निर्वासितांच्या कला, निर्वासितांसाठी कला

 "and yet I found in this dome a lot of love, kindness, spirit, life, moments - and pure art... I felt: yes, I am a citizen of the world and I have a safe place."

-- माजिद आदिन, इलस्ट्रेटर, इराण

-----

सुप्रसिद्ध इंग्लिश पॉप-रॉक गायक सर एल्टन जॉन यांचं सत्तरच्या दशकातलं एक गाणं आहे- ‘रॉकेट मॅन’. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवून दोन-तीन वर्षंच झाली होती... अवकाशमोहिमांचं अद्भुत जगासमोर आलं होतं... अशात या गाण्याचे गीतकार बर्नी टॉपिन यांनी एका अंतराळवीराची व्यथाच या गाण्यात उलगडून दाखवली. अंतराळ मोहिमा म्हणजे फार काळ आश्चर्याची बाब राहणार नाही, बघताबघता माणसांसाठी ती नित्यनेमाची गोष्ट होईल, असं म्हणत त्यांनी तंत्रज्ञान आणि मानवी मन यांच्यातलं द्वंद्व गाण्यात मांडलं. पाश्चात्य जगतात हे गाणं खूप गाजलं. सर एल्टन आणि टॉपिन यांनी दीर्घकाळ एकत्र काम केलं. या संगीतमैत्रीला ५० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल २०१७ साली एक स्पर्धा घेण्यात आली. या जोडीची सत्तरच्या दशकातली तीन गाणी निवडून तीन वेगवेगळ्या प्रकारांतर्गत त्याचे म्युझिक व्हिडिओज तयार करून पाठवण्याचं आवाहन केलं गेलं. त्यात ‘रॉकेट मॅन’ गाणं होतं, गाण्याला अ‍ॅनिमेशनमधून सादर करायचं होतं. यथावकाश स्पर्धांचे निकाल जाहीर झाले. ‘रॉकेट मॅन’च्या अ‍ॅनिमेशन म्युझिक व्हिडिओचा विजेता होता वयाच्या तिशीतला इराणी कलाकार माजिद आदिन.

refugees-and-art-03-majid-adin.jpg

सुरुवातीला उद्गार दिले आहेत ते याचेच. त्याने ते विचार मांडले तो भवताल, ती परिस्थिती आणि ‘रॉकेट मॅन’ म्युझिक व्हिडिओची अशी पार्श्वभूमी यांचा काय संबंध?

माजिद निर्वासित आहे. इराणमधल्या मूलतत्ववादी धोरणांविरोधात त्याने लेखन केलं, कार्टून्स काढली आणि इराणी पोलिसांची त्याच्यावर नजर पडली. आपला जीव वाचवण्यासाठी त्याला मायदेशातून पळ काढावा लागला. सुरुवातीला त्याने उत्तर फ्रान्समधल्या कॅले इथल्या निर्वासित छावणीत आश्रय घेतला. ती निर्वासित छावणी ‘द जंगल’ या नावाने ओळखली जायची. तो २०१५-१६ दरम्यानचा काळ. युरोपातली निर्वासितांची समस्या उग्र रूप धारण करत होती. कॅले जंगल छावणीची लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. फ्रान्स सरकारने ऑक्टोबर, २०१६ मध्ये ती छावणी तिथून पूर्णपणे हटवली; तिथे राहणार्‍या निर्वासितांना देशात अन्यत्र ठिकठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला. त्यावरून तेव्हा तिथे बराच गहजब झाला. त्या सगळ्या गोंधळात माजिदने तिथूनही पळ काढला. एका मालवाहू ट्रकमधल्या रेफ्रिजरेटरमध्ये तो कित्येक तास लपून बसला. तिथून मग आणखी एका ट्रकच्या मागे लटकत, लपतछपत तो आधी इंग्लंडमध्ये आला आणि २०१६च्या सुरुवातीला त्याने लंडन गाठलं. रेफ्रिजरेटरमध्ये लपण्याचा मार्ग त्याला दिसला त्यापूर्वी त्याने ट्रकच्या खालच्या भागात, रस्ता आणि ट्रकच्या मध्ये लटकण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पण हातांची पकड जरा ढिली झाली तर काय, या विचारानेच त्याचा थरकाप उडायचा. त्यापेक्षा रेफ्रिजरेटरमध्ये जरा गुदमरणं त्याने पत्करलं...

