दोन अनुत्तरित, गहन प्रश्न.

रोजच्यासारखीच एक घाईगर्दीची सकाळ. नवरा ऑफीसला निघून गेलेला होता; माझ्या कामांचं पहिलं सत्र आटोपलं होतं. (रोजच सकाळी नवरा एकदा(चा) घराबाहेर पडला की मला उगीचच एखादा गड सर केल्यासारखं वाटतं.) थोड्याच वेळात माझ्या तीन-चार वर्षांच्या मुलाला शाळेत सोडायला जायचं होतं. माझी कामाची घाई आणि त्यात मुलाची लुडबुड सुरू होती. त्याच्याबरोबर काहीतरी गाणी म्हणत, बडबड करत मी आता त्याचा किल्ला लढवत होते. मध्येच तो थोडा वेळ दुसऱ्या खोलीत जायचा आणि काही न सुचल्यासारखा परत यायचा. असं तीनचारदा झालं आणि अचानक त्यानं मला प्रश्न केला - "आई, चिमणी का असते गं? "...
भरधाव वेगाने निघालेल्या गाडीसमोर अचानक एखादी म्हैस वगैरे यावी तशी मी गप्पकन थांबले. एखाद्या नवशिक्या गोलंदाजानं ऐन भरातल्या फलंदाजाला अनपेक्षितरित्या चकवून बाद करावं तसं माझ्या मुलानं हा प्रश्न विचारून मला ’क्लीन बोल्ड’ केलं. क्षणभर मी करत असलेलं काम विसरले. चिमणी का असते? म्हणजे?? मला वाटलं आपण ऐकण्यात काहीतरी चूक केली असेल. म्हणून त्याला परत विचारलं. तर मगाचच्या त्या फलंदाजाच्या विकेटचा ’ऍक्शन रीप्ले’ पाहावा लागला... "चिमणी का असते? "
यावेळी ’का’ वर जरा जोर होता आणि चेहेरा कावलेला होता. रोजच्या ’चिऊताई’ या संबोधनाची अनुपस्थितीही मला प्रथमच जाणवली. ’मी पुन्हा विचारल्यामुळे पोरगं कावलेलं दिसतंय’ मी स्वतःशीच म्हटलं. आता ’चिमणी का असते? ’ या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं या चिमुरड्याला? त्या मूठभर देहाच्या टीचभर मेंदूत हा प्रश्न आला कुठून आणि का तेच मला कळेना. घराच्या खिडकीत, गॅलरीत चिवचिवणाऱ्या चिमण्या बघायला त्याला किती आवडायच्या! रोजचाच सकाळचा त्याचा तो विरंगुळा होता. गॅलरीतून खिडकीत, खिडकीतून पंख्यावर - ती चिऊताई जिकडे उडेल तिकडे याची मानही तेवढीच वळायची. त्या नादात रोज ग्लासभर दूध पोटात गेलेलंही त्याला कळायचं नाही. (या एका कारणामुळे रोज सकाळी त्याच्यापेक्षा मीच त्या चिमण्यांची जास्त वाट बघायचे.) ’चिऊताई कधी येणार’ पासून चोवीस तासांच्या आत ’चिमणी का असते’ पर्यंतचा त्याचा हा प्रवास मला झेपेना. निसर्गातली एखादी गोष्ट ’का असते’ या शंकेचं समाधान मी कसं करणार? एखादा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ सुद्धा एखाद्या नैसर्गिक गोष्टीचं कार्य कसं चालतं याचा शोध घेईल फारफार तर. पण ती नैसर्गिक गोष्ट मुळातच ’का असते’ हा प्रश्न, मला वाटतं, त्यालाही पडणार नाही. मग हा माझा बालबृहस्पतिच चिऊ-काऊचे बोबडे बोल ’ऑप्शन’ला टाकून, ’चिमणी का असते? ’ असा प्रश्न विचारून एकदम तत्त्वज्ञानाच्या तासाला का बरं बसला? मला काही उमगेचना. त्याच्या चेहेऱ्यावर ’चिंता करितो विश्वाची’ असं उत्तर देणाऱ्या बाल रामदासस्वामींची काही झलक दिसतीये का ते मी पहायला लागले.
त्याला काहीतरी उत्तर देणं तर भाग होतं. मी म्हटलं, "चिमणी का असते म्हणजे काय सोनू... कावळा असतो, विठू-विठू पोपट असतो तशीच चिमणी पण असते. "... आता यापलिकडे मी तरी काय सांगणार? उत्तर देताना रोजचा सवयीचा ’चिऊताई’ हा शब्द वापरण्याचंही मला धारिष्ट्य होईना. नाहीतर वैतागापायी थोड्याच वेळात ’आई का असते? ’ असा प्रश्न ऐकावा लागला असता!
वैताग!... माझा मुलगा चक्क त्या चिमण्यांवरच वैतागला होता... आता माझ्या लक्षात आलं! दुसऱ्या खोलीत त्यानं ज्या तीन-चार चकरा मारल्या त्या दरम्यान असं काही घडलं होतं की ज्यामुळे अचानक त्यानं चिमण्यांच्या असण्याचं कारण शोधण्याच्या कामाचा श्रीगणेशा करायचा ठरवला होता. या विधायक कार्यासाठी पहिली कार्यकर्ती म्हणून त्यानं माझी निवड केली होती आणि त्याच्या त्या गहन प्रश्नाचं उत्तर शोधण्यासारखी अवघड कामगिरी पदार्पणातच माझ्यावर तो सोपवू पाहत होता.
पण चिमण्यांनी याचं असं काय घोडं मारलं की याला अचानक त्यांचं अस्तित्वच खटकायला लागलं? खिडकीच्या गजांवर बसावं, इकडे-तिकडे उडावं, चिवचिव करावी यापलिकडे त्या काहीच करत नाहीत. मग त्यांच्या ’असण्याचा’ याला का त्रास व्हावा? प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊनच आता याचा काहीतरी उलगडा झाला असता. मी माझ्या मुलाचं बोट धरून त्याला म्हटलं, "चल दाखव मला, काय केलं चिमणीनं"...
त्यानं मला दुसऱ्या खोलीच्या दिशेनं नेलं. तिथे गेल्यागेल्या दुसऱ्या मिनिटाला माझ्या सगळं लक्षात आलं. खोलीत खिडकीजवळच भिंतीवर नवीन आरसा बसवला होता. त्यादिवशी रोजच्याप्रमाणेच खिडकीत आल्यावर चिमण्यांना तो नवीन आरसा आणि त्यात त्यांचं प्रतिबिंब दिसलं असणार. एकदम आठ-दहा चिमण्या त्या आरश्याभोवती जमल्या आणि कलकलाट करत सगळ्यांनी त्या आरश्यावर चोचींनी जोरजोरात टकटक-टकटक असे आवाज करायला सुरूवात केली. मी तिथे गेले तेव्हाही त्यांचं अखंड हेच चालू होतं. त्या कलकलाटानं आमचे चिरंजीव वैतागले होते. त्या त्याच्या वैतागवाडीला तो आरसा आणि तसा तो तिथे लावणारे आम्हीही तितकेच कारणीभूत होतो हे काही त्याला उमगलं नाही. चिमण्या आवाज करताहेत म्हणजे चूक त्यांची आहे एवढंच त्याच्या बालबुद्धीनं ताडलं; मुळात त्याच नसत्या तर इतका कलकलाट झालाच नसता असा निष्कर्षही काढला. पण शेवटी बालबुद्धीच ती! आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर आईकडे असतं हा निरागस विश्वास त्याला तो प्रश्न विचारत माझ्याकडे घेऊन आला होता.

