पुस्तक परिचय : क्लोज एन्‌काउंटर्स (पुरुषोत्तम बेर्डे)

पुस्तक आणि लेखकाच्या नावाची जोडी एकत्र पाहिली, तर वाटतं की नाट्य-चित्रसृष्टीतल्या काही व्यक्ती-वल्लींबद्दल किंवा अनुभवांबद्दल लेखन असेल. पण पुस्तकाचं मुखपृष्ठ काही वेगळंच सांगतं... याच क्रमाने विचार करत मी हे पुस्तक उचललं.

लेखक लहानपणी कामाठीपुर्‍यात राहत होता. त्या काळातल्या या आठवणी, व्यक्तिचित्रं, अनुभव आहेत. एकूण २४ लेख आहेत. काही लहान, काही मोठे. त्यातली ७० आणि ८० च्या दशकातली कष्टकरी, बकाल, हलाखीची मुंबई फार रंजक आणि भेदक दोन्ही आहे. कामाठीपुर्‍यातल्या १६ गल्ल्या, तिथे राहणारे भाजीवाले, छोटे भंगार व्यापारी, छोटी-मोठी दुकानं नाहीतर हॉटेलं चालवणारे व्यावसायिक, या सार्‍यांचं आपांपसांतलं नातं, शेजारधर्म, हेवेदावे, चढाओढ, खुन्नस, काळा बाजार, हिंसाचार, हिंदु-मुसलमान तेढ... त्यांतलंच शाळकरी मुलांचं आपलं विश्व, मैत्री, आसपासचं मोठ्यांचं जग समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न... हिंदी सिनेमे, गल्ली क्रिकेट, स्थानिक राजकारण... खास बंबैय्या हिंदी-मराठी बोली... मुंबई शहराचा एक लहानसा काळ-तुकडाच पुस्तकातून समोर येतो, आणि तो पुढे पुढे वाचत रहायला आपल्याला उद्द्युक्त करतो.

कामाठीपुरा या उल्लेखाने आधी दचकायला होतं. लेखकानंही कबूल केलं आहे, की कॉलेजमध्ये असताना सुरुवातीला त्याला आपण कामाठीपुर्‍यात राहतो हे सांगण्याची लाज वाटायची.  पुढे जाहिरात क्षेत्रातली नोकरी सुरू झाल्यावर ते मुंबईत अन्यत्र रहायला गेले. बर्‍याच वर्षांनी कामानिमित्त त्या दिशेला जाणे झाल्यावर जुन्या आठवणींनी परत उसळी घेतली. त्या आठवणी त्यांनी आधी whatsapp वर मित्रमंडळींसोबत share करायला सुरुवात केली. त्यातूनच पुढे हे पुस्तक उभं राहिलं.

लेखनाचा मुख्य भर व्यक्तिचित्रणावर आहे. तरी त्यात येणार्‍या आठवणी, प्रसंग एक-से-एक आहेत. बेर्डे बंधूंचं लहान वयातलंच नाटकांचं वेड, साहित्य संघात प्रयोग करण्याच्या खटपटी, गल्ली क्रिकेटच्या रीतसर स्पर्धा, त्यात एका टीमतर्फे चक्क मनमोहन देसाई स्पर्धेत खेळायला येणे, शेट्टी लोक (त्यांतले एक रोहित शेट्टीचे वडील), गँगवॉरमध्ये अडकत जाणार्‍या तरुणांच्या आठवणी, लेखक आणि त्याचे शाळकरी मित्र मिळून घोडबंदर किल्ल्याजवळ एका हिंदी सिनेमाचं शूटिंग बघायला जातात त्याचं वर्णन, सिनेमांची पोस्टर्स हातानं रंगवणार्‍या अबुभाईच्या कामाचं बारकाईनं केलेलं वर्णन... ही यादी खूप मोठी होईल. प्रत्येक लेखाची आपापली खासियत आहे. आपण वाचताना त्यात गुंगून जातो.

प्रत्येक लेखासोबत रेखाटनं आहेत, ती लेखकानं स्वतःच केली आहेत. पुस्तकाला जयंत पवारांची प्रस्तावना आहे. ती सुद्धा अगदी वाचण्यासारखी आहे. पुस्तक २०१९ मध्ये प्रकाशित झालेलं आहे. पण त्याबद्दल कुठे काही वाचण्यात आलं नव्हतं. त्यामुळेच पुस्तक वाचायला मला जास्त मजा आली.

मुंबई जशी आहे तशीच आवडणार्‍या प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं पुस्तक.


Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३