पुठ्ठा, सेलोटेप आणि ’पॅकर्स अँड मूव्हर्स’

नुकताच, नवऱ्याच्या नोकरीबदलामुळे, गेली अकरा वर्षं वास्तव्य असलेलं गाव सोडून नवीन गावी स्थलांतराचा योग आला. स्थलांतर आपल्या सोबत शंभर गोष्टी घेऊन येतं. त्यांत प्रथम स्थानावर विराजमान अर्थातच सामानाची बांधाबांध. सामानाची बांधाबांध आपल्या सोबत अजून डझनभर गोष्टी घेऊन येतं आणि त्यातली सर्वात अपरिहार्य कुठली असेल तर ती नवरा-बायकोची वादावादी! कुठल्या वस्तू फेकायच्या, कुठल्या ठेवायच्या, "कशाला इतका पसारा जमवून ठेवलाय", "वेळच्यावेळी आवरायला काय होतं", "मला काय तेवढं एकच काम असतं का घरात"... या प्रत्येक शीर्षकाखाली तात्विक मतभेदांवर(! ) आधारित अजून ढीगभर संवाद! पण यावेळी त्या डझनाच्या पटीतल्या सर्व गोष्टींना फाटा मिळणार होता कारण सामानाच्या बांधाबांधीला आम्ही प्रथमच ’पॅकर्स अँड मूव्हर्स’ना बोलवायचं ठरवलं होतं. (इथे सर्वात आधी हे स्पष्ट केलं पाहिजे की या संज्ञेचं मराठीकरण शक्य नाही. ’पॅकर्स अँड मूव्हर्स’ च्या जागी ’सामानाची बांधाबांध करणारे आणि सामान हलवणारे’ असं त्याचं भाषांतर केलं तर सगळी मजाच जाईल. शिवाय शीर्षकावरून लेख कशाबद्दलचा आहे ते ब्रह्मदेवाच्या बापालाही कळणार नाही. मध्यंतरी दुकानांवर मराठी पाट्या लावण्यावरून महाराष्ट्रात जेव्हा गदारोळ झाला होता तेव्हा वाचकांच्या पत्रव्यवहारात वाचलेलं एक पत्र मला आठवतंय. ’दुकानांवर मराठी भाषेतल्या पाट्या हव्यात की देवनागरी लिपीतल्या ते आधी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट करावे’ असं त्या पत्रलेखकाचं म्हणणं होतं. तो मुद्दा मला मनोमन पटला होता. उदा. Shopper's Stop ची देवनागरी पाटी ’शॉपर्स स्टॉप’ अशी होईल मात्र मराठी भाषेतली पाटी ’खरेदी करणाऱ्यांचा थांबा’ अशी होईल. ) तर अश्या त्या (देवनागरी लिपीतल्या) ’पॅकर्स अँड मूव्हर्स’शी आमचा प्रथमच संबंध येणार होता.
’पॅकर्स अँड मूव्हर्स’ या जमातीबद्दल, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून अनेकदा ऐकलं होतं. तरीही, प्रत्यक्षात ते (देवनागरी लिपीत) पॅकिंग आणि मूव्हींग कसं करतात ते पहायची निदान मला तरी प्रचंड उत्सुकता होती. हे काम करणाऱ्या तीन-चार कंपन्यांशी आधी बोलणी केली. (गाव महाराष्ट्राबाहेरचं असल्यामुळे ही देवनागरी लिपीतली बोलणी मात्र हिंदी भाषेत होती! ) ही बोलणी साधीसुधी नसतात. प्रत्येकाकडचे Field Executive किंवा Field Officer असे आंग्लभाषिक पद धारण करणारे अधिकारी(! ) येऊन आधी पाहणी करून जातात. ते त्यांचं Field म्हणजे प्रत्यक्षात आपलं घर असतं आणि येणारा "माज्या मते धा-पंदरा खोकी व्हतील, दादानू" असा अंदाज बांधायला आलेला असतो. त्या माणसांना घरातल्या बारीक सारीक सामानाबद्दल माहिती द्यावी लागते. म्हणजे फ्रीज, टी. व्ही, वॉशिंग मशीन इ. मोठ्या वस्तू आहेत (अथवा नाहीत... अर्थात, ही शक्यता आजकाल फारच कमी असते म्हणा! ) हे आपण न सांगताही बघणाऱ्याला लगेच कळतं पण स्वयंपाकघरात किती भांडी आहेत, काचसामान किती आहे, कपाटात किती कपडे आहेत हे सुद्धा त्यांना सांगावं अथवा दाखवावं लागतं. एक वेळ बाहेरची खोली, स्वयंपाकघरापर्यंत ठीक आहे पण कपड्यांचं कपाट पण सताड उघडून त्यांना दाखवायचं? हे म्हणजे फारच झालं! आधीच पेपरवाला, कुरियरवाल्यापासून दाराशी येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी दाराच्या फटीतून बोलणारी मी, त्या परक्या माणसांना घराच्या सगळ्या खोल्यांतून फिरवून सामानाची माहिती देताना मला फारच विचित्र वाटत होतं. माझ्याच घरातल्या लहानमोठ्या वस्तूंचा अश्या प्रकारचा आढावा मी स्वतःसुद्धा कधी घेतलेला नव्हता. आढावा वगैरे करायचाय काय? घरं बदलायची वेळ आली की औषधांच्या दुकानातून मोठी रिकामी खोकी आणायची आणि दणादण त्यात वस्तू भरत सुटायचं