Gone With The Wind जेव्हा गारूड करतं...

आठवतंय तेव्हापासून या पुस्तकाचं वर्णन ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्‍हेट बटलरची प्रेमकथा’ असंच वाचण्यात आलं होतं. प्रेमकथा म्हटलं की आपल्या डोक्यात काही basic ठोकताळे तयार असतात. पुस्तकाची पहिली १००-१२५ पानं वाचून झाली तरी त्यातलं फारसं काही कथानकात येत नव्हतं. त्याचंही इतकं काही नाही, पण (narration ला एक छान लय असूनही) त्या शंभर-एक पानांमध्ये हळूहळू कंटाळाही यायला लागला. ५००+ पानांचं पुस्तक कसं काय पूर्ण करणार, असा प्रश्न पडायला लागला. (Kindle वर ५००+ पानांची आवृत्ती मिळाली होती.)

पुस्तक विकत घ्यावं की नाही, वाचलं जाईल की नाही, अशा शंकेनं आधी काही वाचक मित्रमंडळींना पिडलं होतं. त्यातल्या बर्‍याच जणांनी वाचायला सुरुवात करून कंटाळा आल्याने मध्येच सोडून दिलं होतं, ते आठवलं. मग काही काळ पुढे रेटू म्हणून वाचत राहिले, आणि... कधी पुस्तकाने माझा ताबा घेतला हे कळलंच नाही!

सुरुवातीला कंटाळा आला, पण आता जरा बरं सुरू आहे... आता फारच इंटरेस्टिंग होत चाललं आहे... व्यक्तिचित्रणं करण्याची पद्धत कमाल आहे... वाचणार्‍याला आपल्यासोबत ओढून नेणारं आहे... दिवसेंदिवस unputdownable होत चाललं आहे... झपाटून, हेलपाटून टाकणारं आहे... अशा एक एक पायर्‍या चढत मी वाचत गेले. आणि शेवटी मेलनीच्या आजारपणानं सुरू झालेला प्रदीर्घ प्रसंग वाचत वाचत पुस्तकाच्या शेवटाला आले तेव्हा तर मला स्पष्टपणे जाणवलं, की मनावर एक गारूड तयार झालेलं होतं, एक अंमल चढला होता...

त्याचं मर्म पुस्तकाच्या पानापानावरच्या detailing मध्ये होतं; तरीही घेतलेल्या अनपेक्षित jumps मध्ये होतं... त्या jumps मुळे वाचकांचा अजिबात विरस न होण्यात होतं; historic fiction मध्ये इतिहास किती आणावा याच्या घालून दिलेल्या परिपाठात होतं; प्रेमकथेला किती तर्‍हेचे कोन असू शकतात याच्या दाखवून दिलेल्या शक्यतांमध्ये होतं; प्रेमाची कबुली देण्याचा प्रसंग किती जगावेगळा असू शकतो या जाणीवेत होतं... ’माणसं अशी वागतातच का?’ या प्रश्नांच्या अनेको उत्तरांमध्ये होतं.

हो, ही ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्‍हेट बटलरची प्रेमकथा’च आहे, पण तेवढ्या ६(च) शब्दांत पुस्तकाचं वर्णन करणे हा अन्याय आहे.

ही जगण्याच्या वावटळीत टिकून राहण्यासाठी केलेल्या अथक धडपडीची, धीरोदात्तपणाची कथा आहे; आता सगळं संपलं, अशी परिस्थिती समोर ठाकते तेव्हाही शरण न जाता जमेल तसे हातपाय मारण्याची आहे; प्रेमामुळे या धडपडीसाठी मोठी ताकद मिळू शकते याकडे झालेल्या दुर्लक्षाची आहे.

काही पुस्तकं चाळीशीच्या अनुभवांचं गाठोडं हाताशी आल्यावरच वाचावीत असं मला ’The God Of Small Things’ वाचल्यावर जाणवलं होतं. Gone With The Wind नं त्यावर शिक्कामोर्तब केलं.

Timeless Classics म्हणजे नेमकं काय हे या पुस्तकामुळे लख्खपणे समजलं.

----------

पुस्तकात गुलामगिरीची पाठराखण केली गेली आहे असा या पुस्तकावर आरोप होतो. (जॉर्ज फ्लॉइड प्रकरणानंतर नेटफ्लिक्सवरून हा सिनेमा हटवण्यात आला, असंही वाचलं.) पण लेखिका एक southerner होती, कथानकही southerners च्या दृष्टीकोनातून लिहिलं गेलं आहे, हे एकदा लक्षात घेतलं, तर मग ती बाब खूप खटकत नाही.

उलट त्या संदर्भात आणखी एक गोष्ट नोंदवाविशी वाटते. पुस्तकातल्या गुलाम पात्रांचे संवाद ते ज्या उच्चारांची इंग्रजी बोलतात तशा पद्धतीनंच लिहिलेले आहेत. (I - Ah, going - gwine) ते वाचायला सुरुवातीला जरा अडचणीचं वाटतं. पण नंतर मजा यायला लागते. ती पात्रं खरंच आपल्यासमोर उभी राहून बोलत असल्याचा भास होतो.

----------

Gone With The Wind हा सिनेमा मी पाहिलेला नाही. YouTube वर त्यातल्या बर्‍याच महत्वाच्या प्रसंगांच्या clips आहेत. पुस्तकातला तो-तो प्रसंग वाचून झाला की मी त्या-त्या clips पाहत होते. आणि (संपूर्ण सिनेमा पाहिल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करणे चुकीचं आहे हे मान्य करून म्हणेन, की) पुस्तकात फार सुंदर/भेदक/परिणामकारक रीतीने समोर येणारे प्रसंग त्या clips मध्ये ५० टक्केही वठलेले वाटले नाहीत...  अर्थात माध्यमांतर हा वेगळा विषय झाला.

पण मुद्दा आहे गारूड! पुस्तक पूर्ण करायला दोन महिने लागले, पण ते झालं. पुस्तक पूर्ण करून एक आठवडा होऊन गेला, तरी ते अजून तसंच आहे!

Comments

mayur blogs said…
खूप सुंदर विश्लेषण आहे.

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)