फॅक्ट आणि फिक्शनच्या सीमारेषेवर


(महिला दिनानिमित्त २०१७ साली दिव्य मराठी मधुरिमा पुरवणीत लिहिलेला छोटासा लेख)

-----

कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असायचे, तेव्हा कायम माझ्या बसच्या आधी एका खासगी कंपनीची बस यायची. स्टॉपलगत उभे असलेले त्या कंपनीतले दोघं-चौघं बसमध्ये चढायचे. त्यात एक तरूण मुलगीही असायची. माझा तिच्याकडे पाहून फुल्ल फॅन झालेला असायचा. तिचे ऑफिसी कपडे, खांद्यावरची बॅग, पायांतले सँडल्स, गळ्यातलं आय-कार्ड, एका मनगटावर घड्याळ, दुसर्‍या हातात ब्रेसलेट किंवा तत्सम काहीतरी, एकदम टकाटक कॉर्पोरेट लूक! आपण पुढे नोकरी करायची तर अश्याच कंपनीत, अश्याच अवतारात ऑफिसला जायचं, अश्याच बसमधून, हे मी तिच्याकडे बघून तेव्हा मनाशी पक्कं केलं होतं...

पुढे बर्‍याच वर्षांनी ‘गोष्टीवेल्हाळ’ (लेखक : मधुकर धर्मापुरीकर) या कथासंग्रहातली ‘वधू’ ही कथा वाचताना मला अगदी अचानक ती कॉर्पोरेट मुलगी आठवली. मला इतकं आश्चर्य वाटलं! दोघींमध्ये कणमात्रही साम्य नव्हतं... की होतं?

कथेतला नारायणराव हा एका विवाहेच्छुक मुलाचा बाप. लग्न जुळवताना वधूपित्यांनी चपला झिजवायच्या, आपण नाही, या विचारांचा त्याच्यावर पगडा आहे. पण तरी मुलाचं लग्नाचं वय टळून चाललंय, चांगली स्थळं येतच नाहीयेत या विचारानं तो हतबलही झालेला आहे. ओळखीपाळखीच्यात आपली चिंता तो कधीतरी सहज बोलून दाखवतो आणि त्याला एक स्थळ कळतं. मुलीच्या बापाला भेटण्याआधी तो चाकोरी मोडून थेट त्या मुलीलाच बघायला जातो, कुठे? तर एस.टी.स्टँडवर. कारण मुलगी एस.टी.त कंडक्टर म्हणून नोकरी करणारी आहे.
त्याला ज्या एस.टी.नं गावी परतायचंय त्याच एस.टी.त तिची ड्यूटी लागलेली आहे. तिथून पुढचा त्याचा २-४ तासांचा प्रवास, त्या दरम्यान त्यानं त्या मुलीचं मुलाच्या बापाच्या दृष्टीकोनातून केलेलं निरिक्षण, त्याच्या मनातले इतर विचार, अशी सगळी ती कथा.

नारायणरावाबरोबर त्याचा चुलत भाऊही आहे. कथेत दोघं गप्पा मारतात, गंभीरपणे विचारविनिमय करतात, ‘जनरेशन-गॅप’बद्दल आपापली मतं व्यक्त करतात, त्यामार्फत कथा पुढे सरकते. या सगळ्यात ती कंडक्टर पोरगी जरा बाजूलाच पडतेय की काय असं वाटतं. कारण दोघा पुरूषपात्रांच्या दृष्टीकोनातूनच तिचं चित्र आपल्यापुढे उभं राहतं. कथेत तिला संवाद आणि ‘फूटेज’ही म्हणाल तर अगदीच कमी, पण तरी कथा संपते तेव्हा तीच मनात घर करून राहते. कारण तिची नोकरी, त्या कामाचं स्वरूप हेच तिचं वेगळेपण आहे!

