पूर्वतयारी
दक्षिण आफ्रिकेला जाण्याचं अनेक वर्षांपासून मनात होतं. २०१७ साली
न्यूझीलंडला गेलो तेव्हाही आधी द.आ.च मनात होतं. पण त्याच्या आदल्या वर्षीच
केपटाऊनमधल्या पाण्याच्या दुर्भिक्षाच्या बातम्या वाचल्या होत्या.
त्यामुळे तेव्हा ते लांबणीवर टाकलं गेलं, ते यंदा प्रत्यक्षात आलं.
सुरुवात प्लॅनिंगपासून करतेय, कारण आतापर्यंतच्या आमच्या टूर्समध्ये द.आ.चं प्लॅनिंग मला सर्वात चॅलेंजिंग वाटलं आहे.
द.आ. म्हटल्यावर पहिल्यापासून माझ्या डोक्यात केप टाऊन आणि क्रूगर नॅशनल
पार्क ही जोडी फिट्ट बसलेली होती. ती माझी चूक होती. नकाशा पाहिला तर कळतं,
की केप टाऊन आणि क्रूगर जवळपास diagonally opposite आहेत आणि त्यांच्यातलं
अंतर भरपूर आहे. (क्रूगर आसाम-अरुणाचल मानलं तर केप टाऊन गोवा आहे.)
क्रूगर नॅशनल पार्क हे आफ्रिकेतल्या महत्त्वाच्या नॅशनल पार्कपैकी एक.
क्रूगरला जवळचं मोठं शहर म्हणजे जो’बर्ग किंवा प्रिटोरिया. भारतातून
जो’बर्गला रोज फ्लाइटस आहेत. शिवाय जो’बर्ग हे राजधानीचं शहर. त्यामुळे
पहिला प्लॅन ठरला- मुंबई-जो’बर्ग, तिथून क्रूगर. पहिले प्लॅन्स थोड्याच
दिवसांत मान टाकतात. हा प्लॅनही आठवड्याभरात ढेपाळला. (का ते पुढे सांगणारच
आहे.)
क्रूगर नॅशनल पार्कतर्फे वेगवेगळ्या टूर्स डिझाइन केलेल्या आहेत. २ दिवस, ३
दिवस, ४-५ दिवस. त्यांच्या वेबसाइटवरून त्याचं बुकिंग करावं लागतं.
टूरमध्ये कुठल्याही ठिकाणी किमान ३ दिवस तरी हवेत, असा आमचा thumb rule,
आम्ही Scandinavia tour नंतर ठरवलेला. त्यावर मी ठाम होते. त्यामुळे ३/४/५
दिवसांच्या क्रूगर टूर्सची माहिती काढायला सुरुवात केली. त्यातली ४
दिवसांची एक टूर सर्व तर्हेने आवडली. कोणती ते आता आठवत नाही, कारण ही
मे-जूनची गोष्ट आहे आणि ढेपाळलेल्या प्लॅनमधली आहे. मुंबईहून फ्लाइट्सच्या
वेळा इ. पाहता जो’बर्गला रात्री पोहोचून, एक रात्र राहून दुसर्या दिवशी
सकाळी लवकर क्रूगरची वाट धरावी लागणार होती. तो गाडीने साधारण ४ तासांचा
प्रवास, तिथे पोचल्यावर लगेच safari वगैरे सुरू. इतका एकसलग प्रवास, आणि
लगेच क्रूगरमध्ये भटकंती आम्हाला दोघांनाही नको वाटली. मग क्रूगरमध्ये ४
ऐवजी ५ दिवस राहू असं ठरवलं, तशी तिथली एक टूर बुकमार्क करून ठेवली आणि केप
टाऊनकडे वळलो.
केप टाऊनची जसजशी माहिती काढत गेलो, तसं लक्षात आलं, की तिथे किमान चार
दिवसांचा मुक्काम तरी हवाच. (हा हिशोब आमच्या फिरण्याच्या पद्धतीनुसार.
