खा, प्या, मजा करा, पण आधी हात धुवा !!


कीर्ती
मागच्या आठवडय़ात कोल्हापूरला आमच्या घरातलं एक लग्न होतं. मला शाळा आणि क्लास बुडवणं शक्य नव्हतं. म्हणून आई-बाबा दोघंच जाऊन आले. शुक्रवारचा अर्धा दिवस, शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा आख्खा दिवस मी एकटी होते. मी प्रथमच एकटी राहणार होते, त्यामुळे आई जाताना शंभर सूचना करून गेली. त्यातल्या नव्व्याण्णव सूचना मी ऐकून सोडून दिल्या. एक मात्र लक्षात ठेवली आणि सांगितलेल्या वेळी बरोबर अमलातही आणली. ती म्हणजे शुक्रवारच्या रात्री घरी कुठल्या तरी मैत्रिणीला सोबतीला बोलावण्याची. ही सूचना एकदम ब्येष्ट होती. त्याच्या बदल्यात आईच्या इतर नव्व्याण्णव सूचनाच कशाला, एकशे नव्व्याण्णव आज्ञा पाळायलाही मी तयार होते. फक्त ‘मैत्रिणीला’च्या जागी मी ‘मैत्रिणींना’ इतकाच बदल केला.
सुजी, दोन्ही अस्मिता आणि प्रज्ञा चौघी क्लासमधून थेट माझ्या घरीच आल्या. आल्या आल्या आधी आम्ही सगळ्यांनी मिळून टीव्हीवर ‘हॅना मॉंटाना’ बघितलं. इतर वेळी आम्ही आपापल्या घरात एकेकटय़ाच ती सीरियल पाहतो. त्या दिवशी सगळ्यांनी मिळून बघायला सही वाटलं. मायली सिरस त्यात कस्सली दिसते, कस्सली धमाल काम करते. रॉक स्टार म्हणून अगदी शोभून दिसते. आमच्या वर्गातल्या सगळ्याच मुलींना ती सीरियल आवडते. पण बहुतेक जणींच्या आया बघू देत नाहीत. मग आम्ही शाळेत ती सीरियल शेअर करतो. जिनं आदल्या दिवशी पाहिली नसेल तिला दुसऱ्या दिवशी त्या एपिसोडची स्टोरी सांगते. या सीरियलमुळे अमेरिकेत मायली जाम फेमस झालीय म्हणे. जाईल तिथं तिचं फिल्मस्टारसारखं स्वागत होतं. हिंदी अस्मिताची मावशी सांगत होती की, तिथे तिच्या नावाचे फॅन क्लब्स आहेत. त्या सीरियलमधल्या गाण्यांच्या अल्बम्सची तिथे दणक्यात विक्री होते. त्या रात्रीच्या आमच्या जेवणाचा मेनू होता- मॅगी! आमची अजून एक कॉमन आवडीची गोष्ट. आईनं आदल्या दिवशीच मॅगीची सहा-सात पाकिटं आणून ठेवली होती. आई नेहमी तिच्या लहानपणीची मॅगीची एक आठवण सांगते की, ती शाळेत असताना मॅगी नवीन नवीन बाजारात आलं. इन्स्टंट फूड वगैरे प्रकार तेव्हा कुणालाच माहीत नव्हता. एक दिवस आजीनं त्याची दोन पाकिटं आणली. त्यातलं एक दिलेल्या सूचनांनुसार करून बघितलं. तर घरातल्या एकूण एक ‘महान’ लोकांनी ते चाखून पाहिल्यावर तोंडं वाकडी केली. कुणालाच ते आवडलं नाही आणि त्यांनी ते अक्षरश: टाकून दिलं. कमाल आहे की नाही. मॅगीसारख्या पदार्थात न आवडण्यासारखं, तोंडं वाकडी करण्यासारखं काही आहे का? पुढची हाईट म्हणजे दुसऱ्या पाकिटातल्या नूडल्सची माझ्या आजीनं चक्क खीर केली गोडाची! टू मच.
