Posts

Showing posts from 2022

प्रागची जादू, स्ट्रीट म्युझिक वगैरे

Image
 प्रागमधला तिसरा दिवस. सकाळपासून म्हटलं तर randomly भटकत होतो. Letna Park च्या टेकडीवरून खाली उतरलो, समोर आलेला नदीपूल पार केला आणि Old Town Square ची दिशा धरली. या चौकाला ५००-६०० वर्षांचा इतिहास आहे. त्या काळाच्या मानानं हा चौक GRAND आहे. चौकाच्या भोवती अनेक बारीकसारीक रस्ते, चिंचोळ्या गल्ल्या आहेत. अशाच एका उपरस्त्यावरून आम्ही चौकाच्या तोंडाशी पोचलो. भरपूर गर्दी, वर्दळ, गजबज होती. अचानक उजव्या हाताला रस्त्याच्या कडेला एक वादक वाटणारा माणूस दिसला. Folding खुर्चीवर बसला होता. थकलेला चेहरा, पिकलेले केस, धीमेपणानं पुढ्यातल्या उलट्या टोपीतली नाणी गोळा करत होता. माझी नजर आपसूक शेजारच्या वाद्यांवर गेली. दोन saxophones होते. मी जरा वेळ रेंगाळले. पण म्हातारबाबांचा lunchtime झाला होता बहुतेक. ते काही वादन पुन्हा सुरू करेनात. आधी जरा हळहळायला झालं. पण street music म्हटलं की हे देखील आलंच. वाद्यांच्या लकेरी अचानक कानावर पडण्यातली मजा जशी आहे, तशीच ही हळहळ. आम्ही पुढे सरकलो. पुढचा तासभर तो grand चौक बघण्यात कसा गेला कळलं नाही. २ वाजून गेले होते. आता गारठा चांगलाच वाढला होता. आलो त्याच्या विरुद्ध

पुस्तक परिचय : Sharp Objects (Gillian Flynn)

Image
  अमेरिकेतल्या एका लहानशा गावात एका लहान मुलीचा मृत्यू झालेला असतो. आणि वर्षभराने आणखी एक मुलगी नाहीशी झालेली असते. शिकागोतल्या एका जेमतेम चालणार्‍या वृत्तपत्राच्या संपादकाला त्यात काहीतरी कनेक्शन असावं असं वाटतं. ती स्टोरी खणून काढली तर आपल्या पेपरला फायदा होईल असा त्याचा होरा असतो. तिथे नोकरी करणारी एक पत्रकार मुलगी (कॅमील) मूळची त्याच गावची असते. तो तिलाच त्या कामगिरीवर पाठवतो. तिने १५-१६ वर्षांपूर्वीच ते गाव सोडलेलं असतं. गावात तिची आई, सावत्र बाप आणि सावत्र बहीण राहत असतात. तिची गावाशी, घराशी फारशी अ‍ॅटॅचमेंट नसते. ती जरा नाखुषीनेच तिथे जाते. पुढे त्या दुसर्‍या मुलीचाही मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं. दोघींच्या मृत्यूत काही ना काही कनेक्शन असणारच, याची खात्री पटते. स्थानिक पोलीस तपास करत असतात. एफ.बी.आय.ही येतात. कॅमील शिकागो पेपरला काही ना काही पाठवायलाच हवं म्हणून आपल्या पद्धतीने 'स्टोर्‍या' शोधत असते. त्यातून एकेक गोष्टी उघड व्हायला लागतात. त्या मुलींचा खून झालेला असतो. पोलीस आणि कॅमील आपापल्या पद्धतीने खुन्यापर्यंत पोचतात. त्यातला पोलीस तपास पुस्तकात येत

पुस्तक परिचय : मध्यरात्रीनंतरचे तास (तमिळ लेखिका – सलमा, अनुवाद – सोनाली नवांगुळ)