माजिदने आपला हा सारा जीवघेणा अनुभव ‘रॉकेट मॅन’च्या अ‍ॅनिमेशन म्युझिक व्हिडिओत गुंफला आहे. गाण्यातला अंतराळवीर आपल्या कुटुंबाला सोडून मंगळमोहिमेवर निघाला आहे; व्हिडिओत एक तरूण आपला देश सोडून निघाला आहे. अंतराळवीराला मंगळ ग्रहावर काय अनुभवायला मिळेल ठाऊक नाही, आपली प्रेमाची माणसं पुन्हा आपल्याला भेटतील की नाही हे त्याला सांगता येत नाही, एक अनिश्चितता सोबत घेऊन तो अंतराळयानात शिरतो. व्हिडिओतला तरूण असाच अनिश्चितता सोबत घेऊन लहानशा रबरी बोटीत चढतो, समुद्रातल्या अक्राळविक्राळ लाटांना तोंड देतो; पुढे कुठेतरी ट्रकखाली लपतो; लंडनमध्ये पोहोचल्यावर आपला इथे कसा निभाव लागणार हा प्रश्न त्याला ग्रासून टाकतो. व्हिडिओतली समुद्राची अ‍ॅनिमेशन दृश्यं आहेत काही सेकंदांचीच, पण ती अंगावर येतात. तितकाच भेदक आहे त्या तरुणाचा केविलवाणा, गांगरलेला चेहरा.

refugees-and-art-05-the-dome-Calais.jpg

माजिद कॅले जंगल छावणीत असताना कलाक्षेत्रात काम करणार्‍या ‘गुड चान्स थिएटर’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेशी त्याचा संपर्क आला. या संस्थेची कहाणीही रोचक आहे.
जो मर्फी आणि जो रॉबर्टसन हे दोन तरुण ब्रिटिश नाटककार. २०१५ मध्ये त्यांना कॅले जंगल छावणीबद्दल समजलं. हे काय प्रकरण आहे, त्यावरून इतका गदारोळ का माजला आहे, हे जाणून घ्यावं, ती छावणी प्रत्यक्ष जाऊन पहावी असं ठरवून दोघं सरळ तिथे जाऊन धडकले. त्यांनी पाहिलं- वेगवेगळ्या देशांचे, वंशांचे लोक तिथे एकत्र राहत होते; तगून राहण्यासाठी धडपडत होते. त्यांच्या दैनंदिन गरजा कशातरी भागत होत्या. पण आपल्या कथा-व्यथा सांगायला, ऐकायला त्यांना कुणी नव्हतं; त्यांना दोस्त नव्हते; एकत्र जमून गप्पा माराव्यात, जोक सांगावेत, मजेसाठी काहीतरी करावं यासाठीचा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. त्या दोघा ब्रिटिश नाटककारांनी त्यांना हा ‘गुड चान्स’ देण्याचं ठरवलं आणि ‘गुड चान्स थिएटर’ची स्थापना केली.
त्यांनी त्या छावणीतल्या निर्वासितांसाठी काही अभिनव उपक्रम आखले. ‘द डोम’ हा असाच एक उपक्रम. याअंतर्गत दोघांनी छावणीत एक मोठाच्या मोठा गोलाकार तंबू उभा केला. त्याला नाव दिलं ‘थिएटर ऑफ होप’. छावणीतल्या निर्वासितांनी तिथे जमावं, नाचावं-गावं, वाद्य वाजवावीत, मुक्तपणे जे करावंसं वाटतं ते करावं, एकमेकांशी संवाद साधावा, एकत्र वेळ घालवावा, अशी ही कल्पना. माजिद त्या डोममध्ये आला आणि त्याला आशेचा किरण दिसायला लागला. माजिद आणि त्याच्यासारख्या तिथल्या इतरांना डोममध्ये विसावा मिळाल्यासारखं वाटलं. हा कलेतून, कलाविष्कारातून मिळणारा विसावा होता. बाहेरच्या जगाची भीषण दृष्यं डोममुळे त्यांच्या नजरेआड गेल्यासारखी झाली. डोमच्या आतला अवकाश फक्त त्यांचा होता; तिथे जगण्याची धडपड नव्हती; तिथे ते स्वतःकडेच वेगळ्या दृष्टीकोनातून बघू शकत होते.

