए.आय., bio-informatics वगैरेची मदत घेतो. त्यातून काही शक्यता समोर येतात. त्या तो पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण पोलिसांनी एव्हाना अस्वलाला पकडून मारलेलं असल्यामुळे ते याला भीक घालत नाहीत. पण प्रोफेसर हळूहळू त्या केसमध्ये ओढला जातो. तो एकटा पोलिसांपासून लपूनछपून पण शिस्तीत तपास सुरू करतो. हा तपास पूर्णपणे सायन्...

पुस्तक परिचय - White Rose, Black Forest (Eoin Dempsey)

Image
  महायुद्धावर आधारित फिक्शन अधूनमधून वाचायला मला आवडतं. तसंच हे आवडीखातर वाचण्याचं पुस्तक आहे. आयुष्यात सर्व काही गमावून बसलेली तरुण नायिका सुनसान ब्लॅक फॉरेस्टमध्ये आत्महत्या करायला निघाली आहे. गडद थंडी, सगळीकडे बर्फ, अशात कुठेतरी जाऊन स्वतःवर गोळी झाडून घ्यायची असा तिचा विचार आहे. दिशाहीन चालत निघालेली असताना तिला एके ठिकाणी एक सैनिक अर्धमेला होऊन पडलेला दिसतो. त्याच्या पाठीवर पॅराशूट असतं. एक सॅक, त्यात काही सामान. गणवेशावर जर्मन स्वस्तिक आणि नाव. ती व्यवसायाने नर्स असते. नाझींमुळेच तिचे सगळे कुटुंबीय मारले गेलेले असतात. तरी त्या सैनिकाला मदत न करता तसंच निघून जायचं हे तिला पटत नाही. ती त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचं ठरवते. तिची ती खटपट, तो सैनिक कोण असतो, गेस्टापोंना संशय येणं, पाठलाग, त्यांच्यापासून सुटका करून घेण्याची पुढची धडपड, अधेमध्ये तिचे फ्लॅशबॅक्स – अशी ही कादंबरी आहे. ‘व्हाइट रोझ’ या चळवळीबद्दल याआधी कधी वाचण्यात आलं नव्हतं. ते या पुस्तकामुळे समजलं. त्या चळवळीतली दोन प्रमुख नावं - हान्स आणि सोफी - फ्लॅशबॅकमधली पात्रं म्हणून येतात. युद्धपरिस्थिती, थंडीचे ब...

खेळावर प्रेम असणार्‍या वाचकांसाठी (पुस्तकपरिचय : Beartown)

Image
स्वीडनच्या आर्क्टिक भागातलं एक लहानसं गाव- बेअरटाऊन. हे गाव आइस-हॉकीच्या प्रेमात बुडलेलं आहे. They talk ice-hockey, eat ice-hockey, sleep ice-hockey अशी परिस्थिती. गावात बेकारी वाढीस लागली आहे. बिनकामाची किंवा कामासाठी गाव सोडावं लागलेली माणसं वाढत चालली आहेत. अशा काळात हॉकीचाच (पुस्तकात बहुतेक ठिकाणी फक्त ‘हॉकी’ असाच उल्लेख आहे) त्यांना मोठा आधार वाटतो. १५-२० वर्षांपूर्वी बेअरटाऊनचा पुरुष संघ स्वीडनच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलला गेलेला. तो या गावाच्या हॉकीच्या इतिहासातला सर्वोच्च, सोनेरी क्षण. पण त्यानंतर इथल्या हॉकीत विशेष काहीच घडलेलं नाही. आणि आता इथला मुलांचा संघ राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेच्या सेमी-फायनलला पोहोचला आहे. पुस्तकाचं कथानक या टप्प्यावर सुरू होतं. Kevin हा या संघाचा मुख्य खेळाडू. आइस-हॉकी खेळातला हिरो. त्याला त्या खेळाची उपजत देणगी आहे. केविनने हात घातलेली कोणतीही गोष्ट सामन्यात वाया जात नाही, चुकीची ठरत नाही. त्याचे आई-वडील मोठे पैसेवाले, बेअरटाऊनच्या हॉकी क्लबचे मोठे देणगीदार. पण केविनच्या हॉकीप्रेमाशी, skills शी त्यांना फारसं देणंघेणं नाही. त्यांच्य...

