Posts

Showing posts with the label पर्यावरण

येऊरच्या जंगलात...

Image
अनुभवच्या जून-२०१५ अंकात प्रकाशित झालेला लेख. ---------- कुठल्याही हौशी, भटक्या ठाणेकरासमोर ‘येऊर’ हा शब्द उच्चारून बघा, त्याचे डोळे चमकतील. कारण तो किमान एकदा तरी येऊरच्या जंगलात फिरून आलेला असतो आणि त्या एका फेरीतच त्या जंगलाच्या प्रेमात पडलेला असतो. येऊरचं हे जंगल म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्याकडील भाग. नकाशा पाहिलात, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर-दक्षिण पसरलेलं आहे. उत्तरेकडे वर्सोव्याची खाडी ते दक्षिणेकडे विहार तलाव असा त्याचा विस्तार आहे. त्याच्या पूर्वेकडे ठाणे शहर आणि मुलुंड-भांडुप ही मुंबईची मध्य उपनगरं येतात; तर पश्चि मेकडे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ही मुंबईची पश्चिेम उपनगरं येतात. म्हणजे मध्यात घनदाट जंगल आणि चहुबाजूंनी पसरलेली शहरं असं साधारण स्वरूप. या राष्ट्रीय उद्यानाला ‘मुंबईची फुफ्फुसं’ असं म्हटलं जातं ते याचमुळे. हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांमध्ये ‘बोरिवली नॅशनल पार्क’ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. बोरिवली का, तर राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठीचं मोठं प्रवेशद्वार, तिकीटखिडक्या बोरिवलीत आहेत. ‘लायन सफारी’, लहान मुलांची लाडकी ‘टॉय ट्र...

आठवणीतला पाऊस

आज दि. ९ जुलै २०१० ची लोकसत्ता-व्हिवा पुरवणी 'आठवणीतला पाऊस' या विषयावर आधारित आहे. त्या पुरवणीतला हा माझा लेख. (मूळ लेख  इथे  पाहता येईल.) ------------------------------------------------------------------ आठवणीतला पाऊस म्हणजे धमाल सहली, पिकनिक्स, मित्र-मैत्रिणी, बटाटेवडे, कांदाभजी, वाफाळता चहा... पावसाच्या आठवणी या अशाच बेभान करणार्‍या असतात. मात्र माझ्या आठवणीतला एक पाऊस यापेक्षा एकदम वेगळा आहे. १९९८ सालचा जून महिना. आम्ही तेव्हा गुजराथच्या दक्षिण भागातल्या वापी या छोट्या शहरात रहात होतो. सुप्रसिध्द दमणच्या समुद्रकिनार्‍यालगतच ते वसलेलं आहे. त्यामुळे तिथल्या हवेतही मुंबईसारखाच दमट चिकचिकाट असतो. सर्वसाधारणपणे गुजराथमधे मोसमी पाऊस दाखल होतो तो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. पण त्यावर्षी गुजराथच्या संपूर्ण किनार्‍याला जोरदार चक्रीवादळाच्या तडाख्याचा इशारा देण्यात आला होता. चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे जूनच्या सुरूवातीपासूनच ढगाळ, कुंद वातावरण होतं. तरीही त्याचा जोर उत्तरेला कच्छ किनारपट्टीच्या दिशेला जास्त असणार होता. त्यामुळे इकडे वापी-बलसाड परिसरात आम्ही तसे निर्धास्त ह...

हिमालय ही चीजच तशी आहे...!!

Image
उत्तर भारतातली कुठलीही सहल करायची म्हटली की आपल्याला आधी आठवते ती तिथली थंडी आणि पाठोपाठ आठवतो तो बर्फ. ‘नॉर्थ’ची सहल केली पण बर्फ बघितला नाही असं जर कुणी आपल्याला सांगितलं तर गोव्याला जाऊन समुद्र न बघता परतलेल्या माणसासारखं आपण त्या व्यक्तीला लगेच मूर्खात काढू. उत्तर भारताचं पर्यटन आणि बर्फाच्छादित शिखरं यांचं असं इतकं घट्ट नातंच आपल्या मनात आपण बाळगलेलं आहे.त्यामुळे एखादा वारकरी विठ्ठलदर्शनासाठी जितका आसुसलेला असतो तितकीच, किंबहुना त्याहून कणभर जास्तच मी आसुसलेले होते त्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन घेण्यासाठी आणि ‘देवभूमी उत्तरांचल’मधे प्रवेश करून दोन दिवस उलटून गेले तरी त्या दर्शनाचा लाभ काही होत नव्हता.काय गम्मत आहे! तिकडे देशाच्या दुसर्‍या टोकाला केरळ पर्यटनाच्या जाहीरातीतही आपण ‘गॉड्स ओन कंट्री’ असं लिहीलेलं वाचतो आणि नवी दिल्लीहून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८७चं बोट पकडून नैनितालला जाताना उधमसिंगनगरच्या जरासं अलिकडेही ‘देवभूमी उत्तरांचलमें आपका स्वागत है।’ अशा पाटीनंच आमचं स्वागत केलं. (उधमसिंग या शब्दामुळे असेल कदाचित पण इतकी वर्षं उधमसिंगनगर हे गाव/शहर पंजाबमधे आहे असंच मला वाट...

