पुस्तक परिचय : Britt-Marie Was Here (Frederik Backman)

 ब्रिट-मारी, एक ६३ वर्षांची बाई. आपला नवरा दुसर्‍या बाईच्या प्रेमात असल्याच्या संशयावरून ती एक दिवस घर सोडते. तिला तो अचानक आलेला एकाकीपणा खायला उठतो. उद्या आपल्याला काही झालं तर कुणाला कळणारही नाही की ब्रिट-मारी इथे होती (Britt-Marie Was Here) आणि आता ती दिसत नाहीये, या विचाराने ती सैरभैर होते. काहीतरी हातपाय हलवायला हवेत, चार माणसांच्यात राहता यायला हवं म्हणून ती सरकारी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये नाव नोंदवते.

एका सुन्या पडत चाललेल्या Borg नावाच्या गावात तिला तिथल्या रिक्रिएशन सेंटरची केअरटेकर म्हणून नोकरी मिळते. जागतिक मंदीच्या तडाख्यात त्या गावातले व्यवसाय एक एक करत बंद पडत चाललेत, माणसं तिथून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. ते रिक्रिएशन सेंटरही लवकरच बंद होणार असतं. गावात काही फुटबॉलप्रेमी शाळकरी मुलं असतात. रिक्रिएशन सेंटरलगतच्या थोड्या मोकळ्या जागेत ती न चुकता फुटबॉल खेळत असतात. गावात फुटबॉल खेळण्यासाठी इतर कोणत्याही सोयी नसतात.

ब्रिट-मारीला फुटबॉलमध्ये काडीइतकाही रस नसतो, त्या खेळाची काहीही माहिती नसते. तरी एका अनपेक्षित आणि गंमतीशीर कारणाने ती मुलांच्या फुटबॉलशी जोडली जाते. ती मुलं, रिक्रिएशन सेंटरशेजारचं pizza shop cum post office cum utility store चालवणारी अपंग मुलगी, गावातला पोलीस ऑफिसर, मुलांपैकी एक-दोघांचे पालक, मोठी भावंडं यांच्याशी तिच्या ओळखी होत जातात.

पुस्तक संथ गतीने पुढे सरकतं. बोर्ग गावातलं साचलेपण निवेदनात उतरतं. दैनंदिन आयुष्यातले छोटे छोटे प्रसंग अगदी बारकाईने सविस्तर येतात. त्यातून ब्रिट-मारीचं व्यक्तिमत्व, तिचा भूतकाळ, गावातल्यांशी तयार होणारं तिचं नातं हे सगळं समोर येतं. त्यासाठी फुटबॉलचा नेमका आणि नेटका उपयोग करून घेतला आहे. तिला वस्तू नीटनेटक्या ठेवण्याची, सतत साफसफाई करण्याची OCD असते. या सवयीचाही कथानकात छान उपयोग करून घेतला आहे. मात्र काही ठिकाणी हे वर्णन खूप लांबल्यासारखं, repetitive वाटतं.
तरी नेमक्या कोणत्या मार्गाने शेवटी Britt-Marie Was Here या टप्प्यावर पुस्तक येऊन पोहोचणार याची उत्सुकता टिकून राहते. पुस्तकाची भाषा अगदी सोपी, साधी आहे. लेखकाची खास वेगळी शैली आहे.

याच लेखकाचं A Man Called Ove (अ मॅन कॉल्ड ऊवे/ऊवॅ) हे पुस्तक गेल्या वर्षी वाचलं. ते प्र-चं-ड आवडलं होतं. Britt-Marie Was Here मला तितकं आवडलं नाही. पण तरी ६०+ वयाची नायिका आणि वेगळ्याच वातावरणातली साधी गोष्ट या कारणांसाठी नक्की वाचण्यासारखं आहे.
याच लेखकाची Us Against You आणि Beartown ही आणखी दोन पुस्तकं विश-लिस्टमध्ये आहेत.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)