पुस्तक परिचय : गोठण्यातल्या गोष्टी (हृषिकेश गुप्ते)
या पुस्तकाचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासून शीर्षकाचा अर्थ मी वेगळाच लावत होते. गोठणे हे क्रियापद मानून abstract शीर्षक असावं अशी समजूत करून घेतली होती. (मनं गोठतात त्याच्या गोष्टी, वगैरे.)
पण, हे तसं काहीही abstract नाही. गोठणे हे गाव आहे. (नागोठणेचा संदर्भ लेखकानेच सुरुवातीला दिला आहे.) लहानपणीच्या गावातल्या आठवणी असं पुस्तकाचं स्वरूप आहे. मुख्य भर व्यक्तिचित्रणावर आहे. मित्रमंडळींच्या गप्पाटप्पांमध्ये किस्से सांगण्यासारखी लेखनाची धाटणी आहे.
ते सगळं वाचायला मजा येते. काही व्यक्ती एकाहून अधिक लेखांमध्ये प्रसंगानुरूप, कधी केवळ एखाद्या उल्लेखापुरत्या येतात. त्यातून गावाचं एकजिनसी चित्र समोर उभं राहतं. खेडेगावातल्या/निमशहरी गावातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभावविशेष, विशेष अशा ठिकाणीच उद्भवू शकतील असे प्रसंग, पात्रांची बोलीभाषा हे सगळं टिपत टिपत चवीचवीने वाचण्याचं पुस्तक आहे.
निवेदनाच्या ओघात आलेले ट्रक मालवाहतुकीच्या व्यवसायातले
बारकावे, मूर्तीकारांच्या कामांशी संबंधित वर्णनं किंवा अगदी गावाकडचे पतंग उडवण्याच्या
युनिव्हर्सचे तपशील वाचायला मला फार आवडले. युनिव्हर्स अशासाठी म्हटलं, की त्यात निव्वळ
पतंग उडवण्याच्या किंवा काटाकाटीच्या प्रसंगांचं वर्णन नाहीये, तर त्या जोडीने येणारे
संवाद, इतर terminologies, पतंगबाजीशी संबंधित खास शाळकरी विचारसरणी, पतंग उडवण्यात
वाकबगार असणारा गावातला एकजण, असं सगळंच. Trucks संबंधित बारीकसारीक terminologies
पण तशाच.
तीच गोष्ट गोट्यांच्या खेळाची. मी लहानपणी गोट्यांचा खेळ
खूप बघितला आहे. क्वचित खेळलेही आहे. गोट्या खेळणे हे आपल्याकडे जरा हेटाळणीच्या सुरात
बोललं जातं. पण पुस्तकातलं गोट्यांच्या मॅचेसचं वर्णन, चढाओढ, त्या जोडीने येणारं खेळाडूंचं
वर्णन, त्यातून दाखवलेली त्यांची व्यक्तिमत्त्वं, सगळं मला फार आवडलं.
हा सारा मला सोशल हिस्ट्रीचा भाग वाटतो. आणखी काही वर्षांत
हे लुप्त होणार आहे. तेव्हा अशी पुस्तकं म्हणजे या गोष्टींचा मोठा दस्तऐवज ठरणार आहे.
पुस्तकातले काही लेख पसरट झालेत. पण त्याकडेही वाटा फुटणारी रसाळ गप्पाष्टकं म्हणून बघितलं तर मग ते
तितके पसरट वाटेनासे होतात. उलट काही ठिकाणी या निरनिराळ्या वाटा कोणत्या टप्प्यावर
पुन्हा एकत्र येणार हे guess करत करत वाचलं गेलं.
कोकणी वातावरण, मुंबईसारखं शहर जवळ असणे, शिक्षण-अर्धशिक्षणाचे स्तर, इतर सामाजिक-आर्थिक स्तर, त्या स्तरांना गावाने जगण्याचा भाग म्हणून स्वीकारणं, कोकणी मुस्लिम लोकांच्या खासियती, जातीपातीसहितचं गावातलं वातावरण, मैत्री, हेवेदावे, शेती, निसर्ग, ऋतू, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून घडणारी गावातली व्यक्तिमत्वं, त्यांचे निरनिराळे वयोगट, प्रेमप्रकरणं, गावाचा म्हणून एकत्रित भोचकपणा, परंपरांवरचं प्रेम, एकमेकांबद्दलची अधिकउणी आस्था.... आणि मुळात या सगळ्याबद्दलची लेखकाची आस्था, त्याबद्दल इतरांना सांगण्याची असोशी - हे सगळं मिळून तयार झालेल्या या गोष्टी आवर्जून वाचाव्यात अशा आहेत.
Comments