मर्फी आणि रॉबर्टसन कॅले छावणीत सात महिने राहिले. फ्रान्स सरकारने छावणी हटवली, त्यामुळे ‘गुड चान्स’लाही तिथून हलावं लागलं. (जाताना ते त्यांनी उभा केलेला डोम व्यवस्थित उतरवून घेऊन गेले.) मात्र दरम्यान त्यांनी तिथे ‘द जंगल’ हे नाटक लिहिलं, बसवलं, सादरही केलं. नाटकात छावणीतल्या लोकांच्या कथा सांगितल्या होत्या. निर्वासितांच्या समस्येकडे जगाने कसं बघायला हवं यावर भाष्य केलं होतं. नाटकात एका नऊ वर्षांच्या मुलीचं पात्र होतं. तिचं नाव अमाल. तिची आई हरवलेली असते. कँपमध्ये ती सगळीकडे आईला शोधत असते. नाटकातली इतर पात्रं तिची थोडीफार देखभाल करतात, तिला खायला-प्यायला देणं वगैरे; त्यापलिकडे कुणाला काही पडलेलं नसतं. प्रत्येकाला स्वतःच्याच इतक्या विवंचना असतात की अमालची चिंता वाहायला कुणाला सवडच नसते.
अमाल म्हणजे कॅले छावणीतल्या हजारो पोरक्या मुलांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र. मात्र त्याची व्याप्ती त्याच्याही पलिकडची आहे. आज अमालसारखी लाखो पोरकी, निर्वासित मुलं जगभरात कुठे ना कुठे सैरभैर अवस्थेत राहत आहेत. त्यांची ही अवस्था जगापुढे आणावी, त्यांच्या पुनर्वसनासाठी काहीतरी वेगळं, ठोस आंतरराष्ट्रीय धोरण आखण्याची गरज तरी किमान अधोरेखित व्हावी, यासाठी ‘गुड चान्स थिएटर’ने आणखी एक उपक्रम आखला आहे- ‘द वॉक’. जवळपास ८००० किमी.चा हा वॉक यंदा जुलैमध्ये सुरू होईल आणि नोव्हेंबरमध्ये संपेल. ही वाट तुर्कस्तान-सिरिया सीमेवरच्या गाझियान्तेप इथून सुरू होऊन तुर्कस्तान, ग्रीस, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स या देशांतून इंग्लंडमधल्या मँचेस्टरपर्यंत जाणार आहे. आणि या वाटेवरून चालणार आहे आपल्या आईला शोधणारी साडे तीन मीटर उंचीची बाहुली- अमाल.

refugees-and-art-06-Amal-The-Walk.jpg

‘अमाल’ या शब्दाचा अर्थ होतो ‘आशा’. अमाल, द पपेट ही आशा जागवण्यासाठीच प्रवासाला निघणार आहे. तिच्या वाटेवर ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कलाप्रदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यात प्रत्येक प्रांतातले स्थानिक कलाकार सहभागी होणार आहेत. या खटाटोपाकडे ‘ट्रॅव्हलिंग फेस्टिव्हल ऑफ आर्ट अँड होप’ असं पाहिलं जावं असं आयोजकांना वाटतं. निर्वासितांकडे ‘समस्या’ म्हणून पाहण्यापेक्षा त्यांच्यामुळे यजमान देशाला किती वैविध्य बहाल केलं जातं ही बाब प्रकर्षाने पुढे आणावी ही त्यांची इच्छा आहे.

(https://maaza-indradhanushya.blogspot.com/2021/05/blog-post.html - या लेखात याच संदर्भाने भाषावैविध्याच्या मुद्द्यावर चर्चा केली गेली होती.)

