Posts

Showing posts from 2021

पुस्तक परिचय : One Part Woman (मूळ लेखक - पेरुमल मुरुगन)

Image
शंभर-एक वर्षांपूर्वीच्या तामिळनाडूतल्या एका खेड्यातल्या जोडप्याची (पोन्ना आणि काली) ही कथा आहे. लग्नाला १०-१२ वर्षं होऊनही त्यांना मूलबाळ नाही म्हणून गावातल्या लोकांकडून, नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकून घ्यावे लागत असतात. दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. पोन्ना मूल व्हावं म्हणून बर्‍यापैकी डेस्परेट असते; कालीचं म्हणणं असतं आपण दोघं एकमेकांच्या साथीला असणं जास्त महत्वाचं. त्या काळात त्यांच्या गावात, पंचक्रोशीत ज्या प्रथा, परंपरा, रूढी, अंधश्रद्धा असतात त्यानुसार दोघं नाना उपाय करतात. या पूजाअर्चा, नवस, विविध देवाची सेवा यांची पुस्तकात खूप सविस्तर वर्णनं येतात. माझ्यासारख्या व्यक्तीला एका टप्प्यानंतर त्याचा कंटाळा यायला लागतो. तरी दोघांचं त्यामागचं डेस्परेशन या त्यातल्या एका धाग्याने मला बांधून घातलं. त्या वर्णनातली पोन्ना आणि कालीची इंटरअ‍ॅक्शन काही काही ठिकाणी खूप बारकाव्यांसहित आणि नकळत वाचकांसमोर येते. त्यांच्यातलं नातं त्यातून छान समजतं. या पूजा, उपासतपास, नवस कशाचाच उपयोग होत नाही. शेवटी दोघांच्या आया एक मार्ग सुचवतात. त्या भागातल्या मंदिरात दरवर्षी एका उत्सवाच

पुस्तक परिचय : The Passengers (John Marrs)

Image
भविष्यकाळात घडणारी कादंबरी आहे. ब्रिटनमध्ये स्मार्ट, ड्रायव्हरलेस कार्सचा वापर वाढलेला असतो. तो आणखी वाढावा असा सरकारचा प्रयत्न असतो. लेव्हल-१ ते लेव्हल-५ अशा या कार्स असतात. त्यात लेव्हल-५ कार्सना मॅन्युअल कंट्रोलचा पर्यायच नसतो. याच कार्स पुढच्या दहा वर्षांत ब्रिटनमध्ये सगळीकडे आणायच्या, माणसांना चालवता येतील अशा कार्स बाद करायच्या, असा सरकारचा प्लॅन असतो. त्या दृष्टीने स्मार्ट कार्सचं decision making, A.I. कसं असावं यावर चर्चा, संशोधन म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या गटातल्या लोकांना आमंत्रण देऊन आळीपाळीने काही panels तयार होत असतात. त्यात सरकारतर्फे एक प्रतिनिधी असतो. देशात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या स्मार्ट कार्स अपघातांचा अभ्यास करून A.I. मध्ये कोणकोणते बदल करायला हवेत त्यावर चर्चा होत असतात. कादंबरीची नायिका अशाच एका चर्चागटात बोलावली जाते. तिचा लेव्हल-५ स्मार्ट कार्सना विरोध असतो. (आणि अशा चर्चांनाही ती फारशी अनुकूल नसते. त्याची कारणं कथेत येतात.) या चर्चागटाचं काम सुरू होतं आणि दुसर्‍याच दिवशी ८ स्मार्ट कार्स हॅक होतात. त्या गाड्यांना एकसमान destination ठरवून दिलं जातं. पुढच्या दो

अफगाण निर्वासित - फुफाट्यातून कुठे?