Image
पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी सलमा यांच्याबद्दल थोडंसं. (कारण त्यामुळेच मुळात मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं.) सलमा हे त्यांचं टोपणनाव आहे. तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींत काढली. त्यांना लहानपणापासून वाचन, कविता यांची आवड होती. त्यांनी मिळेल त्या कागदावर, जमेल तशा कविता करायला सुरुवात केली. ते कागद घरच्या मोठ्यांच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून त्या कागदांच्या बारीक घड्या घालून लपवून ठेवत असत. काही काळाने त्यांच्या आईला हे समजलं. आईनं या बाबतीत मुलीच्या मागे उभं राहण्याचं ठरवलं आणि लपूनछपून ते कागद कुणा ओळखीच्यांकडे सोपवले. त्यांनी आणखी कुणा जाणकाराला ते दाखवले. त्या कविता पठडीबाहेरच्या, वेगळ्या असल्याचं त्यांच

पुस्तक परिचय : क्लोज एन्‌काउंटर्स (पुरुषोत्तम बेर्डे)

Image
पुस्तक आणि लेखकाच्या नावाची जोडी एकत्र पाहिली, तर वाटतं की नाट्य-चित्रसृष्टीतल्या काही व्यक्ती-वल्लींबद्दल किंवा अनुभवांबद्दल लेखन असेल. पण पुस्तकाचं मुखपृष्ठ काही वेगळंच सांगतं... याच क्रमाने विचार करत मी हे पुस्तक उचललं. लेखक लहानपणी कामाठीपुर्‍यात राहत होता. त्या काळातल्या या आठवणी, व्यक्तिचित्रं, अनुभव आहेत. एकूण २४ लेख आहेत. काही लहान, काही मोठे. त्यातली ७० आणि ८० च्या दशकातली कष्टकरी, बकाल, हलाखीची मुंबई फार रंजक आणि भेदक दोन्ही आहे. कामाठीपुर्‍यातल्या १६ गल्ल्या, तिथे राहणारे भाजीवाले, छोटे भंगार व्यापारी, छोटी-मोठी दुकानं नाहीतर हॉटेलं चालवणारे व्यावसायिक, या सार्‍यांचं आपांपसांतलं नातं, शेजारधर्म, हेवेदावे, चढाओढ, खुन्नस, काळा बाजार, हिंसाचार, हिंदु-मुसलमान तेढ... त्यांतलंच शाळकरी मुलांचं आपलं विश्व, मैत्री, आसपासचं मोठ्यांचं जग समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न... हिंदी सिनेमे, गल्ली क्रिकेट, स्थानिक राजकारण... खास बंबैय्या हिंदी-मराठी बोली... मुंबई शहराचा एक लहानसा काळ-तुकडाच पुस्तकातून समोर येतो, आणि तो पुढे पुढे वाचत रहायला आपल्याला उद्द्युक्त करतो. कामाठीपुरा या उल्लेखाने

पुस्तक परिचय : Breaking Through (Isher Judge Ahluwalia)

Image
  इशर जज अहलुवालिया या अर्थशास्त्रज्ञ विदुषीचं हे memoir आहे. लहानसं पुस्तक आहे, आणि ते जबरदस्त आहे!   कोलकातात पारंपरिक पंजाबी कुटुंबात वाढलेली इशर, ११ भावंडांमधली एक. तिला शिक्षणाची आस होती. घरात मुलींच्या शिक्षणासाठी खूप काही पोषक वातावरण नव्हतं. घरातल्या मोठ्यांनी जरासं नाखुषीनेच तिच्या उच्चशिक्षणाला परवानगी दिली. कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि तिथून थेट अमेरिकेत एम.आय.टी. अशी तिची गाडी सुसाट निघाली. इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च - हे तिचं क्षेत्र होतं. पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत नोकरी, पीएचडी, मॉन्टेक सिंग अहलुवालियांशी ओळख, मैत्री, लग्न, संसार, कामानिमित्त अमेरिकेतल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उच्च अर्थशास्त्री वर्तुळात त्यांचा समावेश होता. अमेरिकेत १० वर्षं लखलखीत करिअर घडवून दोघं आणि त्यांची दोन मुलं भारतात परतले. इथल्या अर्थशास्त्र क्षेत्रातही दोघांच्या नावांचा एव्हाना दबदबा निर्माण झालेला होता. इशरनी आपलं पॉलिसी रिसर्चचं काम पुढे सुरू केलं. त्या रिसर्चवर आधारित काही पुस्तकं लिहिली. अमेरिकेत असतानाच मनमोहन सिंग यांच्याशी दोघांची ओळख

