Posts

Showing posts with the label पुस्तक परिचय

पुस्तक परिचय : US AGAINST YOU (Frederik Backman)

Image
BEARTOWN या पुस्तकाबद्दल मागे लिहिलं होतं.  ही तीन कादंबर्‍यांची मालिका आहे. त्यातला दुसरा भाग US AGAINST YOU वाचला. पहिल्या कादंबरीत हॉकी आणि तरुण हॉकी खेळाडू ही प्रमुख पात्रं होती. त्यांची एनर्जी होती. दुसर्‍या भागात खेळाभोवतीची इतर परिस्थिती, राजकारण, पैसा, हेवेदावे, चढाओढ, खेळाचं मॉनेटायझेशन या बाबी येतात. आज कोणत्याही व्यावसायिक खेळासोबत या गोष्टी असतात, होतातच, घडतातच. तो प्रश्न नाही. पण या गोष्टींबद्दल बोलताना हॉकी आणि तरुण मुलं काहीशी बाजूला सारलेली आहेत. पहिल्या भागात जी एक भूतो न भविष्यति घटना घडते, त्याचे पडसाद सर्व कोनांमधून दुसर्‍या भागात मांडलेले आहेत. त्यात अनेक बॅकस्टोरीज आहेत. खेळाशी निगडीत, तसंच घरगुती नातेसंबंधांच्या पातळीवरच्याही आहेत. लेखकाच्या शैलीमुळे पुस्तक पुढे पुढे वाचलं जातं. पण कुठलंच पात्र खणखणीतपणे समोर येत नाही. किंबहुना, या भागाचा तो उद्देशच नसावा. त्या घटनेमुळे बेअरटाऊनला आलेली मरगळ, एकसाचीपणा, गावातल्या हॉकीचं लटकतं भविष्य, संघबांधणीला बसलेला झटका असं सगळं अगदी धीम्या गतीने मांडलेलं आहे. मुलांच्या संघाची नवीन कोच - हे एक नवीन पात्र आहे....

पुस्तक परिचय : CARELESS PEOPLE (Sarah Wynn-Williams)

Image
लेखिका फेसबुकमध्ये ७ वर्षं पब्लिक पॉलिसी डायरेक्टर होती. ती मूळची न्यूझीलंडची. अमेरिकेत नोकरी करत असताना ख्राइस्टचर्चचा भूकंप झाला. त्यात तिचे घरचे सापडले. आई-वडिलांशी काही दिवसांत सम्पर्क झाला, पण बहीण बेपत्ता होती. पुढे बहिणीशीही संपर्क झाला तो फेसबुकच्या मदतीने. तोपर्यंत लेखिकेला फेसबुकबद्दल फारसं माहिती नव्हतं. या निमित्ताने फेसबुकसारख्या माध्यमाची ताकद तिला समजली. आपण इथे नोकरी करायलाच हवी असं तिच्या मनाने घेतलं. तोवर ती डिप्लोमॅटिक क्षेत्राशी संबंधितच काम करत होती. तिच्या स्किल्सचा, 'पब्लिक पॉलिसी' या गोष्टीचा फेसबुकमध्ये काय उपयोग, मुळात गरजच काय, असं फेसबुकच्या टॉप ब्रासचं मत होतं. पण आपल्या अनुभवाचा फेसबुकला उपयोग होईल हे तिने त्यांच्या गळी उतरवलं. त्यांच्या खनपटीला बसून तिच्यासाठी वेगळी पोस्ट निर्माण करायला लावली. हा सगळा भाग रंजक, क्रिस्प आहे. तिच्या द्रष्टेपणाचं कौतुक वाटतं. झुकरबर्गने आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संबंध वाढवायला हवेत हा विचार तिने पहिल्यांदा फेसबुकमध्ये मांडला. त्यासाठी जमेल तो सगळा आटापिटा केला. या टप्प्यावर पुस्तक अधूनमधून रटाळ व्हायला सुर...

