आर.टी.ओ.च्या नानाची... !!!


माझा दुचाकीचा लायसन्स मागच्या महिन्यात संपुष्टात आला. आता याला माझा वेंधळेपणा म्हणा, दुर्दैव म्हणा किंवा योगायोग म्हणा पण हे माझ्या लक्षात आलं ते लायसन्सनं ‘राम’ म्हटल्यानंतरच. यातला वेंधळेपणा हा की नूतनीकरणाची कुणकुण मला आधीचे २-३ महिने लागलेली होती आणि तरीही मी लक्षात ठेवून वेळेवर ते काम केलं नाही; दुर्दैव आणि योगायोग असे की आदल्या महिन्याच्या ज्या तारखेला लायसन्सनं शेवटचा श्वास घेतला होता, चालू महिन्याच्या नेमक्या त्याच तारखेला नूतनीकरण नक्की कधी आहे हे पाहण्याच्या उद्दीष्टानं मी अगदी कॅलेंडर बघून दिवस ठरवल्यासारखा तो उघडून पाहिला.
एक महिन्यापूर्वीच आपला लायसन्स होत्याचा नव्हता झालाय हे लक्षात आल्यावर माझा चेहराही क्षणार्धात तसाच म्हणजे होत्याचं नव्हतं झाल्यासारखा झाला. (या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का?)
गेला महिनाभर आपण गावभर चक्क विनापरवाना गाडी चालवत होतो हे जाणवलं. तेवढ्या दिवसांत किमान पाच ते सहा वेळा ट्रॅफिक हवालदाराला दिलेले झाँसे, (इमानदारीत) फक्त दोनदाच लाल दिव्यातून गुपचूप दामटवलेली गाडी, चौकात उभ्या असलेल्या ट्रॅफिक इन्स्पेक्टरच्या नाकावर टिच्चून काही सेकंदांकरता का होईना पण झेब्रा क्रॉसिंगवरच तीन वेळा उभी केलेली गाडी आणि ती सुध्दा डोक्यावर हेल्मेट नसताना... हे सगळं सगळं डोळ्यांसमोरून तरळून गेलं. महिन्याभराच्या कालावधीत सविनय कायदेभंगाचे दशकोत्तर संख्येने घडलेले प्रसंग...हो, हे सगळे कायदेभंग सविनयच. यापैकी कुठल्याही प्रसंगात ट्रॅफिक पोलिसानं मला पकडलं असतं तर आपला गुन्हा सविनय मान्य करून, योग्य तो दंड भरून त्या दंडाच्या पावतीची मी त्या पोलिसाजवळ सविनय मागणी केली असती. ती त्यानं सविनय दिली असती की सखेद तो त्याचा प्रश्न झाला... तर हे असे सगळे ट्रॅमाद (म्हणजे ट्रॅफिकी प्रमाद) माझ्या हातून अगदी नेहमीच्या सरावानं घडले होते आणि ते करत असताना आपल्या वैध वगैरे लायसन्सनं केव्हाच मान टाकलेली आहे हे माझ्या गावीही नव्हतं.
वाईटात चांगलं शोधायचं तर इतकंच की माझ्या चेहर्‍यानं हो.न.झा.सारखं होण्यासाठी जो दिवस निवडला तो सुदैवानं रविवार होता. त्यामुळे मला विचार करायला जरा अवधि मिळाला. (रविवार हा साप्ताहीक सुट्टीचा दिवस ठरवणार्‍यानं मनुष्यजातीवर केवढे उपकार करून ठेवलेत याची कल्पना येण्यासाठी त्या दिवसाचा मुहूर्त साधून अश्या dawned upon होणार्‍या प्रसंगांमधे सापडावं लागतं.)
थोड्या विचाराअंती माझ्या लक्षात आलं की जे झालं ते बरंच झालं. कारण प्रस्तुत (खरं म्हणजे, आता अप्रस्तुत!) लायसन्स हा जवळजवळ वीस-बावीस वर्षांपूर्वी मिळवलेला आणि त्यामुळे जुना-पुराणा, जीर्ण असा झालेला होता. ज्या काळात पासपोर्ट आकाराचे फक्त कृष्ण-धवल फोटोच मिळायचे अश्या काळात काढलेला त्यावरचा माझा फोटो आता मलाच ओळखू येईनासा झालेला होता. (कोण रे ते? ‘चोरट्या अफूची आयात करणारी टोळी’ म्हणालं?) शिवाय त्यावरचं माझं लग्नापूर्वीचंच नाव, त्या नावाशी इमान राखून असलेली तेव्हाची सही - एकंदर सगळा मामलाच दुर्मिळ दस्त‍ऐवज या शीर्षकाखाली मोडणारा होता. त्यामुळे नूतनीकरणापेक्षा नवीन कोरा करकरीत लायसन्सच मिळवावा असं मी ठरवलं.
