एक विकट हास्य... कुंच्याचं !!


एक दिवस घरातल्या कागदपत्रांच्या फाईल्स्‌मधे मी एक पावती शोधत होते. निरनिराळी महत्त्वाची पत्रं, पावत्या इ. गोष्टी त्या-त्या फाईलला लावण्याचं काम माझा नवराच करत असल्याने (मी त्या कामात कधी लक्ष घालत नाही हे ओघानं आलंच!) ऐनवेळेला नवर्‍याच्या अनुपस्थितीत हवा तो कागद अथवा पावती योग्य त्या फाईलमधे शोधणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं कामच असतं!
नवर्‍यानं खरं म्हणजे प्रत्येक फाईलवर व्यवस्थित नाव, नंबर इ.च्या चिठ्ठ्या डकवलेल्या आहेत. तरीही इष्ट कागद मिळण्यापूर्वी ती विशिष्ट फाईल मला कमीतकमी दोनवेळा तरी अथपासून इतिपर्यंत धुंडाळावी लागते. म्हणजे मुळात मी योग्य ती फाईल उचललेली असते, आतले कागद पालटायलाही सुरूवात केलेली असते, भसाभसा कागद चाळताना मला हवा तो कागद नेमका त्याच्या आधीच्या कागदाला चिकटून पालटला जातो आणि एकाक्षणी अचानक त्या फाईलचा मागचा रंगीत पुठ्ठाच माझ्या पुढ्यात येतो. चरफडत, नवर्‍यावर वैतागत, ‘नेमकी हीच पावती या फाईलला कशी नाही लावली याने...’ असं स्वतःशी बडबडत मी कपाटातून अजून तीनचार फाईल्स्‌ धपाधप काढते.
कधीकधी त्या फाईल्स्‌वर लावलेल्या चिठ्ठ्यांचा आणि मी शोधत असलेल्या कागदाचा आपसांत काहीही संबंध नसतो. म्हणजे, ‘व्हेईकल्स्‌’ अशी चिठ्ठी लावलेल्या फाईलमधे मुलाच्या जन्मतारखेच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत शोधण्यात खरं म्हणजे काहीही अर्थ नसतो. पण तरी ‘न जाणो, यात असली तर...’ अशा विचाराने ती फाईल न धुंडाळता मला खाली ठेववतच नाही. अशी ३-४ फाईल्समधे उलथापालथ घडवत असताना सतत हे जाणवत असतं की सर्वात पहिली फाईलच बरोबर होती. त्यातच नीट शोधलं पाहीजे...
त्यादिवशी असंच झालं. नव्वंकोरं वॉशिंगमशिन दुरुस्त(?) करायला कंपनीकडून माणूस आला होता. वॉ.मशिन वॉ.पिरीयडमधलं असल्यामुळे त्याला त्याची पावती आणि वॉ.कार्ड दाखवणं गरजेचं होतं. नेहमीप्रमाणे ‘हाऊसहोल्ड इक्विपमेंट्स’ची फाईल एकदा चाळून झाली. त्यात पंखे, मिक्सर, फ्रीज, टी.व्ही., टॉर्च, घाऊक भावात घेतलेल्या सहा ट्यूबलाईट्स... म्हणजे ज्या क्रमानं उपकरणं घरात आली त्याच क्रमानं त्याच्या पावत्या वगैरे लावून ठेवलेल्या होत्या! हे असलं सगळं माझा नवराच करू जाणे! (आता विचारलं तर तो कबूल करणार नाही, पण माझी खात्री आहे की त्या फाईलमधे सर्वात पहिला माझाच फोटो लावण्याची तीव्र इच्छा त्यानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच दडपून टाकली असणार!) सग्गळ्या पावत्या, गॅरंटी-वॉरंटी कार्ड्स सर्व काही सापडलं. एक मेली ती वॉशिंगमशीनची पावती काही सापडेना! मग सॅलरी-स्लीप्स्‌, म्युच्युअल फंड्स अशा विषयांना वाहीलेल्या दोन-तीन फाईल्सही धुंडाळून झाल्या. पण ती पावती मला सापडू द्यायची नाही असं त्या सर्वजणींनी म्युच्युअली ठरवलेलंच दिसत होतं.