पुस्तक परिचय : विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले)

Image
विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले) ९० च्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या शहरी भागांमध्ये झपाट्यानं बदल व्हायला लागले. नवनवी टीव्ही चॅनल्स, इंटरनेट कॅफे यांच्यामार्फत आधी कधीही न पाहिलेलं एक जग लोकांच्या घरात पोहोचलं. एम-टीव्ही, चॅनल-व्ही यांचाही यात मोठा हात होता. परदेशी पॉप गायकगायिका, त्यांचे म्युझिक व्हिडिओज, त्यातली फॅशन या सगळ्याचं विशेषतः तरुणांना वेड लागलं. पुढे अनेक घरांमध्ये PC दिसायला लागले. वॉकमन्स, मोबाइल फोन्स, CDs ची देवाणघेवाण हे पाठोपाठ होतंच. त्यातूनच पॉर्नोग्राफी बघण्याच्या व्यसनाने शिरकाव केला.  ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ पुस्तकात हा सगळा काळ येतो. त्यातही केंद्रस्थानी हे पॉर्न बघण्याचं व्यसन आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवण्याचा आपला उद्देश लेखकानं प्रस्तावनेत स्पष्ट केला आहे. ठाण्यातल्या मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या एका आळीत घडणारी ही कथानकं आहेत. पहिल्या एक-दोन कथांमध्ये त्या आळीचा tone प्रस्थापित होतो. लेखकानं स्वतः ते जग तेव्हा पाहिलेलं आहे. तिथल्या तरुणाईचा तो सुद्धा एक भाग होता. त्या प्रवाहात ओढला जातानाच अनेक बारीकसारीक गोष्टी त्याच्या मनात नकळ

नेटफ्लिक्सची गोष्ट (पुस्तक परिचय - That Will Never Work : Marc Randolph)

Image
मार्क रॅन्डॉल्फ हा नेटफ्लिक्सचा सहसंस्थापक. Online DVD rental ची कल्पना त्याच्या डोक्यात आली तेव्हापासून ते नेट्फ्लिक्स कंपनी पब्लिक लिमिटेड झाली आणि तो कंपनीतून बाहेर पडला तिथपर्यंतची ही ‘नेटफ्लिक्सची गोष्ट’. लेखकाने ती अगदी रंगवून रंगवून सांगितली आहे. तीन-चार start-ups उभे करून दिल्यानंतर त्याला वाटायला लागलं होतं की आपण काहीतरी वेगळ्या कल्पनेवर काम करावं, स्वतःची कंपनी सुरू करावी. त्या कंपनीद्वारे लोकांना एखादी ऑनलाइन सर्व्हिस देण्यावर त्याचा भर होता. तो आणि त्याचा सहकारी मित्र रीड हेस्टिंग्ज यांनी वेगवेगळ्या start-up ideas वर कशा चर्चा केल्या, त्यातून Online DVD rental ची कल्पना कशी समोर आली, ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधी दोघांनीच काय काय केलं, मग कंपनी स्थापण्याचं ठरलं, त्यासाठी पहिली team कशी गोळा केली, पुढे business development, असे टप्पे एक-एक करत पुस्तकात येत जातात. मार्क रॅन्डॉल्फच्या आयडिया आणि हेस्टिंग्जचा पैसा आणि मार्केटिंग स्किल्स, अशी ही जोडगोळी होती. नेटफ्लिक्समध्ये दोघांच्या भूमिका काय असाव्यात त्यावर मुख्य त्या दोघांच्यात स्पष्टता होती. त्यातू

पुस्तक परिचय : मॉलमध्ये मंगोल (कथासंग्रह, सतीश तांबे)

