Posts

Showing posts from April, 2010

दोन पुरातन पासवर्ड्स

एकदा पंधरा ऑगस्टच्या आसपास कधीतरी आमच्या केबलवाल्यानं एका दुपारी चक्क ‘२२ जून १८९७’ हा सिनेमा लावला होता. मी टी.व्ही. लावला तेव्हा सिनेमा अर्धाअधिक संपला होता पण तरीही मला तो पाहून एकदम नॉस्टॅल्जिक वगैरे व्हायला झालं. शाळेत असताना जुन्या कृष्ण-धवल दूरदर्शनवर जितक्या वेळा तो लागायचा तितक्या वेळा आईची बोलणी खात मी तो पाहीलेला होता. मी ताबडतोब माझ्या मुलाला मस्का, गूळ इ.इ. लावून शेजारी बसवून घेतलं आणि तो उर्वरित सिनेमा पहायला लावला. ‘मुंग्यान्‌ मेरुपर्वत तर नाय ना गिळलनीत...’च्या आविर्भावात माझा मुलगा आश्चर्यानं माझ्याकडे बघायला लागला. आई आपणहून टी.व्ही.वरचा सिनेमा बघ म्हणतीए म्हणजे काय! पण पडत्या फळाची आज्ञा मानून तो लगेच माझ्या शेजारी येऊन बसला. (प.फ.ची आज्ञा मानली नाही तरी आई ब.भ. म्हणजे बर्‍यापैकी भडकते - हे त्याचंच वाक्य!) पडद्यावर रॅन्डच्या खुनाचं दृश्य सुरू झालं. "गोंद्या आला रे...", जोडीला घोड्याच्या टापांचा आवाज. "गोंद्या आला रे..." आता, सिनेमातले संवाद लक्षपूर्वक ऐकायच्या फारशा फंदात न पडल्यामुळे माझ्या शेजारच्या त्या विसाव्या शतकात जन्मलेल्या आणि एकविसा

पालवी

Image
आमच्या घराच्या खिडकीतून हे असं दृष्य दिसतं. वसंत ऋतू काय आला आणि बघता बघता हे चित्र पालटलं. पिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांच्या टोकावर एक निराळीच लगबग सुरू झाली. आणि एक दिवस सकाळी सकाळी या कोवळ्या आश्चर्याच्या निरनिराळ्या आविष्कारांनी स्वतःच्या उपस्थितीची मला दखल घ्यायला लावली. ... आणि मग मला दर तासा-दोन तासांनी ती दृष्य न्याहाळण्याचा नादच लागला. निसर्ग हळू हळू कात टाकू लागला. ताजी, लुसलुशीत, कोवळी, मऊशार पानं! जणू गोंडस, गोजीरवाणी बाळं! त्यांच्या लीला बघाव्या तितक्या थोड्या! मानवानं सारासार विचार करणं सोडून दिलेलं असलं तरी सृष्टीनं अजूनही आपला आशावाद सोडलेला नाही. नव्या उत्साहानं, उमेदीनं प्रत्येक फांदी या तान्ह्या बाळांच्या बोबड्या बोलांत हरवून गेलीय. या सुरूवातीच्या टप्प्यात वसंतातल्या उन्हाच्या रूपातलं मऊमऊ भाताचं मंमं या बाळांना पुरेसं आहे. पण जसजशी ती मोठी होतील, त्यांचं विश्व विस्तारेल तसतशी त्यांची भूक वाढेल. ते पावसाची वाट बघायला लागतील. ते जेवण त्यांना हवं तितकं, हवं तेवढं... पुनःपुन्हा, वर्षानुवर्षं... आपण पुरवू शकू?? जरा विचार करा.