पुस्तक परिचय : One Part Woman (मूळ लेखक - पेरुमल मुरुगन)

शंभर-एक वर्षांपूर्वीच्या तामिळनाडूतल्या एका खेड्यातल्या जोडप्याची (पोन्ना आणि काली) ही कथा आहे. लग्नाला १०-१२ वर्षं होऊनही त्यांना मूलबाळ नाही म्हणून गावातल्या लोकांकडून, नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकून घ्यावे लागत असतात. दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. पोन्ना मूल व्हावं म्हणून बर्‍यापैकी डेस्परेट असते; कालीचं म्हणणं असतं आपण दोघं एकमेकांच्या साथीला असणं जास्त महत्वाचं.

त्या काळात त्यांच्या गावात, पंचक्रोशीत ज्या प्रथा, परंपरा, रूढी, अंधश्रद्धा असतात त्यानुसार दोघं नाना उपाय करतात.

या पूजाअर्चा, नवस, विविध देवाची सेवा यांची पुस्तकात खूप सविस्तर वर्णनं येतात. माझ्यासारख्या व्यक्तीला एका टप्प्यानंतर त्याचा कंटाळा यायला लागतो. तरी दोघांचं त्यामागचं डेस्परेशन या त्यातल्या एका धाग्याने मला बांधून घातलं. त्या वर्णनातली पोन्ना आणि कालीची इंटरअ‍ॅक्शन काही काही ठिकाणी खूप बारकाव्यांसहित आणि नकळत वाचकांसमोर येते. त्यांच्यातलं नातं त्यातून छान समजतं.

या पूजा, उपासतपास, नवस कशाचाच उपयोग होत नाही. शेवटी दोघांच्या आया एक मार्ग सुचवतात. त्या भागातल्या मंदिरात दरवर्षी एका उत्सवाची प्रथा असते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी तरूण स्त्री-पुरुषांवरची सामाजिक बंधनं एका रात्रीपुरती शिथिल करून, सर्व पुरुषांना देवाचं रूप मानून, मूल न होणार्‍या स्त्रीला आपल्या पसंतीचा एक पुरूष निवडून त्याच्याशी संग करण्याची मुभा असते. पोन्नाने हा मार्ग अनुसरावा असं दोघांच्या आया सुचवतात. पोन्ना हो-नाही करत त्या उत्सवाच्या ठिकाणी पोचते.
तिनं घरातून निघून उत्सवाच्या ठिकाणी पोचणे, वाटेतले प्रसंग, दृश्यं, तिच्या मनातल्या आठवणी, उत्सवाच्या ठिकाणचं वातावरण हे सगळंही खूप सविस्तर आणि प्रभावी लिहिलं आहे. ते सगळं चित्र, वातावरण नजरेसमोर अगदी तंतोतंत उभं राहतं.
पोन्नाला तिच्या पसंतीचा एक पुरूष 'बहुतेक' भेटतो, या नोटवर कादंबरी संपते.

या पुस्तकावरून मोठा गहजब झाला. मुरुगननी 'लेखक मुरुगन मेला आहे' असं जाहीर केलं. या सगळ्या बातम्या वाचलेल्या होत्या. तरी ते पुस्तक म्हणजे हेच, हे मला वाचत असताना माहिती नव्हतं. त्यामुळे मी कोर्‍या पाटीने वाचू शकले.

मुरुगननी या कथानकाचे दोन सिक्वेल्स लिहिले आहेत, असं मला किंडलवर समजलं. ('A Lonely Harvest' आणि 'Trial By Silence') त्यातलं A Lonely Harvest विकत घेऊन ठेवलं आहे. 

मला दोन्ही सिक्वेल्स वाचण्याची इच्छा आहे.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)