साडेतीनशे पानी झाकोळ (पुस्तक परिचय : Shuggie Bain, लेखक : Douglas Stuart)

Image
 १९९० च्या दशकाची सुरुवात. स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो. १५-१६ वर्षांचा एक मुलगा, शगी, कॉट-बेसिसवर एकटाच राहतोय. एका सुपरमार्केटच्या स्नॅक्स काऊंटरवर जेमतेम नोकरी करतोय. त्याच्या अवतीभोवती स्थानिक गरीब नाहीतर स्थलांतरित माणसं. अभावग्रस्त जीवन. शगीला हेअरड्रेसर व्हायचंय. पण आधी रोज येणार्‍या दिवसाला एकट्याने तोंड द्यायचंय. रोज येणार्‍या दिवसाला काहीही करून तोंड देणे हे त्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. कसं? कोण आहे हा शगी? त्याची गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी आपल्याला ११ वर्षं मागे नेते. ग्लासगोच्या एका भागात एका उंचच्या उंच इमारतीत सोळाव्या मजल्यावरचं एक घर. आजी-आजोबा, मुलगी-जावई, तीन नातवंडं. शगी या नातवंडांमधला सर्वात धाकटा. या वर्णनावरून जे छानशा कुटुंबाचं चित्र समोर उभं राहतं, त्यापेक्षा प्रत्यक्षातली परिस्थिती पार वेगळी. ते राहतायत ती इमारत म्हणजे सरकारने कष्टकर्‍यांसाठी बांधलेल्या एकसुरी, हताश, अंगावर येणार्‍या उंच काँक्रीट ठोकळ्यांपैकी एक. हे कष्टकरी म्हणजे मुख्यत्वे कोळसा खाण कामगार. पण ७० च्या दशकात भरभराट झालेला तो कोळसा उद्योग आता पार झोपलाय. माणसांच्या हातांना काम...

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)

Image
अमेरिकेतल्या Idaho राज्यात राहणारं एक कुटुंब. नवरा-बायको आणि ७-८ मुलं. नवरा-बायको कट्टर Mormon पंथीय. या पंथाच्या लोकांचा आधुनिक जगावर, वैज्ञानिक प्रगतीवर अजिबात विश्वास नसतो. आधुनिक शिक्षण, वैद्यकीय उपचार इ. गोष्टी म्हणजे सैतानाशी सामना. त्यापासून दूर राहायचं. आयुष्यात येणारं प्रत्येक संकट देवाने परीक्षा घेण्यासाठी धाडलं असल्याप्रमाणे सहन करायचं. त्यातून जमेल तसं तरुन जगणं पुढे सुरू ठेवायचं. ही यांची रीत. हे कुटुंबही तसंच. वडिलांचा भंगार व्यवसाय. सगळी मुलं तिथे पडेल ते अंगमेहनतीचं काम करण्यात तरबेज असतात. पण एकूण जीवनशैली पुरती रासवट. टॅरासुद्धा १५ वर्षांची होईपर्यंत असंच रासवट जगत होती. पण तिला हळूहळू बाहेरच्या जगाचं वारं लागायला लागलंच. आपलं विनाशिक्षित असणं तिला जाणवायला लागलं. यातून बाहेर पडण्याची गरज भासायला लागली. तो निर्णय तिच्यासाठी खूप अवघड होता. बाहेर पडायचं तर कसं, याचा शोध तिचा तिलाच घ्यायचा होता. मोठा सामाजिक, आंतरिक, तात्विक झगडा होता तो तिच्यासाठी. पण तिने एक-एक पाऊल टाकायला सुरुवात केली. आणि आयुष्याची पहिली १५ वर्षं शाळेचं तोंडही न पाहिलेली ही मुलगी पुढच...

