पुस्तक परिचय : Snowblind (Ragnar Jónasson)

आइसलँडच्या पार उत्तरेकडचं एक दुर्गम गाव. कादंबरीचा नायक पोलीस ऑफिसर आहे. त्याला पहिलंच पोस्टिंग या गावात मिळतं. गावातलं पोलीस स्टेशन अगदी लहानसं, स्टाफ अगदी मर्यादित. एकूण फक्त ३ जण. कारण तिथल्या हेडच्या म्हणण्यानुसार nothing happens here.

गावात एक हौशी नाटक कंपनी असते. ती मंडळी दरवर्षी एक नाटक लिहून बसवून गावात सादर करत असतात. नाटकातले कलाकार, लेखक, दिग्दर्शक हीच कथानकातली मुख्य पात्रं आहेत.
गावात २ मृत्यू होतात. एक अपघाती, एका परीने आसपास माणसं असताना. दुसरी आत्महत्या, संशयास्पद वातावरणात. पोलीस प्रमुख दोन्ही मृत्यू त्या-त्या रकान्यात टाकतो. पण नायकाला काही बारीकसारीक गोष्टी खटकत असतात. तो आडूनआडून तपास सुरू करतो.

वर्षातला बराच काळ त्या भागात बर्फ आणि प्रचंड थंडी असते. अगदी कुंद वातावरण असतं. देशातल्या दक्षिण भागात वाढलेला नायक, त्याला हे वातावरण घुसमटून टाकत असतं. ही नोकरी स्वीकारली ती चूक झाली का हा विचार त्याला छळत असतो. त्याची मनाची अस्वस्थता कथानकात चांगली गुंफली आहे.
प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे गावात येणारा एकमेव रस्ता बंद झालेला असतो. विमानसेवाही बंद असते. या गोष्टी वेगळ्या प्रकारे नायकाच्या पथ्यावर पडतात. एक-एक सूक्ष्म धागेदोरे त्याच्या हाती यायला लागतात.
कथानक अगदी संथ गतीने उलगडत जातं. बर्फवृष्टीमुळे व्यवहार ठप्प झालेल्या दुर्गम जागी जगण्याचा जो वेग उरतो तोच कथानकातही उतरवला आहे. पुस्तकातली ही बाब मला सर्वात आवडली.
स्कँडी-थ्रिलर्समध्येही हवामान, ऋतू, वातावरण हे कथानकात खूप डॉमिनन्ट असल्याचं दिसतं. टोकाच्या हवामानाला बाजूला सारून तिथली कथानकं रचणे अवघड जात असावं. (जसं आपल्याकडे राजस्थानातली गोष्ट सांगताना वाळवंट, त्याचा रखरखीतपणा त्यात हटकून येतोच. किंवा कोकणातला पाऊस.)

थ्रिलर्सची वेगळी ट्रीटमेंट - म्हणून या टाइपची पुस्तकं मला आवडली. (आतापर्यंत २ वाचली आहेत.)

नाटक कंपनी, त्यातली प्रमुख पात्रं, यामुळे मला 'खामोश' सिनेमाची (अमोल पालेकर, शबाना आझमी, नसिरुद्दीन शाह) अधूनमधून आठवण होत होती.

'डार्क आइसलंड' ही पाच की सहा पुस्तकांची सिरीज आहे. ऑनलाइन रिव्ह्यूजवरून तरी ती चिकार गाजलेली वाटते. त्यातलं हे इंग्रजीत अनुवाद झालेलं पहिलं पुस्तक. (मूळ आइसलँडिक सिरीजमधलं हे दुसरं पुस्तक आहे.)


Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)