सर्वांना हे लागू होईल असं नाही.) त्याच्याहीपेक्षा, असं दिसलं, की केप
टाऊनपासून पूर्वेकडे समुद्रकिनार्यालगत पार पूर्व किनारपट्टीपर्यंत
टूरिस्टांसाठी घबाड होतं! (त्याला ‘गार्डन रूट’ असं नाव आहे, हे नंतर
समजलं. त्याबद्दलही पुढे सांगेनच.) क्रूगर ५ दिवस, केप टाऊन ४ दिवस,
मुंबई-जो’बर्ग येण्याजाण्याचा एक-एक दिवस, ११ दिवस तर असेच संपत होते.
तेवढेच दिवस फिरून परतायचा पर्याय होताच. पण नाही, घबाडाबद्दल समजल्यावर
ऐसी जीभ लपलपाई, की आणखी आठ-एक दिवस टूर वाढवून तेवढ्यात त्या घबाडातलं काय
काय हाती लागतंय याचा शोध सुरू केला.
पश्चिमेला केप टाऊन ते पूर्वेला पोर्ट एलिझाबेथ अशी ही गार्डन रूटची
किनारपट्टी. (काटेकोरपणे बोलायचं तर मोझल बे ते जेफ्रीज बे.) द.आ. देशाची,
तसंच आफ्रिका खंडाचीही ही दक्षिण किनारपट्टी. केप टाऊन आणि पोर्ट एलिझाबेथ
ही दोन्ही नावं क्रिकेटमुळे आपल्याला ठाऊक असतात. त्यामुळे दोन्हींच्या
मधला हा टापू उगीचच आपला वाटायला लागतो. असो.
तर या दोन शहरांच्या दरम्यान किनारपट्टीलगत आख्खं ’गार्डन रूट नॅशनल पार्क’
आहे. हे वाचून ‘अबब!’ झालं. गार्डन रूटला जाणारे टुरिस्टस् केप टाऊन
किंवा पोर्ट एलिझाबेथमध्ये कार भाड्याने घेतात आणि ४-५ दिवसांत गार्डन
रूटची रोड-ट्रिप करतात. बहुतेक blogs, vlogs वर अशीच माहिती मिळत होती.
यातलं काहीच ‘आमच्या लायनीपरमाने’ नव्हतं. ६००-७०० किमी ४-५ दिवसांत
हाकायचे हे काही आम्हाला पटेना.
मग, केप टाऊनपासून जवळपास गार्डन रूटचा कोणकोणता भाग येतो, कोणती ठिकाणं
पाहण्यासारखी आहेत, हे शोधायला सुरुवात केली. पण google, TripAdvisor
वगैरे ‘केप टाऊनपासून जवळपास’ या filter ला कुठले दाद द्यायला! त्यांनी
आख्खा गार्डन रूट आमच्यासमोर उलगडला.
गार्डन रूटवर किमान १० ते १२ मध्यम/छोटी towns आहेत. त्यांच्या भोवताली
अनेक नॅशनल पार्क्स, nature reserves आहेत, ही सगळी त्या गार्डन रूट नॅशनल
पार्कची पिल्लं. प्रत्येक नॅ.पा.ची आणि प्रत्येक टाऊनची आपापली खासीयत आहे,
प्रत्येकाला 4.5 stars onwards ratings आहेत. आणि ही सर्वात महत्त्वाची
ठिकाणं. इतरही अनेक जागा आहेत असं समजलं. बघता बघता आमच्यासमोर problem of
plenty ठाकला. काय निवडायचं, काय वगळायचं, उरलेल्या ५-७ दिवसांत काय काय
बसवायचं कळेना. त्यात पूर्व किनारपट्टीवरचं Durban ही एव्हाना खुणावू लागलं
होतं.