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

Image
रशियाने युक्रेनवर आक्रमण का केलं? अमेरिका हाच देश राजकीय, आर्थिक महासत्ता का बनला? आखाती देशांमध्ये सतत काही ना काही खदखदत का असतं? आफ्रिकेतले देश इतके गरीब का? चीनला दक्षिण अमेरिकेच्या आणि आफ्रिकेच्या भूभागात रस का आहे? असे एकगठ्ठा प्रश्न आपल्याला कधी पडत नाहीत. जागतिक राजकारण हा काही सर्वसामान्यांच्या आवाक्यातला विषय मानला जात नाही. त्यावर राजकारणी बोलतील, अभ्यासक बोलतील, तो आपला प्रांत नव्हे, असं म्हणून तो सोडून दिला जातो. Prisoners of Geography हे पुस्तक ही सोडून देण्याची मुभा आपल्यापासून हिरावून घेतं. आणि त्यात मजा आहे. एका वाक्यात या पुस्तकाचा गोषवारा सांगायचा, तर जगाच्या राजकारणात जे काही घडत आलेलं आहे, त्यामागे त्या-त्या देशांचं भौगोलिक स्थान, त्यांच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती याच गोष्टी कारणीभूत आहेत, असं या पुस्तकात म्हटलेलं आहे. आणि हे इतक्या साध्या-सोप्या भाषेत सांगितलं आहे, की वाचताना आपण त्यात नकळत रमत जातो. पुस्तकात १० विभाग/प्रकरणं आहेत- रशिया, चीन, अमेरिका, पश्चिम युरोप, आफ्रिका, मध्य-पूर्व आशिया, भारत-पाकिस्तान, कोरिया-जपान, लॅटिन अमेरिका, आर्क्टिक प्र...

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

Image
 बंगलोरमध्ये राहणारी तरुण नायिका. दक्षिण भारतीय. तिचं कुटुंब आधुनिक विचारांचं आहे. कुटुंब म्हणजे आता फक्त वडील. आईने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली. आई मानसिक रुग्ण असते. त्यापायी अधूनमधून तिचं वागणं कधी अति मनस्वी, तर कधी पार तर्‍हेवाईक होत असतं. एरवी हे इतर चारचौघांसारखंच कुटुंब. सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जाणारं, घरी पार्ट्या आयोजित करणारं, मित्रमंडळींना जेवायला बोलावणारं. सगळ्यात आईचाच पुढाकार. पण या पार्ट्या, ट्रिप्स सुरळीतपणे पूर्ण होतीलच याची शाश्वती नाही, त्याला कारणही आईचा आजार. वडील आणि मुलीला त्याची कल्पना असते. दोघं शक्यतो आईला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आईचा आजार आणि त्यांची कौटुंबिक वीण हे कादंबरीचं मुख्य कथानक नाही. या गोष्टी नायिकेच्या बालपणीच्या फ्लॅशबॅकमधून आपल्याला समजतात. मुख्य कथानक आहे ते Far Field, म्हणजे काश्मिर खोर्‍यातलं. नायिकेच्या लहानपणी त्यांच्या घरी एकदा काश्मिरी गालिचे, हस्तकला वस्तू वगैरे विकणारा एक विक्रेता येतो- बशीर अहमद. आईची बशीरशी ओळख वाढते. दुपारच्या वेळी तो दारावर आला की आई त्याला घरात घ्यायला लागते. त्याच्याशी...

पुस्तक परिचय : Sharp Objects (Gillian Flynn)

