Posts

Showing posts from December, 2013

उमा कुलकर्णी यांचे व्याख्यान

वर्तमानपत्राच्या पुरवणीच्या एखाद्या पानावर कोपर्‍यात स्थानिक कार्यक्रमांची माहिती देणारी यादी बर्‍याचदा येते. ती वाचून त्यातल्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी शिवून गेला, तरी मनाला बरं वाटतं. प्रत्यक्षात तसं फार क्वचित घडतं, हे देखील तितकंच खरं. त्याच यादीत गेल्या शुक्रवारी ‘लेखक-वाचक थेट भेट. उमा कुलकर्णी यांचे व्याख्यान’ या मथळ्यावर माझी नजर पडली. मथळ्यामुळेच खालचा मजकूर लक्षपूर्वक वाचला गेला. कार्यक्रम दुसर्‍या दिवशी संध्याकाळी होता. ठाण्यातच होता. वेळही जमण्यासारखी होती. पण शनिवार सकाळपासून नेमकी एक-एक कामं अशी लागोपाठ निघत गेली, की मला दुपारचं जेवायलाच तीन वाजून गेले. कार्यक्रमाला जायचं, तर संध्याकाळचं स्वयंपाकघर लगेच खुणावायला लागलं आणि जाण्याचा बेत मी जवळपास रद्दच करून टाकला. पण तरी एखादा कार्यक्रम घडायचा असला, की घडतोच. मी स्वतःलाच जरा दटावलं, की सकाळपासून धावपळ झाली आहे, म्हणून दिवसातली उर्वरित कामं तू बाजूला सारणार आहेस का? मग हाच कार्यक्रम का म्हणून? मुकाट्यानं कार्यक्रमाला जा. मग चरफडत रात्रीची पोळी-भाजी केली आणि गेले मुकाट्यानं कार्यक्रमाला. निघा