एकीकडे खर्चाचा अंदाज बांधायला सुरुवात केली होती. बघता बघता लक्षात
आलं, की क्रूगर मुक्कामापेक्षा तुलनेनं कमी खर्चात गार्डन रूटवर आरामात
फिरता येऊ शकतं. (म्हणजे क्रूगरचा ५ दिवसांचा खर्च गार्डन रूटवरच्या ५
दिवसांच्या खर्चापेक्षा बर्यापैकी जास्त असल्याचं दिसलं. हे सुद्धा आमच्या
फिरण्याच्या, खर्च करण्याच्या पद्धतीला अनुसरून.) इथे आमच्या प्लॅननं
पहिली गटांगळी खाल्ली.
तरी काथ्याकूट करायला हाताशी वेळ होता. त्यामुळे केप टाऊन आणि गार्डन रूटला
जरा बाजूला ठेवलं आणि जो’बर्ग, प्रिटोरियाकडे वळलो.
मुंबई-जो’बर्ग-क्रूगर-प्रिटोरिया-जो’बर्ग-मुंबई अशा compact plan चा २-३
दिवस बारीकसारीक विचार केला. पण काहीही केलं तरी गार्डन रूटचं पारडंच जड
राहत होतं. आणि केप टाऊनला (म्हणजे पर्यायानं cape of good hope ला)
अव्हेरणे काही पटत नव्हतं.
शेवटी आम्ही चक्क क्रूगरला अव्हेरण्याचा निर्णय घेतला. खर्चाचा मुद्दा
होताच. शिवाय तिथे पहाटे ५ वाजता उठून जीप सफारी, दुपारी पुन्हा सफारी,
रात्री आणखी एक सफारी – हे विशेषत: माझ्या वृत्तीला मानवणारं नव्हतं. अशी
धावाधाव करत wildlife काय बघायचं! पुन्हा, wildlife बघायचं तर
केनिया-टांझानिया अधिक चांगले, द.आ. काय कामाचं! (हा युक्तीवाद प्लॅनच्या
गटांगळीनंतर सुचलेला.)
एकदा हा निर्णय झाल्यावर, गार्डन रूटवर २० दिवसांचं रान मोकळं
होतं...... असं आधी वाटलं, पण पुढचा चॅलेंज तिथे होता. गार्डन रूटवरची
महत्त्वाची सगळी ८-१० ठिकाणं पहायची तर खूप नाचानाच झाली असती. नकाशा पाहून
अंदाज येत नाही, पण द.आ.चा विस्तार खूप मोठा आहे. अंतरं खूप आहेत. नुसतं
hotel hopping झालं असतं. म्हणजे पुन्हा त्या ८-१० तून निवड करणे आलं.
यादी मोठी होती – Cape Town, Hermanus, Cape Agulhas, Mossel Bay,
Wilderness, Knysna, Plettenberg bay, Nature’s valley, Stormsrivier,
Jeffrey’s bay, Port Elizabeth
यातलं सर्वात पहिलं गळलं ते PE. गार्डन रूटवर road travel शिवाय पर्याय
नाही हे एव्हाना लक्षात आलं होतं. पण self drive tour नको होती. केप
टाऊनहून हर्मानसला day tours जातात, फार फार तर एक रात्र मुक्कामाच्या
टूर्स असतात, असं नेटवर दिसत होतं. हर्मानसवर हा अन्याय होता, असं त्याची
माहिती काढल्यावर दिसलं. Customisation ने आता आपलं जाळं पसरायला सुरुवात
केलीच होती. आम्ही हर्मानसला ३ दिवस राहण्याचा निर्णय घेतला. (तो किती
योग्य होता हे तिथे पोचल्यावर लक्षात आलंच. त्याबद्दल पुढच्या लेखांमध्ये
येईलच.)
केप अगुलहास इथे अटलांटिक आणि हिंद महासागर एकत्र येतात (म्हणे),
आफ्रिका खंडाचं हे सर्वात दक्षिणेकडचं टोक, पण बाकी तिथे मुक्काम करावा असं
विशेष काही वाटलं नाही. इथेही केप टाऊनहून day tours येतात, असं समजलं, ते
सुद्धा बाद. त्यामुळे यादीतला दुसरा मेंबर गळला तो Cape Agulhas.