एवढी मोठी बाहुली प्रत्यक्षात चालवण्यासाठी ‘गुड चान्स थिएटर’चे तीन कलाकार सतत तिच्यासोबत असणार आहेत. दोघं तिच्या दोन बाजूंना चालत तिचे हात हलवतील आणि तिसरा कलाकार त्या डोलार्‍याच्या आत मोठ्या काठ्यांवर पाय ठेवून चालत तिला पुढे घेऊन जाईल. तिच्या डोळ्यांची उघडझाप करण्यासाठी एका कॉम्प्युटरची सोय केली गेली आहे. या बाहुलीच्या मार्गावर आयोजित होणारे सर्व कार्यक्रम खुल्या जागेत होणार आहेत. कोरोनाकाळातले सर्व नियम, अटी पाळल्या जातील याची आयोजकांनी हमी दिली आहे. सध्या त्यासाठी निधी उभा करण्याची त्यांची धडपड सुरू आहे.
प्रत्यक्षात हा सर्व उपक्रम कसकसा उलगडत जाईल, ठरवलेल्या सर्व गोष्टी होतील का, हे पुढे दिसेलच. कदाचित त्यातूनच आणखी काही नव्या कल्पना निघतील, काही मोहरे पुढे येतील. मुळात या सगळ्याच्या मागची ऊर्मी आणि ऊर्जा ध्यानात घेण्याजोगी आहे. त्यामागेही कलेचा ध्यास, कलाविष्कारातून आपलं म्हणणं मांडण्याने मिळणारं आंतरिक समाधान, समस्त जगाला जोडून घेण्याची कलेची ताकद याच गोष्टी आहेत.

या उपक्रमाचा कलादिग्दर्शक आमिर निझार झुआबी स्वतः एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नाटककार आणि पॅलेस्टिनी निर्वासित आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरातल्या नाट्यक्षेत्राला मोठा फटका बसला आहे; नाट्यगृहं, नाट्यप्रयोग बंद पडले आहेत; असं असताना या उपक्रमाकडे तो एक नवी संधी म्हणून पाहतो. प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना माणसाला कला साहाय्यभूत ठरते, त्याचवेळी ती कलाही तावूनसुलाखून निघत असते. बदलत्या जागतिक परिप्रेक्ष्यात कलेचा मूळ गाभा तोच राहिला, तरी वेळोवेळी माणसामाणसांतलं वैविध्य कलेतही उतरतं. आज निर्वासितांवर ओढवलेल्या परिस्थितीने त्यांच्यातला कलाकारही बदलला आहे. पण त्यामुळेच त्यांच्या अंधार्‍या भवतालात कलाविष्कारांचे अनेक नवनवे झरोखेही त्यांना खुणावत आहेत. त्या हाकांना प्रतिसाद देण्यासाठीची त्यांची धडपड सुरू आहे. स्वतःचं असं काहीच जवळ उरलेलं नसण्याच्या अवस्थेतही त्यांचं कलाभान मात्र विरलेलं, विझलेलं नाही. हे विलक्षण आहे.
झुआबी म्हणतो, ‘कोरोनाची साथ किंवा निर्वासितांचा प्रश्न, अशी संकटं एखाद्या चाळणीसारखं काम करतात. कलाकारांनी या चाळणीतून धडधाकटपणे बाहेर पडण्यासाठी धडपडायला हवं.’ त्याने लहान वयापासूनच आपल्या देशात कधीच स्थैर्य, सुरक्षित वातावरण अनुभवलेलं नाही; मायदेशाची म्हणून असणारी ऊब त्याला फारशी मिळालेली नाही. म्हणूनच त्याच्या या म्हणण्याला अधिक वजन प्राप्त होतं.

अमालप्रमाणेच दीड-दोन वर्षांपूर्वी आणखी एक कलाकृती आशियातून अमेरिकेत गेली होती. त्याची सुरुवात झाली बलुखाली रोहिंग्या रेफ्युजी कँपमध्ये. डॉ. मॅक्स फ्रेडर आणि जोएल बर्गनर यांची ‘आर्टोल्युशन’ ही स्वयंसेवी संस्था रेफ्युजी कँप्समध्ये जाऊन मोठाली भित्तीचित्रं काढतात, रंगवतात. त्याकामी ते कँपमधल्या मुलांना सहभागी करून घेतात. हे दोघंही रंगांनी माखलेले असतात आणि मुलांचं तर काय विचारायलाच नको.

फ्रेडर, बर्गनर दोघांनी बलुखाली कँपमध्ये ते विशिष्ट म्युरल करायला घेतलं आणि त्यांना दिसलं की तिथल्या मुलांना निरनिराळ्या मार्गांनी आपल्या कथा, अनुभव सांगायचे होते- आकाशात घिरट्या घालणारी हेलिकॉप्टर्स, जळणारी घरं, सैनिकांच्या गोळ्यांना बळी पडणारे नातेवाईक, बांग्लादेशाला निघालेल्या बोटींमध्ये शिरण्यासाठीची झटापट, कँपमधली घरं, बरंच काही. काही मुलांनी स्वतःची शाळेत जातानाची चित्रं काढली. एका मुलीने त्या अख्ख्या म्युरलमध्ये फक्त एक पक्षी काढला, तिला जमला तसा; तिला बाकी काहीही काढायचंच नव्हतं. अनेक मुलींना रंग आणि ब्रश देऊ केल्यावर खूप आश्चर्य आणि काहीतरी अद्भुत वाटलं. कारण मुलींना, स्त्रियांना चित्रं काढण्याची परवानगी नसते असंच त्यांना तोपर्यंत वाटत होतं.