ही गम्मत मी सगळ्यांना सांगत होते तर प्रज्ञाचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. हातात एक मॅगीचं पाकीट घेऊन त्याच्याकडे बघत ती काहीतरी आठवायचा प्रयत्न करीत होती. त्या पाकिटावर ‘ट्वेंटीफाईव्ह इयर्स ऑफ जॉय’ असं काहीतरी लिहिलेलं होतं. ते वाचून मॅगीला २५ वर्ष पूर्ण झाल्याचं तिला कळलं आणि अजून कुठल्या गोष्टीला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली ते ती आठवत होती. शाळेत सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी आचरेकर बाईंनी सांगितलेलं तिला ‘अंधुक’ आठवत होतं. नशीबच म्हणायचं निदान अंधुक तरी आठवत होतं!
"इंदिरा गांधींच्या हत्येला २५ वर्षे पूर्ण झाली", मराठी अस्मितानं तिची अंधूक आठवण सुस्पष्ट केली.
"म्हणजे इंदिरा गांधी गेल्या आणि त्याच वेळी मॅगी आपल्या देशात अवतरलं. म्हणजे त्यांना मॅगी चाखायलाच मिळालं नसेल ना?" प्रज्ञाची नसती शंका.
"मग? त्यांनी त्यांच्या शीख मारेकऱ्यांना सांगायला हवं होतं का की बाबांनो, आधी मला थोडं मॅगी खाऊन बघू दे, मगच तुम्ही माझ्यावर गोळ्या झाडा म्हणून?", प्रज्ञानं नेहमीप्रमाणे हिंदी अस्मिताची एक टप्पल खाल्ली.
"आणि खाऊन पाहिलं असतंच तरी त्यांनाही कीच्या आजीसारखं ते आवडलंच नसतं..."
"मग त्यांनी त्याची खीर करून राहुलला खायला दिली असती!"
"पण राहुलनं ती खीर खाऊनच तोंड वाकडं केलं असतं."
"अजिबात नाही. राहुलला सगळं आवडतं. त्याचे खाण्याचे काहीही नखरे नाहीत!", प्रज्ञाला तो राहुल गांधी सांगायलाच आला होता जणू त्याला काय काय आवडतं आणि काय काय नाही ते!
"उगीच यडपटासारखं काहीतरी बडूबडू नकोस! हे खा आधी." सुजी तिच्यासमोर मॅगीची डिश सरकवत म्हणाली.
"खरंच आहे ते. त्याचे खाण्याचे काही नखरे नाहीत म्हणून तर तो एका दलिताच्या घरी जाऊन जेवला ना. पेपरमध्ये फोटो नव्हता का आला तो जेवतानाचा! साध्या वेषातही तो कसल्ला हॅंडसम दिसतो ना अगदी!" बघता बघता प्रज्ञाचा ‘राहुल गांधी फॅन क्लब’ झाला.
मी डोक्यावर हात मारून घेतला. कुठला विषय हिनं कुठे नेऊन चिकटवला.
जेवताना आणि जेवण झाल्यावरही आम्ही चिक्कार गप्पा टाकल्या, हसलो, खिदळलो, खिडक्यांचे पडदे ओढून गाण्यावर डान्स केले. (सगळ्यांच्या अंगात तेव्हा मायली संचारली होती. ) थोडा वेळ एचबीओवरचा एक सिनेमाही पाहिला. (आजकाल एचबीओवर सगळ्या सिनेमांना सबटायटल्स दाखवतात) आईनं खरं तर सगळ्या इंग्रजी म्युझिक आणि सिनेमांच्या चॅनल्सना लॉक करून ठेवलंय. पण तिला हे माहीत नाही की मला त्या लॉकचा कोड माहीत आहे. मी तिला ते कळूही देणार नाही. रात्री १० नंतर जोरजोरात गाणी किंवा टीव्ही लावायचा नाही ही आईची ऑर्डर मात्र पाळणं गरजेचं होतं. नाही तरी ती परत आल्यावर सोसायटीतल्या कुणीतरी हमखास चुगली केली असती. लहानपणी मी आणि सुजी एकमेकींकडे कधी कधी राहायला जायचो. पण आम्ही पाचजणी एकत्र अशा प्रथमच राहिलो. अशक्य धमाल आली.

