पुस्तक परिचय : The Messenger (Shiv Malik)

There are more than two sides to every story - हे या पुस्तकाचं उपशीर्षक आहे. आणि अगदी पहिल्या पानापासूनच आपण ही तिसरी बाजू काय असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात करतो.

७ जुलै २००५ यादिवशी लंडनमध्ये चार ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. लंडन पोलीस, इंग्लंडमधली प्रमुख वृत्तपत्रं, न्यूज चॅनल्स या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याच्या मागे होते. या हल्ल्यामागे ब्रिटिश जिहादी नेटवर्कचा (BJN) हात होता, हे स्पष्ट झालं होतं.
शिव मलिक हा इंग्लंडमधला शोधपत्रकार सुरुवातीला मँचेस्टरमध्ये एका दुय्यम असाइनमेंटसाठी या नेटवर्कमधल्या एका सदस्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेला. त्याचं नाव - हसन बट्ट. हसन बट्ट इंग्लंडमधल्या वृत्तमाध्यमांमध्ये बर्‍यापैकी माहित असलेला चेहरा होता. BJN तर्फे माध्यमांना मुलाखती देणे, पत्रकारपरिषदेत बोलणे या गोष्टी तो करायचा. त्याचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं.

हसन बट्टशी बोलताना शिव मलिकच्या लक्षात आलं, की तो BJN चा केवळ ‘चमको प्रवक्ता’ नव्हता. त्याची स्वतःची काही तत्वं होती, धर्माचारण म्हणजे नेमकं काय याबद्दल त्याची मतं स्पष्ट होती, आणि तरीही तो विवेकी विचार करणारा होता. तो अगदी कोवळ्या वयात BJN मध्ये सामिल झाला होता. आणि आता १०-१५ वर्षांनी BJN आपल्या उद्दीष्टांपासून दूर होत चाललंय, असं त्याला वाटायला लागलं होतं.

यामुळे शिव मलिकला हसनच्या स्टोरीत रस वाटायला लागला. हसन BJN पासून दूर होत चालला होता आणि त्याला आपले अनुभव शब्दबद्ध करण्याची इच्छा होती. हे कळताच शिव मलिकनं त्याला त्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्यातल्या भेटीगाठी, गप्पा, फोनकॉल्स वाढायला लागले.

या पुस्तकाचा पहिला दोन तृतियांश भाग म्हणजे हसनची कहाणी काय होती, ती त्यानं शिव मलिकला कशी सांगितली, त्यातून शिव मलिकनं between the lines कोणती निरिक्षणं नोंदवली, याचं सविस्तर वर्णन आहे. आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे. परक्या भूमीवर कोणतंही जिहादी नेटवर्क कसं काम करतं, तरुण मुलं त्यात का आणि कशी ओढली जातात, त्यांच्या बारीकसारीक अनुभवांचे-भेदभावांचे ताणेबाणे कोणते असतात, देशा-परदेशात अतिरेकी हल्ला होतो, तेव्हा त्याची पूर्वतयारी कशी होते, सहभागी सदस्यांना कसं आणि कोणतं प्रशिक्षण दिलं जातं (सिनेमात दाखवतात तसं नुसतं सैनिकी पोषाखात हातात बंदूक घेऊन ओरडत पळण्याचा सराव नव्हे) हे सगळं वर्णन बर्‍यापैकी हेलपाटून टाकणारं आहे. ते झपाट्यानं वाचलं गेलं.

पुस्तकाचा उरलेला एक तृतियांश भाग म्हणजे शिव आणि हसनच्या ‘कहानी में, दोस्ती में ट्विस्ट’ आहे. (आणि तो काल्पनिक नाही, खराखुरा घडलेला आहे.) तो ट्विस्ट इथे सांगणे म्हणजे एका परिनं या पुस्तकाचा spoiler ठरेल.
पुस्तकाच्या उपशीर्षकातली तिसरी बाजू इथे समोर येते.
या भागातलं निवेदन मला जरा लांबल्यासारखं वाटलं. पण त्यामागची शिव मलिकची तळमळ खरी वाटते. त्या ट्विस्टमुळे काय खरं, काय खोटं, कोण कुणाच्या हातातलं बाहुलं, कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही, असे real life प्रश्न पडतात.
मतपरिवर्तनाच्या वाटेवरचा एक तरुण जिहादी आणि त्याच्याच वयोगटातला एक स्थलांतरित पार्श्वभूमीचा तरुण पत्रकार, दोघांच्याही करिअरचे, आयुष्याचे graphs पणाला लागण्याची ही गोष्ट आहे.


काही वेगळं contemporary वाचायला आवडत असल्यास चुकवू नये असं पुस्तक.

(दोन-एक वर्षांपूर्वी लोकसत्ता-बुकमार्क पुरवणीत या पुस्तकाबद्दल वाचलं होतं, तेव्हाच ते विश-लिस्टला टाकून ठेवलं होतं. गेल्या वर्षी कधीतरी किंडल डील्समध्ये अगदी स्वस्तात मिळालं.)


Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)