तीव्र कोमल
फक्त एक घर तर घ्यायचं होतं. या ‘फक्त’पाशी येऊन पोहोचायला चंद्रकांत काशिनाथ फाटक ऊर्फ चंदाला गेले चार-सहा महिने फार घाम गाळावा लागला होता... आपला फारच घाम गळतोय हे लक्षात आल्यावर त्यानं कारचा ए.सी. अजून वाढवला. ए.सी.वाढवणे या शब्दप्रयोगाचा ऐश्वर्याला राग येतो. "तो काय आवाज आहे का वाढवायला किंवा कमी करायला?" असं तिचं म्हणणं. "मग काय म्हणायचं?" "Drop the temperature." "म्हणजे तेच ते ना?" "नाही!" हे ‘नाही’ तिच्याकडून नाही, धनश्रीकडून येतं. धनश्रीला त्याची ही ‘तेच ते’ म्हणायची सवय मुळ्ळीच आवडत नाही. ते ऐकलं, की तिच्या कपाळावर पावणेतीन आठ्या पडतात. तिकडे ऐश्वर्या ‘Gosh! Pops म्हणजे ना...’ असा चेहरा करून आपलं टेक्स्टिंग पुढे सुरू करते. असा साध्या साध्या शब्दांचाही कीस पाडणार्या या बायका, घर घ्यायचं म्हटल्यावर सरसावल्या नसत्या तरच नवल होतं. किती खोल्यांचं घर घ्यायचं इथेच चर्चेला तोंड फुटलं आणि झालं की सुरू दोघींचं! तरी, धनश्रीला यावेळेस एक अतिरिक्त काम आहे. ऐशूनं केलेल्या एका मागणीपायी तिच्यासमोर एक पेच उभा राहिला आहे, जो तिला सोडवायचा आह...