पुस्तक परिचय : Permanent Record (Edward Snowden)

Image
एडवर्ड स्नोडेननं २०१३ साली केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल मला जुजबी माहिती होती. तेव्हाच्या पेपरात आलेल्या बातम्या काही दिवस मी फॉलो केल्या असतील, नसतील. मात्र नंतर त्याबद्दल विसरायला झालं होतं. पण नुकतंच हे पुस्तक वाचलं.  मला आवडलं. त्यात प्रत्यक्ष गौप्यस्फोटाचा भाग शेवटच्या ७०-८० पानांमध्ये येत असेल. ते थ्रिलिंग आहेच. पण त्यापूर्वीची शाळकरी वयापासूनची त्याची जडणघडण, कम्प्युटर आणि इंटरनेटवर त्याचं बालपण, teens पोसलं जाणं, त्यातून त्याचं geek बनत जाणं, देशासाठी काहीतरी करायचं या प्रेरणेनं सुरू केलेली नोकरी - हा भागही खूप वाचण्यासारखा आहे. त्यानं तो अगदी प्रामाणिकपणे, प्रांजळपणे, आडपडदा न ठेवता लिहिलाय. तो वाचकांच्या पुढ्यात बसून गप्पा मारतोय असं वाटतं. कम्प्युटर, इंटरनेट, त्याच्याशी जोडलेलं तंत्रज्ञान, माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याचा होणारा अधिकाधिक वापर, या सगळ्याबद्दल सांगताना त्यानं जागोजागी तात्विक पातळीवर भाष्य केलं आहे. ते शोधायला, वाचायला खूप मजा आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं माणसाच्या जीवनातलं महत्व काय याचा तात्विक पातळीवर विचार स्नोडेनच्या मनात सतत नकळत सुरू होता, की या पुस्तक...

पुस्तक परिचय : दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी (बालाजी सुतार)

Image
अस्वस्थ वर्तमान, बेरोजगारी; शहरीकरणाच्या रेट्यात गुदमरणारा, घुसमटणारा निमशहरी, ग्रामीण भाग; तरुणांच्या आकांक्षा धारातीर्थी पडणे; ऑनलाइन मैत्री आणि भ्रमनिरास; असे आधुनिक जगण्याचे वेगवेगळे पदर, त्यातले हेलकावे, त्यात अडकलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे मूड्स, यांच्याबद्दलचं हे लिखाण आहे. आणि ते प्रभावी आहे. पुढे पुढे वाचत राहावं असं वाटणारं आहे. पुस्तकाचं ब्लर्ब वाचून हा कथासंग्रह असल्याचा माझा समज झाला होता. पैकी तीन व्यवस्थित ’कथा’ म्हणाव्यात अशा आहेत. त्यातली ’दोन जगातला कवी’ ही कथा मला खूप आवडली. कथेचा शेवट किंचित प्रेडिक्टेबल असूनही ’फँड्री’ सिनेमाप्रमाणे वाचकाला जोरदार फटकावतो. दुसरी कथा ’निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’ ऑनलाइन मैत्री-चॅटची दुसरी बाजू सांगणारी आहे. त्याला स्त्री-पुरुष भेदाभेदाचाही पदर आहे. काही ठिकाणी ही कथा जरा टिपिकल वळणावर जाते. त्यामुळे मला खूप आवडली नाही. तिसरी ’डहूळ डोहातले भोवरे’ सुद्धा ठीकठाक वाटली. प्रसंग, व्यक्तीचित्रण, वातावरणनिर्मिती तिन्हीतली आवडली. दोन निमकथा-टाइप आहेत. त्यातली वातावरणनिर्मितीही खूप छान आहे. बाकी लेख म्हणजे निरिक्षणं, नोंदी...

पुस्तक परिचय : गोठण्यातल्या गोष्टी (हृषीकेश गुप्ते)