Image
अफगाणिस्तानातल्या जलालाबाद शहरालगत गेल्या काही वर्षांत एक नवी वस्ती उभी राहिली आहे. वस्ती कसली , एक लहानसं खेडंच म्हणायला हवं. खेड्यात एका जेमतेम गिलावा केलेल्या छोट्या घरात ६० वर्षीय हलिमा बीबी आपल्या तीन तरूण मुलांसह राहते. त्यांतल्या एकालाही नोकरी नाही. हलिमा बीबीची प्रकृती वयोमानापरत्वे खालीवर होत असते. पण गावात कोणतेही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. गावात अशी आणखी पाचशे-सहाशे कुटुंबं सहज असतील. त्यांची संख्या सतत वाढते आहे. गावाच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. चिंतेने ग्रासलेली हलिमा बीबी म्हणते , ‘ इथे अवघड परिस्थिती आहे. आमचे नातेवाइक , मित्रमंडळी सगळे तिकडेच आहेत. इथे दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न आहे.’ हलिमा बीबी सांगते ते ‘तिकडे’ म्हणजे पाकिस्तानात. या गावातले सर्वजण पाकिस्तानात तीन-चार दशकं निर्वासित म्हणून घालवून आता अफगाणिस्तानात परतले आहेत. तेव्हा स्वतःचं घरदार सोडून पळताना त्यांच्यासमोर भविष्यातला अंधार होता आणि आता परतल्यावर देखील भविष्यात काय वाढून ठेवलंय याचं उत्तर त्यांच्याकडे नाही... अफगाणिस्तानातलं नागरी जीवन सत्तरच्या दशकाच्या अखेरीपासून ढवळून निघायला सुरुवात

पुस्तक परिचय : Reshaping Art (T. M. Krishna)

Image
कर्नाटकी शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी कला, कलासाधना यासंदर्भातली सहसा चर्चा न होणारी एक मिती या पुस्तकात सुस्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकानुनय, रसिकानुनय, आनंद, विरंगुळा - कलाविष्कारांवरचे असे जगमान्य पापुद्रे काढून टाकून जगण्याचा शोधक प्रवास म्हणून कलेला आपलंसं केलं पाहिजे; कलेला जातीभेद, वर्गभेद, धर्मभेद यांच्या चौकटीत अडकवून ठेवता कामा नये; कला ही त्यापलिकडचीही एक वेगळी जाणीव आहे; असं ते ठासून सांगतात. हे सांगत असताना त्यांनी आपल्या अनुभवांतून आलेली काही खणखणीत विधानं केली आहेत.  उदा. कर्नाटकी संगीत कार्यक्रम म्हणजे निव्वळ श्रवणभक्ती उरत नाही, तिथे ब्राह्मणी संस्कृतीचं पुरेपूर प्रतिनिधित्व दिसतं. (ते स्वतः कर्नाटक संगीत शिकत असतानाच्या काही गोष्टी, निरिक्षणं त्यांनी पुस्तकात थोडक्यात सांगितली आहेत.) रसिकांना, श्रोत्यांना, डोळ्यांसमोर ठेवून कलानिर्मिती करण्यातच कलाकारांना जास्त रस असतो. कलारसिकांकडे सहप्रवासी म्हणून नव्हे, तर एक ग्राहक (कन्झुमर) म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे, कलाकार आनंदाचे पुरवठादार बनून राहतात. कला जेव्हा धार्मिक अनुष्ठान बनून राहते

निर्वासितांच्या कला, निर्वासितांसाठी कला

Image
  "and yet I found in this dome a lot of love, kindness, spirit, life, moments - and pure art... I felt: yes, I am a citizen of the world and I have a safe place." -- माजिद आदिन, इलस्ट्रेटर, इराण ----- सुप्रसिद्ध इंग्लिश पॉप-रॉक गायक सर एल्टन जॉन यांचं सत्तरच्या दशकातलं एक गाणं आहे- ‘रॉकेट मॅन’. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवून दोन-तीन वर्षंच झाली होती... अवकाशमोहिमांचं अद्भुत जगासमोर आलं होतं... अशात या गाण्याचे गीतकार बर्नी टॉपिन यांनी एका अंतराळवीराची व्यथाच या गाण्यात उलगडून दाखवली. अंतराळ मोहिमा म्हणजे फार काळ आश्चर्याची बाब राहणार नाही, बघताबघता माणसांसाठी ती नित्यनेमाची गोष्ट होईल, असं म्हणत त्यांनी तंत्रज्ञान आणि मानवी मन यांच्यातलं द्वंद्व गाण्यात मांडलं. पाश्चात्य जगतात हे गाणं खूप गाजलं. सर एल्टन आणि टॉपिन यांनी दीर्घकाळ एकत्र काम केलं. या संगीतमैत्रीला ५० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल २०१७ साली एक स्पर्धा घेण्यात आली. या जोडीची सत्तरच्या दशकातली तीन गाणी निवडून तीन वेगवेगळ्या प्रकारांतर्गत त्याचे म्युझिक व्हिडिओज तयार करून पाठवण्याचं आवाहन केलं गेलं. त्यात ‘र

पुस्तक परिचय : Snowblind (Ragnar Jónasson)

