Posts

Showing posts from 2010

स्वप्न नावाचं आश्चर्य

लग्नाचा एक मोठा हॉल, पाहुण्यांनी खचाखच भरलेला... एक मध्यमवयीन महिला प्रफुल्लित चेहर्‍यानं हॉलमधे प्रवेश करते. तिची एक अतिशय लाडकी गर्भरेशमी साडी तिने नेसलेली आहे; साडीला साजेसे दागिने घातलेले आहेत... तिकडे लांबवर, हॉलच्या अंतर्भागात वधू-वर लग्नविधींत मग्न आहेत. त्यामुळे तिला त्यांचे चेहरे दिसत नाहीत... मात्र पाहुण्यांच्या गर्दीत बहुतेक सगळे चेहरे तिच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे बरेचजण तिच्याकडे पाहून हसत आहेत, हात हलवत आहेत, ओळख देत आहेत, काही आपणहून येऊन तिच्याशी जुजबी गप्पा मारत आहेत, काही जणांशी ती जाऊन बोलत आहे... असं करत करत ती हळूहळू लग्नविधींच्या जागेकडे सरकते... आता गर्दीत तिला तिच्या स्वतःच्याच घरची, सासरची वरिष्ठ मंडळी दिसायला लागली आहेत. पण त्यांना तिथे पाहून तिला मुळीच आश्चर्य वाटलेलं नाही किंवा हे सगळे असताना त्यांच्याबरोबर न येता आपण अशा एकट्याच का आलो इथे हा प्रश्नही पडलेला नाही... ती वधू-वरांजवळ पोहोचेपर्यंत तिथलं दृष्य मात्र आता अचानक बदललं आहे. आता तिथे ग्रुप-फोटो-सेशन सुरू झालं आहे. वधू-वरांचे चेहरे अजूनही तिला दिसलेले नाहीत. ते पाहण्याच्या आटोकाट प्रयत्नात असतानाच फ…

सरणार कधी...

सताड उघडी रात्र, चार भिंतींच्या कोंदणात न मावणारी...! आसपास जाग असूनही भेडसावणारी, रस्त्यांवर दिवे चालू असूनही काळोखी भासणारी!
सारिका शून्य नजरेनं पाहत होती.
खुल्या आकाशाखाली अशा कित्येक रात्री तिनं पूर्वीही काढल्या होत्या - एखाद्या गडाच्या माचीवर, डोंगरातल्या, कडेकपार्‍यांतल्या गुहेत किंवा बालेकिल्ल्याच्या उरल्यासुरल्या अवशेषांच्या संगतीत. आत्ता अवतीभवती होते शेजारपाजारी, तर तेव्हा बरोबरचे सवंगडी, उत्साही सखे-सोबती आणि सुनयना!
रात्रीच्या शांततेत सर्वांचं कुजबुजत, दबक्या आवाजात बोलणं दोन्हीकडे सारखंच. होता फक्त एकच फरक... मनाला झोके घ्यायला बोलावणारा तेव्हाचा स्वच्छंदीपणा आणि त्याच मनाला बधीर करून सोडणारी आत्ताची ही अनिश्चितता!
खरंतर मेंदूनं भराभर विचार करायला हवा होता. भावनेच्या आहारी जाणार्‍या मनाला ताळ्यावर आणायला हवं होतं. पण यातलं काहीही होत नव्हतं. सारिका नुसती शून्य नजरेनं पहात होती.
डोक्यावरती होतं तेच ते काळं आकाश. वर्षानुवर्षांच्या परिचयाचं. नेहमीसारखंच चांदण्यांचं प्रदर्शन मांडून बसलेलं. पण खाली काय चाललंय हे त्याच्या गावीही नव्हतं. आणि पायाखाली... त्याक्षणी जमीन होती. पण प…

घरोघरी मातीच्या चुली

"अहो, तुमची पाहुण्यांची यादी झाली का तयार?"
"वेगळी तयार काय करायचीय? तू घे लिहून, मी सांगतो..."
"आता तेवढं एकच काम आहे का मलाऽऽ? सतरा व्यवधानं आहेत. लिहून घे काय? तुम्हीच लिहून द्या मला आज संध्याकाळपर्यंत."
"(आठ्या घालून) आजच्या आज??"
"ओरडताय कायऽऽ? तुम्हाला जराही गांभीर्य कसं नाही हो? वधूपक्ष आहे आपला. सगळी व्यवस्था चोख नको? घरच्या कामात लक्ष कमीच तुमचं पहिल्यापासून. मी आहे म्हणून चाललंय सगळं सुरळीत इतकी वर्षं...!"

