एक दिवस, सुपरमार्केटमध्ये...

मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे सुपरमार्केटमध्ये गेले होते. (मी आजकाल सग्गळी खरेदी फक्त सुपरमार्केटमधूनच करते हे मला प्रामुख्याने सांगायचं होतं हे सूज्ञ वाचकांच्या लगेच लक्षात आलंच असेल.) मला ही सुपर, हायपर वगैरे मार्केट्स आवडतात ती केवळ तिथल्या वातानुकूलित हवेमुळे. त्या हवेची करणी अशी की सुरुवातीसुरुवातीला एक बास्केट घेऊन आत शिरणारी आणि त्या बास्केटमध्ये मावतील इतक्याच वस्तू विकत घेणारी मी आताशा ‘शॉपिंग कार्ट’ घेऊन आत शिरते. काही वर्षांपूर्वी मला जर कुणी असं सांगितलं असतं की एक दिवस असा येईल की उकाडा आणि घामाच्या चिकचिकाटापासून दूर अशा परिस्थितीत तू निवांत भाजी आणि वाणसामान खरेदी करशील तर मी त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याला/तिला एक चहा पाजून सन्मानानं घरी पाठवलं असतं. ते तसं कुणी मला सांगितलं नाही ते बरंच झालं नाहीतर उगीच माझा एक कपभर चहा वाया गेला असता आणि वर ‘बघ, मी मागेच म्हटलं नव्हतं!’ हे वाक्यही शंभरदा ऐकून घ्यावं लागलं असतं! असो.
तर, त्यादिवशीही तशीच एक मोठी ढकलगाडी घेऊन मी सुपरमार्केटमध्ये शिरले. वातानुकूलित हवा, (पडेल चित्रपटांतल्या गाण्यांचं) मंद संगीत, नीट ओळीनं मांडून ठेवलेल्या विविध वस्तू, ‘मे आय हेल्प यू’ असं अंगावरच्या एप्रनद्वारे आपल्याला विचारणारे सुपरमार्केटचे कर्मचारी, आकर्षक वेष्टनांतल्या खाद्यपदार्थांची पुडकी हातात घेऊन त्यावर छापलेली आतल्या पदार्थाची न्युट्रीशनल व्हॅल्यू किंवा एक्सपायरी डेट (आणि हळूच त्यांची किंमतही) पाहणार्‍या ‘जागरुक’ आया, आईचं लक्ष नाही असं बघून दोन तीन चॉकोलेट्स नाहीतर शीतपेयांच्या बाटल्या बास्केटमध्ये टाकणारी त्यांची मुलं, त्यांच्यापासून काही विभाग लांबवर उगीच खिश्यांत हात घालून इकडे तिकडे फिरणारे त्यांचे नवरे या सगळ्यांच्यात अजून एका कस्टमर ऊर्फ गिर्‍हाईकाची भर पडली.

आपला भारत देश कसा झपाट्यानं प्रगती करतोय, लोकांचं राहणीमान कसं उंचावतंय, जुन्या वाण्याच्या दुकानांऐवजी आता आपण कसे या चकचकीत सुपरमार्केटमध्ये खरेदी करतोय अश्या सगळ्या ‘फील गुड’ विचारांनी भारावून जाऊन मी माझ्याजवळच्या शॉपिंग कार्टरूपी ढकलगाडीच्या सामान साठवण्याच्या क्षमतेला पुरेपूर न्याय देण्याच्या कामी लागले होते. इतक्यात मला समोरून एक मध्यमवयीन चिनी (किंवा जपानी) जोडपं येताना दिसलं. (ते मिझोरामी किंवा मणीपुरी जोडपं नव्हतं याची शंकेखोर वाचकांनी नोंद घ्यावी!) नाही म्हटलं तरी आश्चर्यानं माझ्या भुवया जराश्या उंचावल्याच! जगप्रसिध्द मुंबई शहराचा शेजार लाभलेल्या ठाणेनामक शहराच्या तश्या वेशीवरच असणार्‍या एका मध्यम आकाराच्या सुपरमार्केटमध्ये दोन आंतरराष्ट्रीय कष्टमर पाहून आनंदही झाला. (त्या दोन चिन्यांच्या (किंवा जपान्यांच्या; समजून घ्या हो!) उपस्थितीमुळे काही मिनिटांपूर्वीपर्यंत चकाचक, पॉश वाटणारं ते सुपरमार्केट मला एकदम मध्यम वगैरे वाटायला लागलं हे चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून सुटलं नसणारच.)
त्या ज्या कोण चांग-चुंग किंवा विंग-पिंग बाई असतील त्यांच्या हातात एक बास्केट होती. बास्केटमध्ये संसाराला लागणार्‍या दोन चार किरकोळ वस्तू होत्या. त्या वस्तूंकडे मी उगीचच कौतुकानं बघितलं. खरं म्हणजे आश्चर्य किंवा कौतुक वाटण्याचं काहीही कारण नव्हतं. आंतरराष्ट्रीय गिर्‍हाईकं असली तरी ती सुध्दा शेवटी माणसंच की! त्यांनाही खायला-प्यायला लागणार, त्यासाठी फळं, भाज्या, वाणसामान लागणार आणि त्याची खरेदी करण्यासाठी ते दुकानात जाणार यात नवल ते काय?
मग एकदम डोक्यात एक विचार चमकून गेला की परदेशी जाऊन आलेला भारतीय माणूस जसा तिथल्या मोठमोठ्या मार्केट्स, मॉल्सबद्दल भरभरून बोलत असतो तसे हे दोघं जेव्हा आपल्या देशात परत जातील तेव्हा आपल्या या सुपरमार्केटबद्दल तिथे काय बोलतील? किंवा आत्ता या क्षणी त्यांच्या मनात ‘आपल्याकडचं आणि इथलं’ अशी तुलना होत असेल का? हे आपलं प्रगतिपथावरच्या भारत देशाचं प्रतिक(!) असं सुपरमार्केट त्यांना अगदी गिचमिड गर्दीचं वाटत असेल की सुटसुटीत? म्हणजे, ‘आपल्याकडे म्हणजे चार वस्तू घ्यायच्या म्हटल्या तर हायपर मार्केटच्या आत चार मैल चालावं लागतं; इथे बरंय, अर्ध्या-पाऊण तासांत उरकता येतंय’ असलं काही त्या चांग-चुंग काकूंना वाटत असेल का? की जिथे जरा इकडे तिकडे वळलं की अजून एकदोघांचे धक्के खावे लागतात अश्या छोट्याश्या गर्दीच्या ठिकाणी चांग-चुंग काका त्यांना घेऊन आले म्हणून त्या वैतागल्या असतील?...
माझी ढकलगाडी एकीकडे विनाकारण वस्तूंनी भरत असताना माझ्या मनाला हा बरा विरंगुळा मिळाला!

