पुस्तक परिचय : दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी (बालाजी सुतार)

अस्वस्थ वर्तमान, बेरोजगारी; शहरीकरणाच्या रेट्यात गुदमरणारा, घुसमटणारा निमशहरी, ग्रामीण भाग; तरुणांच्या आकांक्षा धारातीर्थी पडणे; ऑनलाइन मैत्री आणि भ्रमनिरास; असे आधुनिक जगण्याचे वेगवेगळे पदर, त्यातले हेलकावे, त्यात अडकलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे मूड्स, यांच्याबद्दलचं हे लिखाण आहे. आणि ते प्रभावी आहे. पुढे पुढे वाचत राहावं असं वाटणारं आहे.

पुस्तकाचं ब्लर्ब वाचून हा कथासंग्रह असल्याचा माझा समज झाला होता. पैकी तीन व्यवस्थित ’कथा’ म्हणाव्यात अशा आहेत. त्यातली ’दोन जगातला कवी’ ही कथा मला खूप आवडली. कथेचा शेवट किंचित प्रेडिक्टेबल असूनही ’फँड्री’ सिनेमाप्रमाणे वाचकाला जोरदार फटकावतो. दुसरी कथा ’निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’ ऑनलाइन मैत्री-चॅटची दुसरी बाजू सांगणारी आहे. त्याला स्त्री-पुरुष भेदाभेदाचाही पदर आहे. काही ठिकाणी ही कथा जरा टिपिकल वळणावर जाते. त्यामुळे मला खूप आवडली नाही. तिसरी ’डहूळ डोहातले भोवरे’ सुद्धा ठीकठाक वाटली. प्रसंग, व्यक्तीचित्रण, वातावरणनिर्मिती तिन्हीतली आवडली.

दोन निमकथा-टाइप आहेत. त्यातली वातावरणनिर्मितीही खूप छान आहे. बाकी लेख म्हणजे निरिक्षणं, नोंदी, दीर्घ टिप्पणी असं स्वरूप आहे. (पुस्तकाच्या शीर्षकातही ’नोंदी’ म्हटलेलं आहेच.) काही नोंदी, टिप्पण्यांमध्ये फिक्शन-टाइप व्यक्तिरेखा येतात. त्यामुळे वाचायला सुरुवात केल्यावर कथेची अपेक्षा तयार होते. त्यांतले सूक्ष्म फरक लक्षात घेतल्यास एकूण हे लिखाण फेसबुक-पोस्ट्सच्या दिशेला जाणारं वाटतं. अर्थात ’लाइक्स’चा विचार न करता, प्रामाणिकपणे, विचारपूर्वक लिहिलेल्या ’चांगल्या’ फेसबुक पोस्ट्स.

पुस्तकाचं शीर्षक आणि 'इसवीसन १९९० ते २०१५ या पाव शतकास’ ही अर्पणपत्रिका, यावरून पुस्तकाच्या थीमचा साधारण अंदाज येतो. पुस्तक संपल्यावर तो अंदाज खोटा ठरत नाही.
यातलं लेखन अजिबात एकसुरी झालेलं नाही. त्यात जोरकसपणा आहे. पण एक-एक लेख/कथा/नोंदी जितक्या ताकदवान आहेत तितकं एकूण ’पुस्तक’ म्हणून परिणामकारक वाटलं नाही. तरीही अनेक ठिकाणी अनेकांकडून या पुस्तकाबद्दल ऐकलं होतं. त्यामुळे मला वाचायचं होतंच. मुखपृष्ठावरचं चित्र बहुदा लाकडी घाण्याचं किंवा कोलूचं असावं. पण मला नीट कळलं नाही.

आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवर लेखक म्हणून ठामपणे व्यक्त होणं - या निकषावर हे लेखन व्यवस्थित उतरतं.

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३