पुस्तक परिचय : Paper Moon (Rehana Munir)

फिजा नावाची मध्यमवर्गीय कॉलेज तरुणी, एकुलती एक, आईबरोबर मुंबईत राहत असते. एक बॉयफ्रेन्ड, ५ वर्षं स्टेडी असलेला. उच्चभ्रू, हिंदू. त्याच्या घरच्यांना ही पसंत असते. पण तो प्रपोज करतो तेव्हा मात्र ती आधी उत्तर टाळते, नंतर नाही म्हणते. (त्याचं नीटसं कारण पुस्तकात स्पष्ट होता होता राहिलंय असं वाटतं.)

फिजाचे वडील तिच्या लहानपणीच घर सोडून गेलेले. (त्याचं कारणही स्टोरीत नीटसं कळत नाही.) त्यामुळे वडिलांबद्दल तिला थोडंफार कुतूहल असलं तरी ती त्यांच्या विचाराने फार ऑब्सेस्ड किंवा नाराज वगैरे नसते.
वडिलांचा मृत्यू होतो. इच्छापत्रात त्यांनी फिजासाठी थोडीफार रक्कम ठेवलेली असते. त्या रकमेतून तिनं एक पुस्तकांचं दुकान काढावं अशी त्यांची इच्छा असते. इथे तिला वडिलांशी काहीतरी कनेक्शन आहे असं जाणवायला लागतं. कारण एकतर त्यांनी तिची आठवण ठेवलेली असते, आणि तिलाही वडिलांप्रमाणे पुस्तकांची खूप आवड असते. हो-नाही करता करता ती तिच्याही नकळत पुस्तकांच्या दुकानाचा विचार करायला लागते.

इथपर्यंत कथानकाची बैठक बर्‍यापैकी जमली आहे. पुस्तकांच्या दुकानाच्या निमित्ताने, ते ही मुंबईत, काहीतरी वेगळं, इंटरेस्टिंग वाचायला मिळेल अशी आपली अपेक्षा होते.
पण तिथून पुढे सगळं सोपं, सहजसाध्य, गुडीगुडी दाखवलंय. तिला हवी ती सगळी चांगली माणसं भेटतात. छुटपुट प्रॉब्लेम्स येतात. आदर्शवादी पद्धतीने सुटतात. पुस्तकांच्या दुकानाची जागा मिळणे, ते दुकान सजवणे, (पेपर मून - दुकानाचं नाव), दुकानाची नंतर येणारी वर्णनं, दुकानाची प्रसिद्धी कशी होत जाते, हे तर सगळं करण जोहरचा सिनेमा बघतोय अशा प्रकारे येतं.
प्रेमाचा त्रिकोण म्हणून एक सो-कॉल्ड मिस्टेरियस तरुण कथानकात येतो. त्याची आणि फिजाची पहिली भेट जरा वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. इतरही काही मोजके प्रसंग उल्लेखनीय आहेत. पण तितकेच.

मध्यमवर्गीय नायिका उच्चभ्रू वातावरणात अगदी सहज वावरताना दिसते. दुकानासाठी पुस्तकांची खरेदी करायला थेट लंडन बुक फेअरमध्ये जाते. ते ही एकवेळ ठीक आहे. पण बुक फेअरच्या निमित्ताने २-३ आठवडे तिथे मुक्काम, भटकंती, त्या मिस्टेरिअस तरुणाची तिथे भेट होणे... या टप्प्यावर मला टोटल कंटाळा आला.

लेखनशैली चांगली, सोपी, ओघवती आहे. बांद्रा परिसराचं वर्णन छान आहे. पण निवेदन अगदीच एकरेषीय वाटलं. कितीही प्रयत्न करून स्टोरीशी कनेक्टच होता आलं नाही. एखादा तद्दन बॉलिवूड सिनेमा पाहत असल्यासारखं वाटत राहिलं. फिजाच्या भूमिकेत आलिया भट. शेवट करण जोहर स्टाइल नाहीये, इतकाच काय तो फरक.

नेटवर या पुस्तकाला भरभरून रिव्ह्यूज आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी किंडल डील्समध्ये अगदीच स्वस्तात मिळालं, म्हणून घेऊन ठेवलं होतं. पण पुरता विरस झाला.

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)