Posts

Showing posts from August, 2020

शेवटचा मोदक (शतशब्दकथा)

  झालं एकदाचं, आता शेवटचा मोदक...! पारी हातात गोल गोल फिरायला लागण्याच्या बेतात होती. एकीकडे सारणाचा अंदाज घेतला गेला. शेवटचा मोदक वळल्यावर अगदी थोडंसंच सारण उरलं असतं. मग आणखी थोडीशी उकड घेऊन पारी वाढवण्यात आली. मोठी पारी, हातात गोल गोल फिरायला लागली. पारीच्या गोल वाटक्यात शेवटचं सारण भरलं गेलं. शेवटचा घाणा वाफवायला ठेवला गेला. पुढच्या दहा मिनिटांत जेवणाची तयारी केली गेली. गरमागरम मोदकांचा शेवटचा घाणा आधी टेबलावर आला. आकारामुळे उठून दिसणारा शेवटचा मोदक सर्वात आधी उचलला गेला. आणि तूप घेण्यासाठी त्याचं नाक उकललं गेलं... Just like that! अक्षरशः दहा मिनिटांपूर्वीच, पेशन्स संपल्याने, शेवटचा मोदक वळायला जरा जास्तच कसरत करावी लागली होती...  

Gone With The Wind जेव्हा गारूड करतं...

आठवतंय तेव्हापासून या पुस्तकाचं वर्णन ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्‍हेट बटलरची प्रेमकथा’ असंच वाचण्यात आलं होतं. प्रेमकथा म्हटलं की आपल्या डोक्यात काही basic ठोकताळे तयार असतात. पुस्तकाची पहिली १००-१२५ पानं वाचून झाली तरी त्यातलं फारसं काही कथानकात येत नव्हतं. त्याचंही इतकं काही नाही, पण ( narration ला एक छान लय असूनही) त्या शंभर-एक पानांमध्ये हळूहळू कंटाळाही यायला लागला. ५००+ पानांचं पुस्तक कसं काय पूर्ण करणार, असा प्रश्न पडायला लागला. ( Kindle वर ५००+ पानांची आवृत्ती मिळाली होती.) पुस्तक विकत घ्यावं की नाही, वाचलं जाईल की नाही, अशा शंकेनं आधी काही वाचक मित्रमंडळींना पिडलं होतं. त्यातल्या बर्‍याच जणांनी वाचायला सुरुवात करून कंटाळा आल्याने मध्येच सोडून दिलं होतं, ते आठवलं. मग काही काळ पुढे रेटू म्हणून वाचत राहिले, आणि... कधी पुस्तकाने माझा ताबा घेतला हे कळलंच नाही! सुरुवातीला कंटाळा आला, पण आता जरा बरं सुरू आहे... आता फारच इंटरेस्टिंग होत चाललं आहे... व्यक्तिचित्रणं करण्याची पद्धत कमाल आहे... वाचणार्‍याला आपल्यासोबत ओढून नेणारं आहे... दिवसेंदिवस unputdownable होत चाललं आहे... झपाटून, ह