आठवणीतला पाऊस


आज दि. ९ जुलै २०१० ची लोकसत्ता-व्हिवा पुरवणी 'आठवणीतला पाऊस' या विषयावर आधारित आहे. त्या पुरवणीतला हा माझा लेख. (मूळ लेख इथे पाहता येईल.)
------------------------------------------------------------------
आठवणीतला पाऊस म्हणजे धमाल सहली, पिकनिक्स, मित्र-मैत्रिणी, बटाटेवडे, कांदाभजी, वाफाळता चहा...
पावसाच्या आठवणी या अशाच बेभान करणार्‍या असतात. मात्र माझ्या आठवणीतला एक पाऊस यापेक्षा एकदम वेगळा आहे.
१९९८ सालचा जून महिना. आम्ही तेव्हा गुजराथच्या दक्षिण भागातल्या वापी या छोट्या शहरात रहात होतो. सुप्रसिध्द दमणच्या समुद्रकिनार्‍यालगतच ते वसलेलं आहे. त्यामुळे तिथल्या हवेतही मुंबईसारखाच दमट चिकचिकाट असतो.
सर्वसाधारणपणे गुजराथमधे मोसमी पाऊस दाखल होतो तो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. पण त्यावर्षी गुजराथच्या संपूर्ण किनार्‍याला जोरदार चक्रीवादळाच्या तडाख्याचा इशारा देण्यात आला होता. चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे जूनच्या सुरूवातीपासूनच ढगाळ, कुंद वातावरण होतं. तरीही त्याचा जोर उत्तरेला कच्छ किनारपट्टीच्या दिशेला जास्त असणार होता. त्यामुळे इकडे वापी-बलसाड परिसरात आम्ही तसे निर्धास्त होतो.
चक्रीवादळ जसजसं किनार्‍याकडे सरकत होतं, तसतसे प्रचंड वेगानं वारे वहायला लागले होते. जूनच्या ८-९ तारखेला ते कच्छच्या किनारपट्टीवर धडकलं. तिथे त्यामुळे अक्षरशः वाताहत झाली. कैक घरं, हजारो माणसं वाहून गेली. अगणित झाडं, वीजेचे खांब उखडले गेले. त्यामुळे किनारपट्टीच्या बर्‍याच भागातला वीजपुरवठा खंडित झाला. आम्ही राहत असलेल्या राज्याच्या दक्षिण भागात खबरदारीचा उपाय म्हणून तो मुद्दामहून बंद करण्यात आला.
दमट हवा, घाम यावरचा हमखास शहरी उपाय म्हणजे घराघरांतले पंखे, ते बंद पडले होते. दारं-खिडक्या उघडण्याची अजिबात सोय नव्हती. कारण बाहेरच्या वार्‍याचा वेग घाबरवून सोडणारा होता. इतकं असूनही ‘रात्रीपर्यंत लाईट येतील, इतका वेळ वीज गायब राहणं शक्य नाही’ असं म्हणत आम्ही तसे थोडे बेसावधच होतो.
शहरी भागांतला वीजपुरवठा दीर्घकाळ बंद असेल तर त्याचा पहिला परिणाम होतो पाणीपुरवठ्यावर. परिणामतः वीजेपाठोपाठ दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत पाणीही गेलं. आता घरातल्या तुटपुंज्या पाणीसाठ्यावरच आमची सगळी मदार होती.
वीज नाही, पुरेसं पाणी नाही, उकाडा, घामानं होणारी चिकचिक आणि बंद खिडक्यांमधूनही भयाण घोंघावणारा वारा अशा परिस्थितीत आम्ही पुढचे दोन दिवस काढणार होतो.
दुसरा दिवस संपता संपता सहनशक्तीही संपत आली होती. बाहेरून शक्यतो कोरडे पदार्थ आणून खात होतो. तरीही स्वयंपाकघरात खरकट्या भांड्यांची रास लागली होती. धुवायच्या कपड्यांचा ढीग साचला होता. इतर घरगुती स्वच्छतेचे बारा वाजले होते. वैयक्तिक स्वच्छतेचीही चिंता वाटायला लागली होती. आता आम्हाला हवं होतं पाणी. फक्त पाणी! भरपूर पाणी!!