Image
या पुस्तकाचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासून शीर्षकाचा अर्थ मी वेगळाच लावत होते. गोठणे हे क्रियापद मानून abstract शीर्षक असावं अशी समजूत करून घेतली होती. (मनं गोठतात त्याच्या गोष्टी, वगैरे.) पण, हे तसं काहीही abstract नाही. गोठणे हे गाव आहे. (नागोठणेचा संदर्भ लेखकानेच सुरुवातीला दिला आहे.) लहानपणीच्या गावातल्या आठवणी असं पुस्तकाचं स्वरूप आहे. मुख्य भर व्यक्तिचित्रणावर आहे. मित्रमंडळींच्या गप्पाटप्पांमध्ये किस्से सांगण्यासारखी लेखनाची धाटणी आहे. ते सगळं वाचायला मजा येते. काही व्यक्ती एकाहून अधिक लेखांमध्ये प्रसंगानुरूप, कधी केवळ एखाद्या उल्लेखापुरत्या येतात. त्यातून गावाचं एकजिनसी चित्र समोर उभं राहतं. खेडेगावातल्या/निमशहरी गावातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभावविशेष, विशेष अशा ठिकाणीच उद्भवू शकतील असे प्रसंग, पात्रांची बोलीभाषा हे सगळं टिपत टिपत चवीचवीने वाचण्याचं पुस्तक आहे. निवेदनाच्या ओघात आलेले ट्रक मालवाहतुकीच्या व्यवसायातले बारकावे, मूर्तीकारांच्या कामांशी संबंधित वर्णनं किंवा अगदी गावाकडचे पतंग उडवण्याच्या युनिव्हर्सचे तपशील वाचायला मला फार आवडले. युनिव्हर्स अशासाठी म्हटलं, क...

पुस्तक परिचय : The Naturalist (Andrew Mayne)

Image
एका विज्ञान संशोधक विद्यार्थिनीचा जंगलात अभ्यासासाठी गेलेली असताना मृत्यू होतो. पोस्टमार्टेममध्ये दिसतं की हा अस्वलाने केलेला हल्ला आहे. पोलीस हादरतात. जोरदार शोधमोहिम सुरू करतात. आणि अखेर त्या अस्वलाला गाठून ठार मारतात. आधी पोलिसांना ही खुनाची घटना वाटत असते. त्या संशोधक विद्यार्थिनीचा जुना विज्ञान प्रोफेसर हा पोलिसांचा प्राइम सस्पेक्ट असतो. पोलीस त्याला चौकशीसाठी धरतात. पण पुरेशा पुराव्याअभावी त्याला जाऊ देतात. त्यामुळे प्रोफेसरचा या प्रकरणातला इंटरेस्ट वाढतो. नाहीतर त्याचा त्या मुलीशी आता काहीही संपर्क उरलेला नसतो. प्रोफेसरचं विज्ञान संशोधक डोकं त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो इंटरनेटवर या केसशी संबंधित तपशील शोधतो. आपल्या परीने डॉट्स जोडायला लागतो. त्यासाठी लॉजिक, ए.आय., bio-informatics वगैरेची मदत घेतो. त्यातून काही शक्यता समोर येतात. त्या तो पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण पोलिसांनी एव्हाना अस्वलाला पकडून मारलेलं असल्यामुळे ते याला भीक घालत नाहीत. पण प्रोफेसर हळूहळू त्या केसमध्ये ओढला जातो. तो एकटा पोलिसांपासून लपूनछपून पण शिस्तीत तपास सुरू करतो. हा तपास पूर्णपणे सायन्...

पुस्तक परिचय : गॉगल लावलेला घोडा (निखिलेश चित्रे) कथासंग्रह

Image
अद्भुत, मॅजिकल रिअ‍ॅलिझम, फँटसी, फिक्शन - असं सगळं मिश्रण असणार्‍या कथा. काही कथांमध्ये sarcasm आहे, आसपासच्या घटनांवर सूचक भाष्य आहे. एखाद्या कथेतला एखादा तपशील एकदम रिलेट होतो आणि वाचताना एक स्पार्क जाणवतो. त्या दृष्टीने 'लोकर्‍या' ही कथा खूप आवडली. तशी प्रत्येक कथेत काही ना काही गंमत आहेच. काही पात्रं एकाहून जास्त कथांमध्ये येतात. ते धागे जुळवतानाही कथांमध्ये गुंतायला होतं. शीर्षककथाच मला तितकीशी कळली नाही. मोठा रिव्ह्यू लिहायची इच्छा असूनही लिहायला जमत नाहीये. त्याला कारणही या कथाच. मी या प्रकारचं एकगठ्ठा काहीतरी पहिल्यांदाच वाचलं. मजा आली वाचायला. पण आस्वादात्मक सविस्तर लिहायचं तर पुन्हा एकदा सर्व कथा वाचाव्या लागतील हे जाणवलं. तरी चुकवू नये असं पुस्तक आहे इतकं नक्की सांगू शकते.