अर्थात, त्यापूर्वी, ‘आपल्याकडे चारचाकीचा लायसन्स आहे म्हटल्यावर आता निराळ्या दुचाकीच्या लायसन्सची गरजच काय?’ असला निरर्थक विचार माझ्या डोक्यात काही काळ हॉर्न वाजवून गेलाच. एखाद्याला गाता येतं म्हणजे गुणगुणता येतच असणार, पोहता येतं म्हणजे तरंगता येतच असणार या चालीवरचा हा विचार खरंतर अगदीच निरर्थकही म्हणता येणार नाही. काय आहे, आपण आसपास जे बघतो, ऐकतो त्यावरून एखाद्या बाबतीतल्या आपल्या धारणा बनत जातात ना! माझ्या एका मित्राच्या बाबतीत घडलेला एक किस्साच याला कारणीभूत ठरला असावा. बाईकवरून जाताना एकदा एका चौकात पोलिसानं या मित्राला अडवलं. लायसन्स मागितला. घाईघाईत घराबाहेर पडताना मित्र त्याचा दुचाकीचा लायसन्स घरी विसरला होता. मात्र तो तेव्हा वैमानिकाचं प्रशिक्षण घेत होता आणि त्यादिवशी त्या प्रशिक्षणासाठीच बाहेर पडलेला असल्याने सुदैवानं त्यावेळी त्याच्या खिश्यात विमान चालवण्यासाठीचा लायसन्स होता. त्यानं तोच काढून पोलिसाला दाखवला. त्यावर त्याचा प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या गणवेषातला फोटोबिटो होता. लायसन्स उघडून तो फोटो पाहिल्या पाहिल्या त्या ट्रॅफिक पोलिसानं त्याला चक्क एक कडक सॅल्यूटच ठोकला आणि त्याला जाऊ दिलं! आता बोला!! तुम्ही जे वाहन चालवताय त्याचा संबंधित लायसन्स सोबत हवाच या नियमाचा त्या ऑन-ड्यूटी पोलिसालाही जिथे विसर पडला तिथे माझ्यासारख्यांचं काय! असो.
आर.टी.ओ.ची पायरी चढण्याऐवजी कुठल्यातरी एजंटला गाठून, त्याच्यासमोर चारचाकीचा लायसन्स नाचवून त्याला भागिले दोन करता येतंय का ते बघावं असा तद्दन ऐदी आणि आळशीपणाचा विचार करून मी दुसर्‍या दिवशी घराजवळच्या एका ड्राईव्हिंग स्कूलमधल्या एजंटला गाठलं. त्यानं मोबदला म्हणून माझ्याकडून निष्कारण अवाच्या सवा पैश्यांची मागणी केली ज्याची पूर्तता मी करणं कधीच शक्य नव्हतं.
आणि अश्या तर्‍हेनं शेवटी एका स्वच्छ, सुंदर, प्रसन्न सकाळी मी आर.टी.ओ.च्या प्रांगणात अनेक वर्षांनी पुन्हा एकदा प्रवेश करती झाले.
तिथे चौकशीअंती असं कळलं की मला आधी दुचाकीचा शिकाऊ परवाना काढावा लागणार होता. तुम्ही त्याआधी वीस वर्षं गाडी चालवलेली असूदे किंवा दोनशे वर्षं, सरकारी नियम म्हणजे नियम! तो सामान्य नागरिकांनी पाळायचा म्हणजे पाळायचा!
मग काय, निमूटपणे ‘शिकाऊ परवान्यासाठीचा विहीत अर्ज क्रमांक अमुकतमूक’ घेऊन तो भरला. अर्जाची, इतर कागदपत्रांची पडताळणी वगैरे झाल्यावर मला आणि सोबतच्या पंधरा-वीसजणांना परीक्षा-केंद्रात जाऊन बसायला सांगण्यात आलं.
तिथे एक मोठा हॉल, आत पन्नास-साठ खुर्च्या मांडलेल्या, प्रत्येक खुर्चीसमोर साधारण तीन फूट उंचीवर १, २, ३ असे आकडे लिहिलेल्या तीन बटणांचं पॅनल, त्याच्या कोपर्‍यात एक छोटा एल.ई.डी., एल.ई.डी.सकट प्रत्येक पॅनलला झाकणारा एक-एक लाकडी कोनाडा, समोरच्या भिंतीवर मोठा एल.सी.डी.स्क्रीन, ताजा-ताजा चुना फासलेल्या भिंती, खिडक्यांना स्वच्छ पडदे, गारठवून टाकणारं तापमान असा सगळा जामानिमा होता. आर.टी.ओ. आणि स्वच्छ, वातानुकूलित हॉल या दुकलीची नोंद घ्यायला माझ्या मेंदूला जरा वेळच लागला. एकेका खुर्चीवर आम्ही सगळे जाऊन बसलो. थोड्या वेळानं समोरच्या स्क्रीनवर परीक्षा कशी द्यायची त्याचा डेमो सुरू झाला. एकूण दहा प्रश्न विचारले जाणार होते. प्रत्येक प्रश्नाला तीन पर्याय. हे ऐकल्यावर पुढ्यातल्या त्या पॅनलचं प्रयोजन लक्षात आलं. योग्य पर्याय दर्शवणारं बटण दाबलं की आपलं उत्तर नोंदवलं जाणार; दहापैकी किमान सहा प्रश्नांची उत्तरं बरोबर आली पाहीजेत तरच उमेदवार उत्तीर्ण मानला जाईल; इ.इ. नियम स्क्रीनवरच्या बाईनं तीन-तीनदा सुहास्य-वदने समजावून सांगितले.
मला इकडे वेगळीच चिंता लागून राहिली होती. कुठल्या खुर्चीवर कोण बसलंय आणि कुणी काय उत्तरं दिली आहेत हे कसं कळणार?? कारण त्या पंधरा-वीसजणांच्यात सरावलेली (किंवा निर्ढावलेली म्हणा हवं तर) मी एकटीच होते आणि इतर कुणाच्या चुकीमुळे अनुत्तीर्ण होण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती. माझी बसल्या जागी चुळबूळ सुरू झाली. इतक्यात स्क्रीन पांढराफटक पडला आणि आमच्या मागूनच कुठूनतरी एक आवाज आला.