Image
  'मानगुटीवर बसलेल्या ग्लोबलायझेशनच्या वेताळाला' अशी अर्पणपत्रिका पाहून पुस्तक वाचावंसं वाटलं.  बहुतेक कथांचं बीज चांगलंच आहे, पण कथाविस्तार आणि निवेदन मला खूपच पाल्हाळिक वाटलं. सगळ्या कथा प्रथमपुरुषी निवेदनात आहेत. पुस्तकाच्या मध्यात त्याचाही जरा कंटाळाच आला. (लेखकाची शैलीच तशी आहे, की या पुस्तकात हा योगायोग आहे, ते माहिती नाही.) कथा प्रथमपुरुषी केव्हा लिहितात, केव्हा लिहावी, याबद्दलचे काही ठोकताळे असतील तर मला कल्पना नाही. पण सरसकट सगळ्या कथा तशाच, हे मी पहिल्यांदाच पाहिलं. मध्यमवर्गीय वातावरण, तशीच पात्रं, भाषा साधी-सोपी, समोर बसून गप्पाटप्पांत आठवणी/अनुभव सांगावेत अशी शैली - या पुस्तकातल्या चांगल्या गोष्टी. पण अर्पणपत्रिकेतला भेदकपणा एकाही कथेत मला तितकासा दिसला नाही. त्यातल्या त्यात ‘तळघरातील बुरखेधार्‍याची गोष्ट’, ‘मॉलमध्ये मंगोल’, ‘बेडरूम तिथे पिकासो’ या तीन कथा चांगल्या वाटल्या. काही वर्षांपूर्वी या पुस्तकावर पेपरमध्ये, फेसबूक पोस्टींतून बरंच वाचलं होतं. म्हणून फार अपेक्षेने पुस्तक वाचलं; पण मला विशेष आवडलं नाही.

पुस्तक परिचय : Cobalt Blue (सचिन कुंडलकर, अनुवाद - जेरी पिंटो)

Image
(‘कोबाल्ट ब्लू’ हे सचिन कुंडलकरलिखित पुस्तक ऐकून माहिती होतं. पण का कोण जाणे, मी सुरुवातीपासून ते इंग्रजी पुस्तक आहे, असंच समजत होते. किंडलवर मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दिसला तेव्हा हे लक्षात आलं. असो. थोडक्यात, मी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वाचला.) तर, पुण्यातल्या मध्यमवर्गीय जोशी कुटुंबातल्या दोन भावंडांची ही गोष्ट आहे. भाऊ, तनय, जरा अबोल, लाजराबुजरा; तर बहीण, अनुजा, ट्रेकिंग आवडणारी, बाइक चालवणारी; मेक-अप, सुंदर कपडे वगैरेशी फार देणेघेणे नसणारी. त्यांच्या घरी एक तरुण मुलगा पेइंग-गेस्ट म्हणून येतो. आणि या भावंडांच्या आयुष्यात एक वावटळ येते. दोघंही त्यात हेलपाटून जातात. वावटळ येते तशी यांना तडाखा देऊन निघूनही जाते. त्यानंतरच्या काळात पुस्तकाची सुरुवात होते. दोघं हेलपाटून का जातात, त्याचं कथानक flashback मध्ये येतं. त्याच ओघात पुढे दोघं त्यातून सावरण्यासाठी काय करतात, सावरू शकतात का, याचे धागे गुंफलेले आहेत. *** पुढच्या मजकुरात spoilers आहेत *** तीन तरुण पात्रं असल्यामुळे ही वावटळ अर्थात प्रेमाची, शारीरिक आकर्षणाची आहे. तनय आणि अनुजा दोघंही पाहुण्याच्या प्रेमात पडतात.

