Posts

Showing posts from 2009

एक विकट हास्य... कुंच्याचं !!

एक दिवस घरातल्या कागदपत्रांच्या फाईल्स्‌मधे मी एक पावती शोधत होते. निरनिराळी महत्त्वाची पत्रं, पावत्या इ. गोष्टी त्या-त्या फाईलला लावण्याचं काम माझा नवराच करत असल्याने (मी त्या कामात कधी लक्ष घालत नाही हे ओघानं आलंच!) ऐनवेळेला नवर्‍याच्या अनुपस्थितीत हवा तो कागद अथवा पावती योग्य त्या फाईलमधे शोधणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं कामच असतं!
नवर्‍यानं खरं म्हणजे प्रत्येक फाईलवर व्यवस्थित नाव, नंबर इ.च्या चिठ्ठ्या डकवलेल्या आहेत. तरीही इष्ट कागद मिळण्यापूर्वी ती विशिष्ट फाईल मला कमीतकमी दोनवेळा तरी अथपासून इतिपर्यंत धुंडाळावी लागते. म्हणजे मुळात मी योग्य ती फाईल उचललेली असते, आतले कागद पालटायलाही सुरूवात केलेली असते, भसाभसा कागद चाळताना मला हवा तो कागद नेमका त्याच्या आधीच्या कागदाला चिकटून पालटला जातो आणि एकाक्षणी अचानक त्या फाईलचा मागचा रंगीत पुठ्ठाच माझ्या पुढ्यात येतो. चरफडत, नवर्‍यावर वैतागत, ‘नेमकी हीच पावती या फाईलला कशी नाही लावली याने...’ असं स्वतःशी बडबडत मी कपाटातून अजून तीनचार फाईल्स्‌ धपाधप काढते.
कधीकधी त्या फाईल्स्‌वर लावलेल्या चिठ्ठ्यांचा आणि मी शोधत असलेल्या कागदाचा आपसांत काही…

खा, प्या, मजा करा, पण आधी हात धुवा !!

कीर्ती
मागच्या आठवडय़ात कोल्हापूरला आमच्या घरातलं एक लग्न होतं. मला शाळा आणि क्लास बुडवणं शक्य नव्हतं. म्हणून आई-बाबा दोघंच जाऊन आले. शुक्रवारचा अर्धा दिवस, शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा आख्खा दिवस मी एकटी होते. मी प्रथमच एकटी राहणार होते, त्यामुळे आई जाताना शंभर सूचना करून गेली. त्यातल्या नव्व्याण्णव सूचना मी ऐकून सोडून दिल्या. एक मात्र लक्षात ठेवली आणि सांगितलेल्या वेळी बरोबर अमलातही आणली. ती म्हणजे शुक्रवारच्या रात्री घरी कुठल्या तरी मैत्रिणीला सोबतीला बोलावण्याची. ही सूचना एकदम ब्येष्ट होती. त्याच्या बदल्यात आईच्या इतर नव्व्याण्णव सूचनाच कशाला, एकशे नव्व्याण्णव आज्ञा पाळायलाही मी तयार होते. फक्त ‘मैत्रिणीला’च्या जागी मी ‘मैत्रिणींना’ इतकाच बदल केला.
सुजी, दोन्ही अस्मिता आणि प्रज्ञा चौघी क्लासमधून थेट माझ्या घरीच आल्या. आल्या आल्या आधी आम्ही सगळ्यांनी मिळून टीव्हीवर ‘हॅना मॉंटाना’ बघितलं. इतर वेळी आम्ही आपापल्या घरात एकेकटय़ाच ती सीरियल पाहतो. त्या दिवशी सगळ्यांनी मिळून बघायला सही वाटलं. मायली सिरस त्यात कस्सली दिसते, कस्सली धमाल काम करते. रॉक स्टार म्हणून अगदी शोभून दिसते. आमच्या वर…

