पुस्तक परिचय : Before the Coffee Gets Cold (Toshikazu Kawaguchi)

टोक्योच्या एका गल्लीतल्या बेसमेंटमधल्या लहानशा जुनाट कॅफेत घडणारी गोष्ट आहे. कॅफेत येणार्‍यांना टाइम ट्रॅव्हलची सोय असते. मात्र त्यासाठी चार अटी असतात :


- टाइम ट्रॅव्हल करून कॅफेच्या बाहेर जाता येणार नाही.
- त्यामुळे अर्थातच भूतकाळात किंवा भविष्यकाळात त्या कॅफेत आलेल्या/येणार्‍या व्यक्तींनाच भेटता येईल.
- भूतकाळात जाऊन वर्तमानकाळ बदलता येणार नाही.
- हे सगळं करण्यासाठी कॅफेतल्या एका विशिष्ट जागी बसावं लागेल, समोर कपात वाफाळती कॉफी ओतली जाईल, ती कॉफी थंड होण्याच्या आत पिऊन संपवायची आणि वर्तमानकाळात परत यायचं.

कॅफेत येणारी नेहमीची मोजकी गिर्‍हाइकं आणि कॅफेतले चार कर्मचारी एवढी पात्रं. त्या सर्वांना टाइम ट्रॅव्हलच्या सोयीबद्दल माहिती आहे.
हा सेट-अप पाहून ज्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात त्याहून पुस्तक खूप वेगळं आणि सुंदर आहे.

कथानकात चार टाइम ट्रॅव्हल्स आहेत. त्यातले तीन भूतकाळात आणि एक भविष्यकाळात आहे. एक गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, एक मध्यमवयीन जोडपं, दोन सख्ख्या बहिणी, आई-मुलगीची जोडी अशा चार कथा त्यात येतात. यातल्या प्रत्येक जोडीत आपांपसांत काही समज-गैरसमज झालेले असतात. ते फार काही मोठे नसतात. पण जवळच्या नात्यात कधीकधी अशा छोट्या गोष्टीच मनाला कुरतडू शकतात, राहून राहून त्याचं वाईट वाटू शकतं. त्यामुळे पुढचं सगळं बिनसत गेलं, ही टोचणी राहते.

यातल्या प्रत्येकाच्या कथेची पार्श्वभूमी वाचत असताना आपल्याला वाटायला लागतं, की यात टाइम ट्रॅव्हल करून काय होणारे? या व्यक्ती नेमकं काय साधणारेत? शिवाय त्यासाठीच्या अटी अशा किचकट असताना हे कशाला त्याच्या नादी लागतील? पण प्रत्यक्षात ते घडतं तेव्हा तो एक विशिष्ट क्षण इतक्या तरलपणे आपल्यासमोर येतो की नकळत आपल्याकडून दाद दिली जाते. किचकट अटी पाळण्यामागची त्यांची अपरिहार्यता लक्षात येते ती तिथे. हे अक्षरशः चारही कथांबाबत होतं.
त्यांतल्या भूतकाळातल्या तीन ट्रॅव्हलबाबत आपल्याला बॅक-स्टोरी आधी निदान कळलेली तरी असते. चौथ्या कथेत भविष्यकाळात जाण्याचं कारण आपल्याला समजतं तोच तरल क्षण ठरतो.

त्या एका सरप्राइज एलिमेंटसाठीच की काय, निवेदन काही ठिकाणी clumsy आहे. पात्रांच्या हालचाली (बंदिस्त कॅफेतच सगळं घडत असल्याने), त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया, याची संगती लावताना काही ठिकाणी वाचणार्‍याला प्रयास पडू शकतात.

मला जाणवलेली आणखी एक अडचण, म्हणजे पात्रांची जपानी नावं. जपानी स्त्रियांची नावं कोणती असतात, पुरुषांची कोणती असतात, याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे कोणत्याही पात्राचं एरवी वाचकाच्या मनात एक चित्र उभं राहतं, ते इथे झालं नाही. सुरुवातीची काही पानं वाचताना तर मी दरवेळी त्या-त्या पात्राचा उल्लेख आला की मागे जाऊन स्त्री-की-पुरूष हे refer करत होते. मग ते सोडून दिलं. (जपानी लेखकाचं मी वाचलेलं हे पहिलंच पुस्तक.)

पण एकूणात पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. मी अगदी गुंतून जाऊन वाचलं. संपलं तेव्हा काहीतरी वेगळं आणि भारी वाचायला मिळाल्याचं feeling आलं. पात्रांची परिचित नावं असती तर वाचायला आणखी मजा आली असती हे नक्की.

पुस्तकाचं cover त्यामानाने अगदीच साधं आहे. ते कदाचित जाणीवपूर्वक तसं केलं असावं.

माझ्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार, पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर मग मी नेटवरचे त्याबद्दलचे ब्लॉग्ज, सविस्तर reviews, एक्सपर्ट समीक्षण वगैरे वाचलं. त्यात समजलं, की हा जपानी लेखक तिथला यशस्वी नाटककार आहे. पुस्तकाचं बंदिस्त कॅफेत घडणारं कथानक त्यामुळे आहे.

हे पुस्तक magic realism प्रकारात मोडतं, असंही वाचण्यात आलं. हे समजल्यावर मला ‘हैला!’ झालं. Lol (काहीतरी वेगळं आणि भारी वाटलं ते यामुळेच असावं बहुतेक) या प्रकाराची पुस्तकं आपल्याला झेपतील का, समजतील का, आवडतील का, अशी मला कायम शंका वाटते. अज्ञानातल्या सुखापोटी हे पुस्तक वाचलं गेलं आणि आवडलं, त्यामुळे आता या प्रकारातली बाकीची पुस्तकं वाचली जाण्याची शक्यता किंचित वाढली आहे.

आणि शेवटी माझं सध्याचं पालुपद - Kindle नसतं तर हे पुस्तक माझ्यासमोर कधी आलं असतं का? नाहीच बहुधा!

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)