Image
आइसलँडच्या पार उत्तरेकडचं एक दुर्गम गाव. कादंबरीचा नायक पोलीस ऑफिसर आहे. त्याला पहिलंच पोस्टिंग या गावात मिळतं. गावातलं पोलीस स्टेशन अगदी लहानसं, स्टाफ अगदी मर्यादित. एकूण फक्त ३ जण. कारण तिथल्या हेडच्या म्हणण्यानुसार nothing happens here. गावात एक हौशी नाटक कंपनी असते. ती मंडळी दरवर्षी एक नाटक लिहून बसवून गावात सादर करत असतात. नाटकातले कलाकार, लेखक, दिग्दर्शक हीच कथानकातली मुख्य पात्रं आहेत. गावात २ मृत्यू होतात. एक अपघाती, एका परीने आसपास माणसं असताना. दुसरी आत्महत्या, संशयास्पद वातावरणात. पोलीस प्रमुख दोन्ही मृत्यू त्या-त्या रकान्यात टाकतो. पण नायकाला काही बारीकसारीक गोष्टी खटकत असतात. तो आडूनआडून तपास सुरू करतो. वर्षातला बराच काळ त्या भागात बर्फ आणि प्रचंड थंडी असते. अगदी कुंद वातावरण असतं. देशातल्या दक्षिण भागात वाढलेला नायक, त्याला हे वातावरण घुसमटून टाकत असतं. ही नोकरी स्वीकारली ती चूक झाली का हा विचार त्याला छळत असतो. त्याची मनाची अस्वस्थता कथानकात चांगली गुंफली आहे. प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे गावात येणारा एकमेव रस्ता बंद झालेला असतो. विमानसेवाही बंद असते. या

पुस्तक परिचय : Let Me Say It Now (Rakesh Maria)

Image
मुंबईचे सुपर-कॉप राकेश मारिया यांनी आपल्या ३०+ वर्षांच्या पोलीस सेवेतले अनुभव, आठवणी लिहिल्या आहेत. सुरुवातीचं अकोला पोस्टिंग आणि नंतर एकदा रायगड जिल्ह्यातलं अल्प काळाचं पोस्टिंग वगळता त्यांनी कायम मुंबईत काम केलं. आणि त्यातही क्राइम डिटेक्शन हे त्यांचं आवडतं फील्ड होतं. १९९३ सालच्या मुंबई बाँबस्फोट तपासामुळे ते प्रकाशात आले. तेव्हाचं सगळं वर्णन, तपासाची माहिती, संजय दत्तला त्यांनी अटक केलं त्या आठवणी वाचायला इंटरेस्टिंग आहेत. तेव्हा मी या बातम्या बर्‍यापैकी फॉलो करायचे. ते सगळं पुन्हा आठवलं. नंतरही मुंबईतले काही स्थानिक गुन्हे, गाजलेल्या केसेस, काही गुन्हेगारांचा इतर राज्यांमध्ये काढलेला थरारक माग, नेपाळ बॉर्डरपर्यंतच्या मोहिमा मुंबईत बसून मॉनिटर करणे, हे सगळं पण भारी आहे. त्यातलं पोलिसी जार्गन (उदा. क्लीन पिक-अप) वगैरेमुळे थ्रिलर सिनेमे पाहत असल्यासारखं वाटतं. प्रत्येक मोहिमेतले त्यांचे ज्युनिअर सहकारी, कुणाची काय खासीयत होती, क्राइम डिटेक्शनसाठी खबर्‍यांचं जाळं कसं महत्वाचं असतं, हे सगळं त्यांनी खूप छान लिहिलं आहे. (खबर्‍यांचं विस्तृत आणि बारकाईने रचलेलं जाळं यासाठी