मी, एक ‘गजर’वंत

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अखिल मानवजातीची ही जी काही धावपळ, धडपड चालली आहे ती या गरजा भागवण्यासाठीच. त्या धावपळीत माझाही रोजचा थोडाफार वाटा असतोच. या दैनिक धावपळीचं अविभाज्य अंग म्हणजे पहाटे लवकर उठणे आणि माझं घोडं, जागं होता होता, पहिलं तिथेच अडतं! त्यामुळे, रोजची ही धावपळ सत्कारणी लावायची असेल तर माझ्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या यादीत अजून एका गोष्टीचा समावेश होणं अतिशय गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे गजराचं घड्याळ!
रोज सकाळी कानाशी घड्याळाच्या गजरानं बोंबाबोंब करणं ही माझी दिनक्रमातली पहिली आणि मूलभूत गरज आहे. त्या गजरानं जर योग्य वेळी मला उठवलं नाही तर मग (उठण्याच्या बाबतीत) माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असणार्‍या बाकीच्या दोघांचं काही खरं नसतं... मग आदल्या दिवशीच्या उरलेल्या ‘अन्ना’चा नाश्ता उरकावा लागतो, इस्त्री-बिस्त्रीच्या फारश्या फंदात न पडता शाळेची आणि ऑफिसची ‘वस्त्रं’ अंगावर चढवावी लागतात आणि धावतपळत ‘निवारा’ सोडावा लागतो.
गजराच्या मदतीशिवाय स्वतःहूनच पहाटे उठणारे आणि उठल्या उठल्या टवटवीतपणे लगेच आपापल्या कामाला लागणारे तमाम ‘उषाचर’ प्राणी म्हणून…

हिमालय ही चीजच तशी आहे...!!

Image
उत्तर भारतातली कुठलीही सहल करायची म्हटली की आपल्याला आधी आठवते ती तिथली थंडी आणि पाठोपाठ आठवतो तो बर्फ. ‘नॉर्थ’ची सहल केली पण बर्फ बघितला नाही असं जर कुणी आपल्याला सांगितलं तर गोव्याला जाऊन समुद्र न बघता परतलेल्या माणसासारखं आपण त्या व्यक्तीला लगेच मूर्खात काढू. उत्तर भारताचं पर्यटन आणि बर्फाच्छादित शिखरं यांचं असं इतकं घट्ट नातंच आपल्या मनात आपण बाळगलेलं आहे.त्यामुळे एखादा वारकरी विठ्ठलदर्शनासाठी जितका आसुसलेला असतो तितकीच, किंबहुना त्याहून कणभर जास्तच मी आसुसलेले होते त्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन घेण्यासाठी आणि ‘देवभूमी उत्तरांचल’मधे प्रवेश करून दोन दिवस उलटून गेले तरी त्या दर्शनाचा लाभ काही होत नव्हता.काय गम्मत आहे! तिकडे देशाच्या दुसर्‍या टोकाला केरळ पर्यटनाच्या जाहीरातीतही आपण ‘गॉड्स ओन कंट्री’ असं लिहीलेलं वाचतो आणि नवी दिल्लीहून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८७चं बोट पकडून नैनितालला जाताना उधमसिंगनगरच्या जरासं अलिकडेही ‘देवभूमी उत्तरांचलमें आपका स्वागत है।’ अशा पाटीनंच आमचं स्वागत केलं. (उधमसिंग या शब्दामुळे असेल कदाचित पण इतकी वर्षं उधमसिंगनगर हे गाव/शहर पंजाबमधे आहे असंच मला वा…

कॉर्बेटचा वाघ

"काय मग? कशी झाली तुमची ट्रीप? कॉर्बेटमध्ये दिसला का काही वाघ-बिघ?"
नैनीताल-मसूरी-जिम कॉर्बेट नॅशनल पार्क अशी, म्हणजे थोडक्यात उत्तरांचलची सहल करून आल्यानंतरच्या आठवड्याभरात किमान दहा पंधरा वेळा तरी हा प्रश्न आम्हाला विचारला गेला. (आणि त्या प्रश्नाला आम्ही तितक्यांदाच नकारार्थी उत्तर दिलं. खोटं कशाला बोलू?)
खरंतर उत्तरांचल म्हणजे हिमालयाच्या जवळपास(च) कुठेतरी येतं इतपत सामान्यज्ञान सर्वांनाच असतं। पण म्हणून "मसूरीला दिसली का काही बर्फाच्छादित शिखरं-बिखरं?" असा प्रश्न कुणालाही विचारावासा वाटला नाही. त्या प्रश्नाला तर आम्ही ‘होऽऽ! भरपूर...’ असं उत्तर द्यायला आसुसलो होतो. पण ते नाही; व्याघ्रदर्शनाची मात्र पदोपदी चौकशी!जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, किंबहुना कुठल्याही नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, न आलेले, सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आमचं ते नकारार्थी उत्तर ऐकल्यावर एक प्रकारचं मंद स्मित झळकायचं. म्हणजे, ‘असंच पाहीजे! तुम्हाला पण नाही ना दिसला? आम्हाला पण नव्हता दिसला.’ किंवा ‘नाही दिसत ना तिथे वाघ? म्हणूनच आम्ही तिथे जाण्याच्या फंदात पडत नाही.’ असे काहीतरी भाव व…

एक दिवस, सुपरमार्केटमध्ये...

मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे सुपरमार्केटमध्ये गेले होते. (मी आजकाल सग्गळी खरेदी फक्त सुपरमार्केटमधूनच करते हे मला प्रामुख्याने सांगायचं होतं हे सूज्ञ वाचकांच्या लगेच लक्षात आलंच असेल.) मला ही सुपर, हायपर वगैरे मार्केट्स आवडतात ती केवळ तिथल्या वातानुकूलित हवेमुळे. त्या हवेची करणी अशी की सुरुवातीसुरुवातीला एक बास्केट घेऊन आत शिरणारी आणि त्या बास्केटमध्ये मावतील इतक्याच वस्तू विकत घेणारी मी आताशा ‘शॉपिंग कार्ट’ घेऊन आत शिरते. काही वर्षांपूर्वी मला जर कुणी असं सांगितलं असतं की एक दिवस असा येईल की उकाडा आणि घामाच्या चिकचिकाटापासून दूर अशा परिस्थितीत तू निवांत भाजी आणि वाणसामान खरेदी करशील तर मी त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याला/तिला एक चहा पाजून सन्मानानं घरी पाठवलं असतं. ते तसं कुणी मला सांगितलं नाही ते बरंच झालं नाहीतर उगीच माझा एक कपभर चहा वाया गेला असता आणि वर ‘बघ, मी मागेच म्हटलं नव्हतं!’ हे वाक्यही शंभरदा ऐकून घ्यावं लागलं असतं! असो.
तर, त्यादिवशीही तशीच एक मोठी ढकलगाडी घेऊन मी सुपरमार्केटमध्ये शिरले. वातानुकूलित हवा, (पडेल चित्रपटांतल्या गाण्यांचं) मंद संगीत…

पहिला धडा

केशव गजाभाऊ कदम. वय वर्षे २२. नोकरीत फारसा रस नसलेला एक पदवीधर;
आई वडील नोकरी शोध म्हणून मागे लागलेले असताना आजकाल काही नवे सवंगडी भेटलेला, आपणही त्यांच्यातलंच एक व्हायचं या वेडानं हळूहळू झपाटायला लागलेला एक पदवीधर;
ना उच्च, ना कनिष्ठ, नुसत्याच मध्यमवर्गाचा तरूण प्रतिनिधी असा एक पदवीधर.
गेले काही दिवस केशव खूप उत्साहात होता. निवडणुका जाहीर होणार होत्या. पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मिरवणारे केशवचे नवे सवंगडी त्याला अधूनमधून ‘समाजविधायक’ कामांमध्ये मदत करायला बोलवत असत. केशवनं ओळखलं होतं की हीच संधी आहे. आपण मन लावून, तहानभूक विसरून, झपाटून पार्टीचं पडेल ते काम करू. कॉलेजातली पदवी तर मिळवून झाली पण आता या निवडणुका संपेस्तोवर आपल्या नावापुढे ‘पार्टीचा तरूण कार्यकर्ता’ ही पदवीही झळकायलाच हवी.
त्यादृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे हे देखील केशवनं तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा सात‍आठ दिवसांपूर्वी दिनेशकरवी संभादादांनी त्याला अनपेक्षितपणे बोलावून घेतलं होतं. त्यादिवशी दादांनी त्याच्यावर सोपवलेली एक महत्त्वाची कामगिरी आज त्याला पार पाडायची होती.
‘आता आई-आप्पांना समजेलच थोड्या दिवसांत की त्य…

तेव्हा आणि आता

(या प्रसंगांमधला ‘तेव्हा’ म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वीचा काळ आणि ‘आता’ म्हणजे सध्याचा काळ समजावा.)
---------------------------------------------------------------------
तेव्हा
मुलगी (वय वर्षे १४) : आई, शाळेच्या युनिफॉर्मला इस्त्री करू?
आई : युनिफॉर्मला काय करायचीये इस्त्री-बिस्त्री? उगीच नुसते नखरे नकोयेत शाळेत जाताना ... !!

आता
आई : अगं, किती हा आळशीपणा... युनिफॉर्मला जरा इस्त्री-बिस्त्री कर ना.
मुलगी (वय वर्षे १४) : असू दे गं! मला बोअर होतं रोज-रोज इस्त्री करायला...

