पुस्तक परिचय : Sharp Objects (Gillian Flynn)

 

अमेरिकेतल्या एका लहानशा गावात एका लहान मुलीचा मृत्यू झालेला असतो. आणि वर्षभराने आणखी एक मुलगी नाहीशी झालेली असते. शिकागोतल्या एका जेमतेम चालणार्‍या वृत्तपत्राच्या संपादकाला त्यात काहीतरी कनेक्शन असावं असं वाटतं. ती स्टोरी खणून काढली तर आपल्या पेपरला फायदा होईल असा त्याचा होरा असतो.

तिथे नोकरी करणारी एक पत्रकार मुलगी (कॅमील) मूळची त्याच गावची असते. तो तिलाच त्या कामगिरीवर पाठवतो.

तिने १५-१६ वर्षांपूर्वीच ते गाव सोडलेलं असतं. गावात तिची आई, सावत्र बाप आणि सावत्र बहीण राहत असतात. तिची गावाशी, घराशी फारशी अ‍ॅटॅचमेंट नसते. ती जरा नाखुषीनेच तिथे जाते.

पुढे त्या दुसर्‍या मुलीचाही मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं. दोघींच्या मृत्यूत काही ना काही कनेक्शन असणारच, याची खात्री पटते. स्थानिक पोलीस तपास करत असतात. एफ.बी.आय.ही येतात.
कॅमील शिकागो पेपरला काही ना काही पाठवायलाच हवं म्हणून आपल्या पद्धतीने 'स्टोर्‍या' शोधत असते. त्यातून एकेक गोष्टी उघड व्हायला लागतात.

त्या मुलींचा खून झालेला असतो. पोलीस आणि कॅमील आपापल्या पद्धतीने खुन्यापर्यंत पोचतात. त्यातला पोलीस तपास पुस्तकात येत नाही. कॅमीलचा शोध अगदी सविस्तर येतो.
तिच्या लहानपणीच्या आठवणी, तेव्हाच्या मैत्रिणी, गावातल्यांचे आपांपसांतले संबंध, हेवेदावे, दारू, ड्रग्ज, तरुणाईचा स्वैराचार हे संपता संपत नाही. अनेक ठिकाणी 'चला, आता पुढे सरका' म्हणावंसं वाटलं.
रहस्य उलगडण्यासाठी या सगळ्याचा लेखिकेने जाणूनबुजून वापर केला आहे. कारण- खुनी आणि खुनाचं कारण.
पण त्यामुळे मला काही काळाने कंटाळाही आला. पुस्तक पूर्ण करायला वेळ लागला.

गिलियन फ्लिन हे नाव 'गॉन गर्ल' सिनेमामुळे माहिती होतं. 'शार्प ऑब्जेक्ट्स' हे तिचं पहिलं पुस्तक. त्यामुळे मी फार अपेक्षा ठेवून वाचलं. तितकं मला आवडलं नाही.
तरी अगदी शेवटाकडे जरा अनपेक्षित ट्विस्ट येतो. तो आवडला.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)