----------

"अगं, तुझी पाहुण्यांची यादी दे माझ्याकडे. दोन्ही याद्या एकत्र करतो आणि आजच पत्रिका करायला टाकतो. तेवढंच तुझं एक मोठं काम होऊन जाईल."
"पत्रिका काय करायला टाकतो? तुमचीच यादी द्या इकडे. मला एकदा ती नजरेखालून घालायला नको??"
"(हताशपणे) अगं, ती ‘माझ्या’ पाहुण्यांची यादी आहे ना? मला करायला सांगितलीस ना? तशी केलीय मी. आता तू पुन्हा त्यात काटछाट कुठे करतेस?"
"(संशयास्पद नजरेने) म्हणजे, काटछाट करण्याजोगी नावं आहेत तर त्यात...! आणा तो कागद इकडे."
"अगं, पण..."
"(वैतागून)…

आठवणीतला पाऊस

आज दि. ९ जुलै २०१० ची लोकसत्ता-व्हिवा पुरवणी 'आठवणीतला पाऊस' या विषयावर आधारित आहे. त्या पुरवणीतला हा माझा लेख. (मूळ लेख इथे पाहता येईल.) ------------------------------------------------------------------ आठवणीतला पाऊस म्हणजे धमाल सहली, पिकनिक्स, मित्र-मैत्रिणी, बटाटेवडे, कांदाभजी, वाफाळता चहा...
पावसाच्या आठवणी या अशाच बेभान करणार्‍या असतात. मात्र माझ्या आठवणीतला एक पाऊस यापेक्षा एकदम वेगळा आहे. १९९८ सालचा जून महिना. आम्ही तेव्हा गुजराथच्या दक्षिण भागातल्या वापी या छोट्या शहरात रहात होतो. सुप्रसिध्द दमणच्या समुद्रकिनार्‍यालगतच ते वसलेलं आहे. त्यामुळे तिथल्या हवेतही मुंबईसारखाच दमट चिकचिकाट असतो.
सर्वसाधारणपणे गुजराथमधे मोसमी पाऊस दाखल होतो तो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. पण त्यावर्षी गुजराथच्या संपूर्ण किनार्‍याला जोरदार चक्रीवादळाच्या तडाख्याचा इशारा देण्यात आला होता. चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे जूनच्या सुरूवातीपासूनच ढगाळ, कुंद वातावरण होतं. तरीही त्याचा जोर उत्तरेला कच्छ किनारपट्टीच्या दिशेला जास्त असणार होता. त्यामुळे इकडे वापी-बलसाड परिसरात आम्ही तसे निर्धास्त होतो. चक्र…

दोन पुरातन पासवर्ड्स

एकदा पंधरा ऑगस्टच्या आसपास कधीतरी आमच्या केबलवाल्यानं एका दुपारी चक्क ‘२२ जून १८९७’ हा सिनेमा लावला होता. मी टी.व्ही. लावला तेव्हा सिनेमा अर्धाअधिक संपला होता पण तरीही मला तो पाहून एकदम नॉस्टॅल्जिक वगैरे व्हायला झालं. शाळेत असताना जुन्या कृष्ण-धवल दूरदर्शनवर जितक्या वेळा तो लागायचा तितक्या वेळा आईची बोलणी खात मी तो पाहीलेला होता.
मी ताबडतोब माझ्या मुलाला मस्का, गूळ इ.इ. लावून शेजारी बसवून घेतलं आणि तो उर्वरित सिनेमा पहायला लावला. ‘मुंग्यान्‌ मेरुपर्वत तर नाय ना गिळलनीत...’च्या आविर्भावात माझा मुलगा आश्चर्यानं माझ्याकडे बघायला लागला. आई आपणहून टी.व्ही.वरचा सिनेमा बघ म्हणतीए म्हणजे काय! पण पडत्या फळाची आज्ञा मानून तो लगेच माझ्या शेजारी येऊन बसला. (प.फ.ची आज्ञा मानली नाही तरी आई ब.भ. म्हणजे बर्‍यापैकी भडकते - हे त्याचंच वाक्य!)
पडद्यावर रॅन्डच्या खुनाचं दृश्य सुरू झालं.
"गोंद्या आला रे...", जोडीला घोड्याच्या टापांचा आवाज. "गोंद्या आला रे..."
आता, सिनेमातले संवाद लक्षपूर्वक ऐकायच्या फारशा फंदात न पडल्यामुळे माझ्या शेजारच्या त्या विसाव्या शतकात जन्मलेल्या आणि एकविसाव्या …

