प्रागची जादू, स्ट्रीट म्युझिक वगैरे

 प्रागमधला तिसरा दिवस. सकाळपासून म्हटलं तर randomly भटकत होतो.

Letna Park च्या टेकडीवरून खाली उतरलो, समोर आलेला नदीपूल पार केला आणि Old Town Square ची दिशा धरली.
या चौकाला ५००-६०० वर्षांचा इतिहास आहे. त्या काळाच्या मानानं हा चौक GRAND आहे.
चौकाच्या भोवती अनेक बारीकसारीक रस्ते, चिंचोळ्या गल्ल्या आहेत. अशाच एका उपरस्त्यावरून आम्ही चौकाच्या तोंडाशी पोचलो. भरपूर गर्दी, वर्दळ, गजबज होती.

अचानक उजव्या हाताला रस्त्याच्या कडेला एक वादक वाटणारा माणूस दिसला. Folding खुर्चीवर बसला होता. थकलेला चेहरा, पिकलेले केस, धीमेपणानं पुढ्यातल्या उलट्या टोपीतली नाणी गोळा करत होता.
माझी नजर आपसूक शेजारच्या वाद्यांवर गेली. दोन saxophones होते.



मी जरा वेळ रेंगाळले. पण म्हातारबाबांचा lunchtime झाला होता बहुतेक. ते काही वादन पुन्हा सुरू करेनात.
आधी जरा हळहळायला झालं. पण street music म्हटलं की हे देखील आलंच. वाद्यांच्या लकेरी अचानक कानावर पडण्यातली मजा जशी आहे, तशीच ही हळहळ.

आम्ही पुढे सरकलो. पुढचा तासभर तो grand चौक बघण्यात कसा गेला कळलं नाही. २ वाजून गेले होते. आता गारठा चांगलाच वाढला होता.
आलो त्याच्या विरुद्ध दिशेच्या गल्लीत Illusion Art Museum दिसलं होतं. ते बघायचं आणि त्याच गल्लीतून पुढे परतीचा रस्ता धरायचा असं ठरवलं होतं.

तेवढ्यात Saxophone ची धुन ऐकू आली. ही संधी कशी सोडणार! मी तिकडे धावले.

आजोबांनी पुन्हा वादन सुरू केलं होतं. खुर्चीवर अवघडत बसले होते. एका दिशेला झुकून अवजड saxophone कसाबसा पेलत असावेत असं वाटत होतं. जवळ टेपरेकॉर्डरवर मंद साथसंगीत वाजत होतं. 
सगळ्याचा एकत्रित परिणाम काय क-मा-ल होता!



मी ५-१० मिनिटं तिथे उभ्याउभ्या ते वादन ऐकलं. येणार्या-जाणार्यांकडे आजोबांचं लक्ष होतं. कुणी थांबून फोटो काढत होतं, कुणी नुसतं thumbs-up करून जात होतं. त्यांना आजोबा हात हलवून acknowledge करत होते.
त्यांनी वादन थांबवल्यावर मी टाळ्या वाजवल्या आणि वळले. तर त्यांनी हाताच्या इशार्यानं मला बोलावलं आणि जवळचं एक picture postcard मला दिलं. 
Surprise में surprise!

त्या पोस्टकार्डवर कुठे त्यांचं नाव वगैरे लिहिलंय का पाहिलं, पण नव्हतं. नंतर सहज नेटवर शोधाशोध केली तर कळलं की त्यांचं नाव Vladimir Pinta. गेली ३०-४० वर्षं ते jazz music, street music साठी काम करतायत!
प्रागच्या त्या चौकात ते १५-२० वर्षांपासून वादन करत आलेले आहेत. नेटवर त्यांचे व्हिडिओ आहेत, फेसबुकवर fan page आहे.
कमाल वाटली ती सगळी माहिती वाचून.

पण ती माहिती समजायच्या आधीच त्यांचं तल्लीनतेनं saxophone वाजवणे अनुभवता आलं, याचा जास्त आनंद झाला.
प्रागनं केलेली जादू अशी तुकड्या-तुकड्यांत विखुरलेली आहे... ❤️

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)