Posts

Showing posts from November, 2015

परिघावरून

एके दिवशी सकाळी...

गजर वाजायच्या एक मिनिट आधी बॅनर्जी आजोबांना जाग आली. मोबाईलवरच्या 04:59कडे नजर टाकत ते उठले, बाथरूममधे गेले. नळ सोडून त्यांनी पायावर पाणी घेतलं, तोंडावर मारलं; उगीच एकदा सोलरचा नळ उघडून पाहिला. पण तो अजून तरी कोरडा ठक्क होता. ते बाथरूममधून बाहेर आले; सावकाश पावलं टाकत स्वयंपाकघरात गेले; स्वतःसाठी एक कप चहा करून ठेवून अंथरूण आवरायला परत आपल्या खोलीत आले. दुसर्‍या बेडरूमच्या बंद दाराआडून वाजलेला फोनवरचा गजर त्यांना अंधूकसा ऐकू आला. पुन्हा स्वयंपाकघरात येऊन त्यांनी चहा गाळून घेतला, पातेलीत थोडं नळाचं पाणी घालून गाळणं त्यात बुडवून ठेवलं आणि पातेली सिंकजवळ ठेवून दिली. दुसर्‍या बेडरूममधला गजर पुन्हा एकदा वाजला.
त्यांचा चहा पिऊन होईतोवर त्यांची सून उठून बाहेर आलेली होती. ओट्याशी आल्या-आल्या तिनं आधी जोरात नळ सोडून गाळणं त्याखाली धरलं, ओट्याच्या कडेवर आपटत ते स्वच्छ केलं. ते होताच आपल्या मुलाला जोरात हाक मारली.
"राघवऽऽ"
राघव कूस बदलून, पांघरूण ओढून परत झोपी गेला.
चहा घेऊन आजोबा बाहेर पडले. सोसायटीच्या आवारात फिरत त्यांनी थोडी फुलं गोळा केली आणि मग ते आवारातल्याच देवीच्…