कथेतली सगळीच पात्रं ज्या निमशहरी सामाजिक परिस्थितीतली आहेत, तिथे मुलीनं नोकरी करण्याला कदाचित थोडी मान्यता मिळालेली असेलही, ती नोकरी म्हणजे कार्यालयीन कारकुनी काम असंही गृहित धरलं जात असेल; मात्र मुलीने कंडक्टरची नोकरी करणे याला किती जणांचा खुला पाठिंबा असेल? फारच थोड्या जणांचा, किंवा कदाचित एकाचाही नाही. म्हणजे त्या मुलीला त्यासाठी किती झगडावं लागलं असेल... घरच्यांना पटवून द्यावं लागलं असेल; शेजारपाजार्‍यांची कुजकी शेरेबाजी ऐकून घ्यावी लागली असेल... आणि हे सारं केवळ ती नोकरी मिळवण्यासाठी! मिळालेली नोकरी टिकवणे हे तर तिच्यासाठी त्याहून मोठं दिव्य! 
कथेत नारायणरावाच्या मनातही तो विचार येतो, की दिवसभर कुणाकुणाशी तिचा संपर्क येत असेल, गर्दीत वावरायचं, धक्काबुक्कीत स्वतःला सावरायचं, पुरूष प्रवाश्यांच्या नजरा झेलायच्या; तिच्या नोकरीचं स्वरूप असं की नकोसा वाटणारा जनसंपर्क टाळून तिला काम करणेही शक्यच नाही! बरं, नारायणरावाला दिसलेली तिची अंगकाठी, रंगरूप हे सारं तसं चारचौघींसारखं सामान्यच. असं सगळं एकत्र चित्र उभं केलं तर जाणवतं की ती मुलगी मोठी जिगरबाज असणार. आपल्याला काय करायचं आहे (आणि काय करायचं नाहीये) हे तिला पक्कं ठाऊक आहे. ती विचारी आहे, धडपडी आहे, खमकी आहे; आपल्या कामाच्या आड ती आपला बाईपणा येऊ देत नाही, मात्र त्यापलिकडे ती एक तरूण स्त्री म्हणूनच वावरते. सलवार-खमीस, पायात नाजूक लेडीज चपला, डाव्या हातात काकण, उजव्या हातात अंगठ्याच्या नखाएवढं घड्याळ, गळ्यात काळ्या दोर्‍यात ओवलेली सोन्याची नखभर चकती, डोक्याला गुंडाळलेला रुमाल, हे कथेतलं वर्णन तेच दर्शवतं.

कदाचित इथेच तिची आणि कॉर्पोरेट मुलीची माझ्या मनात सांगड घातली गेली. कॉर्पोरेट मुलीला मी पाहायचे तेव्हा तर मी तिच्याहून खूप लहान होते; तिच्या कामाचं स्वरूप काय याचा मला अंदाज येणे त्या वयात कठीणच; त्यामुळे तिची जिगर, झगडा याचाही विचार तेव्हा कधी मनाला शिवला नव्हता. तिच्या बाह्यरूपाकडेच तेवढं लक्ष जायचं. पण आपला मेंदू अश्या नकळत भिडलेल्या गोष्टी, अनुभव यांचं विश्लेषण, संश्लेषण करण्याचं काम राखून ठेवत असावा. भविष्यात कधी त्याच्याशी धागा जुळणारे अनुभव आले किंवा तशा व्यक्ती परत दिसल्या की विचारांचे साचे फिट्ट बसतात आणि आपण लागतो कामाला!

‘वधू’ कथेतल्या कंडक्टर पोरीनं मला असंच कामाला लावलं. तिच्यात मला असं एक ‘सेल्फ-मेड’ व्यक्तिमत्व दिसलं, की मी तिचा माझ्या आठवणीतल्या कॉर्पोरेट मुलीशी एक ‘बॉण्ड’ बनवून टाकला. आज ५-६ वर्षं झाली या ‘बॉण्डिंग’ला... पण सगळं काल-परवाच घडल्यासारखं वाटतंय! ‘फॅक्ट’ आणि ‘फिक्शन’ असं जेव्हा बेमालूमपणे एकत्र येतं तेव्हाचा वाचनानुभव भारी असतो एकदम... विसरू म्हणता विसरता येत नाही!


Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)