पुस्तक परिचय : मास्तरांची सावली (कृष्णाबाई सुर्वे)

Image
 प्रांजळ, प्रामाणिक आत्मकथन. साधीसुधी, गप्पा मारल्यासारखी भाषा. सुर्वे दांपत्याचं बालपण, तरुणपणीचा काळ केवढा ओढगस्तीचा होता! मधला काही काळ तर अक्षरशः अन्नान्न दशा होती. ते वाचताना अंगावर काटा येतो. नारायण सुर्वे शाळाशिक्षक होते, तर कृष्णाबाई एका शाळेत शिपाई होत्या. त्यांना चार मुलं झाली. प्रत्येकाची काही ना काही शोकांतिका झाली. अशातही आनंदी, खेळकर स्वभाव टिकवून ठेवणे, काव्यलेखन, आलागेला-पै पाहुणा, सगळं करणे, याची कमाल वाटते. त्याकाळची मुंबई पुस्तकात ठिकठिकाणी येते. ती चित्रं मनात उभी करायला मजा आली. कृष्णाबाईंनी पूर्णपणे स्वत:च्या नजरेतून, स्वत:च्या आयुष्याबद्दल लिहिलंय. नारायण सुर्वेंच्या कवि म्हणून कारकीर्दीतल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल पुस्तकात केवळ उल्लेख येतात, ते मला आवडलं. लहानपणापासून कृष्णाबाईंचा स्वभाव विचारी, खमका होता. त्यांच्याजवळ भक्कम आत्मविश्वास होता. मात्र लग्नानंतर त्या नोकरी करत असल्या तरी इतर घराबाहेरची कामं, पैशांचे व्यवहार त्यांनी कधीच केले नाहीत; सुर्व्यांच्या कोणत्याही सत्काराला, सार्वजनिक कार्यक्रमाला त्या गेल्या नाहीत; हे वाचून आश्चर्य वाटलं. नवन

पुस्तक परिचय : गोल्डा - एक अशांत वादळ (वीणा गवाणकर)

Image
गोल्डा मेयर यांच्या आत्मचरित्रावर बेतलेलं पुस्तक (वाटलं मला, कारण अधेमध्ये आत्मचरित्राचे उल्लेख आहेत.) हे पुस्तकही चरित्रात्मकच आहे. वाचताना पहिली प्रतिक्रिया होते ती म्हणजे काय जबरदस्त कणखर, करारी, कर्तृत्ववान बाई होती ही! त्यांचं बालपण अमेरिकेत गेलं, ही माहिती मला नवीन होती. बालपण, तरुण वयातली जडणघडण, इस्रायलच्या निर्मितीपूर्वीपासूनची ज्यूंसाठीची त्यांची धडपड, तळागाळातल्या माणसांचा विचार, त्यांच्याशी मनाने कायम जोडलेलं असणे, पुढे इस्रायलमधलं राजकारण, त्यात अनुभवाने आणि कर्तृत्वाने निर्माण झालेला दरारा, कामगार मंत्री, परराष्ट्रमंत्री, पंतप्रधानपद, अरब राष्ट्रांसोबतचे सततचे खटके, युद्धं, कॉफी आणि सिगारेट्सच्या अखंड व्यसनामुळे आलेली आजारपणं, निवृत्ती, मृत्यू... असा दीर्घ, वाचतानाही दमवणारा प्रवास आहे. त्यांची स्टोरीच मुळात इतकी इव्हेन्टफुल असल्यामुळे पुस्तक कंटाळवाणं झालं नाही हे खरं, तरी ते आणखी चांगलं करता आलं असतं, असं वाटलं. आणखी एक, म्हणजे किंडल आवृत्तीत प्रचंड typos आहेत. त्यामुळे फार विरस झाला. त्यापायी मध्ये काही दिवस पुस्तक अर्धवट वाचून बाजूला पडलं होतं. पण शेवटी नेटानं पूर्ण

पुस्तक परिचय : संवादु अनुवादु (उमा कुलकर्णी)