पुस्तक परिचय - White Rose, Black Forest (Eoin Dempsey)

Image
  महायुद्धावर आधारित फिक्शन अधूनमधून वाचायला मला आवडतं. तसंच हे आवडीखातर वाचण्याचं पुस्तक आहे. आयुष्यात सर्व काही गमावून बसलेली तरुण नायिका सुनसान ब्लॅक फॉरेस्टमध्ये आत्महत्या करायला निघाली आहे. गडद थंडी, सगळीकडे बर्फ, अशात कुठेतरी जाऊन स्वतःवर गोळी झाडून घ्यायची असा तिचा विचार आहे. दिशाहीन चालत निघालेली असताना तिला एके ठिकाणी एक सैनिक अर्धमेला होऊन पडलेला दिसतो. त्याच्या पाठीवर पॅराशूट असतं. एक सॅक, त्यात काही सामान. गणवेशावर जर्मन स्वस्तिक आणि नाव. ती व्यवसायाने नर्स असते. नाझींमुळेच तिचे सगळे कुटुंबीय मारले गेलेले असतात. तरी त्या सैनिकाला मदत न करता तसंच निघून जायचं हे तिला पटत नाही. ती त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचं ठरवते. तिची ती खटपट, तो सैनिक कोण असतो, गेस्टापोंना संशय येणं, पाठलाग, त्यांच्यापासून सुटका करून घेण्याची पुढची धडपड, अधेमध्ये तिचे फ्लॅशबॅक्स – अशी ही कादंबरी आहे. ‘व्हाइट रोझ’ या चळवळीबद्दल याआधी कधी वाचण्यात आलं नव्हतं. ते या पुस्तकामुळे समजलं. त्या चळवळीतली दोन प्रमुख नावं - हान्स आणि सोफी - फ्लॅशबॅकमधली पात्रं म्हणून येतात. युद्धपरिस्थिती, थंडीचे ब...

पुस्तक परिचय : बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव)

Image
 हे तीन मोठ्या कथांचं छोटंसं पुस्तक आहे. कथा, लघुकथा, दीर्घकथा – यांची नक्की व्याख्या कशी करायची याबाबत माझ्या मनात कायम गोंधळ असतो. माझ्या मते या पुस्तकातल्या तीनही कथा दीर्घकथा म्हणायला हव्यात. असो. पुस्तकातली पहिलीच (शीर्षक)कथा एक-नंबर आहे, भारी आहे, भन्नाट आहे, झकास आहे! बाळू हा कथानायक, निवेदक. कोल्हापूरजवळच्या खेड्यात दहावी झालेला. आणि आता त्याला कोल्हापूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिथेच तो हॉस्टेलवर राहणार आहे. त्याला हॉस्टेलला सोडायला समस्त घर त्याच्यासोबत कोल्हापूरला आलं आहे- आई, वडील आणि धाकटे दोन भाऊ. एस.टी.तून ते कोल्हापूरच्या स्टँडवर उतरतात. तिथून पायी चालत मार्केटमध्ये, तिथून बस पकडून जरा गावाबाहेर असणार्‍या इन्स्टिट्यूटपर्यंत, आणि इन्स्टिट्यूटच्या मेनगेटपासून बाळूच्या हॉस्टेलच्या खोलीपर्यंत त्या कुटुंबाचा प्रवास, म्हणजे ही ७६ पानी कथा. हा प्रवास लेखकाने असा काही रंगवला आहे, की बस्स! पहिल्या १-२ पानावरच्या पावसाच्या वर्णनापासूनच आपण बाळूच्या छत्रीतून चालायला लागतो. डांबरी रस्त्यावर पडणार्‍या पावसाच्या धारांना दिलेली उपमा, धाकट्या भावाच...