मी जवळ जाऊन सगळ्या चिमण्यांना तिथून उडवून लावलं. भुर्रकन उडणारी ’चिऊताई’ पाहून माझ्या मुलाच्या कावलेल्या चेहेऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुललं. त्याचा वैताग घालवण्याचा (तात्पुरता) उपाय मी त्याला दाखवून दिला. त्याचं तेवढ्यापुरतं समाधान झालं. पण त्याच्या त्या प्रश्नाचं उत्तर...?? ते मात्र माझ्याजवळ नव्हतं.
------------------------
खिडकीतून दिसणाऱ्या झाडावरच्या छोट्याश्या घरट्यातलं चिमणीचं पिल्लूही माणसांच्या गलबलाटानं, वाहनांच्या गोंगाटानं वैतागलं आणि त्यानं आपल्या आईला न राहवून विचारलं - "आई, माणूस का असतो गं? " त्याच्या आईकडेही त्याचं उत्तर नव्हतं...!!

-------------------------------------------------------------------------------------
स्त्री मासिकाच्या जानेवारी-२०१०च्या अंकात हा लेख प्रकाशित झालेला आहे.

Comments

Ha ha ha...
Faracah chhan, tumachi bhaaShaa shaili faarach sundar aahe...

Shewatachaa para wiSheSha aawaDalaa...

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)