पुस्तक परिचय : Breaking Through (Isher Judge Ahluwalia)

 इशर जज अहलुवालिया या अर्थशास्त्रज्ञ विदुषीचं हे memoir आहे.

लहानसं पुस्तक आहे, आणि ते जबरदस्त आहे! 

कोलकातात पारंपरिक पंजाबी कुटुंबात वाढलेली इशर, ११ भावंडांमधली एक. तिला शिक्षणाची आस होती. घरात मुलींच्या शिक्षणासाठी खूप काही पोषक वातावरण नव्हतं. घरातल्या मोठ्यांनी जरासं नाखुषीनेच तिच्या उच्चशिक्षणाला परवानगी दिली. कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि तिथून थेट अमेरिकेत एम.आय.टी. अशी तिची गाडी सुसाट निघाली.

इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च - हे तिचं क्षेत्र होतं.

पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत नोकरी, पीएचडी,

मॉन्टेक सिंग अहलुवालियांशी ओळख, मैत्री, लग्न, संसार,

कामानिमित्त अमेरिकेतल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उच्च अर्थशास्त्री वर्तुळात त्यांचा समावेश होता.

अमेरिकेत १० वर्षं लखलखीत करिअर घडवून दोघं आणि त्यांची दोन मुलं भारतात परतले. इथल्या अर्थशास्त्र क्षेत्रातही दोघांच्या नावांचा एव्हाना दबदबा निर्माण झालेला होता.

इशरनी आपलं पॉलिसी रिसर्चचं काम पुढे सुरू केलं. त्या रिसर्चवर आधारित काही पुस्तकं लिहिली.

अमेरिकेत असतानाच मनमोहन सिंग यांच्याशी दोघांची ओळख झालेली होती. भारतात आल्यावर त्यांची घट्ट मैत्री झाली.

 भारतातल्या इकॉनॉमिक्सचं चित्र तेव्हा कसं होतं, कोणते नवे प्रवाह येत होते, ९०च्या दशकातलं बदललेलं अर्थचित्र, त्या सगळ्यावरची स्वत:ची मतं, स्वत:च्या कामांचे एक-एक टप्पे, जागतिक स्तरावरच्या अर्थशास्त्रीय घडामोडी, त्यात स्वतःचं स्थान नेमकं ओळखून सतत काम करत राहणे- हा सगळा प्रवास त्यांनी मांडला आहे.

त्यात कुठेही जराही आढ्यता नाही, मी अमुक केलं-तमुक केलं हा सूर नाही. त्यांना पद्मभूषण मिळालं होतं हे सुद्धा पुस्तकाच्या शेवटाकडे एका फोटोमुळे समजलं. मजकुरात त्याचा बारीकसाही उल्लेख नाही.

 मॉन्टेक सिंग यांच्या पदाचा, दिल्लीतल्या राजकीय वर्तुळातल्या परिचयांचा इशर यांनी कधीही स्वत:साठी फायदा करून घेतला नाही. आपण ‘मिसेस मॉन्टेक सिंग’ बनून रहायचं नाही हे त्यांच्या डोक्यात पक्कं होतं. त्या मॉन्टेक सिंग यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या होत्या. त्यांच्यापासून स्वतंत्र अशी करिअर, इमेज त्यांनी घडवली. त्याचवेळी त्या कुटुंबात रमणार्‍या, धार्मिक वृत्तीच्याही होत्या.

दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने त्यांचं निधन झालं. कॅन्सर उपचार सुरू असताना हे पुस्तक त्यांनी लिहिलं.

कधी वर्तमानपत्रांत्/नेटवरच्या लिंक्सवर वगैरे सुद्धा इशर जज अहलुवालिया हे नाव वाचल्याचं मला आठवत नव्हतं. अर्थात इकॉनॉमिक्स हा मला न झेपणारा विषय आहे, त्यामुळे तिकडे दुर्लक्षही झालेलं असेल. मात्र पुस्तक कुठेही जड किंवा कंटाळवाणं वाटलं नाही. उलट enriching वाटलं.

(लोकसत्ता-बुकमार्कमध्ये पुस्तकाबद्दल वाचल्यावर ते विशलिस्टला टाकलं होतं. किंडल डील्समध्ये एकदा अगदी स्वस्तात मिळून गेलं.)

वेगळं काही वाचायचं असल्यास चुकवू नये असं पुस्तक.

 

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)