हीच इतक्या वर्षांची सवय. सगळ्या वस्तू कोंबून त्या खोक्यांची तोंडं सेलोटेपने बंद केली की माझ्या नवऱ्याच्या चेहेऱ्यावर कसं कर्तव्यपूर्तीचं समाधान झळकायचं! (सेलोटेप या संज्ञेचंही मराठीकरण शक्य नाही. ’सेलोटेप’ या शब्दाच्या जागी ’चिकटपट्टी’ हा शब्द टाकून बघा ती मजा येते का. ) आणि भरपूर ’तात्विक मतभेद’ होऊनसुद्धा नंतर असं समाधान जोडीदाराच्या चेहेऱ्यावर पाहणं या व्यतिरिक्त संसारात दुसरं काय हवं! भांडी-कुंडी, कपडे-लत्ते हे सगळं निमित्तमात्र! जितकी जास्त खोकी, तितका जास्त सेलोटेप आणि तितकंच जास्त नवऱ्याच्या चेहेऱ्यावरचं समाधान - हे सूत्र मनाशी पक्कं बांधून मी घरात भरपूर सामान वाढवून ठेवलं होतं आणि नवरा नव्या नोकरीच्या जागी लगेच निघून गेल्यामुळे ते भरपूर सामान बांधायच्या कामासाठी आता या लोकांवर अवलंबून राहावं लागणार होतं. तीन-चार जणांशी बोलणी केल्यानंतर मध्यमवर्गीय स्वभावधर्माला अनुसरून ज्यांनी सर्वात कमी पैसे मागितले त्यांच्याकडे हे काम सोपवलं. बचतीसारखा दुसरा मार्ग नाही! (.... घरात सामान वाढवताना बचतीचा विचारही मनाला शिवला नव्हता!! )
... आणि तो दिवस उजाडला. तसा माझा आधीचा आठवडा हे टाक, ते टाक, जुने कपडे, भांडीकुंडी बोहारणीला दे, रद्दी आवर यात गेलाच होता. तरीही खास पॅकर्स अँड मूव्हर्सच्या आगमनापूर्वी आपण घरात काय-काय तयारी करायची असते याची काही कल्पना नव्हती. आपल्या स्वतःच्याच घरातल्या सामानाची बांधाबांध चालू असताना आपण निवांत एका बाजूला बसून रहायचं (आणि त्या निवांतपणासाठी पाच आकडी रक्कम मोजायची) ही कल्पनाच मला जगावेगळी वाटत होती आणि म्हणूनच येणाऱ्या त्या नव्या, अभिनव पाहुण्यांची मी सकाळपासूनच आतुरतेनं वाट पाहत होते.
साडेआठची वेळ देऊन, साडेनऊनंतर उगवून, ’पॉंच आदमी आएंगे’ असं सांगून प्रत्यक्षात तिघांनीच हजेरी लावून त्यानंतरचे दहा-बारा तास त्या लोकांनी घरात जो काही पसारा घातला त्याला तोड नव्हती. येताना त्यांनी एक प्लॅस्टिकचं आणि एक पातळ पुठ्ठ्याचं भलंथोरलं भेंडोळं आणलं होतं आणि सोबत सेलोटेपची असंख्य चाकं. त्या पुठ्ठ्याच्या भेंडोळ्यात घरातलं सामानाच काय घरात राहणारी सगळी माणसंही व्यवस्थित ’पॅक’ झाली असती.
पुठ्ठ्याचे लहान-मोठे तुकडे फाडून त्यांतले दोघं समोर दिसेल ती वस्तू त्यांत गुंडाळत सुटले. भरपूर पुठ्ठा गुंडाळून त्या वस्तूचा आकार दुप्पट करायचा आणि सेलोटेपच्या अगणित वेटोळ्यांत त्या वस्तूला गाडून टाकायचं हाच एक कलमी कार्यक्रम होता त्यांचा. तिसऱ्यानं त्या सगळ्या वस्तू खोक्यांत भरायला सुरूवात केली. नजरेच्या टप्प्यातल्या एकाही निर्जीव वस्तूला त्यांनी सोडलं नाही. दारापाशीच मी जुनी रद्दी काढून ठेवली होती. त्यांनी ती रद्दी पण एका खोक्यात तळाशी ’नीट’ ठेवली. "अरे बाबांनो, ती रद्दी आहे, ती नका भरू त्यात" असं मला सांगावं लागलं त्यांना. डोकंबिकं वापरून काम करायच्या पलिकडचं प्रकरण होतं हे! पण कदाचित डोकं न वापरता, झापडं लावून केल्यामुळेच ते काम दहा-बारा तासांत उरकलं बहुतेक! बाहेरच्या खोलीतल्या छोट्या वस्तू सेलोटेप-नशीन झाल्यानंतर त्यांनी सोफा, खुर्च्या अश्या मोठ्या वस्तूंकडे आपला मोहोरा वळवला. पुठ्ठ्यात गुंडाळलेल्या सोफ्याच्या दोन्ही बाजूला बसून दोघांनी ’कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’च्या चालीवर सेलोटेपचं एक आख्खं चाक मोकळं केलं आणि सोफा लिंपून टाकला. एक-एक करत घरातल्या वस्तू म्हणजे जणू ’पुठ्याआडची सृष्टी’ बनायला सुरूवात झाली... आणि अश्या प्रकारे रात्री बाराच्या सुमाराला जेव्हा सगळं सामान त्यांच्या ट्रकमध्ये चढवण्यात आलं तेव्हा खोक्यांची संख्या साठ भरली! (पंधरा वर्षांच्या सुखी संसाराचं फलित त्या साठ खोक्यांत सामावलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही!)