Image
अनुवादाचा प्रवास मांडायला हवा, या भालचंद्र नेमाडेंच्या सूचनेवरून उमा कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहायला घेतल्याचं म्हटलं आहे. पुस्तकात केवळ अनुवादाचा प्रवासच नव्हे, तर त्यांचा आजवरचा जीवनप्रवासच येतो. त्यामुळे पुस्तक चांगलं घसघशीत आहे. पुस्तकाचं एका वाक्यात वर्णन करायचं तर हे त्यांच्या भोवतीच्या गोतावळ्याचं वर्णन आहे. गोतावळा- माणसांचा आणि पुस्तकांचाही. बेळगावातलं बालपण, तेव्हाचं घरचं वातावरण, लहानपणीचे सवंगडी, शेजारपाजारी, नातेवाईक, घरातले कुळाचार, लग्नानंतरचे सासरचे नातेवाईक, सासरमाहेरच्या नातेवाईकांचे निवेदनाच्या ओघात येणारे स्वभावविशेष, हे सगळं वाचताना आपल्या शेजारच्या घरातलं एखादं कुटुंब रोज येताजाता दिसत राहतं, तसं वाटतं. पुस्तकाचा मुख्य भाग उमा आणि विरुपाक्ष कुलकर्णी यांचं सहजीवन आणि त्यांतला कानडी-मराठी पुस्तकांचा सहभाग यावर आधारित आहे. दोघांच्या वाचनाच्या सवयी, उमा कुलकर्णी यांची कानडी समजून घेण्याची धडपड, त्यातून अनुवादाच्या कामात त्यांचं सहजगत्या शिरणं, हे अगदी गप्पांच्या ओघात सांगावं तसं त्यांनी लिहिलं आहे. त्या कामाच्या निमित्ताने कारंथ, भैरप्पा यांच्याशी त्यांचा स

पुस्तक परिचय : The Messenger (Shiv Malik)

Image
There are more than two sides to every story - हे या पुस्तकाचं उपशीर्षक आहे. आणि अगदी पहिल्या पानापासूनच आपण ही तिसरी बाजू काय असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात करतो. ७ जुलै २००५ यादिवशी लंडनमध्ये चार ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. लंडन पोलीस, इंग्लंडमधली प्रमुख वृत्तपत्रं, न्यूज चॅनल्स या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याच्या मागे होते. या हल्ल्यामागे ब्रिटिश जिहादी नेटवर्कचा (BJN) हात होता, हे स्पष्ट झालं होतं. शिव मलिक हा इंग्लंडमधला शोधपत्रकार सुरुवातीला मँचेस्टरमध्ये एका दुय्यम असाइनमेंटसाठी या नेटवर्कमधल्या एका सदस्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेला. त्याचं नाव - हसन बट्ट. हसन बट्ट इंग्लंडमधल्या वृत्तमाध्यमांमध्ये बर्‍यापैकी माहित असलेला चेहरा होता. BJN तर्फे माध्यमांना मुलाखती देणे, पत्रकारपरिषदेत बोलणे या गोष्टी तो करायचा. त्याचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं. हसन बट्टशी बोलताना शिव मलिकच्या लक्षात आलं, की तो BJN चा केवळ ‘चमको प्रवक्ता’ नव्हता. त्याची स्वतःची काही तत्वं होती, धर्माचारण म्हणजे नेमकं काय याबद्दल त्याची मतं स्पष्ट होती, आणि तरीही तो विवेकी विचार करणारा ह

विचारांची साखळी, पब्लिक आर्ट वगैरे

Image
आजच्या लोकसत्ता-‘ अन्यथा’ सदरातला हा लेख वाचत होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या आक्रमक साम्राज्यशाहीपोटी उद्भवलेल्या एका जुन्या घटनेबद्दल, तेव्हाच्या युद्धाबद्दल त्यात सांगितलं आहे. १९३९ साली स्टालिनच्या रशियाने (तेव्हाचं USSR) फिनलंडवर असंच आक्रमण केलं. तेव्हा फिनलंडने रशियाला कसा निकराचा लढा दिला, त्या युद्धात रशियाची कशी नाचक्की झाली, याबद्दल लेखात वर्णन आहे. ते वाचत असताना सतत वाटत होतं, की यासंदर्भातलं काहीतरी (लेख किंवा वृत्त याहून वेगळं) आपल्या पाहण्यात येऊन गेलं आहे. पण काय? दोन-तीन वर्षांपूर्वी Scandinavia tour दरम्यान फिनलंडमध्ये ७-८ दिवस मुक्काम होता, हाच त्यातल्या त्यात एक धागा. मग जरा डोक्याला ताण दिला. तेव्हाचे फोटो काढून धुंडाळले. आणि ते काय हे आठवलं. फिनलंडमधल्या Rovaniemi इथे फिरताना दिसलेलं हे सुंदर शिल्प : हे शिल्प तिथे आहे हे आम्हाला आधी अजिबात माहिती नव्हतं. गॉथेनबर्ग (स्वीडन) इथून एक ट्रेन आणि दोन विमानं बदलून, दिवसभराचा प्रवास करून रोवानिएमीला पोहोचेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती. पण ती arctic circle वरची जुलैमधली संध्याकाळ होती! अंधार-बिंध