फुंकर मारली तरी उडून जाईल अश्या चणीचा एक आर.टी.ओ.कारकून बोलत बोलतच आत शिरला होता. गाडी वळवताना इंडिकेटर सुरू केला तरी ज्याप्रमाणे हातही दाखवावा लागतो त्याप्रमाणेच पुढे येऊन त्यानं स्क्रीनवरच्या सुहास्य-वदनी बाईचं पुराण पुन्हा एकदा ऐकवलं. त्या पुराणाच्या भरतवाक्याला स्क्रीन पुन्हा जिवंत झाला आणि माझ्या चिंतेचं उत्तरही मिळालं. स्क्रीनवर पंधरा जणांच्या नावांची यादी होती आणि प्रत्येकाच्या नावापुढे एकएक क्रमांक लिहिलेला होता. त्या-त्या क्रमांकाच्या खुर्चीवर त्या-त्या उमेदवारानं जाऊन बसायचं होतं. मग काहीवेळ खुर्च्या सरकवण्याचे, आपापसांत बोलण्याचे, हसण्याचे, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे, पेन खाली पडण्याचे वगैरे आवाज झाले आणि हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. सर्वांना सर्व नियम नीट समजलेत याची त्या कारकुनानं खात्री करून घेतली आणि पाठोपाठ आश्वासक सुरात ‘काळजी करू नका, प्रश्न तसे सोपे असतात, मी उत्तरं सांगेन.’ असं म्हणून आश्चर्याचा पहिला धक्का दिला. पुन्हा काही सेकंद लोकांच्या सुटकेच्या निःश्वासाचे वगैरे आवाज झाले. माझ्या चेहर्‍यावर मात्र ‘काय हे!’, ‘यू टू ब्रूटस...!’, इ.इ. भाव होते. परीक्षा सुरू झाली.
पहिलाच प्रश्न बाँबगोळा होता -
‘शिकाऊ परवानाधारक चालक वाहन चालवत असताना सोबत कायमस्वरूपी परवानाधारक व्यक्‍ती असली पाहीजे.’ हा नियम मोटार-वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली येतो?
१.अमूक
२.तमूक
३.ढमूक
बोंबला! हे कलम-क्रमांक वगैरे कुणाच्या काकाला ठाऊक असणार! त्यात पुन्हा, आपण मुळ्ळीच कॉपी करायची नाही असं मी ठरवलेलंच होतं. त्यामुळे कानावर पडलेल्या उत्तराकडे साफ दुर्लक्ष करून मी बाणेदारपणे वेगळा पर्याय निवडला. माझं उत्तर चुकीचं निघालं.
आता मला ९ चेंडूंत किमान ६ धावा काढायच्या होत्या. पुढचे तीन प्रश्न ट्रॅफिकची चिन्हं, खुणा इ.बद्दल होते. माझी उत्तरं बरोबर निघाली.
आता ६ चेंडू, ३ धावा...
बाँबगोळा क्रमांक दोन - मोटारवाहन कायदा कलम क्रमांक अमूक-२ब खालीलपैकी कुठला आहे?
१. दुचाकीवर हेल्मेट वापरणे सक्‍तीचे आहे.
२. दुचाकीची नियमित प्रदूषण चाचणी करणे अनिवार्य आहे.
३. वाहन चालवताना सोबत विहीत परवाना बाळगणे सक्‍तीचे आहे.
पुन्हा ‘बोंबला!’ मी पहिला पर्याय निवडला. माझं उत्तर चुकलं. बरोबर उत्तर होतं पर्याय ३. म्हणजे मी गेला महिनाभर ‘हा’ नियम मोडत होते तर...! - एक स्वगत.
आता, ५ चेंडू, ३ धावा. नंतरचा प्रश्न बाँबगोळा नव्हता तरीही माझं उत्तर चुकलं. ४ चेंडू, ३ धावा. पुढचे ३ मात्र नो-बॉल पडले आणि मी ‘हुश्श!’ केलं.
पाव मिनिटांत स्क्रीनवर निकाल झळकला आणि आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. सर्व पंधराच्या पंधरा उमेदवार ‘नापास’ झाले होते! आमच्या कुणाच्याही आधी त्या उत्तरं सांगणार्‍या कारकुनाचंच तोंड थोतरीत दिल्यासारखं झालं. टाईमप्लीज घेऊन तो जो अंतर्धान पावला तो दहा मिनिटांनी उगवला. ‘शिश्टिममधे कायतरी प्राब्लेम आलावता, आता ठीक आहे, परीक्षा पुन्हा द्यायला लागेल’ असं त्यानं जाहीर केलं. दरम्यान पंधरा जणांचा अजून एक गट बाहेर येऊन थांबला होता. त्या सर्वांना आत घेतलं गेलं. त्यांच्या जागांची निश्चिती, सुहास्य-वदनी इंडिकेटर, नंतर हात दाखवणं सगळं पार पडलं. क्र.१६ पासून पुढल्या उमेदवारांना आश्चर्याचा पहिला धक्का देऊन परीक्षा पुन्हा सुरू झाली.