पालवी

Image
आमच्या घराच्या खिडकीतून हे असं दृष्य दिसतं.


वसंत ऋतू काय आला आणि बघता बघता हे चित्र पालटलं.
पिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांच्या टोकावर एक निराळीच लगबग सुरू झाली.
आणि एक दिवस सकाळी सकाळी या कोवळ्या आश्चर्याच्या निरनिराळ्या आविष्कारांनी स्वतःच्या उपस्थितीची मला दखल घ्यायला लावली.


... आणि मग मला दर तासा-दोन तासांनी ती दृष्य न्याहाळण्याचा नादच लागला.


निसर्ग हळू हळू कात टाकू लागला.

ताजी, लुसलुशीत, कोवळी, मऊशार पानं! जणू गोंडस, गोजीरवाणी बाळं! त्यांच्या लीला बघाव्या तितक्या थोड्या!


मानवानं सारासार विचार करणं सोडून दिलेलं असलं तरी सृष्टीनं अजूनही आपला आशावाद सोडलेला नाही. नव्या उत्साहानं, उमेदीनं प्रत्येक फांदी या तान्ह्या बाळांच्या बोबड्या बोलांत हरवून गेलीय.


या सुरूवातीच्या टप्प्यात वसंतातल्या उन्हाच्या रूपातलं मऊमऊ भाताचं मंमं या बाळांना पुरेसं आहे. पण जसजशी ती मोठी होतील, त्यांचं विश्व विस्तारेल तसतशी त्यांची भूक वाढेल. ते पावसाची वाट बघायला लागतील. ते जेवण त्यांना हवं तितकं, हवं तेवढं... पुनःपुन्हा, वर्षानुवर्षं... आपण पुरवू शकू?? जरा विचार करा. 

दंगल

प्राजक्ता पुन्हा एकदा सायलीचा नंबर फिरवावा काय या विचारात होती. इतक्यात तिचाच फोन वाजला. कॉलर आयडी मुंबईचा नंबर दाखवत होता.
सायोचाच फोन असणार असं मनाशी म्हणत सोफ्यावर बसकण मारत तिनं रिसीव्हर उचलला.
"हॅलो..."
"हॅलो... हं, प्राजू, बोल, सायली बोलतेय. फोन केला होतास? निरोप मिळाला मला दिपककडून..."
"आहात कुठे नोमॅडिक नेमाडेबाई? सकाळपासून सारखा फोन लावायचा प्रयत्न करतेय. मगाशी तुझ्या रूमपार्टनरलाही करून बघितला. ती म्हणाली की तू अजून ऑफिसमधेच आहेस. शेवटी निरोप ठेवला तुझ्या त्या दिपकजवळ."
"ए, ‘तुझ्या’ दिपकजवळ काय? आमचा ऑफिस बॉय आहे तो. कशासाठी फोन करत होतीस?"
"घ्या! आज तुझा स्पेश्शल दिवस. म्हटलं तुला फोन करावा, गप्पा माराव्यात..."
"अर्र तिच्या! सॉरी, सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या."
"अगं सायो, काय हे! स्वतःचा वाढदिवसही विसरलीस? इतकी काय अगदी कामात गढलीयेस?"
"ए बाई, जरा बाहेरच्या जगात काय चाल्लंय ते पण बघत जा! टी.व्ही. लावलायस का सकाळपासून?"
"छे! मी तर सकाळपासून तुला फोन लावण्यातच बिझी आहे."
"प्राजू, आ…