Image
  अमेरिकेतल्या एका लहानशा गावात एका लहान मुलीचा मृत्यू झालेला असतो. आणि वर्षभराने आणखी एक मुलगी नाहीशी झालेली असते. शिकागोतल्या एका जेमतेम चालणार्‍या वृत्तपत्राच्या संपादकाला त्यात काहीतरी कनेक्शन असावं असं वाटतं. ती स्टोरी खणून काढली तर आपल्या पेपरला फायदा होईल असा त्याचा होरा असतो. तिथे नोकरी करणारी एक पत्रकार मुलगी (कॅमील) मूळची त्याच गावची असते. तो तिलाच त्या कामगिरीवर पाठवतो. तिने १५-१६ वर्षांपूर्वीच ते गाव सोडलेलं असतं. गावात तिची आई, सावत्र बाप आणि सावत्र बहीण राहत असतात. तिची गावाशी, घराशी फारशी अ‍ॅटॅचमेंट नसते. ती जरा नाखुषीनेच तिथे जाते. पुढे त्या दुसर्‍या मुलीचाही मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं. दोघींच्या मृत्यूत काही ना काही कनेक्शन असणारच, याची खात्री पटते. स्थानिक पोलीस तपास करत असतात. एफ.बी.आय.ही येतात. कॅमील शिकागो पेपरला काही ना काही पाठवायलाच हवं म्हणून आपल्या पद्धतीने 'स्टोर्‍या' शोधत असते. त्यातून एकेक गोष्टी उघड व्हायला लागतात. त्या मुलींचा खून झालेला असतो. पोलीस आणि कॅमील आपापल्या पद्धतीने खुन्यापर्यंत पोचतात. त्यातला पोलीस तपास पुस्तकात येत...

पुस्तक परिचय : Breaking Through (Isher Judge Ahluwalia)

Image
  इशर जज अहलुवालिया या अर्थशास्त्रज्ञ विदुषीचं हे memoir आहे. लहानसं पुस्तक आहे, आणि ते जबरदस्त आहे!   कोलकातात पारंपरिक पंजाबी कुटुंबात वाढलेली इशर, ११ भावंडांमधली एक. तिला शिक्षणाची आस होती. घरात मुलींच्या शिक्षणासाठी खूप काही पोषक वातावरण नव्हतं. घरातल्या मोठ्यांनी जरासं नाखुषीनेच तिच्या उच्चशिक्षणाला परवानगी दिली. कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि तिथून थेट अमेरिकेत एम.आय.टी. अशी तिची गाडी सुसाट निघाली. इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च - हे तिचं क्षेत्र होतं. पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत नोकरी, पीएचडी, मॉन्टेक सिंग अहलुवालियांशी ओळख, मैत्री, लग्न, संसार, कामानिमित्त अमेरिकेतल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उच्च अर्थशास्त्री वर्तुळात त्यांचा समावेश होता. अमेरिकेत १० वर्षं लखलखीत करिअर घडवून दोघं आणि त्यांची दोन मुलं भारतात परतले. इथल्या अर्थशास्त्र क्षेत्रातही दोघांच्या नावांचा एव्हाना दबदबा निर्माण झालेला होता. इशरनी आपलं पॉलिसी रिसर्चचं काम पुढे सुरू केलं. त्या रिसर्चवर आधारित काही पुस्तकं लिहिली. अमेरिकेत असतानाच मनमोहन सिंग यांच्याशी दोघ...

नेटफ्लिक्सची गोष्ट (पुस्तक परिचय - That Will Never Work : Marc Randolph)

Image
मार्क रॅन्डॉल्फ हा नेटफ्लिक्सचा सहसंस्थापक. Online DVD rental ची कल्पना त्याच्या डोक्यात आली तेव्हापासून ते नेट्फ्लिक्स कंपनी पब्लिक लिमिटेड झाली आणि तो कंपनीतून बाहेर पडला तिथपर्यंतची ही ‘नेटफ्लिक्सची गोष्ट’. लेखकाने ती अगदी रंगवून रंगवून सांगितली आहे. तीन-चार start-ups उभे करून दिल्यानंतर त्याला वाटायला लागलं होतं की आपण काहीतरी वेगळ्या कल्पनेवर काम करावं, स्वतःची कंपनी सुरू करावी. त्या कंपनीद्वारे लोकांना एखादी ऑनलाइन सर्व्हिस देण्यावर त्याचा भर होता. तो आणि त्याचा सहकारी मित्र रीड हेस्टिंग्ज यांनी वेगवेगळ्या start-up ideas वर कशा चर्चा केल्या, त्यातून Online DVD rental ची कल्पना कशी समोर आली, ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधी दोघांनीच काय काय केलं, मग कंपनी स्थापण्याचं ठरलं, त्यासाठी पहिली team कशी गोळा केली, पुढे business development, असे टप्पे एक-एक करत पुस्तकात येत जातात. मार्क रॅन्डॉल्फच्या आयडिया आणि हेस्टिंग्जचा पैसा आणि मार्केटिंग स्किल्स, अशी ही जोडगोळी होती. नेटफ्लिक्समध्ये दोघांच्या भूमिका काय असाव्यात त्यावर मुख्य त्या दोघांच्यात स्पष्टता होती. त्यातू...