पुन्हा काही सोपे प्रश्न, २-३ बाँबगोळे आणि कॉपी. एका प्रश्नाचं त्या कारकुनानंच चुकीचं उत्तर दिलं. मी त्याची चूक निदर्शनाला आणून दिली. तोपर्यंत बहुतेकांनी त्या चुकीच्याच उत्तराची नोंद करून टाकलेली असल्यामुळे ते सगळे त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेनं बघायला लागले. पण त्याला त्याची तमा नव्हती. परीक्षा संपली. पहिल्या पंधराजणांना तिसरा आणि नंतरच्या पंधराजणांना दुसरा, असा आश्चर्याचा टू-इन-वन धक्का देऊन निकाल जाहीर झाला. सर्वच्या सर्व तीस उमेदवार ‘नापास’!
पुन्हा थोतरीत दिल्यासारखं तोंड, टाईमप्लीज आणि तिसर्‍यांदा परीक्षा देण्याची आज्ञा! आता मात्र हद्द झाली. पण निव्वळ निषेध नोंदवण्यापलिकडे काहीही करणं शक्य नव्हतं.
सुदैवानं, तिसर्‍यांदा मात्र परीक्षा सुरळीत पार पडली. पहिल्या चार प्रश्नांपर्यंत तो कारकुंडा हॉलमध्ये हजर होता. त्यानं सांगितलेल्या उत्तरांकडे मी काणाडोळा करतेय हे एव्हाना त्याच्या (आणि माझ्या शेजारच्या मुलीच्याही) लक्षात आलं होतं. चौथ्या प्रश्नाला तो माझ्यामागे येऊन उभा राहिला आणि त्यानं मलाच उत्तर विचारलं. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण लाकडी कोनाडारूपी आडोश्याची ऐशी-की-तैशी करून मी नोंदवलेलं उत्तर शेजारच्या मुलीनं बघून घेतलं होतं. तिनंच ते मोठ्या आवाजात जाहीर केलं. अचानक माझ्या मागून, "काय चाललंय तुमचं? शांत बसता येत नाही का? नापास करून टाकीन..." असा एकदम वेगळ्याच पट्टीतला दरडावण्याचाच आवाज आला. त्या कारकुंड्याच्या टीचभर देहातून असला आवाजही निघतो?? मला काही कळेच ना! अचानक त्याचा द्विधाता कसा झाला ते पहायला मी चमकून मागे बघितलं तर तो गायब झाला होता आणि त्याच्या जागी एक काळाकभिन्न, पोट सुटलेला, ‘तैय्यार’ ट्रॅफिक इन्स्पेक्टरच उभा होता. आश्चर्याचा धक्का क्रमांक ४!! पण मला माझ्या ६० टक्यांची जास्त चिंता असल्यामुळे मी चेहरा निर्विकार ठेवून उर्वरीत परिक्षा दिली. इन्स्पेक्टरनं एक्झिट घेतली. त्याच्या मते त्यानं परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ दिला नव्हता.
एका मायक्रोसेकंदाकरता निकाल स्क्रीनवर झळकला. तो फुल्या-फुल्या कारकुंडा पुन्हा अवतरला आणि ‘सर्वजण पास’ असं जाहीर करून आम्हाला तिथून त्यानं अक्षरशः हाकललं. आपल्याला शेवटी नक्की मार्क तरी किती मिळाले हे कुणाला नीटसं समजलंच नाही आणि जाणून घेण्याची कुणाला गरजही वाटली नाही.
सांगितल्याप्रमाणे बरोब्बर छत्तीस तासांनी मला माझा शिकाऊ लायसन्स ताब्यात मिळाला. लॅमिनेट केलेला, माझ्या फोटोसकट आर.टी.ओ.चा होलोग्राम वगैरे मिरवणारा. हा पाचवा धक्का होता.
तो लायसन्स किमान तीस दिवस वापरून, ट्रॅफिकचे नियम माहीत करून घेऊन, वाहन चालवण्याचा सराव करून मगच पक्का लायसन्स मिळवता येणार होता. याचा अर्थ, आम्हाला अभ्यासक्रमात नसलेलेच प्रश्न विचारले गेले होते! पण ही एक छोटीशी तांत्रिक चूक कुणाच्याच गावी नव्हती.
मी लगेच सेलफोनच्या कॅलेंडरमध्ये तीस दिवसांनंतरची तारीख पाहून ठेवली. पण म्हटलं नकोच; आपण त्या दिवशी अगदी तत्परतेनं जाऊ पण आपला [(n - m)+1] हा नियम त्यांच्या अभ्यासक्रमात नसला तर सांगतील उद्या तीस दिवस पूर्ण होतात, परवा या! त्यापेक्षा, आपण आपलं चाळीस दिवसांनीच जावं.
----------
एकेचाळीसाव्या दिवशी सकाळी सकाळी पुन्हा आर.टी.ओ.त जाऊन पक्क्या लायसन्ससाठीचा विहीत अर्ज क्रमांक अमुकतमूक भरून सादर केला. पैसे भरले. एका लांबवरच्या कोपर्‍याकडे निर्देश करून ‘तिकडे जाऊन माणेसाहेबांची सही घ्या आणि टेस्ट द्या’ असं मला सांगण्यात आलं. हे जे ‘तिकडे’ होतं तिथे किमान तीन-चार निरनिराळ्या केबिन्स्‌ आणि आठ-दहा तरी साहेब दिसत होते. पुढची पंधरा मिनिटं योग्य खिडकी शोधण्यात गेली. ‘माणे’साहेब गायब होते पण तिथेच आसपास एक मोठी रांग दिसली. रांगेतल्या सर्वांच्या हातात माझ्याकडे होता तसलाच अर्ज, फोटो, शिकाऊ लायसन्स इ. दिसत होते. म्हटलं हीच ती आपली ‘लाईन’. तरीही, पुढच्या माणसाला विचारलं, "टू-व्हीलर पर्मनन्ट लायसन्सचा क्यू हाच का?" त्यानं तत्परतेनं मान डोलवली.
