Posts

Showing posts from March, 2013

काही ऑस्करविजेते चित्रपट

Image
गेल्या ८-१५ दिवसांत काही ऑस्करविजेते चित्रपट पाहिले. ' द आर्टिस्ट ' - स्पेशल इफेक्टस् आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या युगात एखाद्याला मूकपट काढावासा का वाटतो - ही मुख्य उत्सुकता होती. पण सिनेमा पाहिल्यावर जाणवलं, की बोलपट काढला असता, तर तो अन्य सर्वसाधारण सिनेमांप्रमाणेच झाला असता. नायक - ज्याँ दुयॉर्दिन (उच्चार  ) - त्याचा चेहरा किती एक्स्प्रेसिव्ह आहे! आयुष्यातल्या भरभराटीच्या काळात, आनंदी, उल्हसित नायक हसतो, तेव्हा त्याचे डोळेही हसतात. कठीण काळात तो अधूनमधून केविलवाणा हसतो, तेव्हा मात्र डोळे हसत नाहीत. हे पडद्यावर दाखवणं किती कठीण आहे! २०च्या दशकाचा उत्तरार्ध वेषभूषेतून आणि भवतालातून निव्वळ अफलातून उभा केलेला आहे. (कथानक हॉलिवूडमधे घडतं. पण हा सिनेमा एक फ्रेंच निर्मिती आहे - हे मला टायटल्स पाहताना कळलं.) विकीपेडियावर दिलंय, की It was also the first film presented in the 4:3 aspect ratio to win since 1955's Marty, मग या aspect ratioला गूगल केलं. ती एक तांत्रिक बाब आहे हे तर झालंच, पण सिनेमाच्या एकत्रित प्रभावी परिणामामागे हे एक महत्त्वाचं कारण असावं - असं जाणवलं.