Posts

Showing posts from October, 2009

एक दिवस, सुपरमार्केटमध्ये...

मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे सुपरमार्केटमध्ये गेले होते. (मी आजकाल सग्गळी खरेदी फक्त सुपरमार्केटमधूनच करते हे मला प्रामुख्याने सांगायचं होतं हे सूज्ञ वाचकांच्या लगेच लक्षात आलंच असेल.) मला ही सुपर, हायपर वगैरे मार्केट्स आवडतात ती केवळ तिथल्या वातानुकूलित हवेमुळे. त्या हवेची करणी अशी की सुरुवातीसुरुवातीला एक बास्केट घेऊन आत शिरणारी आणि त्या बास्केटमध्ये मावतील इतक्याच वस्तू विकत घेणारी मी आताशा ‘शॉपिंग कार्ट’ घेऊन आत शिरते. काही वर्षांपूर्वी मला जर कुणी असं सांगितलं असतं की एक दिवस असा येईल की उकाडा आणि घामाच्या चिकचिकाटापासून दूर अशा परिस्थितीत तू निवांत भाजी आणि वाणसामान खरेदी करशील तर मी त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याला/तिला एक चहा पाजून सन्मानानं घरी पाठवलं असतं. ते तसं कुणी मला सांगितलं नाही ते बरंच झालं नाहीतर उगीच माझा एक कपभर चहा वाया गेला असता आणि वर ‘बघ, मी मागेच म्हटलं नव्हतं!’ हे वाक्यही शंभरदा ऐकून घ्यावं लागलं असतं! असो. तर, त्यादिवशीही तशीच एक मोठी ढकलगाडी घेऊन मी सुपरमार्केटमध्ये शिरले. वातानुकूलित हवा, (पडेल चित्रपटांतल्या गाण्यांचं) मंद संगीत