पुस्तक परिचय : Lab Girl (Hope Jahren)
हे एका पॅलिओबोटॅनिस्टचं memoir आहे. आणि बॉटनीसंदर्भातलं इतकं सुंदर पुस्तक मी या आधी वाचलेलं नव्हतं.
वनस्पतीजगतातली वाढीची एक-एक स्टेप, त्यातल्या अद्भुत गोष्टी, त्यातले काही महत्वाचे शोध, आणि या सगळ्याची स्वतःच्या सायंटिस्ट म्हणूनच्या प्रवासाशी (वाचकांच्या नकळत) घातलेली सांगड, ही या पुस्तकातली बहारदार गोष्ट आहे.
एका बीजाचा झगडा काय असतो, मुळं-खोडं गेली लाखो वर्षं काय काय करत आलेली आहेत, झाडाचं पान ही काय चीज आहे, झाडं-वृक्षं ही झाडं/वृक्षं का आहेत, इतर सजीव प्राण्यांहून ती वेगळी का आणि कशी आहेत, मातीकडे कसं बघायला हवं, हे पुस्तकात अतिशय रोचक पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्या वर्णनात काही काही फार सुंदर विधानं आहेत. त्यातल्या अनेक गोष्टी सामान्यज्ञान म्हणून आपल्यालाही थोड्याफार माहिती असतात; तरी त्या अशा पद्धतीनं सांगितल्या गेल्यामुळे वाचताना फार भारी वाटतं. आणि त्याच्या जोडीला अर्थात सायन्सवरचं प्रेम, लहानपणापासून नकळत जपणूक होत गेलेली संशोधक वृत्ती, पी.एचडी.साठीचे प्रयत्न, त्यानंतरची रिसर्च सायंटिस्ट म्हणून वाटचाल, असा हा सगळा प्रवास आहे.
यात लेखिकेला पी.एचडी. रिसर्चच्या दरम्यान भेटलेला सहकारी, बिल, हे पुस्तकातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. दोघांमधलं सहकारी म्हणून असलेलं नातं फार छान दर्शवलं आहे. दोघांच्या स्वभावातले, व्यक्तिमत्वातले फरक, तरी झाडांवर-मातीवर निरतिशय प्रेम असणे, एकमेकांना पूरक पद्धतीनं लॅबमधलं काम करणे, एकमेकांचे जीवाभावाचे मित्र असणे, हे सगळं वर्णन संशोधनकामातलं चांगल्या सहकार्यांचं महत्व अधोरेखित करतं.
तीन ठिकाणी लॅब सेट-अप करतानाच्या अडचणी, गमतीजमती, त्यादरम्यानचे दोघांमधले प्रसंग, संवाद वाचायला खूप मजा येते.
वैज्ञानिकांना निधी उभा करताना काय काय अडचणी येतात, हे तिनं हलक्याफुलक्या भाषेत पण स्पष्टपणे सांगितलं आहे. वैज्ञानिक संशोधन हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे, तिथे आपलं नाणं खणखणीत वाजवताना एका स्त्री-संशोधिकेला किती प्रयास पडतात, हे देखील तिनं स्पष्ट केलं आहे.
हा सगळा प्रवास मांडताना बॉटनीचं बोट कुठेही सुटलेलं नाही; पण बोट आहे म्हणून आख्खा हातच पकडलाय असंही कुठे झालेलं नाही.
पुस्तकाच्या उपसंहारात तिनं झाडांबद्दल काही भाष्य केलंय. सर्वसामान्य लोकांनी झाडा-वृक्षांप्रति आपला दृष्टीकोन कसा ठेवायला हवा, त्यासाठी अगदी साध्या सोप्या गोष्टी कराव्या लागतात, तो सर्व मजकूर म्हणजे पुस्तकाचा कळसाध्याय आहे. उपसंहार संपतो, पुस्तक संपतं तेव्हा ‘वा!’ अशी मनोमन समाधानाची दाद दिली गेली.
पुस्तकातलं लेखिकेच्या प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीबद्दलचं वर्णन मला जरा ताणल्यासारखं वाटलं, बोअर झालं. पण ते माफ आहे.
पुस्तक मला अतिशय आवडलं.
Comments