Posts

Showing posts from February, 2011

पुस्तक परिचय - आवा

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. २० फेब्रुवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख. (मूळ लेख इथे  वाचता येईल.) ------------------------------------------ चित्रा मुद्‌गल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या सर्व अनुभवांचा परिपाक म्हणजे त्यांची ‘आवा’ ही कादंबरी. आवा - म्हणजे कुंभाराची भट्टी. कादंबरीत ही भट्टी प्रतिक बनून निरनिराळ्या रूपांत वाचकांसमोर येते. कामगारांच्या दैनंदिन जीवनात परिस्थितीचे चटके देणारी भट्टी, चंगळवादी समाजाची जणू खाजगी मालमत्ता भासणारी पैश्यांची ऊब देणारी भट्टी, आपल्याला निव्वळ उपभोग्य वस्तू मानणार्‍या समाजाला खडसावू पाहणारी स्त्री-क्षमतेची भट्टी आणि भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या तरुणवर्गाच्या मानसिकतेची भट्टी. नायिका नमिता पांडेय ही विशीतील तरूणी. कामगार चळवळीतील आघाडीचे नेते असलेले तिचे वडील पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. घरची अर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे पाच जणांच्या कुटुंबा

आर.टी.ओ.च्या नानाची... !!!

माझा दुचाकीचा लायसन्स मागच्या महिन्यात संपुष्टात आला. आता याला माझा वेंधळेपणा म्हणा, दुर्दैव म्हणा किंवा योगायोग म्हणा पण हे माझ्या लक्षात आलं ते लायसन्सनं ‘राम’ म्हटल्यानंतरच. यातला वेंधळेपणा हा की नूतनीकरणाची कुणकुण मला आधीचे २-३ महिने लागलेली होती आणि तरीही मी लक्षात ठेवून वेळेवर ते काम केलं नाही; दुर्दैव आणि योगायोग असे की आदल्या महिन्याच्या ज्या तारखेला लायसन्सनं शेवटचा श्वास घेतला होता, चालू महिन्याच्या नेमक्या त्याच तारखेला नूतनीकरण नक्की कधी आहे हे पाहण्याच्या उद्दीष्टानं मी अगदी कॅलेंडर बघून दिवस ठरवल्यासारखा तो उघडून पाहिला. एक महिन्यापूर्वीच आपला लायसन्स होत्याचा नव्हता झालाय हे लक्षात आल्यावर माझा चेहराही क्षणार्धात तसाच म्हणजे होत्याचं नव्हतं झाल्यासारखा झाला. (या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का?) गेला महिनाभर आपण गावभर चक्क विनापरवाना गाडी चालवत होतो हे जाणवलं. तेवढ्या दिवसांत किमान पाच ते सहा वेळा ट्रॅफिक हवालदाराला दिल