निर्वासितांना सांधणारे भाषांचे पूल

Image
 ‘मी पहिला तुर्की शब्द शिकलो तो म्हणजे ‘सू’... घशाला कोरड पडली होती, प्यायला पाणी हवं होतं... अरबी भाषेत पेय या अर्थी शराब असं म्हणतो आम्ही... पण तो शब्द ऐकून त्या तुर्की माणसाने दारू आणून दिली... मी खाणाखुणा करून कसंबसं शेवटी तुर्की भाषेतलं सू म्हणजे पाणी मिळवलं’... सिरियातून पळावं लागलेल्या अलाचा तुर्की भाषेशी झालेला हा पहिला सामना. आज चार-पाच वर्षं उलटून गेली. अला तीच तुर्की भाषा आता व्यवस्थित बोलतो. इस्तंबूलमध्ये, म्हणजे तुर्की राजधानीतच राहतो. तिथे एका एन.जी.ओ.मार्फत तिथल्या सिरियन निर्वासित मुलांना कॉम्प्युटर शिकवतो. अरेबिक भाषेचे ऑनलाइन कोर्सही घेतो. तो कोणत्या परिस्थितीत मायदेशातून बाहेर पडला, त्यापूर्वी तो आणि त्याच्यासारख्या इतर अनेकांवर तिथे काय काय परिस्थिती ओढवली, हे तो विसरलेला नाही. मात्र भूतकाळाला कवटाळून न बसता तो आता पुढे निघाला आहे. आपली सिरियन मुळं न विसरता तो तुर्की जीवनाला, तुर्की समाजाला आपलंसं करण्याच्या प्रयत्नात आहे. काही अंशी यशस्वीही झाला आहे. निर्वासितांच्या पुनर्वसनात भाषाशिक्षण किती महत्वाचं असतं हे अलाच्या उदाहरणावरून अधोरेखित होतं. निर्वा

पुस्तक परिचय : Paper Moon (Rehana Munir)

Image
फिजा नावाची मध्यमवर्गीय कॉलेज तरुणी, एकुलती एक, आईबरोबर मुंबईत राहत असते. एक बॉयफ्रेन्ड, ५ वर्षं स्टेडी असलेला. उच्चभ्रू, हिंदू. त्याच्या घरच्यांना ही पसंत असते. पण तो प्रपोज करतो तेव्हा मात्र ती आधी उत्तर टाळते, नंतर नाही म्हणते. (त्याचं नीटसं कारण पुस्तकात स्पष्ट होता होता राहिलंय असं वाटतं.) फिजाचे वडील तिच्या लहानपणीच घर सोडून गेलेले. (त्याचं कारणही स्टोरीत नीटसं कळत नाही.) त्यामुळे वडिलांबद्दल तिला थोडंफार कुतूहल असलं तरी ती त्यांच्या विचाराने फार ऑब्सेस्ड किंवा नाराज वगैरे नसते. वडिलांचा मृत्यू होतो. इच्छापत्रात त्यांनी फिजासाठी थोडीफार रक्कम ठेवलेली असते. त्या रकमेतून तिनं एक पुस्तकांचं दुकान काढावं अशी त्यांची इच्छा असते. इथे तिला वडिलांशी काहीतरी कनेक्शन आहे असं जाणवायला लागतं. कारण एकतर त्यांनी तिची आठवण ठेवलेली असते, आणि तिलाही वडिलांप्रमाणे पुस्तकांची खूप आवड असते. हो-नाही करता करता ती तिच्याही नकळत पुस्तकांच्या दुकानाचा विचार करायला लागते. इथपर्यंत कथानकाची बैठक बर्‍यापैकी जमली आहे. पुस्तकांच्या दुकानाच्या निमित्ताने, ते ही मुंबईत, काहीतरी वेगळं, इंटरेस्टिंग

मोडलेली मनं, जोडणारे खेळ

Image
  ऑगस्ट, २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’... सिरियाचे दोन जलतरणपटू, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे दोन ज्युडोपटू, इथियोपियाचा एक मॅरेथॉनपटू आणि दक्षिण सुदानचे पाच धावपटू... त्या दहाजणांचे स्वतःचे देश आता त्यांचे उरले नव्हते. त्यांचं निर्वासित असणं त्यांना इतरांहून वेगळं करणारं होतं. मात्र ते बोचरं वेगळेपण तिथे गळून पडलं होतं. ऑलिंपिक्स खेळांनी त्यांना तशी संधी दिली होती. एक नवा इतिहास घडत होता. त्याला कारणीभूत होती जगाची बसलेली एक नवी घडी... की विस्कटलेली? खेळ, शारिरीक व्यायाम आणि निर्वासित या त्रैराशिकाची कल्पना करणं आपल्याला आधी

पुस्तक परिचय : Lab Girl (Hope Jahren)