सवयीनं म्हणा, हताश होऊन म्हणा, एक शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणा, मी पुन्हा ‘इक्विपमेंट्स’च्या फाईलकडे मोहरा वळवला. एक क्षण डोळे मिटून, विचार करून ‘वॉशिंग मशिन हे ‘घरगुती उपकरणे’ याच शीर्षकाखाली येतं ना?’ असा प्रश्न स्वतःला विचारला. सुदैवानं त्याचं होकारार्थी उत्तर मिळाल्यावर ‘हर हर महादेव’ म्हणून पुन्हा फाईल उघडली. या खेपेला दीडव्या मिनिटाला मला ती पावती सापडली. आधीच्या व्हॅक्यूम क्लीनरच्या पावतीला चिकटून ही देखील पालटली गेली होती.
फाईल हातातून खाली ठेवताना व्हॅक्यूम क्लीनरच्या पावतीपाशी मी एक क्षणभर थबकले. ती पावतीही मला पुन्हा नीट, निरखून वाचाविशी वाटली. पण दुरुस्तीसाठी आलेला माणूस आपलं काम संपवून बाहेर हॉलमधे ताटकळत उभा असेल हे लक्षात येताच मी हातातली फाईल बंद केली आणि लगबगीनं वॉशिंग मशीनची पावती घेऊन हॉलमधे गेले. तर तिथे तो टी.व्ही.वरची क्रिकेटची लाईव्ह मॅच बघण्यात गर्क होता! (तो आला तेव्हा मी ही तेच करत होते.) सेहवाग ८६ धावांवर खेळत होता, श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुवत होता. त्याच्या उरलेल्या १४ धावा निघेपर्यंत जरी मी आत पावती शोधत बसले असते तरी त्याची (म्हणजे सेहवागची नाही हो, मशिनवाल्याची) काहीही हरकत नव्हती!
पाच मिनिटांत सर्विसकार्डवर माझी सहीबिही घेऊन तो (बहुतेक नाईलाजानंच) निघून गेला आणि मी माझा मोहरा पुन्हा एकदा घरगुती उपकरणांच्या फाईलकडे वळवला.
काय बरं शोधायचं होतं मला?... हं, ती व्हॅक्यूम क्लीनरची पावती.
त्या पावतीवर आठ वर्षांपूर्वीची तारीख होती. याचा अर्थ असा होता की, ज्या क्र. उ. घ. आली, त्याच क्र. त्यांच्या पा. फा.ला लावण्याची नवर्‍याची सवय बघता व्हॅक्यूम क्लीनरनंतर गेल्या आठ वर्षांत आम्ही काही विकतच घेतलेलं नव्हतं! ती खरेदीच तशी होती म्हणा. मला नुसत्या गृहिणीची ‘आधुनिक शहरी गृहिणी’ बनवण्यात त्या खरेदीचा मोलाचा वाटा होता! त्या खरेदीनंतर ही नव-आधुनिक गृहिणी अशी काही भरून पावली की नंतर कुठल्याही नव्या वस्तूसाठी नवर्‍याकडे तगादा लावण्याचं तिनं जवळजवळ सोडूनच दिल्यासारखंच होतं. (त्यामुळे नवर्‍याच्या गृहस्थाश्रमातलीही मजाच निघून गेली असावी. बहुदा म्हणूनच थोडीथोडकी नव्हे तर तब्बल आठ वर्षं वाट पाहून, कंटाळून शेवटी त्यानं मनानंच जुनं देऊन नवीन वॉशिंग मशीन घरात आणलं असावं!)
व्हॅक्यूम क्लीनर आपल्या शहरी बाजारात प्रथम आला तो आम्ही कॉलेजमधे असताना. तेव्हा त्याची जाहीरात करण्यासाठी, प्रात्यक्षिकं देण्यासाठी उच्चभ्रू वस्त्यांमधून दारोदार फिरणारे, चकाचक पेहरावातले आणि गुळगुळीत इंग्रजी बोलणारे त्या कंपनीचे ‘मार्केटींग एक्झिक्युटीव्हज’ (हा शब्दही आम्हाला तेव्हा नवीन नवीनच कळला होता. तोपर्यंत ‘मार्केटीग’ म्हणजे खरेदी असंच वाटायचं!) हेच आम्हा मैत्रिणींमधे चर्चेचा मुख्य विषय असायचे. घरगुती स्वच्छतेशी, साफसफाईशी त्या वयात(ही) फारसा संबंध नसायचा. त्यामुळे ज्या मैत्रिणीच्या घरी ते डेमोवाले जायचे ती दुसर्‍या दिवशी कॉलेजमधे प्रत्यक्ष डेमोपेक्षा त्या ‘चिकण्या डेमोवाल्या’चंच जास्त रसभरीत वर्णन करायची!