अगदी असाच अनुभव ‘लव्ह विदाऊट बॉर्डर्स फॉर रेफ्युजीज इन नीड’ची संस्थापक कायरा मार्टिनेझ हिने आपल्या एका टेड-टॉकमध्ये सांगितला आहे. कायरा जर्मनीत एका विमानकंपनीसाठी फ्लाइट अटेंडन्ट म्हणून काम करायची. २०१५ मध्ये कधीतरी तिला ग्रीसमधल्या रेफ्युजी कँप्सबद्दल, तिथे निर्वासित कशा अवस्थेत राहत होते याबद्दल समजलं. काय वाट्टेल ते करून आपण तिथे मदतीसाठी जायला हवं असं तिच्या मनाने घेतलं. सुरुवातीला निर्वासितांसाठी कपडे, बूट पुरवणं; त्यांच्या व्यथा कान देऊन शांतपणे ऐकणं; असं काम तिने केलं. एक दिवस तिला काय वाटलं, ती तिथल्या मुलांसाठी कागद आणि रंगीत खडू घेऊन गेली. त्याचा फारच चांगला परिणाम तिला दिसला. मग हळूहळू तिथली मोठी माणसंही चित्रं काढायला लागली. त्यांत काही हरखून गेलेल्या स्त्रियाही होत्या. कारण स्त्रियाही चित्र काढू-रंगवू शकतात हे त्यांना तिथे पहिल्यांदा समजलं होतं.

निर्वासितांनी मन लावून काढलेली चित्रं कायरा आपल्या मित्रमंडळींना दाखवायची. त्यातच कधीतरी एकाने सुचवलं की या चित्रांचं प्रदर्शन आणि विक्री व्हायला हवी. तिने ते देखील मनावर घेतलं. धडपड करत तिने त्या चित्रांची अमेरिकेत विक्री सुरू केली. त्यातून मिळणारी रक्कम ती थेट त्या-त्या निर्वासित कलाकारापर्यंत पोचती करत असे. त्या कमाईतून काही निर्वासित कलाकारांना रेफ्युजी कँप्समधून बाहेर पडून ग्रीसमध्ये आपली आयुष्यं नव्याने सुरू करता आली. या सर्व खटाटोपातूनच ‘लव्ह विदाऊट बॉर्डर्स...’ची स्थापना झाली. त्यांच्या वेबसाइटवर काही आर्ट-स्टोरीज वाचायला मिळतात. त्यांत काही कसलेले पण सगळं हरवून बसलेले चित्रकार होते; तर काहींना आपण चांगली चित्रं काढू शकतो, त्यामुळे आपल्याला आधार मिळू शकतो, पुढची दिशा सापडू शकते, हेच तिथे प्रथम समजलं होतं.

