पुस्तक परिचय : संवादु अनुवादु (उमा कुलकर्णी)

अनुवादाचा प्रवास मांडायला हवा, या भालचंद्र नेमाडेंच्या सूचनेवरून उमा कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहायला घेतल्याचं म्हटलं आहे. पुस्तकात केवळ अनुवादाचा प्रवासच नव्हे, तर त्यांचा आजवरचा जीवनप्रवासच येतो. त्यामुळे पुस्तक चांगलं घसघशीत आहे. पुस्तकाचं एका वाक्यात वर्णन करायचं तर हे त्यांच्या भोवतीच्या गोतावळ्याचं वर्णन आहे. गोतावळा- माणसांचा आणि पुस्तकांचाही.

बेळगावातलं बालपण, तेव्हाचं घरचं वातावरण, लहानपणीचे सवंगडी, शेजारपाजारी, नातेवाईक, घरातले कुळाचार, लग्नानंतरचे सासरचे नातेवाईक, सासरमाहेरच्या नातेवाईकांचे निवेदनाच्या ओघात येणारे स्वभावविशेष, हे सगळं वाचताना आपल्या शेजारच्या घरातलं एखादं कुटुंब रोज येताजाता दिसत राहतं, तसं वाटतं.

पुस्तकाचा मुख्य भाग उमा आणि विरुपाक्ष कुलकर्णी यांचं सहजीवन आणि त्यांतला कानडी-मराठी पुस्तकांचा सहभाग यावर आधारित आहे. दोघांच्या वाचनाच्या सवयी, उमा कुलकर्णी यांची कानडी समजून घेण्याची धडपड, त्यातून अनुवादाच्या कामात त्यांचं सहजगत्या शिरणं, हे अगदी गप्पांच्या ओघात सांगावं तसं त्यांनी लिहिलं आहे. त्या कामाच्या निमित्ताने कारंथ, भैरप्पा यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला, याबद्दल माहिती होतंच.
मला नव्याने समजलं, ते कुलकर्णी पतीपत्नी, अनिल अवचट आणि कमल देसाई यांच्यातल्या मैत्रीबद्दल. या चौकडीचे प्रसंग त्यांनी खूप छान लिहिले आहेत.
पुण्यातलं त्यांचं मॉडेल कॉलनीतलं घर, तिथे त्यांच्या मित्रमंडळींचा असणारा राबता, घराच्या रिडेवलपमेंटची प्रोसेस, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सतत सुरू असलेलं अनुवादाचं काम... त्याबद्दल लिहिताना अधूनमधून अगदी सहज त्या त्यांची अनुवादाची प्रोसेस सांगतात. सगळ्या गोतावळ्यात अनुवादाबद्दलचं त्यांचं म्हणणं वाचकाला ठिकठिकाणी अचानक सापडावं तसं समोर येतं.

अगदी प्रांजळ, घरगुती गप्पांसारखं पुस्तक आहे. जरा पसरट आहे. काही ठिकाणी विस्कळीतही झालं आहे. संपादनाचा आणखी थोडा हात फिरवला जायला हवा होता, असं वाटलं.


Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)