विचारांची साखळी, पब्लिक आर्ट वगैरे

आजच्या लोकसत्ता-‘अन्यथा’ सदरातला हा लेख वाचत होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या आक्रमक साम्राज्यशाहीपोटी उद्भवलेल्या एका जुन्या घटनेबद्दल, तेव्हाच्या युद्धाबद्दल त्यात सांगितलं आहे.

१९३९ साली स्टालिनच्या रशियाने (तेव्हाचं USSR) फिनलंडवर असंच आक्रमण केलं. तेव्हा फिनलंडने रशियाला कसा निकराचा लढा दिला, त्या युद्धात रशियाची कशी नाचक्की झाली, याबद्दल लेखात वर्णन आहे. ते वाचत असताना सतत वाटत होतं, की यासंदर्भातलं काहीतरी (लेख किंवा वृत्त याहून वेगळं) आपल्या पाहण्यात येऊन गेलं आहे. पण काय?

दोन-तीन वर्षांपूर्वी Scandinavia tour दरम्यान फिनलंडमध्ये ७-८ दिवस मुक्काम होता, हाच त्यातल्या त्यात एक धागा. मग जरा डोक्याला ताण दिला. तेव्हाचे फोटो काढून धुंडाळले. आणि ते काय हे आठवलं.

फिनलंडमधल्या Rovaniemi इथे फिरताना दिसलेलं हे सुंदर शिल्प :


हे शिल्प तिथे आहे हे आम्हाला आधी अजिबात माहिती नव्हतं. गॉथेनबर्ग (स्वीडन) इथून एक ट्रेन आणि दोन विमानं बदलून, दिवसभराचा प्रवास करून रोवानिएमीला पोहोचेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती. पण ती arctic circle वरची जुलैमधली संध्याकाळ होती! अंधार-बिंधार पडायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मुक्कामाच्या आसपासचा परिसर पहावा, grocery store शोधून ठेवावं म्हणून बाहेर पडलो. 

रिकामे रस्ते, शांत वसाहती, कुडकुड थंडीचा arctic उन्हाळा... आपसांत हळू आवाजात काही बोलत असू तरी तो आवाज मोठा वाटावा इतकी शांतता होती... आणि चालता चालता अचानक डावीकडच्या लहानशा बागेत मध्यात हे शिल्प दिसलं- ही ताठमानेने उभी साखळी.

त्याक्षणीचा माझा चेहरा मला अजूनही आठवतो. अशा public art मध्ये काहीतरी मजा असते खरी, शिवाय आपल्याकडे अशा प्रकारचं public art अजून तरी फार काही पहायला मिळत नाही. आणि ते असं अचानक समोर आलं होतं, की त्यातलं surprise element खासच होतं.

अशा साखळीचं शिल्प करावं, हे कुणाला वाटलं असेल? ती इतकी ताठ आणि थाटात उभी होती, की त्यातून काहीतरी statement केलेलं असावं का? इथल्या लोकांच्या भवतालात अशी गोष्ट आहे, हे आपल्यासाठी किती वेगळं आहे! - बरेच विचार मनात आले. 

तिथे अगदी जवळ जाऊन पाहता येईल का खात्री नव्हती. आधी बागेत जाऊन त्याभोवती सावकाश १-२ फेर्‍या मारत अंदाज घेतला. मग लक्षात आलं, की जवळ जाता येतंय. जवळ जाऊन त्यातल्या एका साखळीला एकदाच अलगद स्पर्श करून आले. 

चहूबाजूंनी काही फोटोही घेतलेच. तिथे त्याबद्दल इतर काही माहिती दिसली नाही. (किंवा माझ्या नजरेतून ती सुटली.) पण मुक्कामाच्या ठिकाणी परतल्यावर इंटरनेटवर शोध घेतला. तर कळलं, की १९३९ सालच्या winter war मध्ये लढलेल्या स्वीडिश आणि नॉर्वेजियन स्वयंसेवकांच्या स्मरणार्थ ते 'The Brothers in Arms Chain' शिल्प १९६० च्या दशकात तिथे उभं करण्यात आलं. Oscar Reutersvärd या स्वीडिश शिल्पकाराने ते तयार केलंय.

सुरुवातीला म्हटलेला लोकसत्तामधला लेख याच winter war संबंधी आहे. विचारांची, आठवणींची साखळी पूर्ण झाली ती अशी.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)