पुस्तक परिचय : Cobalt Blue (सचिन कुंडलकर, अनुवाद - जेरी पिंटो)

Image
(‘कोबाल्ट ब्लू’ हे सचिन कुंडलकरलिखित पुस्तक ऐकून माहिती होतं. पण का कोण जाणे, मी सुरुवातीपासून ते इंग्रजी पुस्तक आहे, असंच समजत होते. किंडलवर मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दिसला तेव्हा हे लक्षात आलं. असो. थोडक्यात, मी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वाचला.) तर, पुण्यातल्या मध्यमवर्गीय जोशी कुटुंबातल्या दोन भावंडांची ही गोष्ट आहे. भाऊ, तनय, जरा अबोल, लाजराबुजरा; तर बहीण, अनुजा, ट्रेकिंग आवडणारी, बाइक चालवणारी; मेक-अप, सुंदर कपडे वगैरेशी फार देणेघेणे नसणारी. त्यांच्या घरी एक तरुण मुलगा पेइंग-गेस्ट म्हणून येतो. आणि या भावंडांच्या आयुष्यात एक वावटळ येते. दोघंही त्यात हेलपाटून जातात. वावटळ येते तशी यांना तडाखा देऊन निघूनही जाते. त्यानंतरच्या काळात पुस्तकाची सुरुवात होते. दोघं हेलपाटून का जातात, त्याचं कथानक flashback मध्ये येतं. त्याच ओघात पुढे दोघं त्यातून सावरण्यासाठी काय करतात, सावरू शकतात का, याचे धागे गुंफलेले आहेत. *** पुढच्या मजकुरात spoilers आहेत *** तीन तरुण पात्रं असल्यामुळे ही वावटळ अर्थात प्रेमाची, शारीरिक आकर्षणाची आहे. तनय आणि अनुजा दोघंही पाहुण्याच्या प्रेमात पडतात....

पुस्तक परिचय : मास्तरांची सावली (कृष्णाबाई सुर्वे)

Image
 प्रांजळ, प्रामाणिक आत्मकथन. साधीसुधी, गप्पा मारल्यासारखी भाषा. सुर्वे दांपत्याचं बालपण, तरुणपणीचा काळ केवढा ओढगस्तीचा होता! मधला काही काळ तर अक्षरशः अन्नान्न दशा होती. ते वाचताना अंगावर काटा येतो. नारायण सुर्वे शाळाशिक्षक होते, तर कृष्णाबाई एका शाळेत शिपाई होत्या. त्यांना चार मुलं झाली. प्रत्येकाची काही ना काही शोकांतिका झाली. अशातही आनंदी, खेळकर स्वभाव टिकवून ठेवणे, काव्यलेखन, आलागेला-पै पाहुणा, सगळं करणे, याची कमाल वाटते. त्याकाळची मुंबई पुस्तकात ठिकठिकाणी येते. ती चित्रं मनात उभी करायला मजा आली. कृष्णाबाईंनी पूर्णपणे स्वत:च्या नजरेतून, स्वत:च्या आयुष्याबद्दल लिहिलंय. नारायण सुर्वेंच्या कवि म्हणून कारकीर्दीतल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल पुस्तकात केवळ उल्लेख येतात, ते मला आवडलं. लहानपणापासून कृष्णाबाईंचा स्वभाव विचारी, खमका होता. त्यांच्याजवळ भक्कम आत्मविश्वास होता. मात्र लग्नानंतर त्या नोकरी करत असल्या तरी इतर घराबाहेरची कामं, पैशांचे व्यवहार त्यांनी कधीच केले नाहीत; सुर्व्यांच्या कोणत्याही सत्काराला, सार्वजनिक कार्यक्रमाला त्या गेल्या नाहीत; हे वाचून आश्चर्य वाटलं. ...

