मोडलेली मनं, जोडणारे खेळ

ऑगस्ट, २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’... सिरियाचे दोन जलतरणपटू, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे दोन ज्युडोपटू, इथियोपियाचा एक मॅरेथॉनपटू आणि दक्षिण सुदानचे पाच धावपटू... त्या दहाजणांचे स्वतःचे देश आता त्यांचे उरले नव्हते. त्यांचं निर्वासित असणं त्यांना इतरांहून वेगळं करणारं होतं. मात्र ते बोचरं वेगळेपण तिथे गळून पडलं होतं. ऑलिंपिक्स खेळांनी त्यांना तशी संधी दिली होती. एक नवा इतिहास घडत होता. त्याला कारणीभूत होती जगाची बसलेली एक नवी घडी... की विस्कटलेली? खेळ, शारिरीक व्यायाम आणि निर्वासित या त्रैराशिकाची कल्पना करणं आपल्याला आधी