पुढचा अर्धा तास मी निश्चिंत मनाने रांगेत उभी होते. केबिनमधे आत जाणारी मंडळी कसलीशी सही-शिक्का घेऊन बाहेर आल्यावर कुठल्या दिशेला जातायत त्याचं मी अचूक निरीक्षण करून ठेवलं होतं. म्हटलं नंतर वेळ वाया जायला नको. पण नंतर कुठला, माझा वेळ त्या क्षणीच वाया चालला होता.
झालं असं की माझा नंबर आल्यावर मी केबिनमधे आत शिरले. आत तो माणे कुठेच दिसला नाही पण एक निराळाच शिंदे किंवा पवार किंवा तावडे लोकांच्या अर्जांची छाननी करत होता. मी माझा अर्ज दाखवला.
"तुमचा अर्ज प्रायवेट आहे, तिकडे जा."
"??????" (‘प्रायव्हेट अर्ज’ हा नवीन शब्दप्रयोग कळला. अगदीच काही नुकसानी नव्हती.)
"हा अमुकतमूक ड्राईव्हिंग स्कूलचा क्यू आहे. तुमचा टू-व्हीलरचा आहे. प्रायवेट आहे. तिकडे जा आणि मग बाहेर पवारसायबांना भेटा."
(म्हणजे हा नक्की शिंदे किंवा तावडे असणार.)
बावळट चेहरा करून मी बाहेर आले. अर्धा तास वाया!
मला एक कळत नाही, की छोटेसे का होईना, योग्य ते सूचना-फलक लावायला यांना काय धाड भरते? पण दहा खिडक्यांची वारी घडवल्याशिवाय लोकांची कामं करायचीच नाहीत हाच यांचा खाक्या! (रेशनिंग हापिसातपण ‘शासनाभिमुख एक खिडकी योजना’ या मोठ्या अक्षरातल्या फलकाखालीच पाच खिडक्या!)
‘तिकडे क्र. दोन’ शोधलं. तिथे तुम्ही बरोबर आणलेल्या वाहनाचा क्रमांक फक्‍त नोंदवायचा होता आणि त्याच वाहनावर टेस्ट द्यायची होती. तेवढं तरी नशीबच म्हणायचं.
ती नोंद करून पुन्हा तिकडच्या तिकडेहून इकडच्या तिकडे आले. मगाचचा शिंदे किंवा तावडे आता लोकांची ड्राईव्हिंग टेस्ट घेत होता. पण तिथे माझी वर्णी लागण्यासाठी आधी मला पवार-शोधमोहीम फत्ते करायची होती.
एका टेबलाभोवती बराच घोळका दिसला. सर्वांच्या हातात तसेच अर्ज, फोटो, शिकाऊ लायसन्स. मी तिथे गेले. टेबलपाशी बसलेल्या सायबाच्या गणवेषावरची ‘पवार’ नावाची पाटी क्षणभर दिसली आणि गर्दीत मी मुसंडी मारली.
आघाडीवर पोचल्यावर सायबांनी माझ्या हातातला अर्ज हिसकावून घेतला. नोंदी तपासल्या. अर्जावरची एक रिकामी जागा शोधून पेनानं एक वर्तुळ काढलं आणि मला तिथे सही करायला लावली. सहीची पडताळणी झाल्यावर त्यानं पुन्हा अर्ज हिसकावून घेतला. पुन्हा एक रिकामी जागा शोधून तिथे एकाखाली एक चार ओळींत काही अक्षरं ३-३च्या गटांत लिहीली आणि ‘गाडीचे पेपर्स पाहून या तारखा भरा’ असं फर्मान सोडलं.
मी ती अक्षरं वाचली. MV N, ZAP, TIK (किंवा TIA) आणि PLC - हे अक्षरगट वाचून मला काहीही बोध होईना. पण ‘गाडीचे पेपर्स’मुळे मी अंदाज बांधला की MV N म्हणजे ‘मोटर व्हे‌ईकल नंबर’ आणि PLC हे PLC नसून PUC असणार. विजयी मुद्रेनं मी माझ्या गाडीचा नंबर तिथे लिहीला. PUCची मुदतही लिहीली. पण मधल्या दोनांचं काय करायचं ते कळेना.
ZAPवर बोट ठेवून मठ्ठ चेहर्‍यानं ‘इथे काय लिहायचं?’ असं पवारला विचारलं.
"इन्श्युरन्स! इन्श्युरन्सची डेट टाका तिथे... मगाचपासून सांगतोय तुम्हाला गाडीचे पेपर्स काढा म्हणून..." तो खेकसला.
मी गार! Z-A-P म्हणजे गाडीच्या इन्श्युरन्सची शेवटची तारीख?? उद्या म्हणाल R-T-O म्हणजे कृषी-उत्पन्न बाजार समिती!
मी निमूटपणे ती तारीख तिथे लिहीली.
पुन्हा मठ्ठ चेहरा, TIKवर बोट आणि ‘इथे काय लिहायचं?’ हा प्रश्न.
आता तो केस उपटायच्याच बेताला आला होता... स्वतःचे!
"टी-ए-एक्स...ऽऽ! गाडीच्या संदर्भात ‘टी-ए-एक्स’वरून काय बोध होतो, मॅडमऽऽ?"