पुस्तक परिचय : इति-आदि (अरुण टिकेकर)

Image
आपल्या रोजच्या वापरातल्या, पाहण्यातल्या, अनुभवातल्या आणि इतिहासातल्याही लहान-मोठ्या गोष्टींबद्दल माहितीपर, उद्बोधक, रंजक स्वरूपात केलेलं लेखन आहे. छोटे छोटे २-३ पानी लेख आहेत. मिरची, केळी सिताफळ अशा आहारातल्या गोष्टी, भारतात खाण्याचा बर्फ कधी अवतरला, चुलीचा (म्हणजे अन्न शिजवण्याचा इतिहास), गुलाबाच्या अत्तराचा इतिहास, छपाईकला, गोधडी शिवण्याची कला अशा अनेको गोष्टींवर लिहिलं आहे. सामान्यज्ञान, सामान्य विज्ञान, आहारशास्त्र, मानववंशशास्त्र, अलीकडचा इतिहास (फडणविशी थाट, पेशवाईतल्या जेवणाच्या मेनूचं डिटेल वर्णन), संतसाहित्य, etymology असे अनेक पैलू या लेखनात येत राहतात. जुन्याजुन्या ग्रंथांतले संदर्भ दिले आहेत. इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या नोंदींचेही अनेक संदर्भ येतात. टिकेकरांचं स्वतःचं वाचन केवढं प्रचंड होतं ते यातून समजतं. आपल्याला माहिती असणार्‍या गोष्टी वाचकांनाही रंगवून सांगण्याची असोशीही दिसते. पुस्तकाचं कोणतंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी, असा हा विरंगुळा आहे. प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार यातले काही लेख आवडतील, लक्षात राहतील. तर काही वाचून बाजूला सारले जातील.   ...

खेळावर प्रेम असणार्‍या वाचकांसाठी (पुस्तकपरिचय : Beartown)

Image
स्वीडनच्या आर्क्टिक भागातलं एक लहानसं गाव- बेअरटाऊन. हे गाव आइस-हॉकीच्या प्रेमात बुडलेलं आहे. They talk ice-hockey, eat ice-hockey, sleep ice-hockey अशी परिस्थिती. गावात बेकारी वाढीस लागली आहे. बिनकामाची किंवा कामासाठी गाव सोडावं लागलेली माणसं वाढत चालली आहेत. अशा काळात हॉकीचाच (पुस्तकात बहुतेक ठिकाणी फक्त ‘हॉकी’ असाच उल्लेख आहे) त्यांना मोठा आधार वाटतो. १५-२० वर्षांपूर्वी बेअरटाऊनचा पुरुष संघ स्वीडनच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलला गेलेला. तो या गावाच्या हॉकीच्या इतिहासातला सर्वोच्च, सोनेरी क्षण. पण त्यानंतर इथल्या हॉकीत विशेष काहीच घडलेलं नाही. आणि आता इथला मुलांचा संघ राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेच्या सेमी-फायनलला पोहोचला आहे. पुस्तकाचं कथानक या टप्प्यावर सुरू होतं. Kevin हा या संघाचा मुख्य खेळाडू. आइस-हॉकी खेळातला हिरो. त्याला त्या खेळाची उपजत देणगी आहे. केविनने हात घातलेली कोणतीही गोष्ट सामन्यात वाया जात नाही, चुकीची ठरत नाही. त्याचे आई-वडील मोठे पैसेवाले, बेअरटाऊनच्या हॉकी क्लबचे मोठे देणगीदार. पण केविनच्या हॉकीप्रेमाशी, skills शी त्यांना फारसं देणंघेणं नाही. त्यांच्य...

पुस्तक परिचय : तडा (कथासंग्रह, ले. गणेश मतकरी)