‘आर्टोल्युशन’तर्फे मुलांसाठी आणखी एक उपक्रम केला जातो- ‘फाऊंडस्ट्रुमेंट साऊंडस्ट्रुमेंट’. कचर्‍यातल्या, फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या, लाकडाच्या, धातूच्या लहान-मोठ्या वस्तू गोळा करायच्या; त्यांच्यावर काठ्या आपटल्यावर येणार्‍या आवाजांनुसार त्यांचं मुलांकरवी वर्गीकरण करायचं; त्या वर्गीकरणानुसार त्यांना छान छान रंगांमध्ये रंगवायचं; आणि मग त्या एकमेकांना बांधून, जोडून, चिकटवून, लटकवून एक मोठं संगीत-शिल्पच तयार करायचं. असं संगीतशिल्प मुलांना आपलं वाटतं. कारण त्यांच्या भवतालातूनच ते आलेलं असतं. असं स्ट्रीट-आर्ट म्हणजे रेफ्युजी कँप्ससारख्या ठिकाणी मोठा आधार ठरतो. आर्टोल्युशन, गुड चान्स थिएटर यांच्यासारखी मंडळी असे नवनवे पर्याय शोधत असतात. तो त्यांच्यासाठीही शिकण्याचा, स्वतःला पारखण्याचा एक मार्ग असतो. डॉ. मॅक्स फ्रेडर म्हणतो, विस्थापितांच्या समस्यांकडे दोन दृष्टींनी पाहिलं जातं. एकतर त्याने बावचळून जायला होतं; संपूर्ण जगच आता कोसळून पडणार की काय अशी भीती वाटायला लागते. किंवा मग वाटतं, हीच तर ती वेळ, जेव्हा मी माझं काम सर्वोत्तम प्रकारे करू शकतो; माझ्या कामाचे एरवी अशक्यप्राय वाटू शकणारे फायदे मी याच परिस्थितीत प्रत्यक्षात उतरवू शकतो.
फ्रेडरसारख्यांना ही ऊर्मी आणि ऊर्जा त्यांच्या कलेतूनच मिळते. ते ती तळमळीने जगातल्या कानाकोपर्‍यातल्या निर्वासितांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांत नाटककार, संगीतकार, नर्तक आहेत; चित्रकार, शिल्पकार आहेत; फोटोग्राफर, अ‍ॅनिमेशन आर्टिस्ट्स देखील आहेत. कलाविष्काराच्या जितक्या शक्यता, तितके नवनवीन पर्याय...

अशा शक्यता, असे पर्याय २०१९ सालच्या व्हेनिस बिनालेदरम्यानही कलारसिकांनी पाहिले. संयुक्त राष्ट्रांच्या रेफ्युजी एजन्सीतर्फे त्यावर्षी तिथे पाच तरूण निर्वासित कलाकारांना रेसिडन्सी दिली गेली. त्यांतला एक होता मूळचा आयव्हरी कोस्टचा मोहमद केइता. तो १४ वर्षांचा असताना त्याच्या देशातल्या यादवीमुळे पळाला आणि तीन वर्षांनी इटलीत आला. रोममध्ये जरा स्थैर्य शोधत असताना त्याला जाणवलं की त्याच्याकडे त्याच्या आपल्या अशा माणसांचा एकही फोटो नव्हता. त्यातूनच रोममधल्या आपल्या आयुष्याच्या आठवणी फोटोंद्वारे जतन करण्याची त्याला गरज वाटायला लागली. आणि त्याने फोटोग्राफीचा ध्यास घेतला. तो माणसांचे फोटो काढतो, पण फोटोंमध्ये त्यांचे चेहरे नसतात. चेहर्‍यांपेक्षा त्यांची परिस्थिती त्याला फोटोत पकडायची असते.

व्हेनिसमध्ये केइतासोबत माजिद आदिनही होता. तिथे त्याने आपला नवा म्युझिक व्हिडिओ सादर केला. व्हिडिओत पार्श्वभूमीला निक मल्वी या ब्रिटिश गायकाचं ‘मायेला’ हे निर्वासितांवर लिहिलेलं गाणं आहे. या गाण्यात एका तरुण, प्रेग्नंट सुदानी मुलीची कथा आहे. ती लहानशा बोटीतून ग्रीसकडे निघाली होती. त्या आट्यापिट्यात तिच्यासोबतची इतर अनेक माणसं मृत्युमुखी पडली. पण ही मात्र वाचली. निक गाण्यात परतपरत म्हणतो- ‘तिला या तथाकथित मानवी संस्कृतीच्या पिंजर्‍यातून मुक्ती मिळू दे.’ या गाण्याचे बोल भेदक आहेत. माजिदने व्हिडिओत निर्वासितांचे तांडे दर्शवण्यासाठी केलेला काळ्या-पांढर्‍या रंगाचा वापरही खूप भेदक आहे.

निर्वासित कलाकारांच्या कलाकृतींमध्ये अशी भेदकता आपोआपच उतरत असावी. म्हटलं तर ही परिस्थितीशरणता; म्हटलं तर कलेची ताकद... पण विस्कटलेल्या जगातही अजून सगळं संपलेलं नसल्याचा याहून मोठा आधार आणखी कोणता असू शकतो?

----------------------------------------

अनुभव - मार्च २०२१ अंकात प्रकाशित झालेला लेख. (फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत.)

यापूर्वीचे लेख :

अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !! 

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’ 

मोडलेली मनं, जोडणारे खेळ

निर्वासितांना सांधणारे भाषांचे पूल


Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)