पुस्तक परिचय : The Passengers (John Marrs)

भविष्यकाळात घडणारी कादंबरी आहे.

ब्रिटनमध्ये स्मार्ट, ड्रायव्हरलेस कार्सचा वापर वाढलेला असतो. तो आणखी वाढावा असा सरकारचा प्रयत्न असतो. लेव्हल-१ ते लेव्हल-५ अशा या कार्स असतात. त्यात लेव्हल-५ कार्सना मॅन्युअल कंट्रोलचा पर्यायच नसतो. याच कार्स पुढच्या दहा वर्षांत ब्रिटनमध्ये सगळीकडे आणायच्या, माणसांना चालवता येतील अशा कार्स बाद करायच्या, असा सरकारचा प्लॅन असतो.

त्या दृष्टीने स्मार्ट कार्सचं decision making, A.I. कसं असावं यावर चर्चा, संशोधन म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या गटातल्या लोकांना आमंत्रण देऊन आळीपाळीने काही panels तयार होत असतात. त्यात सरकारतर्फे एक प्रतिनिधी असतो. देशात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या स्मार्ट कार्स अपघातांचा अभ्यास करून A.I. मध्ये कोणकोणते बदल करायला हवेत त्यावर चर्चा होत असतात.

कादंबरीची नायिका अशाच एका चर्चागटात बोलावली जाते. तिचा लेव्हल-५ स्मार्ट कार्सना विरोध असतो. (आणि अशा चर्चांनाही ती फारशी अनुकूल नसते. त्याची कारणं कथेत येतात.) या चर्चागटाचं काम सुरू होतं आणि दुसर्‍याच दिवशी ८ स्मार्ट कार्स हॅक होतात. त्या गाड्यांना एकसमान destination ठरवून दिलं जातं. पुढच्या दोन-अडीच तासांत या गाड्या एकमेकींवर आदळून नष्ट होतील अशी हॅकरची योजना असते. आणि या सगळ्याचं टीव्ही, सोशल मिडियावर थेट प्रक्षेपण सुरू होतं.

त्या प्रत्येक कारमध्ये एक-एक प्रवासी असतो. त्यांच्या बॅक-स्टोरीज, हॅकिंगबद्दल समजल्यानंतरची मनःस्थिती हे सगळं सविस्तर आणि उत्कंठा वाढवणारं आहे. सोशल मिडियाच्या ट्रेंड्सनुसार शेवटी कुणीतरी एकजण जिवंत राहू शकतं, अशी हॅकरकडून मुभा मिळते. पॅनलमधल्या लोकांना त्या ८ प्रवाशांशी ऑनलाइन, जाहीर संवाद साधण्याचीही मुभा असते.

Plot मध्ये अनेक इंटरेस्टिंग twists आहेत. त्यामुळे वाचायला मजा येते. माणूस आणि मशीन, राजकारणी आणि सर्वसामान्य लोक, यांत्रिकीकरण आणि भावभावना असे अनेक debates कथानकात गुंफलेले आहेत. प्रत्येक पात्राचं खूप बारकाईने वर्णन केलेलं आहे. शेवट आला म्हणता म्हणता त्यातही ३-४ twists आहेत; आणि ते चांगले आहेत. शेवट, रहस्याची उकल, हॅकर कोण असतो, तो हे सगळं का करतो, हे सगळं वाचकांचा इंटरेस्ट टिकवून ठेवत लिहिलं आहे.


तरी, उत्तरार्धात कादंबरी मला जरा ताणल्यासारखी वाटली. जवळपास ४०० पानी आहे, ती तीन-एकशे पानांमध्ये आणखी crisp करायला हवी होती असं वाटलं. टाइमलाइनचा कुठेकुठे घोळ असल्याचाही संशय आला. काही रेफरन्सेसमुळे कथानक ५०-६० वर्षांनंतरचं असावं असं वाटलं; तर काही ठिकाणी त्याहून पुढचा काळ असणार, असंही वाटलं.
A.I.वर आधारित जरा वेगळी स्टोरी, फिक्‍शन-फँटसी म्हणून मला पुस्तक आवडलं.

Comments

Popular posts from this blog

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १)

दंगल

पुस्तक परिचय - Hired: Six Months Undercover in Low-Wage Britain (James Bloodworth)