Posts

Showing posts from March, 2019

मैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...!

ती : (मी प्यायला दिलेल्या ताज्या ताकाचा एक घोट घेत) ताई , हे घरी बनवलंय ? मी : (प्रफुल्ल चेहर्‍यानं) हो !! ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते!! मी : 😐😐 * ती केर काढत होती. मी फोनवर काहीतरी करत होते. ती : ताई , माझ्या नवर्‍याने माझ्या पोराचा फोटो टाकलाय... फेसबुकवर... गणपतीसोबत मी : बरं... ती : तुमी फोनवर उघडा ना फेसबुक , मी दाखवते... मी : माझ्या फोनवर फेसबुक नाहीये. ती : 😲😲 * ती : ताई , लादीचा कपडा फाटायला आलाय... मी : बरं , उद्या दुसरा काढून ठेवते. ती : डी-मार्टात ‘पोछे का कपडा’ म्हणून मिळतो , मस्त असतोय , तो का नाही आणत ? मी : 😒😒 * ती : ताई , हायपरसिटीत सेल लागलाय... मी : हो का ? ती : मला जायला वेळच होत नाही... मी : 😑😑 * ती : (भांड्यांच्या साबणाचा डबा बघून) ताई , बारहून हा डबा स्वस्त पडतो ? मी : काय माहित! डबा नाहीतर बार , दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते. ती : दुकानातून का ?? डी-मार्टातून नाही आणत ?? मी : डी-मार्ट म्हणजे दुकानच ना ? ती : 🙆🙆

न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २)

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला) ---------- पाहिया, रोटोरुआची भटकंती संपवून वेलिंग्टनला पोहोचलो तोवर अशा आयत्यावेळी ठरवून केलेल्या वॉक्सची जवळपास चटक लागल्यासारखं झालं होतं. वेलिंग्टनच्या वाटेवर असताना नकाशात हॉटेलचा पत्ता वगैरे पाहत होते; तेव्हा हॉटेलपासून जवळच ‘माऊंट व्हिक्टोरिया लूक-आऊट’ नावाचा ट्रेल दिसला. तिथे जायचं हे ओघानं आलंच. वेलिंग्टनला हॉटेल चेक-इन केलं, i-SITE ची वारी केली, तिथे दुसर्‍या दिवशीच्या ‘झीलँडिया टूर’ची व्यवस्था लावली, तिथून जवळच्याच ‘बेसिन-रिझर्व क्रिकेट ग्राऊंड’मध्ये एक फेरफटका मारला आणि मग माऊंट व्हिक्टोरियाची वाट पकडली. आमचं हॉटेल आणि आसपासचा रहिवासी भाग एका अर्थानं मा.व्हिक्टोरियावरच वसलेला होता. कारण आम्ही लूक-आऊटच्या दिशेला चालायला लागलो तो चांगलाच चढाचा रस्ता निघाला. जवळपास दहा-एक मिनिटं हाशहुश करत चालत होतो. दोन्ही बाजूंना टुमदार घरं नाहीतर २-३ मजली इमारती दिसत होत्या. पण चढ असा होता की

फॅक्ट आणि फिक्शनच्या सीमारेषेवर

(महिला दिनानिमित्त २०१७ साली दिव्य मराठी मधुरिमा पुरवणीत लिहिलेला छोटासा लेख) ----- कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असायचे, तेव्हा कायम माझ्या बसच्या आधी एका खासगी कंपनीची बस यायची. स्टॉपलगत उभे असलेले त्या कंपनीतले दोघं-चौघं बसमध्ये चढायचे. त्यात एक तरूण मुलगीही असायची. माझा तिच्याकडे पाहून फुल्ल फॅन झालेला असायचा. तिचे ऑफिसी कपडे, खांद्यावरची बॅग, पायांतले सँडल्स, गळ्यातलं आय-कार्ड, एका मनगटावर घड्याळ, दुसर्‍या हातात ब्रेसलेट किंवा तत्सम काहीतरी, एकदम टकाटक कॉर्पोरेट लूक! आपण पुढे नोकरी करायची तर अश्याच कंपनीत, अश्याच अवतारात ऑफिसला जायचं, अश्याच बसमधून, हे मी तिच्याकडे बघून तेव्हा मनाशी पक्कं केलं होतं... पुढे बर्‍याच वर्षांनी ‘गोष्टीवेल्हाळ’ (लेखक : मधुकर धर्मापुरीकर) या कथासंग्रहातली ‘वधू’ ही कथा वाचताना मला अगदी अचानक ती कॉर्पोरेट मुलगी आठवली. मला इतकं आश्चर्य वाटलं! दोघींमध्ये कणमात्रही साम्य नव्हतं... की होतं? कथेतला नारायणराव हा एका विवाहेच्छुक मुलाचा बाप. लग्न जुळवताना वधूपित्यांनी चपला झिजवायच्या, आपण नाही, या विचारांचा त्याच्यावर पगडा आहे. पण तरी मुलाचं