Image
अनुभव अंकात मतकरींच्या ’बिनशेवटाच्या गोष्टी’ वाचल्या तेव्हापासून मी त्यांच्या कथालेखनाची फॅन आहे. (या गोष्टींचं नंतर पुस्तक झालं- ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’. ते २-३ वर्षांच्या अंतराने दोनवेळा वाचलं. पुन्हाही कधीतरी वाचू शकते.) त्यानंतर ‘इन्स्टॉलेशन्स’, ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हे त्यांचे कथासंग्रह वाचले. नुकतंच प्रकाशित झालेलं त्यांचं  पुस्तक  ’तडा’. या कथासंग्रहातल्या दोन कथा मला सर्वात आवडल्या. एक शीर्षककथा ’तडा’, त्यापेक्षाही आवडली ती ’ओळख’ कथा. ‘ओळख’ कथेत आपल्याकडचा एक ज्वलंत सामाजिक मुद्दा ज्या प्रकारे गोवलेला आहे ते मला फार आवडलं. एक-दोन कथा जरा ताणलेल्या/पाणी घातलेल्या वाटल्या. कोणती कथा आवडेल हे जरासं व्यक्तीसापेक्ष असू शकतं. त्यामुळे मुद्दा तो नाही. मतकरी ज्या perspective मधून कोणतीही कथा सुरू करतात आणि पुढे उलगडत नेतात ते note करण्यात मजा येते. टिपिकली कथेत ’पुढे काय होणार?’ किंवा ’शेवटी काय होणार?’ ही वाचकांना उत्सुकता असते, (किंवा तशी असणं अपेक्षित असतं.) पण मतकरींच्या कथांमध्ये destination पेक्षा journey जास्त इंटरेस्टिंग असते. कथांचा जर्म नंतर मनात summarize करायलाही ...

साडेतीनशे पानी झाकोळ (पुस्तक परिचय : Shuggie Bain, लेखक : Douglas Stuart)

Image
 १९९० च्या दशकाची सुरुवात. स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो. १५-१६ वर्षांचा एक मुलगा, शगी, कॉट-बेसिसवर एकटाच राहतोय. एका सुपरमार्केटच्या स्नॅक्स काऊंटरवर जेमतेम नोकरी करतोय. त्याच्या अवतीभोवती स्थानिक गरीब नाहीतर स्थलांतरित माणसं. अभावग्रस्त जीवन. शगीला हेअरड्रेसर व्हायचंय. पण आधी रोज येणार्‍या दिवसाला एकट्याने तोंड द्यायचंय. रोज येणार्‍या दिवसाला काहीही करून तोंड देणे हे त्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. कसं? कोण आहे हा शगी? त्याची गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी आपल्याला ११ वर्षं मागे नेते. ग्लासगोच्या एका भागात एका उंचच्या उंच इमारतीत सोळाव्या मजल्यावरचं एक घर. आजी-आजोबा, मुलगी-जावई, तीन नातवंडं. शगी या नातवंडांमधला सर्वात धाकटा. या वर्णनावरून जे छानशा कुटुंबाचं चित्र समोर उभं राहतं, त्यापेक्षा प्रत्यक्षातली परिस्थिती पार वेगळी. ते राहतायत ती इमारत म्हणजे सरकारने कष्टकर्‍यांसाठी बांधलेल्या एकसुरी, हताश, अंगावर येणार्‍या उंच काँक्रीट ठोकळ्यांपैकी एक. हे कष्टकरी म्हणजे मुख्यत्वे कोळसा खाण कामगार. पण ७० च्या दशकात भरभराट झालेला तो कोळसा उद्योग आता पार झोपलाय. माणसांच्या हातांना काम...

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)

Image
अमेरिकेतल्या Idaho राज्यात राहणारं एक कुटुंब. नवरा-बायको आणि ७-८ मुलं. नवरा-बायको कट्टर Mormon पंथीय. या पंथाच्या लोकांचा आधुनिक जगावर, वैज्ञानिक प्रगतीवर अजिबात विश्वास नसतो. आधुनिक शिक्षण, वैद्यकीय उपचार इ. गोष्टी म्हणजे सैतानाशी सामना. त्यापासून दूर राहायचं. आयुष्यात येणारं प्रत्येक संकट देवाने परीक्षा घेण्यासाठी धाडलं असल्याप्रमाणे सहन करायचं. त्यातून जमेल तसं तरुन जगणं पुढे सुरू ठेवायचं. ही यांची रीत. हे कुटुंबही तसंच. वडिलांचा भंगार व्यवसाय. सगळी मुलं तिथे पडेल ते अंगमेहनतीचं काम करण्यात तरबेज असतात. पण एकूण जीवनशैली पुरती रासवट. टॅरासुद्धा १५ वर्षांची होईपर्यंत असंच रासवट जगत होती. पण तिला हळूहळू बाहेरच्या जगाचं वारं लागायला लागलंच. आपलं विनाशिक्षित असणं तिला जाणवायला लागलं. यातून बाहेर पडण्याची गरज भासायला लागली. तो निर्णय तिच्यासाठी खूप अवघड होता. बाहेर पडायचं तर कसं, याचा शोध तिचा तिलाच घ्यायचा होता. मोठा सामाजिक, आंतरिक, तात्विक झगडा होता तो तिच्यासाठी. पण तिने एक-एक पाऊल टाकायला सुरुवात केली. आणि आयुष्याची पहिली १५ वर्षं शाळेचं तोंडही न पाहिलेली ही मुलगी पुढच...