------------------------------------------------

तेव्हा
वडील (आपल्या शाळकरी मुलाला) : अरे, काय सारखी रेडियोवरची गाणी ऐकत बसतोस... जरा कधीतरी बाहेर खेळत जा...

आता
वडील (आपल्या शाळकरी मुलाला) : अरे, काय सारख्या व्हिडीओ गेम्स खेळत असतोस... जरा कधीतरी गाणी-बिणी पण ऐकत जा... !!!

------------------------------------------------

तेव्हा
मुलगा : आई, या सुट्टीत पण बालनाट्य बघायला नेशील ना, प्लीऽऽऽज...

आता
मुलगा : या सुट्टीत पण बालनाट्य?? नको ऽऽऽ... आई, प्लीऽऽज!

------------------------------------------------

तेव्हा
मुलगा (आपल्या मित्राला)…

सांगड : झेंडावंदनाची, दहीहंडीची आणि विज्ञानाची!

किर्ती

समाजशास्त्राचं प्रोजेक्ट संपलं तशी शाळेत पंधरा ऑगस्टच्या विज्ञान-प्रदर्शनाची गडबड सुरू झाली. पण आमच्या पाचजणींपैकी कुणीच त्यात भाग घेतलेला नसल्यामुळे जरा बरं होतं. प्रदर्शनात भाग घेतलेला नसला तरी प्रदर्शन बघायला आम्हाला आवडतं. ते आम्ही करणारच आहोत. पण दरम्यान आम्ही आपापसांत एक वेगळाच प्लॅन केला होता. प्रज्ञाच्या आत्याच्या घराजवळ एका मुलींच्या गोविंदा-पथकाची रोज रात्री प्रॅक्टिस असते. प्रत्यक्ष गोकुळाष्टमीदिवशी गर्दीत जाऊन ‘लाईव्ह दहीहंडी’ कधीच बघता येत नाही. म्हणून आम्ही काल ती प्रॅक्टिस बघायलाच गेलो होतो. प्रज्ञाची आई आमच्या बरोबर आली होती. एखाद्या हिंदी सिनेमाच्या जाहिरातीसाठी नाही का ते ‘द मेकिंग ऑफ अमूक’, ‘बिहाईंड द सीन्स् ऑफ तमूक’ दाखवत असतात सारखं... कधी कधी प्रत्यक्ष सिनेमापेक्षा ते कार्यक्रमच जसे छान वाटतात, तसंच टी. व्ही. वर दरवर्षी ज्या दहीहंड्या दाखवतात त्यापेक्षा हा सराव बघायलाच जाम मजा आली. त्या मुली सहा-सात थर तर लावतच होत्या पण आठव्या थरासाठीही त्यांचा प्रयत्न चालू होता. सहाव्या आणि सातव्या थरावर चढणाऱ्या मुली तश्या लहानच होत्या - तिसरीचौथीतल्या. पण त्यांच्या इतर…

पाणी-बचतीचं प्रोजेक्ट

दि. ६ ऑगस्ट २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा माझा लेख.
-----------------------------------------------------------

किर्ती

शेवटी ९०:१०च्या जोडीला आपली कमाल दाखवायची संधी मिळालीच नाही. म्हणजे आता आमचं भाकीत खरं ठरणार... इजा-बिजाची वाट लागली, आता पुढच्या वर्षी कुठला तिजा शोधतात ते बघायचं!
दरम्यान शाळेत आमची युनिट टेस्ट पार पडली। पाठोपाठ दरवर्षीप्रमाणे पावसावरचा एक निबंध आम्हाला लिहायला सांगण्यात आलेला आहे. आजकाल पावसाळा ‘नेमेचि’ येईनासा झालाय पण या निबंधाचा मात्र नेम काही चुकत नाही. तसा यावेळेला अगदीच निबंध एके निबंध लिहायचा नाहीये म्हणा... आम्हाला समाजशास्त्राचं एक प्रोजेक्ट करायचंय - ‘पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल’ या विषयावर आणि त्याचाच एक भाग म्हणून तो निबंध लिहायचा आहे.
आचरेकर बाईंनी वर्गात प्रोजेक्टचा हा विषय जाहीर केल्यावर प्रज्ञा बधीर चेहऱ्यानं आमच्याकडे बघायला लागली. तिला त्याचा अर्थच कळला नाही.
"अगं, म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंऽऽग... " तिला मागच्या बेंचवरून मराठी अस्मितानं इतक्या जोरात सांगितलं की ते आख्ख्या वर्गाला ऐकू गेलं... आण…