गर्दीचं खरं म्हणजे चिन्यांना काही वावडं असण्याचं कारण नाही. पण त्या काकू जर जपानी असतील तर नक्कीच वैतागल्या असतील हे इन्स्टंट ढोकळा मिक्स आणि त्याच्या शेजारचं मॅगी नूडल्सचं पाकीट उचलताना माझ्या लक्षात आल्यावर मी पटकन मान उचलून त्यांना इकडे तिकडे शोधलं. त्यांचा चेहरा वैतागलेला आहे किंवा कसं ते मला पहायचं होतं. पण दरम्यान ते दोघं लांब निघून गेले होते. ते खरंच चिनी आहेत (की जपानी) ते ओळखण्याचा हा सोप्पा उपाय आपल्याला आधी कसा सुचला नाही या विचारानं मी स्वतःवरच जरा वैतागले. पण पंधरा वीस मिनिटांनी ते दोघं पुन्हा जेव्हा माझ्या नजरेसमोरून थोडा वेळ झळकून गेले आणि आपल्या (मध्यम) सुपरमार्केटमधून इतका वेळ निवांत फिरतायत म्हणजे ते नक्कीच चिनी असणार हे माझ्या लक्षात आलं तेव्हा त्या वैतागाची जागा आनंदानं घेतली. त्या आनंदात आपण अर्ध्या किलोऐवजी एक किलो तूरडाळीची पिशवी कार्टमध्ये टाकली आहे हे ही माझ्या लक्षात आलं नाही.
ते दोघं चिनी आहेत हे एकदा नक्की केल्यावर माझी तोपर्यंत अर्धी(च) भरलेली ढकलगाडी पूर्ण भरेपर्यंत मला नवीन विरंगुळा सापडला - भारत आणि चीनच्या तुलनेचा!

भारत आणि चीनची तुलना करायला मी काही चीनबद्दलची जाणकार आहे किंवा त्या देशाला दहावेळा भेट देऊन आले आहे अशातला भाग नाही. वास्तविक माओ, डेंग, ड्रॅगन, बीजिंग, यांग-त्से नदी आणि चंद्रावरूनही दिसणारी (म्हणे!) चीनची भिंत यापलिकडे मला चीन या देशाबद्दल काहीही माहिती नाही. पण रिकाम्या न्हाव्याजवळ जरा जास्तच रिकामा वेळ असेल आणि त्यानं भिंतीसोबत छतालाही तुंबड्या लावायचं ठरवलं असेल तर? त्याला अडवणारे बाकीचे कोण?
तर, वरच्या माओ, डेंग वगैरे यादीपेक्षाही कुठल्याही मराठी माणसाला (उगीचच) परिचयाची, जवळची वाटणारी एक चिनी गोष्ट म्हणजे शांघाय शहर! ती तशी परिचयाची का वाटते ते नव्यानं सांगायची गरज नाही आणि ज्या गोष्टीमुळे ती परिचयाची वाटते त्याबद्दल तर नव्यानं सांगायची अजिबातच गरज नाही.
आपले राजकारणी तसे चतुर! शांघाय आणि मुंबई या दोन शहरांतली अनेक साम्ये त्यांनी नेमकी शोधून काढली. दोन्ही आपापल्या देशातली प्रथम क्रमांकाची बंदरं आहेत, दोन्ही आपापल्या देशांच्या आर्थिक राजधान्या आहेत, (कोणे एके काळी) मासेमारी आणि कापड‍गिरण्या हे दोन्ही ठिकाणचे प्रमुख उद्योगधंदे होते हे एकदा लक्षात आल्यावर या साम्यस्थळांचा वापर करून त्यांनी एक लक्षवेधक, दमदार(!) घोषणा तयार केली आणि त्या जोरावर त्यानंतरच्या निवडणुकांत मतंही मिळवली. मुंबईचं शांघाय अजूनही होऊ शकलेलं नाही ते सोडा पण ही घोषणा भारतात काही काळासाठी वास्तव्याला आलेल्या त्या चिनी जोडप्याच्या कानावर पडली तर त्यांना काय वाटेल, त्यांची काय प्रतिक्रिया असेल असा एक नवीन विचार आता माझ्या मनात आला आणि छताला तुंबड्या लावायच्या माझ्या कामाला मी हात घातला!

