पुस्तक परिचय : Cobalt Blue (सचिन कुंडलकर, अनुवाद - जेरी पिंटो)

(‘कोबाल्ट ब्लू’ हे सचिन कुंडलकरलिखित पुस्तक ऐकून माहिती होतं. पण का कोण जाणे, मी सुरुवातीपासून ते इंग्रजी पुस्तक आहे, असंच समजत होते. किंडलवर मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दिसला तेव्हा हे लक्षात आलं. असो. थोडक्यात, मी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वाचला.)

तर, पुण्यातल्या मध्यमवर्गीय जोशी कुटुंबातल्या दोन भावंडांची ही गोष्ट आहे. भाऊ, तनय, जरा अबोल, लाजराबुजरा; तर बहीण, अनुजा, ट्रेकिंग आवडणारी, बाइक चालवणारी; मेक-अप, सुंदर कपडे वगैरेशी फार देणेघेणे नसणारी. त्यांच्या घरी एक तरुण मुलगा पेइंग-गेस्ट म्हणून येतो. आणि या भावंडांच्या आयुष्यात एक वावटळ येते. दोघंही त्यात हेलपाटून जातात. वावटळ येते तशी यांना तडाखा देऊन निघूनही जाते. त्यानंतरच्या काळात पुस्तकाची सुरुवात होते. दोघं हेलपाटून का जातात, त्याचं कथानक flashback मध्ये येतं. त्याच ओघात पुढे दोघं त्यातून सावरण्यासाठी काय करतात, सावरू शकतात का, याचे धागे गुंफलेले आहेत.

*** पुढच्या मजकुरात spoilers आहेत ***

तीन तरुण पात्रं असल्यामुळे ही वावटळ अर्थात प्रेमाची, शारीरिक आकर्षणाची आहे. तनय आणि अनुजा दोघंही पाहुण्याच्या प्रेमात पडतात. तनय समलिंगी असणे, हा कथानकातला पहिला ट्विस्ट. त्याच्या घरच्यांना किंवा ओळखीपाळखीत कुणालाच त्याबद्दल माहिती नसते. पाहुण्याच्या सहवासात मात्र तनय खुलतो. (पाहुण्याचं नाव पुस्तकात कुठेच येत नाही.) पाहुणा कुठून आला, तो करतो काय, त्याच्या घरी कोणकोण असतं, हे काहीही माहिती नसतं. तरी आधी पाहुण्याला सामान लावायला मदत करण्यासाठी, मग त्याच्या चित्रकलेमुळे, त्यानं त्याची खोली जशी सजवलेली असते त्याचं आकर्षण वाटल्यामुळे तनय अधिकाधिक वेळ त्याच खोलीत घालवायला लागतो. पाहुण्याकडूनही त्याला प्रतिसाद मिळायला लागतो. दोघांमध्ये शारीरिक जवळीकही निर्माण होते. तनय पाहुण्यात खूप गुंतत जातो.

दुसरीकडे पाहुणा सुरुवातीच्या काळात अनुजाच्या फारसा खिजगणतीतही नसतो. पण हळूहळू त्याचं अस्तित्व तिचाही ताबा घेतं. ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडते. तनय मुलगा असल्यामुळे पाहुण्याच्या खोलीत कधीही जाऊ शकतो, आपल्याला मात्र तसं करता येत नाही, याची तिला रुखरुख असते.

आणि मग एक दिवस त्या घरावर बॉम्ब कोसळतो. अनुजा पाहुण्याबरोबर पळून गेल्याचं लक्षात येतं. तनयला दुहेरी धक्का बसतो. पाहुण्याने विश्वासघात केल्याचा धक्का आणि तो सुद्धा स्वतःच्या सख्ख्या बहिणीसाठीच केल्याचा दुसरा धक्का. हा कथानकातला दुसरा ट्विस्ट.

पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला भाग तनयच्या दृष्टीकोनातून आहे. तो मनोमन त्या पेइंग-गेस्टशी बोलत असल्याप्रमाणे प्रथमपुरुषी/द्वितीयपुरुषी निवेदन आहे. अनुजा पळून गेल्यानंतरच्या दिवसांत याची सुरुवात होते. तनय आणि पाहुणा यांच्यातलं समलिंगी आकर्षण कसं निर्माण होतं, वाढतं, हे या भागात अगदी तरलपणे, सूचकतेचा वापर करून सांगितलं आहे. पाहुण्याचं कलागुणनिपुण तरीही गूढ व्यक्तिमत्त्व इथे समोर येतं. तनयचं त्याच्यात गुंतणं बारीकसारीक तपशीलांतून दर्शवलं आहे.
अनुजा आणि पाहुणा एकाच वेळी घरातून गायब झालेले असले तरी दोघं वेगवेगळ्या दिशांना गेलेले असूदेत अशी तनयची मनोमन इच्छा असते. पण सहा महिन्यांनी एक दिवस अनुजा एकटीच परत येते, तिच्या अंगावर पाहुण्याचा टीशर्ट असतो, ते पाहून तनय आतून तुटतो. हा तिसरा ट्विस्ट.
या निवेदनात time-jumps आहेत, तरी त्याची अडचण जाणवत नाही. वाचताना डोक्यात एक सलग धागा तयार होतो.

