पुस्तक परिचय : Let Me Say It Now (Rakesh Maria)

मुंबईचे सुपर-कॉप राकेश मारिया यांनी आपल्या ३०+ वर्षांच्या पोलीस सेवेतले अनुभव, आठवणी लिहिल्या आहेत. सुरुवातीचं अकोला पोस्टिंग आणि नंतर एकदा रायगड जिल्ह्यातलं अल्प काळाचं पोस्टिंग वगळता त्यांनी कायम मुंबईत काम केलं. आणि त्यातही क्राइम डिटेक्शन हे त्यांचं आवडतं फील्ड होतं.

१९९३ सालच्या मुंबई बाँबस्फोट तपासामुळे ते प्रकाशात आले. तेव्हाचं सगळं वर्णन, तपासाची माहिती, संजय दत्तला त्यांनी अटक केलं त्या आठवणी वाचायला इंटरेस्टिंग आहेत. तेव्हा मी या बातम्या बर्‍यापैकी फॉलो करायचे. ते सगळं पुन्हा आठवलं.

नंतरही मुंबईतले काही स्थानिक गुन्हे, गाजलेल्या केसेस, काही गुन्हेगारांचा इतर राज्यांमध्ये काढलेला थरारक माग, नेपाळ बॉर्डरपर्यंतच्या मोहिमा मुंबईत बसून मॉनिटर करणे, हे सगळं पण भारी आहे. त्यातलं पोलिसी जार्गन (उदा. क्लीन पिक-अप) वगैरेमुळे थ्रिलर सिनेमे पाहत असल्यासारखं वाटतं.
प्रत्येक मोहिमेतले त्यांचे ज्युनिअर सहकारी, कुणाची काय खासीयत होती, क्राइम डिटेक्शनसाठी खबर्‍यांचं जाळं कसं महत्वाचं असतं, हे सगळं त्यांनी खूप छान लिहिलं आहे. (खबर्‍यांचं विस्तृत आणि बारकाईने रचलेलं जाळं यासाठी ते मुंबई पोलीस दलात प्रसिद्ध होते.)

तरी मला कसाबचं त्यांनी केलेलं इंटरॉगेशन, त्याबद्दल त्यांचं म्हणणं, अ‍ॅनालिसिस, अनुभवी पोलिस अधिकारी म्हणून त्यांच्या कमेंट्स याची उत्सुकता होती. तिथे मात्र माझी सपशेल निराशा झाली. २६/११ आणि पुढचे २-३ दिवस पोलीस कमिश्नरांनी मारियांची नेमणूक कंट्रोल रूमला केली होती. तेव्हा त्यांच्यावर प्रसारमाध्यमांमध्ये टीका झाली होती, की गुन्हे अन्वेषणाचा दीर्घ अनुभव आणि मुंबईची खडान् खडा माहिती असूनही ते प्रत्यक्ष मैदानात उतरले नाहीत. तसंच अशोक कामटेंच्या पत्नीने त्यांच्यावर आरोप केले होते की त्यांनी जाणूनबुजून कामटेंना कामा हॉस्पिटलला पाठवलं. या सगळ्यावर त्यांनी पुस्तकात उत्तर दिलं आहे. आणि आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ २६/११ च्या रात्रीचा जवळपास मिनिटा-मिनिटाचा रिपोर्ट लिहिला आहे. पुस्तक म्हणून वाचताना यामुळे विरस होतो.
पुढे त्यांच्या करिअरच्या शेवटी शेवटी शीना बोरा मर्डर केसच्या बाबतीतही त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यांची तातडीने बदली झाली होती. ते आरोप त्यांना खूप लागले होते. त्याचंही त्यांनी अति सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. तेव्हाचे पेपरांमधले रिपोर्ट्स, मुख्यमंत्र्यांशी एसएमएसद्वारे झालेलं संभाषण, वगैरे, वगैरे.
पुस्तकाचं शीर्षक बघता असं काही ना काही पुस्तकात असणार याची थोडीफार अपेक्षा होतीच, पण इतकं असेल असं वाटलं नव्हतं.

त्यामुळेच पुस्तक ६००+ पानांचं झालं आहे. ते आणखी जरा आटोपशीर झालं तर वाचायला आणखी मजा येईल. 

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)