सुजाता

आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवसाबद्दल शाळेत समजलं तेव्हापासून प्रज्ञा रोज आम्हाला डबा खाण्यापूर्वी कंपल्सरी हात धुवायला लावते. असल्या गोष्टी तिच्या बरोबर लक्षात राहतात. मागच्या शुक्रवारी रात्री आम्ही चारहीजणी ‘की’कडे राहायला गेलो होतो तेव्हा मात्र जेवणं झाल्यावर तिला अचानक आठवलं की, आम्ही कुणीच जेवणापूर्वी हात धुतले नव्हते. (रोजच्या पोळी-भाजीऐवजी समोर मॅगी पाहून तिच्या स्मरणशक्तीनं टाइम प्लीज घेतलं असावं. ) पण त्या दिवशी आम्ही मॅगीच खाल्लं होतं आणि तेसुद्धा चमच्यानं हे लक्षात आणून दिल्यावर ती जरा शांत बसली.
२७ ऑक्टोबरला त्या ‘हात धुवा’ दिवशी शाळेत शिक्षकांनी आम्हाला सर्वाना अगदी एका ओळीत वगैरे जाऊन हात धुवायला लावले होते. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना ओळ वगैरे करायला काय लावतात! नुसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं. पहिली-दुसरीतली मुलं आणि आम्ही यांच्यात काही फरक आहे की नाही?
मुळात आमचं म्हणणं असं की विद्यार्थ्यांना नुसते हात धुवायला लावून उपयोग काय? शाळेतल्या इतर स्वच्छतेचं काय? असे दिवस साजरे करायचे म्हटले तर शाळेतली ‘टॉयलेटस धुवा दिवस’ सर्वात आधी साजरा झाला पाहिजे. खरं तर ‘साजरा करणं’ या शब्दालाच आमचं ऑब्जेक्शन आहे. ‘साजरा’ म्हटलं की त्यात नुसती शो-बाजी होते.
दादा सांगत होता की, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय ‘हात धुवा दिवस’ तर गेल्याच वर्षी पाळण्यात आला होता- १५ ऑक्टोबर २००८ ला, पण तेव्हा आपल्याला त्याचा पत्ता तरी होता का? की म्हणते की तेव्हाही आपल्या सरकारला माहीत होतं त्याबद्दल. म्हणून त्यांनी ताबडतोब सचिन तेंडुलकरला त्याची जाहिरात शूट करण्यासाठी बोलावून घेतलं. पण त्यांना सचिनच्या डेटस मिळेपर्यंत २००९ साल उजाडलं, त्याला ते तरी काय करणार. यंदाही तो दिवस १५ ऑक्टोबरलाच पाळला गेला म्हणे. मग आल्याकडेच २७ ऑक्टोबर, २७ ऑक्टोबर काय चाललं होतं कोण जाणे. कदाचित असं असेल की, ज्यांना १५ तारखेला जमलं नसेल त्यांनी (निदान) २७ तारखेला तरी हात धुवून घ्यावेत. कारण इतर वेळी हात धुण्याच्या फारशा फंदात न पडणाऱ्या जनतेपैकी निम्म्यांनी जरी हात धुवायचे ठरवले तरी आपल्याकडे पाण्याची लगेच टंचाई निर्माण होणार हे सरकारनं ओळखलं म्हणून उरलेल्यांसाठी त्यांनी वेळीच २७ तारखेची सोय करून ठेवली.
त्या ‘हात धुवा’च्या जाहिरातीत साबणाच्या वडीसकट हात वाहत्या पाण्याखाली धरलेले दाखवतात. त्यामुळे ती तर साबण धुवाची जाहिरात वाटते. पण तेही बरोबरच आहे म्हणा. आधी ती साबणाची वडी स्वच्छ पाहिजे. तरच ती आपले हात स्वच्छ करणार.