दुसऱ्या दिवशी नवीन गावी, नवीन जागी सगळं सामान उतरवण्यात आलं. काही खोकी लगेच उघडणं गरजेचं होतं. त्या लोकांनी प्रत्येक खोक्यावर त्याच्या आत काय असेल ते एक-दोन शब्दात चक्क लिहून ठेवलं होतं. हवी असलेली चार-पाच खोकी आम्ही लगेच उघडली खरी पण आतली पुठ्ठ्याची वेगवेगळी पुडकी नुसती पाहून प्रत्यक्षात त्याच्या आत कुठली वस्तू असेल याचा अंदाज बांधणं केवळ अशक्य होतं. मोठ्या बरणीच्या आकाराचं एक पुडकं सेलोटेपचा अपसव्य करून उघडलं तर तो पाणी प्यायचा काचेचा पेला निघाला! एका पुडक्यात एक जाडजूड पुस्तक असेल अश्या अपेक्षेनं ते टरकावलं तर आत दोन लहान कॅसेटस मिळाल्या! आमचा एक मित्र याचं एकदम सहीसही वर्णन करायचा. तो म्हणायचा - हे लोक साध्या खुर्चीचं सिंहासन करतात आणि दुचाकी वाहनाची रिक्षा!!
निरनिराळ्या खोक्यांतून हव्या असलेल्या वस्तू शोधण्यात पुढचे चार-पाच दिवस गेले. आपल्या स्वयंपाकघरात तीन खोकी भरून भांडी आहेत हे मला त्यानंतर कळलं, साडेपाच-सहा फुटी तीन देह झाकायला चार खोकी भरून कपडे लागतात हे ही तेव्हाच समजलं.
आता या गोष्टीला दोन-तीन महिने उलटून गेले। लाकडी वस्तूंवरचे सेलोटेपचे चिकट डाग काढायचा मी आजही नेटाने प्रयत्न करते आहे. अजूनही छोट्याछोट्या बारा-पंधरा वस्तू तश्याच पुठ्ठा आणि सेलोटेपच्या पांघरुणात पडून आहेत आणि दोन-तीन महिन्यांनंतरही त्या वस्तूंविना आमचं काही काम अडल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही!

--------------------------------------------

('स्त्री' मासिकाच्या जानेवारी-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.)

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३