पुस्तक परिचय : गोल्डा - एक अशांत वादळ (वीणा गवाणकर)

Image
गोल्डा मेयर यांच्या आत्मचरित्रावर बेतलेलं पुस्तक (वाटलं मला, कारण अधेमध्ये आत्मचरित्राचे उल्लेख आहेत.) हे पुस्तकही चरित्रात्मकच आहे. वाचताना पहिली प्रतिक्रिया होते ती म्हणजे काय जबरदस्त कणखर, करारी, कर्तृत्ववान बाई होती ही! त्यांचं बालपण अमेरिकेत गेलं, ही माहिती मला नवीन होती. बालपण, तरुण वयातली जडणघडण, इस्रायलच्या निर्मितीपूर्वीपासूनची ज्यूंसाठीची त्यांची धडपड, तळागाळातल्या माणसांचा विचार, त्यांच्याशी मनाने कायम जोडलेलं असणे, पुढे इस्रायलमधलं राजकारण, त्यात अनुभवाने आणि कर्तृत्वाने निर्माण झालेला दरारा, कामगार मंत्री, परराष्ट्रमंत्री, पंतप्रधानपद, अरब राष्ट्रांसोबतचे सततचे खटके, युद्धं, कॉफी आणि सिगारेट्सच्या अखंड व्यसनामुळे आलेली आजारपणं, निवृत्ती, मृत्यू... असा दीर्घ, वाचतानाही दमवणारा प्रवास आहे. त्यांची स्टोरीच मुळात इतकी इव्हेन्टफुल असल्यामुळे पुस्तक कंटाळवाणं झालं नाही हे खरं, तरी ते आणखी चांगलं करता आलं असतं, असं वाटलं. आणखी एक, म्हणजे किंडल आवृत्तीत प्रचंड typos आहेत. त्यामुळे फार विरस झाला. त्यापायी मध्ये काही दिवस पुस्तक अर्धवट वाचून बाजूला पडलं होतं. पण शेवटी नेटानं पूर्ण ...

पुस्तक परिचय : The Messenger (Shiv Malik)

Image
There are more than two sides to every story - हे या पुस्तकाचं उपशीर्षक आहे. आणि अगदी पहिल्या पानापासूनच आपण ही तिसरी बाजू काय असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात करतो. ७ जुलै २००५ यादिवशी लंडनमध्ये चार ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. लंडन पोलीस, इंग्लंडमधली प्रमुख वृत्तपत्रं, न्यूज चॅनल्स या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याच्या मागे होते. या हल्ल्यामागे ब्रिटिश जिहादी नेटवर्कचा (BJN) हात होता, हे स्पष्ट झालं होतं. शिव मलिक हा इंग्लंडमधला शोधपत्रकार सुरुवातीला मँचेस्टरमध्ये एका दुय्यम असाइनमेंटसाठी या नेटवर्कमधल्या एका सदस्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेला. त्याचं नाव - हसन बट्ट. हसन बट्ट इंग्लंडमधल्या वृत्तमाध्यमांमध्ये बर्‍यापैकी माहित असलेला चेहरा होता. BJN तर्फे माध्यमांना मुलाखती देणे, पत्रकारपरिषदेत बोलणे या गोष्टी तो करायचा. त्याचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं. हसन बट्टशी बोलताना शिव मलिकच्या लक्षात आलं, की तो BJN चा केवळ ‘चमको प्रवक्ता’ नव्हता. त्याची स्वतःची काही तत्वं होती, धर्माचारण म्हणजे नेमकं काय याबद्दल त्याची मतं स्पष्ट होती, आणि तरीही तो विवेकी विचार करणारा ह...