त्या काळात ‘उच्च-मध्यमवर्गीय’ ही जमात अजून निर्माण व्हायची होती. मध्यमवर्गीयांच्या भुवया व्हॅक्यूम क्लीनरला (आणि त्याच्या किंमतीलाही) सहजपणे सामावून घेऊ शकतील इतक्या ताणलेल्या नव्हत्या. त्यामुळे तेव्हा या डेमोवाल्या मंडळींचा आमच्यासारख्यांच्या सोसायट्यांकडे मोहरा वळलेला नव्हता.
व्हॅक्यूम क्लीनरबद्दलच्या अशा सुप्तावस्थेत असणार्‍या आकर्षणानं त्या आठ वर्षांपूर्वीच्या रविवारच्या सकाळी पुन्हा एकदा उचल खाल्लेली मला चांगली आठवतेय. आमच्या लग्नाला ५-७ वर्षं उलटून गेलेली होती. संसारात निर्माण होऊ पाहणार्‍या पोकळीला झाडून, झटकून टाकण्यासाठी आम्हाला व्हॅक्यूम क्लीनरची गरज भासायला लागली होती. शिवाय, त्या डेमोवाल्यांना जवळून न्याहाळायची, कधीकाळी मैत्रिणींकडून ऐकलेलं त्यांचं वर्णन, उशीरानं का होईना, पडताळून पाहण्याची मला संधी मिळाली होती.
पण कसलं काय! कॉलेजमधे ते वर्णन ऐकताना मला जितकी मजा आली होती त्याच्या निम्मीसुध्दा घरी आलेल्या त्या दोघा टायवाल्यांना पाच फुटांवरून प्रत्यक्ष पाहताना आली नाही. मनाच्या या अवस्थेलाच प्रौढत्त्व म्हणत असावेत!
डेमोवाल्यांना न्याहाळून फारसा काही उपयोग नाही म्हटल्यावर आता प्रत्यक्ष डेमोलाच मी न्याहाळायचं ठरवलं.
टाय क्र. १ एका मोठ्या खोक्यातून मूळ यंत्रासोबत त्याच्या एकएक ऍटॅचमेंट्स बाहेर काढत होता. जोडीला टाय क्र. २ ची कॉमेंट्री सुरू होती - पंखे वरच्या बाजूनं साफ करायचे असतील तेव्हा हे वापरायचं, ट्यूबलाईट्सच्या मागच्या बाजूची स्वच्छता करायची असेल तेव्हा हे वापरायचं, हे कपाटाच्या मागे, हे सोफ्याच्या खाली, हे अमक्याच्या कोपर्‍यात, ते तमक्याच्या बेचक्यात... आजपर्यंत केवळ कुंचा आणि फारफारतर बांबूझाडू वापरल्या जाणार्‍या घरातले आम्ही! ‘घरातली धूळ झटकणे’ या अत्यंत दुर्लक्षित मानल्या गेलेल्या कामातही इतकं वैविध्य असेल याची आम्हाला कल्पनाच नव्हती...
प्रत्येक प्रकारच्या साफसफाईचं आमच्यासमोर प्रात्यक्षिक सुरू होतं - सतत वेटोळं करून बसण्यातच धन्यता मानणारा एक होज पाईप, त्याच्यापुढे दोन लांबलचक नळकांडी आणि शेवटी कसलासा ब्रश असं एकमेकांना जोडून खोलीतल्या लांबच्या कोपर्‍यातल्या कोळी आणि कोळीष्टकांसाठी एक मोठा ट्यूब-वे तयार करायचा आणि बसल्याजागी यंत्राचं बटण दाबून त्यांना आपल्या दिशेला बोलवायचं की झालं! अब घर की सफाई इतनी आसान!