कॉर्बेटचा वाघ

"काय मग? कशी झाली तुमची ट्रीप? कॉर्बेटमध्ये दिसला का काही वाघ-बिघ?" नैनीताल-मसूरी-जिम कॉर्बेट नॅशनल पार्क अशी, म्हणजे थोडक्यात उत्तरांचलची सहल करून आल्यानंतरच्या आठवड्याभरात किमान दहा पंधरा वेळा तरी हा प्रश्न आम्हाला विचारला गेला. (आणि त्या प्रश्नाला आम्ही तितक्यांदाच नकारार्थी उत्तर दिलं. खोटं कशाला बोलू?) खरंतर उत्तरांचल म्हणजे हिमालयाच्या जवळपास(च) कुठेतरी येतं इतपत सामान्यज्ञान सर्वांनाच असतं। पण म्हणून "मसूरीला दिसली का काही बर्फाच्छादित शिखरं-बिखरं?" असा प्रश्न कुणालाही विचारावासा वाटला नाही. त्या प्रश्नाला तर आम्ही ‘होऽऽ! भरपूर...’ असं उत्तर द्यायला आसुसलो होतो. पण ते नाही; व्याघ्रदर्शनाची मात्र पदोपदी चौकशी!जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, किंबहुना कुठल्याही नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, न आलेले, सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आमचं ते नकारार्थी उत्तर ऐकल्यावर एक प्रकारचं मंद स्मित झळकायचं. म्हणजे, ‘असंच पाहीजे! तुम्हाला पण नाही ना दिसला? आम्हाला पण नव्हता दिसला.’ किंवा ‘नाही दिसत ना तिथे वाघ? म्हणूनच आम्ही तिथे जाण्याच्या फंदात पडत नाही.’ असे काहीतरी भाव ...

दोन अनुत्तरित, गहन प्रश्न.

रोजच्यासारखीच एक घाईगर्दीची सकाळ. नवरा ऑफीसला निघून गेलेला होता; माझ्या कामांचं पहिलं सत्र आटोपलं होतं. (रोजच सकाळी नवरा एकदा(चा) घराबाहेर पडला की मला उगीचच एखादा गड सर केल्यासारखं वाटतं.) थोड्याच वेळात माझ्या तीन-चार वर्षांच्या मुलाला शाळेत सोडायला जायचं होतं. माझी कामाची घाई आणि त्यात मुलाची लुडबुड सुरू होती. त्याच्याबरोबर काहीतरी गाणी म्हणत, बडबड करत मी आता त्याचा किल्ला लढवत होते. मध्येच तो थोडा वेळ दुसऱ्या खोलीत जायचा आणि काही न सुचल्यासारखा परत यायचा. असं तीनचारदा झालं आणि अचानक त्यानं मला प्रश्न केला - "आई, चिमणी का असते गं? "... भरधाव वेगाने निघालेल्या गाडीसमोर अचानक एखादी म्हैस वगैरे यावी तशी मी गप्पकन थांबले. एखाद्या नवशिक्या गोलंदाजानं ऐन भरातल्या फलंदाजाला अनपेक्षितरित्या चकवून बाद करावं तसं माझ्या मुलानं हा प्रश्न विचारून मला ’क्लीन बोल्ड’ केलं. क्षणभर मी करत असलेलं काम विसरले. चिमणी का असते? म्हणजे?? मला वाटलं आपण ऐकण्यात काहीतरी चूक केली असेल. म्हणून त्याला परत विचारलं. तर मगाचच्या त्या फलंदाजाच्या विकेटचा ’ऍक्शन रीप्ले’ पाहावा लागला... "चिमणी का असते? ...