पुस्तक परिचय : Before the Coffee Gets Cold (Toshikazu Kawaguchi)

Image
टोक्योच्या एका गल्लीतल्या बेसमेंटमधल्या लहानशा जुनाट कॅफेत घडणारी गोष्ट आहे. कॅफेत येणार्‍यांना टाइम ट्रॅव्हलची सोय असते. मात्र त्यासाठी चार अटी असतात : - टाइम ट्रॅव्हल करून कॅफेच्या बाहेर जाता येणार नाही. - त्यामुळे अर्थातच भूतकाळात किंवा भविष्यकाळात त्या कॅफेत आलेल्या/येणार्‍या व्यक्तींनाच भेटता येईल. - भूतकाळात जाऊन वर्तमानकाळ बदलता येणार नाही. - हे सगळं करण्यासाठी कॅफेतल्या एका विशिष्ट जागी बसावं लागेल, समोर कपात वाफाळती कॉफी ओतली जाईल, ती कॉफी थंड होण्याच्या आत पिऊन संपवायची आणि वर्तमानकाळात परत यायचं. कॅफेत येणारी नेहमीची मोजकी गिर्‍हाइकं आणि कॅफेतले चार कर्मचारी एवढी पात्रं. त्या सर्वांना टाइम ट्रॅव्हलच्या सोयीबद्दल माहिती आहे. हा सेट-अप पाहून ज्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात त्याहून पुस्तक खूप वेगळं आणि सुंदर आहे. कथानकात चार टाइम ट्रॅव्हल्स आहेत. त्यातले तीन भूतकाळात आणि एक भविष्यकाळात आहे. एक गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, एक मध्यमवयीन जोडपं, दोन सख्ख्या बहिणी, आई-मुलगीची जोडी अशा चार कथा त्यात येतात. यातल्या प्रत्येक जोडीत आपांपसांत काही समज-गैरसमज झालेले असतात. ते फार का

तीन बेटांची कहाणी (रेफ्युजी मालिकेतला पुढचा लेख)

Image
  You have to understand, That no one puts their children in a boat Unless the water is safer than the land... - वारसन शायर, ब्रिटिश कवयित्री १. ऑक्टोबर २०१३, एका संध्याकाळी उशीरा उत्तर आफ्रिकेतल्या लिबियाच्या किनार्‍यावरून एक बोट निघाली. बोटीत सिरियातले जवळपास ५०० निर्वासित होते. बोट भूमध्यसमुद्रातून निघाली. पुढे सर्वात जवळचा देश म्हणजे इटली. ती रात्र आणि पुढचा संपूर्ण दिवस बोट पाणी कापत चालली होती. त्या वाटेवर इटलीच्या मुख्य भूमीच्या बरंच आधी लाम्पेदूसा हे इटलीच्याच अखत्यारीतलं बेट येतं. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या बेटाच्या थोडं अलिकडे असताना बोट उलटली. लाम्पेदूसा बेटाच्या पूर्वेकडे माल्टा हा लहानसा देश आहे. इटली आणि माल्टाच्या जहाजांनी काही निर्वासितांना वाचवलं; पण त्यादिवशी जवळपास २७० जणांना (त्यांत ५०-६० लहान मुलंही होती) आपले प्राण गमवावे लागले. जीवाच्या भीतीने सगळे निघालेले; त्यांना आशा होती, की एकदा लाम्पेदूसाला पोहोचलो की झालं; मग आपण दुसर्‍या जगात असू; तिथे सगळं आलबेल असतं असं म्हणतात. मधला हा एक समुद्र तेवढा पार करायचा. त्याच्यावरच आता