काळ्या ढगांनी तोपर्यंत नुसत्याच लदबदलेल्या आभाळाला तिसर्‍या दिवशी दुपारनंतर अखेर टाचणी लागली.
बाहेर पाऊस पडायला लागलाय हे समजल्यावर जे वाटलं ते केवळ अवर्णनीय होतं! बघता बघता पावसानं जोर धरला आणि शेवटी मी न राहवून, बाहेरच्या घोंघावणार्‍या वार्‍याची पर्वा न करता घराच्या गच्चीत ओतत्या पावसात जाऊन उभी राहिले. चेहर्‍यावरून, हातांवरून पावसाचं पाणी ओघळायला लागलं. तीन दिवसांचा वैताग, चिडचिड सगळ्याचा मला एका क्षणात विसर पडला. पाण्याचा तो थंडगार, सुखावणारा स्पर्श मला आजही चांगला लक्षात आहे. एखाद्या भाविकाला कुंभमेळ्याच्या पवित्र पर्वात गंगेच्या पाण्यात डुबकी मारून जे समाधान मिळत असेल त्यापेक्षा कैकपटींनी अधिक काहीतरी मी अनुभवत होते. पाचदहा मिनिटे असं पावसात भिजून अंतरात्मा शांत झाल्यावर एका गोष्टीकडे माझं लक्ष गेलं.
गच्चीच्या अर्ध्या भागात सावलीसाठी पत्रे बसवलेले होते. त्या पत्र्यांवरून पागोळ्यांच्या रुपात आता बदाबद पाणी पडायला लागलं होतं. पण ते पाणी गच्चीतच न पडता बाहेर, ग्रिलच्या पलिकडे पडत होतं. तीन दिवस पाणी-पाणी केल्यावर आता हे पाणी मला असं वाया जाऊ द्यावसं वाटेना. मग आम्ही गच्चीच्या ग्रिलला बाहेरच्या बाजूनं प्लॅस्टिकच्या दोन बादल्या बांधल्या आणि पागोळ्यांचं पाणी त्यात साठवायला सुरूवात केली. पावसाचा जोर इतका होता की दर दुसर्‍या मिनिटाला बादली भरत होती.
पाण्याचा असा स्त्रोत उपलब्ध झाल्याची बातमी हा हा म्हणता आमच्या शेजारपाजारच्या घरांमधे पोहोचली. आमच्याप्रमाणेच पाण्याची वाट पाहणार्‍या आमच्या शेजार्‍यांनीही मग ओतत्या पावसाची पर्वा न करता त्या बांधलेल्या बादल्यांमधून पाणी भरून घेतलं.
आमच्यापासून काही शे किलोमीटर्सवरच्या कच्छच्या कांडला बंदरात चक्रीवादळानं आणि पावसानं हाहाःकार माजवला होता, अपरिमीत नुकसान केलं होतं आणि इथे आमच्यावर मात्र पागोळ्यांच्या पाण्यावर विसंबून रहायची वेळ आली होती हा केवढा दैवदुर्विलास!
‘पाणी-बचत’ हे शब्द माझ्या मते त्यादिवशी प्रथम माझ्या मनावर कोरले गेले.
निसर्गानं आपल्या देशावर मोसमी पावसाची फार मोठी कृपा केलेली आहे. पण सहजगत्या आणि सढळहस्ते पदरात पडणार्‍या या दानाची आपल्याला किंमत राहिलेली नाही. आपला हा निष्काळजीपणा, बेदरकारपणा जेव्हा निसर्गाच्या लक्षात येतो तेव्हा तो स्वतःच चक्रीवादळासारख्या दुसर्‍या एखाद्या रुपात येऊन आपल्याला ताळ्यावर आणतो.
माझ्या आठवणीतला हा पाऊस निदान माझ्यासाठीतरी असाच ताळ्यावर आणणारा, समज देणारा ठरला.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)