मोझल बे म्हणजे गार्डन रूटवरचा बहुधा सर्वात टुरिस्टी स्पॉट. तिथून
पुढची सगळी ठिकाणं साधारण एकसारख्या अंतरावर आहेत. Hotel hopping
करण्यापेक्षा यातल्या एक आड एक ठिकाणी आरामात ३/४ दिवस मुक्काम करायचा आणि
अलीकडची-पलीकडची ठिकाणं बघायची, असा साधारण प्लॅन आकाराला यायला लागला.
यावर खूप वेळ घालवून, बराच काथ्याकूट (आणि मतभेद) होऊन शेवटी आमची अंतिम
यादी तयार झाली: केपटाऊन (४ दिवस), हर्मानस (३ दिवस), नाय्ज्ना (४ दिवस),
स्टॉर्म्सरिव्हर (४ दिवस), डर्बन (३ दिवस).
घाई, गर्दी, धावाधाव टाळून अगदी निवांत फिरण्याचा आमचा हा प्लॅन पूर्णतः
यशस्वी झाला- अपवाद फक्त केप टाऊन टेबल माऊंटन व्हिजीटचा अर्धा दिवस.
-----
बेसिक आराखडा ठरल्यावर विमानाची तिकिटं.
द.आ.ला जायला दोन पर्याय आहेत. एक दुबईमार्गे केप टाऊन, एक आदिसअबाबामार्गे
जो’बर्ग. दुबईमार्गे विमानतिकीट बरंच महाग होतं. त्यामुळे आम्ही दुसरा
पर्याय निवडला: मुंबई-आदिसअबाबा-जो’बर्ग, जो’बर्ग-आदिसअबाबा-मुंबई. हॉटेल
बुकिंग केली. जो’बर्गचा वापर फक्त एअरपोर्टपुरता आणि विमानांच्या वेळा odd
असल्याने एकेका रात्रीच्या मुक्कामापुरता करायचा ठरवला. त्यासाठी जो’बर्ग
एअरपोर्टच्या अगदी जवळचं हॉटेल बुक केलं. दुसर्या दिवशी स्थानिक विमानाने
केप टाऊनला गेलो. (हे सगळं धरूनही दुबईमार्गे तिकीट महाग पडत होतं.)
केप टाऊनमध्ये हॉटेल बुक करताना आणखी एक उपकाथ्याकूट केला. केप
टाऊनमध्ये दोन प्रमुख आकर्षणं होती- Cape of Good Hope आणि Table mountain.
केप टाऊनचा विस्तार साधारण मुंबईसारखा दक्षिण-उत्तर आहे. बहुतांश टूर
कंपन्या उत्तरेकडच्या भागांमध्ये वेस्ट कोस्टलगत हॉटेल्स बुक करतात.
आम्हीही आधी तसंच केलं होतं- समजा दहिसर-बोरिवली. तर टेबल माऊंटन येतो
अंधेरीत आणि केप ऑफ गुड होप म्हणजे नेव्ही नगरचं टोक. (यावरून relative
locations चा अंदाज येईल. प्रत्यक्षात केप टाऊनची अंतरं जास्त आहेत.)
बारीकसारीक प्लॅनिंग करताना लक्षात आलं की केप टाऊनमध्ये road travel बरंच
करावं लागणार आहे. हॉटेल ते cape येऊन-जाऊन १००+ किमी. मग आधीचं हॉटेल रद्द
करून साधारण मध्यात येणारं ईस्ट कोस्टवरचं दुसरं हॉटेल बुक केलं. (समजा
शिवडी.) याचा आम्हाला खूप फायदा झाला. केप टाऊनमध्ये फिरतानाही आणि पुढे
Hermanus exit साठी सुद्धा...
-----
भारतीय पर्यटकांसाठी द.आ.व्हिजा प्रोसेसिंग फुकट असतं.