Image
 हे एका पॅलिओबोटॅनिस्टचं memoir आहे. आणि बॉटनीसंदर्भातलं इतकं सुंदर पुस्तक मी या आधी वाचलेलं नव्हतं. वनस्पतीजगतातली वाढीची एक-एक स्टेप, त्यातल्या अद्भुत गोष्टी, त्यातले काही महत्वाचे शोध, आणि या सगळ्याची स्वतःच्या सायंटिस्ट म्हणूनच्या प्रवासाशी (वाचकांच्या नकळत) घातलेली सांगड, ही या पुस्तकातली बहारदार गोष्ट आहे. एका बीजाचा झगडा काय असतो, मुळं-खोडं गेली लाखो वर्षं काय काय करत आलेली आहेत, झाडाचं पान ही काय चीज आहे, झाडं-वृक्षं ही झाडं/वृक्षं का आहेत, इतर सजीव प्राण्यांहून ती वेगळी का आणि कशी आहेत, मातीकडे कसं बघायला हवं, हे पुस्तकात अतिशय रोचक पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्या वर्णनात काही काही फार सुंदर विधानं आहेत. त्यातल्या अनेक गोष्टी सामान्यज्ञान म्हणून आपल्यालाही थोड्याफार माहिती असतात; तरी त्या अशा पद्धतीनं सांगितल्या गेल्यामुळे वाचताना फार भारी वाटतं. आणि त्याच्या जोडीला अर्थात सायन्सवरचं प्रेम, लहानपणापासून नकळत जपणूक होत गेलेली संशोधक वृत्ती, पी.एचडी.साठीचे प्रयत्न, त्यानंतरची रिसर्च सायंटिस्ट म्हणून वाटचाल, असा हा सगळा प्रवास आहे. यात लेखिकेला पी.एचडी. रिसर्चच्या दरम्

पुस्तक परिचय : Britt-Marie Was Here (Frederik Backman)

Image
 ब्रिट-मारी, एक ६३ वर्षांची बाई. आपला नवरा दुसर्‍या बाईच्या प्रेमात असल्याच्या संशयावरून ती एक दिवस घर सोडते. तिला तो अचानक आलेला एकाकीपणा खायला उठतो. उद्या आपल्याला काही झालं तर कुणाला कळणारही नाही की ब्रिट-मारी इथे होती (Britt-Marie Was Here) आणि आता ती दिसत नाहीये, या विचाराने ती सैरभैर होते. काहीतरी हातपाय हलवायला हवेत, चार माणसांच्यात राहता यायला हवं म्हणून ती सरकारी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये नाव नोंदवते. एका सुन्या पडत चाललेल्या Borg नावाच्या गावात तिला तिथल्या रिक्रिएशन सेंटरची केअरटेकर म्हणून नोकरी मिळते. जागतिक मंदीच्या तडाख्यात त्या गावातले व्यवसाय एक एक करत बंद पडत चाललेत, माणसं तिथून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. ते रिक्रिएशन सेंटरही लवकरच बंद होणार असतं. गावात काही फुटबॉलप्रेमी शाळकरी मुलं असतात. रिक्रिएशन सेंटरलगतच्या थोड्या मोकळ्या जागेत ती न चुकता फुटबॉल खेळत असतात. गावात फुटबॉल खेळण्यासाठी इतर कोणत्याही सोयी नसतात. ब्रिट-मारीला फुटबॉलमध्ये काडीइतकाही रस नसतो, त्या खेळाची काहीही माहिती नसते. तरी एका अनपेक्षित आणि गंमतीशीर कारणाने ती मुलांच्या फुटबॉलशी जोडली

पुस्तक परिचय : घाचर घोचर (विवेक शानभाग)

Image
  घाचर घोचर (विवेक शानभाग), अनुवाद : श्रीनाथ पेरूर एक सर्वसामान्य कुटुंब, जेमतेम खाऊनपिऊन व्यवस्थित राहत असलेलं, फॅमिली बिझिनेसमुळे आर्थिक स्थिती सुधारत जाते. त्याचबरोबर कुटुंबाची नैतिकता नकळत ढासळत जाते... असं कथानक आहे. प्रथमपुरुषी निवेदन, फ्लॅशबॅकमध्ये येणारी कथा. निवेदक, त्याची बायको, आधीची प्रेयसी वाटावी अशी एक व्यक्तिरेखा, निवेदकाचे आई-वडील, घटस्फोटित बहीण आणि काका. काकामुळे बिझिनेस वाढीस लागतो, निवेदकाला काही काम नसतं, बिझिनेसमधून पगार मिळत असतो. त्यामुळे त्याची बायको मात्र नाराज असते. त्यावरून त्यांचे संबंध जरा ताणले गेलेले असतात. बहिणीचं लग्न आणि मुख्यत्वे घटस्फोट हे जरा बटबटीतपणे येतं. पण तसंच अभिप्रेत असावं. शेवट अधांतरी ठेवलाय. त्याने पुस्तक एकदम उंचीवर जातं. वाचकांच्या मनात 'नेमकं काय झालं असावं?' हा विचार घोळत राहतो. तसंच, वर्तमानकाळ आणि फ्लॅशबॅकमध्ये मारलेल्या उड्या खूप इंटरेस्टिंगली येतात. त्यामुळे गुंतून जाऊन पुस्तक वाचलं गेलं. कथानकाच्या अनुषंगाने आलेली काही वाक्यं, विधानं खूप छान आहेत. हे पुस्तक खूप गाजलं, अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली आहेत