मी कुठलाही बोध करून घेणं कधीचंच थांबवलंय हे त्याला सांगावंसं वाटलं मला पण अश्या प्रश्नांची अशी चमकदार वगैरे उत्तरं द्यायची नसतात हे ‘फॉट्टी ईयर्सच्या एक्स्पिरियन्स’नंतर आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं.
मी गाडीची टॅक्सची नोंद तपासली. तिथे LTT लिहिलेलं होतं. मीही अर्जावर दिलं ठोकून L-T-T! (तो ‘लाईफटाईम टॅक्स’चा शॉर्टफॉर्म होता हे मला जरा वेळानं उमगलं. आता सायबानंच मठ्ठपणानं त्या LTTचा अर्थ मला विचारावा अशी माझी तीव्र इच्छा होत होती. पण तो योग आला नाही.)
त्यानं पुन्हा एकदा सगळा अर्ज तपासला. माझ्याकडे पाहीलं.
"१२२ नंबरचा नियम सांगा."
(अर्र तिच्या मारी! पुन्हा तेच!)
"मला नंबरप्रमाणे नियम माहीत नाहीत."
"मॅडम, रस्त्यात अ‍ॅक्सिडंट वगैरे झाला तर आम्हाला नियम लावावा लागतोय. नियम सांगा."
"मला नंबरप्रमाणे नियम माहीत नाहीत."
"उद्या १४ वर्षाचा मुलगा येऊन लायसन्स द्या म्हणाला तर द्यायचा का?" माझी शाळा घ्यायच्या सुरात त्यानं मला विचारलं.
"नाही"
"१६ वर्षाचा?"
"हो... बिनगियरचा..." माझा एक पॉईंट सर! (पु.ल., थँक यू!)
"मग गियरच्या गाडीचा कधी द्यायचा?"
"१८ पूर्ण झाल्यावर"
"हां! मग हाच १२२ नंबर! तुम्हाला माहीती असायला पायजे."
"साहेऽऽब, गेली २० वर्षं गाडी चालवतीये, आधीचा लायसन्स एक्स्पायर झाला म्हणून नवीन काढायला आलेय. नियम सगळे माहीत आहेत मला पण असे नंबरप्रमाणे नाही माहीती"
"तुम्ही २० वर्षं गाडी चालवताय हे मला कसं कळणार? मला नियम विचारायला नकोत??"
(पण नंबर कसले विचारतोस लेका, उद्या गाडी उजवीकडे वळवताना मी आधी उजवा हात नाचवणार की मागच्या गाडीवाल्याला थांबवून नियम-क्रमांक सांगणार? आं? - हे मी आपलं मनातल्या मनात.)
"विचारा ना मग. सांगते सगळे नियम. पण असे नंबरप्रमाणे नाही माहीत..." मी डावीकडच्या लेनमधलं माझं ड्रायव्हिंग शांतपणे पुढे चालू ठेवलं.
अखेर त्यानं सपशेल शरणागती पत्करली. क्रमांकाचं कलम वगळून त्यानं गाडी चालवतानाचे ४-५ नियम विचारले. मी ते सांगितले. म्हणजे हातांच्या सर्कशीच्या मदतीनं करून दाखवले. त्याचं समाधान झालं असावं. मग तिथेच थोड्याश्या रिकाम्या जागेत मी त्याला गाडी चालवून दाखवली. ते काम अक्षरशः अर्ध्या मिनिटात उरकलं. कागदी घोडे नाचवण्यातच सर्वांची ऊर्जा इतकी वाया चालली होती की प्रत्यक्ष गाडी चालवून दाखवण्याच्या सर्वात महत्त्वाच्या कलमात कुणालाच विशेष रस नव्हता.
"ठीक आहे. मानेसाहेबांची सही घ्या."
बोंबला! अजून ते मानेप्रकरण उरलेलंच होतं, नाही का!
पण माझ्या सुदैवानं तो साहेब लगेच अवतरला. त्याच्या नियोजित टेबल-खुर्चीसमोर किंचित झुकून तीन-तीनदा त्यानं नमस्कार वगैरे केला. माझ्या अर्जानं त्याची भौनी होणार होती. साडे-दहा ते साडेपाच अशी कामकाजाची वेळ असलेल्या आर.टी.ओ.त हे महाशय बारा वाजता अवतरले होते.
त्यानं अर्ज तपासला, सही केली आणि "तिकडे जाऊन यारटीओ साहेबांची सही घ्या" म्हणून हुकूम सोडला. हे ‘तिकडे’ म्हणजे तिसरंच कुठलंतरी होतं.
"नाव काय म्हणालात त्या साहेबांचं?" मी पृच्छा केली; मठ्ठपणेच! अश्या ठिकाणी दुसरा कुठलाही सूर अवैधच मानला जातो.
माने क्षणभर गोंधळातच पडला. पवारकडे वळून त्यानं विचारलं, "ए, आपल्या यारटीओसाहेबांचं नाव काये रे?"
म्हणजे यारटीओ हे नाव नव्हतं, वेगळंच काहीतरी होतं. हुद्दा असावा बहुतेक.
पवारलाही नाव ठाऊक नव्हतं. तो पण ब्लँक!!
"तिकडं जाऊन यारटीओ साहेब म्हणून विचारा. मोठे साहेब आहेत ते आमचे." असं म्हणून मानेंनी मला वाटेला लावलं.
