पुस्तक परिचय : मध्यरात्रीनंतरचे तास (तमिळ लेखिका – सलमा, अनुवाद – सोनाली नवांगुळ)

पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी सलमा यांच्याबद्दल थोडंसं. (कारण त्यामुळेच मुळात मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं.)

सलमा हे त्यांचं टोपणनाव आहे. तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींत काढली.

त्यांना लहानपणापासून वाचन, कविता यांची आवड होती. त्यांनी मिळेल त्या कागदावर, जमेल तशा कविता करायला सुरुवात केली. ते कागद घरच्या मोठ्यांच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून त्या कागदांच्या बारीक घड्या घालून लपवून ठेवत असत. काही काळाने त्यांच्या आईला हे समजलं. आईनं या बाबतीत मुलीच्या मागे उभं राहण्याचं ठरवलं आणि लपूनछपून ते कागद कुणा ओळखीच्यांकडे सोपवले. त्यांनी आणखी कुणा जाणकाराला ते दाखवले. त्या कविता पठडीबाहेरच्या, वेगळ्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. करता करता कवितांचा एक संग्रह प्रकाशित करण्याचं ठरलं.

दरम्यान इकडे सलमा यांचं लग्न झालं. त्यांच्या सासरी सुद्धा तसं कर्मठ वातावरणच होतं. स्वतःच्याच कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला त्या लपूनछपून गेल्या. कार्यक्रमाच्या जागी त्यांनी आपली ओळख जाहीर केली नाही. प्रेक्षकांमध्ये मागे कुठेतरी बसून कार्यक्रम पाहिला आणि त्या गुपचूप घरी निघून गेल्या.

त्यांची खरी ओळख उघड झाली तेव्हा आधी घरच्यांचा प्रचंड विरोध त्यांना सहन करावा लागला. पुढे हा विरोध मावळला. त्या स्थानिक राजकारणात उतरल्या. गावच्या सरपंच झाल्या. 

आजपर्यंत त्यांचे दोन काव्यसंग्रह, एक लघुकथासंग्रह, एक कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांच्या लेखनाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देशा-परदेशांत त्यांच्या साहित्यावर परिसंवाद आयोजित केले गेले आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित ’सलमा’ हा इंग्रजी लघुपट २०१६ साली सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सादर झाला. पुढे या माहितीपटालाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

२०१९ साली जयपूर लिट-फेस्टमध्ये सलमा आल्या होत्या. त्या वर्षीच्या लिट-फेस्टवर आधारित एक लेख ’अनुभव’ अंकात  प्रकाशित झाला. त्या लेखामुळे मला सलमा यांच्याबद्दल समजलं. मी नेटवर त्यांच्याबद्दल मिळेल ती माहिती शोधून वाचली. (तशी फार नव्हतीच.)

’मध्यरात्रीनंतरचे तास’ हा त्यांच्या तमिळ कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद. २०२१ साली सोनाली नवांगुळ यांना या अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. म.टा.च्या फेसबुक पेजवर सोनाली नवांगुळ यांची मुलाखत मी पाहिली आणि हे पुस्तक विकत घेण्याचं ठरवलं. (छापिल आवृत्ती)

पुस्तकापर्यंतचा हा माझा वैयक्तिक प्रवास मला कुठेतरी नोंदवून ठेवायचा होता. म्हणून इथे लिहिलं. वाचनामुळे एकातून एक माहिती कळत जाते, त्याचा माग काढला जातो, त्यातून काही ना काही नवीन सापडतं, ही साखळीही माझ्या आवडीची. मात्र हा प्रवास जितका आवडता, तितकंच हे पुस्तक झाकोळून टाकणारं आहे.

साडेपाचशे पानांची घसघशीत कादंबरी आहे. तामिळनाडूतल्या मदुराईजवळचं एक लहानसं गाव. गावात बहुसंख्य मुसलमान वस्ती. घरोघरी कर्मठ वातावरण. दैनंदिन आयुष्यातही स्त्रियांवर असलेली अनेक बंधनं. अशा भवतालातली, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातली चार-सहा कुटुंबं, ८-१० वर्षं ते ६०-७० वर्षं वयोगटातली अनेक स्त्री-पात्रं; तुलनेनं मोजकी पुरूष-पात्रं, पण त्यांचा वरचष्मा, घराघरांमध्ये असणारी त्यांची जरब; त्यांच्यावर प्रेम-माया करणार्‍या, तरीही त्यांना दबकून असणार्‍या स्त्रिया; परंपरेच्या पगड्याखाली प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारे पिचत जाणं; असा हा सगळा कादंबरीचा अंतिमतः भकास करणारा अवकाश आहे.

कादंबरीतल्या अनेक स्त्रिया आपापल्या पद्धतीनं आणि आपापल्या पातळीवर लहान-मोठी ते सूक्ष्मातिसूक्ष्म बंडं करतात. त्यात होरपळतात. अनिश्चित भविष्याचं ओझं वागवतात. कथानकात त्या अनुषंगानं येणार्‍या लहानसहान गोष्टी लेखिकेनं आपल्या घरात अनुभवलेल्या असणार याचा वाचताना अंदाज येतो. कादंबरीतला काळ गेल्या ४०-५० वर्षांतलाच; फार काही जुना नाही. त्यामुळे तर भकासपणा आणखीनच वाढतो.

अनुवाद उत्कृष्ट आहे. पुस्तक मूळ मराठीतूनच लिहिलेलं असावं असं वाचताना वाटतं. बर्‍याच दिवसांनी इतका सुंदर मराठी अनुवाद वाचायला मिळाला. तरीही वर म्हटलेल्या भकासपणामुळे (तसंच काही काही जागी ताणली गेलेली वाटल्यामुळे) ही कादंबरी वाचून संपवायला मला वेळ लागला.

हे आपल्याच देशातल्या एका भागातलं कौटुंबिक चित्र आहे हे स्वीकारायला जड जातं. पण त्याचबरोबर अशी इतर आणखी बरीच चित्रं असतील, जी भाषांमधल्या अंतरांमुळे आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलीच नसतील, हे सुद्धा जाणवतं!

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)