आम्ही डोळे विस्फारून ते सगळं बघत होतो. माझ्या मनात आलं - आदल्याच आठवड्यात मान आणि कंबरडं मोडून मी घराची जी स्वच्छता केली होती ती केली नसती तरी चाललं असतं. ते काम या टायवाल्या सफाई-कामगारांकडून सहज करून घेता आलं असतं. (अर्थात, त्या साफसफाईदरम्यान झालेल्या आमच्या भांडणातूनच व्हॅक्यूम क्लीनर विकत घेण्याचा निर्णय जन्माला आला होता हा भाग निराळा!)
केवळ साफसफाईशी संबंधित ऍटॅचमेंट्सच नाहीत तर गॅलरीतल्या कुंड्यांमधल्या झाडांवर आणि खिडकीच्या काचांवर पाणी फवारण्यासाठी एक वेगळी ऍटॅचमेंट, कपड्यांच्या कपाटात डांबराच्या गोळ्यांचा नुसता वास पसरवून झुरळांना फसवण्याचा डांबरटपणा करणारी एक ऍटॅचमेंट, महत्त्वाची कागदपत्रं किंवा भारी साड्या ‘व्हॅक्यूम पॅक’ करू शकेल अशी एक ऍटॅचमेंट... काय काय नव्हतं त्या खोक्यात!
त्यातच एक ‘ब्लोअर’ नावाची ऍटॅचमेंट होती. धूळ झटकणे या प्राथमिक कामाबरोबरच ‘हेअर ड्रायर’ म्हणूनही त्याचा उपयोग करता येतो असं सांगून टाय क्र. २ नं त्याचा अनपेक्षितपणे माझ्यावरच प्रयोग केला. आपल्या कामाशी इतका एकरूप झालेला मनुष्यप्राणी त्यानंतर आजतागायत मी पाहिलेला नाही. रविवार असल्यामुळे मी केस धुतलेले होते. बोलता बोलता त्याचं माझ्या ओल्या केसांकडे लक्ष गेलं आणि मला काही कळायच्या आत त्यानं तो ब्लोअर सुरू करून थेट माझ्या केसांवरच रोखला. त्या हवेच्या झोतामुळे माझ्या डोक्याचं बघता बघता साळींदर झालं. दरम्यान माझ्या मुलानं कोपरातून वाकवलेल्या हातासारखं दिसणारं एक नळकांडं बंदुकीसारखं धरून माझ्यावर रोखलं होतं. त्यामुळे त्याच्या त्या ‘हॅन्ड्स अप!’ कृतीला मी ‘हेअर अप!’ करून प्रत्त्युत्तर दिल्यासारखं वाटत होतं.
माझा अवतार पाहून माझ्या नवर्‍याला आणि टाय क्र. १ ला हसू आवरे ना! आपली चूक लक्षात आल्यावर टाय क्र. २ नं काय करावं? काही न सुचून त्यानं ब्लोअरचा रोख एकदम माझ्या पायांकडेच वळवला. ‘ओले पाय वाळवायचे असतील तरी याचा वापर करता येईल...’ असलं काहीतरी वेडपटासारखं बोलून आपल्या आधीच्या अतिउत्साही कृतीवर पडदा टाकायचा केविलवाणा प्रयत्न केला.
व्हॅक्यूम क्लीनर विकत घेण्याचं आम्ही आधीच नक्की केलेलं असल्यामुळे या साळींदर प्रकरणाचा त्याच्या विक्रीवर परिणाम होणार नव्हताच.
...आणि अशा तर्‍हेनं आठ वर्षांपूर्वीच्या त्या रविवारी सकाळी मी एक अत्याधुनिक गृहिणी बनले होते!
व्हॅक्यूम क्लीनरसोबत पुढची वर्ष-दोन वर्षं अगदी छान गेली. मी अगदी उत्साहानं घराच्या साफसफाईसाठी एक दिवस मुक्रर करायचे. मारे गणेशचतुर्थीच्या पूजेच्या तयारीच्या थाटात सगळ्या ऍटॅचमेंट्स पुढ्यात मांडून ठेवायचे. एक-एक करून कटाक्षानं त्या सगळ्या वापरायचे. हातातलं ट्यूब-वेचं नळकांडं खिडकीतून बाहेर काढून वाकूनबिकून बाहेरची जळमटं साफ करायचे. असं करताना आसपासच्या घरांतल्या बायका आपापली कामं विसरून अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे पाहतायत असा मला भास व्हायचा. माझ्या चेहर्‍यावर नकळत एक समाधानाचं हसू पसरायचं...