पुस्तक परिचय : SNARE

Image
SNARE (Lilja Sigurdardottir) Book 1 of the  Reykjavik Noir Trilogy Reykjavik Noir Trilogy (SNARE, TRAP, CAGE) पैकी पहिलं SNARE वाचलं. स्टोरी चांगली आहे. सोनिया, एक घटस्फोटित आई, लहान मुलगा आळीपाळीने आई आणि वडिलांकडे राहत असतो. मुलाची पूर्णवेळ कस्टडी मिळवण्यासाठी आईला व्यवस्थित घर, इन्कम याची गरज असते. त्यातूनच ती ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये ओढली जाते. नेटाने त्यात ती तरबेजही होते. विमानतळावर कस्टम्समधून पार होण्यासाठी ती कोणकोणत्या युक्त्या करते ते थ्रिलरचा एक भाग म्हणून इंटरेस्टिंग आहे. Reykjavik विमानतळावरचा एक कस्टम्स ऑफिसर हे आणखी एक प्रमुख पात्र आहे. कस्टम्सवाले प्रवाशांकडे कशा प्रकारे लक्ष ठेवतात, त्यांच्या सराईत नजरा काय-काय आणि कसं-कसं टिपत असतात, त्याला सोनियाचा संशय कसा येतो, संशयाची खातरजमा करण्यासाठी तो तिच्यावर कशी कशी पाळत ठेवतो, तिची देहबोली, वेषभूषा, तिचं सामान यातून काय काय अंदाज बांधतो हे सगळं तर फारच इंटरेस्टिंग आहे. पुस्तक वाचताना कस्टम्सचे हे सीन्सच चालू रहावेत, बाकी उपकथानकं मध्येमध्ये नकोत असंच मला वाटत होतं. याच्या जोडीला सोनिया आणि तिच्या नवर्‍याची एक कॉमन

Kindle सोबतचं एक वर्ष

Image
हो-नाही करत गेल्या वर्षाच्या सुरुवातीला kindle reader घेतलं. स्क्रीनवर आपण किती पुस्तकं आणि किती काळ वाचू शकू, एखादं पुस्तक महिना-पंधरा दिवस वाचत असू तर डोक्यात ते पुस्तक होल्ड करायला जमेल का, वाचत असताना मध्येच मागे जाऊन काही संदर्भ पुन्हा शोधता येईल का, मुळात स्क्रीनवर मागे जात जात तो संदर्भ सापडेल का.... यातल्या कशाचंच उत्तर माहीत नसताना त्या गोष्टीवर इतका खर्च करावा का .... हे सर्व प्रश्न Kindleनं पहिल्या पुस्तकालाच पुरते बाद ठरवले. आणि अनेक वर्षांनी मी अधाश्यासारखी भरपूर पुस्तकं वाचली. १० कादंबऱ्या, ६ थ्रिलर्स, ४ आत्मकथा, ३ ऐतिहासिक कादंबऱ्या, ४ दस्तऐवजी लिखाणाची पुस्तकं, २ रिपोर्ताज. पैकी ३ मराठी पुस्तकं, बाकी इंग्रजी. यातली ५ अनुवादित. हे just for the sake of classification. यातल्या काही पुस्तकांनी पुरता भ्रमनिरास केला; काही पुस्तकं फार्फार आवडली. पण ते सुद्धा जाऊ दे…. वाचावीशी वाटतील अशी इंग्रजी पुस्तकं हाताला लागणे मुश्किल झालं होतं. Kindleनं इंग्रजी पुस्तकांचं एक मोठंच्या मोठं गोदामच उघडून दिलं. त्यातली कैक पुस्तकं, अनेको लेखक एरवी समोर येण्याची कणभरही शक्यता नव्हती. आता शंभर