आख्ख्या आर.टी.ओ.च्या प्रांगणात मी जाऊन धडकले नव्हते अशी एकच खिडकी आता शिल्लक राहीली होती. तिथेच आता हे यारटीओ प्रकरण सापडेल बहुधा म्हणून तिकडे मोर्चा वळवला. दारावर ‘साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी’ अशी पाटी होती. जऽरा डोकं चालवल्यावर (अजूनही शाबूत होतं) त्याचं ‘ए.आर.टी.ओ.’ हे इंग्रजी संक्षिप्त रूप लक्षात आलं. त्याचं यारटीओशी साधर्म्य आहे हे ही लक्षात आलं. म्हणजे तो हुद्दाच होता.
आत केबिनमध्ये डोकावून पाहीलं तर आत कुणीच नव्हतं. मग तिथल्या रांगेत उभी राहीले. अचानक कुठूनतरी उगवलेल्या एका भलत्याच माणसानं माझ्या पुढच्या दहाजणांना डावलून अकराव्या सेकंदाला मलाच केबिनमधे बोलावलं. माझ्या हातातला अर्ज हिसकावून घेऊन पुन्हा एका कोपर्‍यात वर्तुळ काढून तिथे मला सही करायला लावली. टेबलच्या ड्रॉवरमधून त्या बेनामी यारटीओ-साहेबाचा शिक्का काढून अर्जावर धप्पाक्‌कन उमटवला. पैसे भरल्याच्या पावतीची एक प्रत माझ्या हवाली केली आणि चार-पाच दिवसांनी येऊन लायसन्स घेऊन जा म्हणून सांगितलं. मी मनातल्या मनात त्या अनुपस्थित, बेनामी यारटीओसाहेबाचे आभार मानले आणि तिथून सटकले.
----------
(n-m) मधे ४-५ मिळवून आलेल्या उत्तराच्या दिवशी उत्साहात आर.टी.ओ.च्या आधीच पाहून ठेवलेल्या, लायसन्स देऊ करणार्‍या खिडकीपाशी गेले. पावती आत सरकवली. ‘मॅडम, अजून झालेला नाई, २-३ दिवस लागतील’ या उत्तरासकट आतल्या सद्‌गृहस्थांनी ती मला परत केली.
n आणि m च्या नव्या किंमतींसकट आणि पुन्हा गणित करून मिळवलेल्या नव्या उत्साहासकट आठवडाभरानं पुन्हा त्या खिडकीपाशी गेले. पावती आत सरकवली. ‘मॅडम, अजून झालेला नाई. तुमच्या पावतीक्रमांक ९१०२ आहे. आज ८०००ची सिरीज चालू आहे. खूप रश आहे, हो! तुम्ही असं करा, मंगळवारी या.’ या हसतमुख उत्तरासकट पावती दुसर्‍यांदा माझ्याकडे परतली.
त्यानं सांगितलेल्या मंगळवारी गेले तर तिथे सगळा शुकशुकाट! चौकशीअंती तो सार्वजनिक सरकारी सुट्टीचा दिवस होता असं कळलं. कॅलेंडर न बघताच गेल्याबद्दल स्वतःलाच दूषणं देत मी परतले.
पुन्हा एक आठवड्यानंतर गेले. खिडकीसमोर रांग होती. माझ्या पुढच्या १०१२४ आणि ११००६ क्रमांकाच्या पावतीवाल्यांना त्यांचा लायसन्स मिळाला. ते पाहून मला ‘हुश्श!’ झालं. म्हटलं, चला, आज आता आपलं काम होईल. काहीश्या निवांतपणे मी पावती आत सरकवली. उत्सुकतेनं आतल्या टेबलावर डोकावून पहायला लागले. आत स्मार्ट-कार्डरूपी लायसन्सचे निरनिराळ्या आकाराचे किमान वीस ते पंचवीस गठ्ठे इतस्ततः पडलेले होते. आतल्या माणसानं सर्व गठ्ठे धुंडाळले. ९१०२ त्याला सापडेना. मी मनातल्या मनात दहा आकडे मोजायला सुरूवात केली. माझ्याकडे नुसता एक कटाक्ष टाकून तो आत कुठल्यातरी बंद दरवाज्यामागे लुप्त झाला.
काही मिनिटांत बाहेर येऊन त्यानं ‘मॅडम, तुमचा लायसन्स अजून तयार नाई, तुम्ही उद्या या’ असं जाहीर केलं मात्र, माझ्या सहनशक्‍तीनं अखेरचा श्वास घेतला.
"नाही, नाही, आज माझा लायसन्स मिळालाच पाहीजे. त्याशिवाय मी इथून हलणारच नाही." कपाळावर जास्तीतजास्त आठ्या घालून, आवाज चढवून, शक्य तेवढ्या तिरसट सुरात मी त्याला सुनावलं.
"तयार नाहीय मॅडम अजूनऽऽ"
"तयार कसा नाही? माझ्या पुढच्या दहा आणि अकराहजारवाल्यांचा तयार आहे आणि माझा कसा नाही? तुम्ही काय वाट्टेल ते करा. माझा लायसन्स आज मला मिळालाच पाहीजे. मी हलणारच नाही त्याशिवाय इथून..."
"मॅडम, ते शोधतायत तुमचा लायसन्स; तोपर्यंत खिडकीतून जरा बाजूला तरी सरका. म्हणजे आमचं काम होईल." माझ्या मागच्यानं लगेच एक आगाऊपणा केला.
मी त्याला मागे वळून ‘ए गपे, मॅडमच्या बच्च्या...’ असा नुसता एक लूक दिला !!