पण काही काळानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की त्या एका समाधानाच्या हास्यासाठी माझा खूप जास्त वेळ खर्ची पडतोय. व्हॅक्यूम क्लीनरचं खोकं बाहेर काढून... यंत्राला सगळ्या ऍटॅचमेंट्स जोडून... स्विच ऑन करून... प्रत्यक्ष पहिलं जळमट नळकांड्यात खेचून घेईपर्यंत इतका वेळ जायचा की तेवढ्या वेळात नुसत्या कुंच्याच्या मदतीनं अर्धीअधिक खोली अगदी सहज स्वच्छ होईल हे उमगताच वर्षाकाठी पाच सहा वेळा होणारी घराची ही षोडषोपचारे स्वच्छता एकदा किंवा दोनदाच होऊ लागली...
आजही कधीतरी अचानक मला माझ्या व्हॅक्यूम क्लीनरची आठवण येते. पुन्हा एकदा घराच्या साग्रसंगीत साफसफाईसाठी मी एक दिवस मुक्रर करते. सग्गळ्या ऍटॅचमेंट्स वापरायचं ठरवून अगदी उत्साहात माळ्यावरून त्याचं खोकं काढते. तर त्याच्यावरच प्रचंड धूळ साचलेली असते. मग मला ती कुंच्यानंच झटकावी लागते. सात-आठ महिन्यांतून एकदाच मिळणार्‍या सुट्टीच्या दिवशीही काम करावं लागल्यामुळे कुंचा आधी आठ्या घालतो. पण काय काम करायचं आहे ते लक्षात येताच त्याच आठ्यांची जागा विकट हास्यानं घेतलेली असते...
फाईलमधली व्हॅक्यूम क्लीनरची पावती बघून कुंच्याचं ते विकट हास्य मला पुन्हा एकदा आठवतं.... तसंच अजून एक विकट हास्य कपडे घासायच्या ब्रशकडून आणि धुपाटण्याकडून कधी ऐकायला मिळेल त्याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात आता काहीही उरलेलं नसतं...!!

Comments

Anonymous said…
हेअर ड्रायर चा प्रसंग मस्तं रंगवलाय.. पण खरंच असं झालं होतं???
Gouri said…
झकास जमलाय लेख.
’साळिंदर’ वाचून मी एकटीच हसते आहे ऑफिसमध्ये :D:D
kayvatelte,

साळिंदर चा प्रसंग खरंच तसा घडला होता :))
हेरंब said…
एकदम सही झालाय लेख. आमच्याकडे पण vacuum cleaner ची अशीच अवस्था झाली होती. अजिबात वापरला गेला नाही. शेवटी विकून टाकावा लागला :)
Shilpa said…
खूपच छान झाला आहे लेख.. सद्या मी सुद्धा नवीन vaccum cleaner घेतला आहे .. सद्या तरी मी इमाने इतबारे वापरत आहे.. आता बघू माझ्या कुंच्याचे आणि तुमचे कुंच्याचे भविष्य एकच आहे का ते..:)
बाकी लेख मस्त.. ड्रायर चा उपयोग पाय वाळवण्यासाठी सुद्धा करता येतो हे नव्याने कळले..:)
Pranav Joshi said…
नमस्कार,
मी प्रणव जोशी. "नेटभेट" या ब्लॉगवर लिहितो. गेल्या दिवाळीपासून दर महिन्यात आम्ही ई मासिक प्रकाशित करीत आहोत. ह्या महिन्याच्या (फेब्रुवारी २०१०) अंकात आपला हा लेख घेण्याची आमची ईच्चा आहे. ह्या विषयावर आधिक माहिती देण्यासाठी आपला ई मेल आय.डी. कळवावा.
धन्यवाद,
प्रणव जोशी.
pranav@netbhet.com
Pranav Joshi said…
नमस्कार,
मी प्रणव जोशी. "नेटभेट" या ब्लॉगवर लिहितो. गेल्या दिवाळीपासून दर महिन्यात आम्ही ई मासिक प्रकाशित करीत आहोत. ह्या महिन्याच्या (फेब्रुवारी २०१०) अंकात आपला हा लेख घेण्याची आमची ईच्चा आहे. ह्या विषयावर आधिक माहिती देण्यासाठी आपला ई मेल आय.डी. कळवावा.
धन्यवाद,
प्रणव जोशी.
pranav@netbhet.com

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)