पुस्तक परिचय : काळे करडे स्ट्रोक्स (प्रणव सखदेव)

Image
गेल्या वर्षी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक . डिग्री कॉलेज शिक्षणाच्या वयोगटातल्या मुंबईतल्या मराठी मुला - मुलींच्या आयुष्यावर बेतलेली कादंबरी आहे . त्यांची आपसांतली मैत्री जुळणे , टिकणे , मोडणे . एकमेकांशी शेअरिंग . प्रेमप्रकरणं , सेक्सचा अनुभव . हे सगळं तर आहेच . त्यापलिकडेही व्यक्ती म्हणून त्यांची अन्डर कन्स्ट्रक्शन असणारी जडणघडण , त्यांच्यातली ऊर्जा , हे सगळंही आहे . मुद्दाम सांगण्याचा आव न आणता कथानकात या गोष्टी सहज येत जातात . वातावरणनिर्मिती छान आहे . पुस्तकाची भाषा , पात्रांच्या तोंडचे संवादही अगदी सहज , सोपे आहेत . द यंग अ‍ॅण्ड द रेस्टलेस अशी एक प्रचिती येते . कथानकाचा नायक फ्लॅशबॅकमध्ये गोष्ट सांगतो . म्हणजे वर्तमानकाळात तो चाळीशीला पोचलेला वगैरे नाही . कॉलेजविश्वातून बाहेर पडून त्याला काहीच वर्षं झाली आहेत . ही सिच्युएशन मला आवडली , त्यामुळे जे घडून गेलं त्याबद्दल सांगताना वेगळा दृष्टीकोन बघायला मिळाला . ( या टाइपच्या पुस्तकांच्या नरेशनच्या दृष्टीने ) कॉलेजजीवनाचा अ...

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

Image
रशियाने युक्रेनवर आक्रमण का केलं? अमेरिका हाच देश राजकीय, आर्थिक महासत्ता का बनला? आखाती देशांमध्ये सतत काही ना काही खदखदत का असतं? आफ्रिकेतले देश इतके गरीब का? चीनला दक्षिण अमेरिकेच्या आणि आफ्रिकेच्या भूभागात रस का आहे? असे एकगठ्ठा प्रश्न आपल्याला कधी पडत नाहीत. जागतिक राजकारण हा काही सर्वसामान्यांच्या आवाक्यातला विषय मानला जात नाही. त्यावर राजकारणी बोलतील, अभ्यासक बोलतील, तो आपला प्रांत नव्हे, असं म्हणून तो सोडून दिला जातो. Prisoners of Geography हे पुस्तक ही सोडून देण्याची मुभा आपल्यापासून हिरावून घेतं. आणि त्यात मजा आहे. एका वाक्यात या पुस्तकाचा गोषवारा सांगायचा, तर जगाच्या राजकारणात जे काही घडत आलेलं आहे, त्यामागे त्या-त्या देशांचं भौगोलिक स्थान, त्यांच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती याच गोष्टी कारणीभूत आहेत, असं या पुस्तकात म्हटलेलं आहे. आणि हे इतक्या साध्या-सोप्या भाषेत सांगितलं आहे, की वाचताना आपण त्यात नकळत रमत जातो. पुस्तकात १० विभाग/प्रकरणं आहेत- रशिया, चीन, अमेरिका, पश्चिम युरोप, आफ्रिका, मध्य-पूर्व आशिया, भारत-पाकिस्तान, कोरिया-जपान, लॅटिन अमेरिका, आर्क्टिक प्र...