आता आतल्या एका वर्दीतल्या सब‍इनिसपेक्टरानं सूत्रं आपल्या ताब्यात घेतली. चेहरा जरा डेंजरच होता त्याचा.
"अजून सही झालेली नाई, सही झाल्याशिवाय कसा देणार लायसन्स तुम्हाला?" ठेवणीतल्या आवाजात त्यानं मला ऐकवलं.
"सही-बिही मला काही माहीत नाही. मला माझा लायसन्स हवा, बस्स! तुम्ही काय वाट्टेल ते करा..." मी आता पाचवा गियर टाकून उजव्या लेनमधून सुसाट सुटले होते.
"ठीक आहे, तिकडे जाऊन आमच्या साहेबांना भेटा" असं म्हणून त्यानं या प्रकरणातून एकदम लक्षच काढून घेतलं.
यावेळेला हे ‘तिकडे’ म्हणजे पुन्हा ते यारटीओ साहेबच हे मला पक्कं ठाऊक होतं. मला हेच हवं होतं.
मी तिकडे गेले. दुसर्‍या मिनिटाला केबिनबाहेरच्या रांगेची पर्वा न करता सरळ आत घुसले. सात्त्विक संतापभरल्या आवाजात साहेबांना माझं गार्‍हाणं ऐकवलं.
तिसर्‍या मिनिटाला साहेबांनी त्यांच्या दोन अशिश्टनची माझा लायसन्स शोधण्याच्या कामगिरीवर त्वरित नेमणूक केली. ‘सापडला नाही तर दुसरा बनवून द्या लगेच’ म्हणून फर्मानही सोडलं.
चौथ्या मिनिटाला त्यांपैकी एकाच्या हातात माझा लायसन्स असल्याचं माझ्या नजरेनं टिपलं...
आणि सहाव्या मिनिटाला ‘got it, at last' असा मेसेज मी माझ्या नवर्‍याला पाठवला !!
----------
नंतर जाणवलेल्या काही गोष्टी -
१. दारावरच्या ‘साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी’ या पाटीखाली आता साहेबांच्या नावाची पाटी लटकत होती. त्यादिवशी मानेबुवांना साहेबांचं नाव विचारून मी निरुत्तर केलं होतं त्याचाच हा परिणाम असावा.
२. इतक्या कष्टांनी मिळवलेला लायसन्स आपण साहजिकच जपून ठेवणार. म्हणजेच तो हरवण्याची शक्यता कमी होणार आणि आर.टी.ओ.वरील अतिरिक्‍त कार्यभार कमी होणार हे जाणूनच या सगळ्या गोंधळाचं शिस्तबध्द आयोजन केलं जातं.
३. आर.टी.ओ.मधले धुरीण आधुनिक संगणकीय युगात लायसन्सला लायसन न म्हणता लायसन्सच म्हणतात.
४. संगणकांना तुफान वातानुकूलन गरजेचंच असतं हा समज सरकार-दफ्तरी तब्बल दोन-अडीच दशकांनंतरही अजून कायम आहे.
५. स्मार्टकार्डरूपी लायसन्सही तातडीनं तयार करता येऊ शकतो.
आणि शेवटचं सर्वात महत्त्वाचं निरीक्षण - स्वतंत्र भारतातील आधुनिक वगैरे नागरिकांना आपल्या हक्कांसाठी अजूनही लढावंच लागतं आणि ती लढाई लढता लढता ‘आपला लायसन्स एकदा हातात पडल्यावर शिकाऊ लायसन्सच्या परिक्षेतील कॉपी-प्रकरणाची योग्य जागी तक्रार करायचीच’ हे जे मी ठरवून ठेवलं होतं त्याची अंमलबजावणी करण्याचं मी साफ विसरून गेले होते.
त्या आर.टी.ओ.च्या नानाची... !!

Comments

Mugdha said…
faar bhari...lavkarach m,alahi ya saglya prakaratun jayche ahe...kalyan che licence Punyala shift karayche ahe !!! ani NO Agent he maze tatvnyan aikun navra mala vedyat kadhto ahe...:)
हेरंब said…
हाहाहा.. धम्माल.. बऱ्याच दिवसांनी लिहिलंस ! आवड्या..
हेरंब,
हो रे... सध्या जरा वेगळ्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे टाईमपास लेखन बाजूला पडलंय.
मी लिहिलेले पुस्तक परिचय वाचलेस का?
मुग्धा,
’नो एजंट’ हे तुझं तत्त्व कायम ठेव. त्या एजंटांच्या डोंबलावर विनाकारण फार पैसे घालावे लागतात.
आपलं सरकारी काम आपणच जाऊन करताना जी काही मजा येते ना त्याला तोड नाही. फक्त डोकं थंड ठेवावं लागतं. (किंवा मी असं म्हणेन की डोकं थंड ठेवण्याचा आपोआप सराव होतो आपल्याला जो इतर ठिकाणी कामी येतो ;-))
हेरंब said…
हो तेही वाचले. तेही मस्तच आहेत. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर मी तुझ्या विनोदी लेखनाचा पंखा आहे. :)
sachin said…
Zabardast.. Mala vatte yaach ek print out kadhun titlya RTO department la tasech Ministry madhye hi dyala have ki ek bai imandarine prayanta karte tilahi evdhe prayatna padtat tar kuni ashi himmat dakhavavi ki nahi mahanun..! Great piece of observation.. Meticulous work..!

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)