पुस्तकाचा दुसरा भाग अनुजाच्या दृष्टीकोनातून आहे. ती घरी परतते तिथे त्याची सुरुवात होते. तिचा बेधडक स्वभाव, परंपरांना झुगारून देण्याची वृत्ती, मनस्वीपणा, त्याला पाहुण्याकडून प्रतिसाद मिळतोय असं तिला वाटत जाणे, हे सारं flashback मध्ये येतं. तनयच्या आठवणी तरल, काव्यमय आहेत. तर अनुजाच्या साध्या-सरळ, घडलं ते हे असं, अशा सुरातल्या आहेत. दोघांच्या व्यक्तिमत्त्वातले फरक इथे लेखकानं खूप बारकाईनं वापरलेले आहेत.

पाहुणा जसा अचानक जोशींच्या घरातून निघून जातो, तसाच एक दिवस तो अनुजाला एकटी सोडूनही निघून जातो. याचा तिला जबर मानसिक धक्का बसतो. घरी आल्यावर तिला मानसोपचार घ्यावे लागतात. त्यातल्यात्यात तिची मावशी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करते.
तनय-अनुजाला एक मोठा भाऊ असतो- असीम. असीम आणि मुलांचे आई-वडील कथानकातली मध्यमवर्गीय कुटुंबाची चौकट पूर्ण करतात. घरात असीमच्या लग्नाची बोलणी चालू असतात. लग्न ठरतं. त्या गडबडीत अनुजाचा प्रश्न जरा बाजूला पडतो.
तनयला मानसोपचार, मावशीचा आधार असा कोणताही दिलासा मिळत नाही. तरीही आपलं वेगळं असणे तो स्वीकारतो. आपल्या आयुष्याचा पुढचा मार्ग निवडतो. मुंबईत एक काम मिळवतो आणि असीमच्या साखरपुड्यादिवशीच घरच्या सर्वांना सांगून-सवरून घर सोडून मुंबईला निघून जातो. कौन्सेलिंगमुळे अनुजाही जरा सावरलेली असते. आपलं शिक्षण, एका एन.जी.ओ.सोबतचं आपलं आवडतं काम पुन्हा सुरू करण्याचं ठरवते.

वावटळीला मागे सोडून आता पुढे निघण्याची दोघांचीही ही प्रोसेस खूप विचारपूर्वक, ठामपणे तरीही निर्विकारपणे उलगडत जाते. दोघांच्या move-on होण्यानं आपल्याला बरं वाटतं, पण त्यामागचा थंडपणा अस्वस्थ करतो.
दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे, याचं सूचन करून पुस्तक संपतं; आणि शेवटी उरते मानवी आयुष्यातली absurdity; माणसाचा आपल्या आयुष्यावर ताबा असणे आणि नसणे; शरीरधर्म, परंपरा यांच्या कात्रीत त्याचं सापडणे; आयुष्याचा गुंता सोबत घेऊनच पुढे जात राहण्याची त्याची अपरिहार्यता.

साखरपुड्यानिमित्त घरी पाहुणे यायचे असतात. अशात त्या पेइंग-गेस्टचं सगळं सामान बाहेर काढलं जातं. त्याची खोली स्वच्छ धुवून काढली जाते. त्या मळक्या पाण्यात एक कोबाल्ट-ब्लू रंगाचीही झाक असल्याचं तनयला दिसतं. कथानकात आधी या कोबाल्ट-ब्लू रंगछटेचे सुंदर फटकारे वेळोवेळी येतात. त्या पार्श्वभूमीवर हा प्रसंग हताश, रितं करणारा ठरतो- तनयसाठीही आणि कथानकासाठीही.

लेखकानं हे सगळं अजिबात गळे न काढता, कुठेही tear jerking च्या नादी न लागता, अगदी सहज-सोप्या भाषेत मांडलं आहे. त्यामुळे कथानक त्यातल्या absurdity सहित विश्वासार्ह वाटतं. गुंतवून ठेवतं. लेखकानं वयाच्या विशीत असताना हे पुस्तक लिहिलंय हे समजल्यावर तर मला खूप आश्चर्य आणि कौतुकही वाटलं. इंग्रजी अनुवादही चांगला आहे.
मला पुस्तक खूप आवडलं. (मूळ मराठी पुस्तकही कधी मिळालं तर नक्की वाचणार.)


Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय : One Part Woman (मूळ लेखक - पेरुमल मुरुगन)

पुस्तक परिचय : Before the Coffee Gets Cold (Toshikazu Kawaguchi)

अफगाण निर्वासित - फुफाट्यातून कुठे?