आता साबणाच्या जाहिराती करणाऱ्यांना एक नवीन पॉइंट मिळेल. आता जाहिरातीत ते म्हणतील, ‘आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवशी ९३. २ टक्के लोकांनी आमच्याच साबणाने हात धुतले’ किंवा ‘आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवशी ज्या घरात आमचं साबण वापरलं जातं त्या घरात बच्चे कम बीमार पडते है’ वगैरे वगैरे (देटॉलवाल्यांनी एव्हाना अशी जाहिरात बनवायला सुरुवातही केली असेल. ) पण एकच दिवस आणि फक्त हातांची स्वच्छता पाळून उपयोग काय?
जसं एकच दिवस अर्धा तास कार्टून चॅनलचं प्रक्षेपण बंद ठेवून उपयोग काय? ते निक चॅनल अर्धा तास बंद राहीलं तर मुलं दुसरं चॅनल बघतील. सगळी कार्टून चॅनल्स संध्याकाळी ५ ते ७ या वेळात बंद राहिली तर ते खरे. कार्टून चॅनल्स संध्याकाळी ५ ते ७ या वेळात बंद ठेवायची. सास-बहूच्या सीरियल्सची चॅनल्स रात्री ७ ते १० बंद ठेवायची. म्हणजे ते कार्यक्रम आपोआपच ५ ते ७ या वेळात प्रक्षेपित होतील. मुलं तेव्हा बाहेर खेळतील आणि आया टीव्ही बघतील. मुलं ७ वाजता घरी येऊन कार्टून लावतील, आया स्वयंपाक करतील. म्हणजे सगळं पुन्हा पहिल्यासारखं सुरू राहील. त्यापेक्षा हात धुवा दिवसासारखा आंतरराष्ट्रीय ‘टीव्ही बंद ठेवा दिवस’ पाळला पाहिजे. अख्ख्या वर्षांचा मिळून एकच दिवस टीव्ही बंद ठेवायचा. अख्ख्या वर्षांचं मिळून एकच दिवस मुलांनी मोकळ्या मैदानात खेळून घ्यायचं. म्हणजे मग सगळेच आपापल्या रुटीनप्रमाणे वागायला वर्षभर मोकळे. नेहमीप्रमाणे हे सगळे अकलेचे तारे आम्ही त्या रात्री ‘की’च्या घरी तोडले. त्यावरून जाम हसलो. शेवटी शेजारी पाजारी आवाज ऐकून तक्रार करतील असं वाटून जेव्हा तिनं दिवे बंद करून ‘आंतरराष्ट्रीय झोपी जा दिवस’ घोषित केला तेव्हा आमची बडबड थांबली.

(१० डिसेंबर २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीतला माझा लेख. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=30384:2009-12-09-10-03-13&catid=74:2009-07-28-04-56-38&Itemid=87 )

Comments

हात धुवा दिन मस्तच.. त्यापेक्शा फक्त "धुवा दिन" जास्त सर्वसमावेशक वाटलं असतं नाहि, हात धुवा, पाय धुवा, तोड धुवा असले सगळे धुने त्यात आले असते नाहि... बाकी छान धुता, स्वारी लिहता तुम्हि.

आपला..

साळसुद पाचोळा.
Anonymous said…
Beautiful writing, and a great blog.
सागर said…
Chan Lihilays.....Ajun vachayala aavdel....
Anonymous said…
साबण धुण्याची आयडीया अफलातुन.. मस्त जमलाय लेख. आवडला.
Gouri said…
सुंदर!!!

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)