Posts

Showing posts from May, 2014

तीन तिघाडा...

वैभवी आणि मुक्ताची मैत्री झाली हे एक आश्चर्यच होतं. मुळात, त्यांच्या ओळखीला मैत्री म्हणणं हेच एक आश्चर्य होतं. पण इतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. इतरांच्या मते त्या दोघी पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या. समोरच्या व्यक्तीशी आपल्या आवडी-निवडी जुळणं, सूर जुळणं, त्या व्यक्तीपाशी आपलं मन मोकळं करावंसं वाटणं, त्या व्यक्तीकडेही आपल्यासाठी वेळ असणं, आपल्या एका हाकेसरशी त्या व्यक्तीचं आपल्याला सर्वतोपरी मदत करायला तयार असणं यालाच मैत्री म्हणत असतील, तर मग मुक्ता आणि वैभवीनं हे सग्गळं केलं होतं... तब्बल तीन महिने, कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना. तेवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्या एकमेकींच्या मैत्रिणी बनल्या. म्हणजे इतरांनी त्यांना एकमेकींच्या मैत्रिणी बनवलं. कधी कुणी हे विचारायच्या फंदात पडलंच नाही, की बाबा, ही अशी अशी वैभवी म्हणून मुलगी आहे, ती तुला मैत्रीण म्हणून पसंत आहे का? किंवा, मुक्तासारख्या मुलीची तू मैत्रीण म्हणून निवड केलीयेस, पण हा तुझा निर्णय पूर्ण विचारांती घेतला गेलेला आहे का? पण मैत्रीत हे पसंती किंवा पूर्ण विचारांती असं काही नसतंच. मैत्री ही मैत्री असते;