इथिओपियामार्गे जायचं तर yellow fever ची लस घ्यावी लागते, असं कुठे कुठे
वाचण्यात आलं होतं. म्हटलं, व्हिजा मिळाला तर घेऊ लस, त्यात काय. तर कसलं
काय, व्हिजासाठी yellow fever vaccination certificate अनिवार्य होतं.
मुकाट्याने लस टोचून घ्यायला गेलो. तिथल्या डॉ.नं विचारलंच- ‘Going to
South Africa?’ लशीमुळे काही ताप वगैरे आला नाही, ही त्यातल्या त्यात
चांगली गोष्ट.
व्हिजाला अपॉइंटमेंटचीही गरज नव्हती, walk-in प्रकरण होतं. गणपती जवळ
आले होते. महालक्ष्मी VFSला जावं लागणार होतं. गर्दी, ट्रॅफिक इ.विचार करून
गणेश चतुर्थीच्या १-२ दिवस आधी नीट ठरवून, सुट्ट्या काढून visa
application देऊन आलो; कशी बरोबर वेळ साधली म्हणून स्वतःची पाठ थोपटून
घेतली. चार दिवसांत पासपोर्ट्स घरी आले सुद्धा. पण २१ दिवसांच्या टूरसाठी
२० दिवसांचा व्हिजा दिला होता!
VFS ला फोन केला, तिथल्या बाईनं सांगितलं, ‘प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही
२१व्या दिवशी सकाळी निघू शकता.’ आम्ही २१ व्या दिवशी सकाळी निघणार होतो हे
बरोबर, पण व्हिजा २०व्या दिवशी रात्री १२ वाजता संपला असता ना. ही रिस्क
कोण घेणार! VFS ला इमेल केलं, तरी त्यांचं उत्तर तेच. म्हटलं, काही खरं
नाही. मग थेट द.आ.वकिलातीलाच इमेल केलं. त्यांच्याकडून उत्तर आलं, visa
correction साठी पुन्हा apply करावं लागेल!
आणि अशा प्रकारे भर गणपतीच्या गर्दीत आम्ही पुन्हा एकदा महालक्ष्मीला गेलो.
(व्हिजा प्रोसेसिंग फुकट होतं, पण त्यासाठी कॅबच्या डोंबलावर दोनदा खर्च
करावा लागला. दोघांचा कामाचा आणखी एक-एक दिवस त्यात गेला.)
Correction application दिलं. त्यांच्या सिस्टिमचं date arithmetic
तेव्हाही गंडलेलंच होतं. २० दिवसच दिसत होते. मग मात्र आम्हाला जरा आवाज
चढवावा लागला. शेवटी तिथल्या मुलीने हाताच्या बोटांवर दिवस मोजले आणि
वरमलेल्या आवाजात म्हणाली- ‘बरोबर आहे तुमचं, २१ दिवस होतात.’ आता बोला! मग
ती कुठेतरी आतल्या केबिनमध्ये अंतर्धान पावली. १० मिनिटांनी बाहेर येऊन
म्हणाली- ‘आठवडाभरात पासपोर्ट मिळतील.’ visa correction होणार की नाही
याबद्दल अवाक्षर नाही. उगीच शंका यायला लागल्या- २० दिवसांचा व्हिजा पूर्णच
रद्द केला तर? उगीच भांडायला आलो का? एका दिवसाने टूर कमी करणे सहज शक्य
होतं, तसंच करायला हवं होतं का? जो’बर्गला २०व्या दिवशी रात्री १२च्या आत
इमिग्रेशन पूर्ण करून रात्रभर एअरपोर्टवर थांबलो असतो, असा s-o-s (आणि
silly) विचारही करून झाला.
पण त्यांनी सांगितल्यानुसार आठवडाभरात पासपोर्ट्स आले, आता त्यावर ३०
दिवसांचा व्हिजा दिसत होता. मुख्य पूर्वतयारी झाली होती. आता आम्ही म्हणू
शकत होतो- It’s time for Africa!
-----
Comments