Posts

Showing posts from October, 2017

इयत्ता दहावी पास

एप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली , तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘ स्नेक-२ ’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता! त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्याकडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला. शेजारीच कमरेवर एक हात ठेवून , दुसर्‍या हातातल्या रुमालाने वारा घेत हाश्श-हुश्श करत उभी असलेली बाई त्याच्यावर मंदसं खेकसली. ती त्याची आई होती. आपली बॅग आपल्याच पाठीवर लावलेला कुमार यश आपण स्वतंत्रपणे एकटेच रेल्वे स्टेशनवर आलोय हे इतरांना जाणवून देण्यात - त्याच्या मते - आतापर्यंत यशस्वी ठरला होता. त्या यशाला खांबाच्या चटक्याने क्षणार्धात चूड लावला होता. त्या चटक्याने गेममधल्या स्नेकचं अखेरचं लाईफही संपवलं होतं. मग दंड चोळत चोळत परत न्यू गे