चांग-चुंग काका-काकू जर शांघाय किंवा आसपासच्या परिसरात राहणारे असतील तर ही घोषणा ऐकल्यावर त्यांना कोण अभिमान वाटेल. मुंबईबद्दल त्यांना आत कुठेतरी धाकट्या भावंडाबद्दल वाटते तशी आत्मीयताही वाटेल. अर्थात्‌, मुंबईचा अभिमान बाळगण्याची अजिबात गरज न वाटणार्‍या पु. लं.च्या मुंबईकरांशी जर शांघायकरांचं साम्य असेल (आणि ते तसं असण्याची दाट शक्यता आहे) तर माझा हा अंदाज सपशेल खोटा ठरू शकतो आणि ज्यांच्यासमोर ‘कर’ जोडावेत अश्या इतर कुठल्या चिनी शहराचे ते नागरिक असतील तर मग मात्र जाज्ज्वल्य चिनी अभिमान वगैरे गोष्टी मैदानात उतरतात!
पुणे हे जसं विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं तसंच काहीसं बीजिंग शहराच्या बाबतीत आहे असं मी ऐकून आहे. म्हणजेच मुंबईचं शांघाय आणि पुण्याचं बीजिंग अशी दुहेरी घोषणा खरं म्हणजे तयार करता आली असती. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले राजकारणी लई हुशार! मुंबईची तुलना एका चिनी बंदराशी आणि पुण्याची मात्र चीनच्या राजधानीशी केली गेली असती तर इये मराठिचिये देशी एक नवाच सांस्कृतिक पेचप्रसंग उद्भवला असता! त्या पेचातून सुटका करून घेता घेता सर्वांच्याच नाकी नऊ आले असते. त्यामुळे त्यांनी ही घोषणा एका शहरापुरतीच मर्यादित ठेवली आणि ते बरंच झालं, नाहीतर त्या दुहेरी घोषणेच्या तुंबड्या जमवता जमवता मला सुपरमार्केटमध्ये दुप्पट वेळ घालवावा लागला असता!

... माझी खरेदी मी आटोपत आणली होती. माझी ढकलगाडीही आता बर्‍यापैकी भरलेली होती. मी बिलींग काऊंटरच्या दिशेला वळले. इतक्यात ‘टॉयलेटरीज’च्या विभागात एका रॅकसमोर हातात कसलीशी छोटी पांढरी बाटली घेऊन ती उलटपालट करत निरखत उभे असलेले चांग-चुंग काका-काकू मला पुन्हा दिसले. त्यांच्या शेजारून जाताजाता ते कसली बाटली निरखतायत ते वाकून पाहण्याचा मोह मला आवरला नाही. त्यांच्या हातातली ती बाटली ‘ओडोमॉस मस्किटो रिपेलंट’ची होती!! आपल्याला इथे आल्यापासून रोज रात्री इतके डास जे फोडून काढतायत, त्या डासांना दूर पळवून लावायला ही बाटली पुरेशी पडेल का ही शंका त्यांच्या चेहर्‍यावर चिनी भाषेत स्पष्ट लिहीलेली मला दिसली. मुंबईचं शांघाय का होऊ शकलेलं नाही त्याचं एक साधं, सरळ उत्तर मला त्या बाटलीनं दिलं! तुंबड्या लावायचं माझं काम मी त्याक्षणीच आवरतं घेतलं. बिलाची रक्कम क्रेडीट कार्डवरून चुकती केली आणि भारंभार पिशव्या घेऊन घराचा रस्ता पकडला.
आता मला अजिबात वेळ नव्हता. घरी जाऊन चायनीज फ्राईड राईस आणि व्हेज मांचुरीयनची तयारी करायची होती. रोज रोज तेच तेच आमटी भात, भाजी पोळी काय खायचं, नाही का!

(या लेखात कुठलंही सामाजिक विचारमंथन वगैरे करण्याचा उद्देश नाही. एखाद्या छोट्याश्या घटनेमुळे आपल्या डोक्यात कशी विचारांची साखळी सुरू होते त्याचं एक गमतीशीर उदाहरण म्हणून हे लेखन आहे.)

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)