खेळावर प्रेम असणार्‍या वाचकांसाठी (पुस्तकपरिचय : Beartown)

स्वीडनच्या आर्क्टिक भागातलं एक लहानसं गाव- बेअरटाऊन. हे गाव आइस-हॉकीच्या प्रेमात बुडलेलं आहे. They talk ice-hockey, eat ice-hockey, sleep ice-hockey अशी परिस्थिती. गावात बेकारी वाढीस लागली आहे. बिनकामाची किंवा कामासाठी गाव सोडावं लागलेली माणसं वाढत चालली आहेत. अशा काळात हॉकीचाच (पुस्तकात बहुतेक ठिकाणी फक्त ‘हॉकी’ असाच उल्लेख आहे) त्यांना मोठा आधार वाटतो. १५-२० वर्षांपूर्वी बेअरटाऊनचा पुरुष संघ स्वीडनच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलला गेलेला. तो या गावाच्या हॉकीच्या इतिहासातला सर्वोच्च, सोनेरी क्षण. पण त्यानंतर इथल्या हॉकीत विशेष काहीच घडलेलं नाही.

आणि आता इथला मुलांचा संघ राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेच्या सेमी-फायनलला पोहोचला आहे. पुस्तकाचं कथानक या टप्प्यावर सुरू होतं.
Kevin हा या संघाचा मुख्य खेळाडू. आइस-हॉकी खेळातला हिरो. त्याला त्या खेळाची उपजत देणगी आहे. केविनने हात घातलेली कोणतीही गोष्ट सामन्यात वाया जात नाही, चुकीची ठरत नाही. त्याचे आई-वडील मोठे पैसेवाले, बेअरटाऊनच्या हॉकी क्लबचे मोठे देणगीदार. पण केविनच्या हॉकीप्रेमाशी, skills शी त्यांना फारसं देणंघेणं नाही. त्यांच्या कौतुकापासून तो कायम वंचितच राहिलेला. त्यामुळे तो स्वतःला हॉकीत अधिकाधिक बुडवून घेतो. सतत हॉकीचा विचार, रिकाम्या घरात एकट्याने जेवायचं, झोपायचं, घरातल्या अंगणात दिवसरात्र हॉकीचा सराव, हेच त्याचं आयुष्य.
केविनचा जिवलग दोस्त Benji. तो सुद्धा हॉकीची उपजत देणगी लाभलेला मुलगा. त्याच्या घरी पूर्ण वेगळी परिस्थिती. केविन-बेंजीची मैत्री पुस्तकात फार छान येते. मुळात बेंजीचं पात्र लेखकाने ‘इत्मिनान से’ म्हणतात तसं लिहिलं आहे. पुढे पुढे असं व्हायला लागतं, की सलग ८-१० पानांमध्ये बेंजीचा उल्लेख नसेल तर चैन पडेनासं होतं. बेंजीचं काय चालू आहे, अमुक प्रसंगावर त्याची प्रतिक्रिया काय आहे ते सांगा, असं वाटायला लागतं.
या दोघांच्या आसपास विल्यम, बोबो आणि इतर काही मुलं असतात. त्यांचा हॉकीचा सराव, कोचसोबतचं नातं, शाळा, मधल्या सुट्टीतल्या गंमतीजमती, भांडणं हे सहजी येत जातं. त्यातून त्यांची वेगवेगळी व्यक्तिमत्वं समोर येतात. या व्हरायटीचाही कादंबरीत पुढे खूप छान उपयोग करून घेतला आहे.
तसंच Amat हा आणखी एक मुलगा. भविष्यातला सुपर-स्टार. पण तो स्थलांतरित आहे, उपरा आहे. गरीब घरचा आहे. त्याला इतरांप्रमाणे हॉकी सरावाची privileges नाहीत. पण त्यालाही हॉकीची उपजत देणगी असल्याचं लक्षात येतं.

सेमी-फायनलच्या काही दिवस आधी Amat ची संघात निवड होते, केवळ हॉकीवर मनापासून प्रेम असणार्‍या प्रशिक्षकामुळे. त्याला इतर मुलांसोबत सरावासाठी जेमतेम १-२ दिवस मिळतात. त्यातही उपरेपण, इतर मुलांकडून अनुल्लेख, bullying हे सुद्धा असतंच. अशा वेळी आइस-हॉकीच त्याच्या मदतीला धावून येते. Kevin-Amat, Benji-Amat, Amat-Bobo यांचं नातं घडत, वाढत, कधी बिघडत जातं, तो arc कथानकात वेळोवेळी अगदी सहज येत जातो.
माया आणि ॲना या दोन मुली, त्यांची मैत्री, त्यांची त्या वयातली गुपितं ही आणखी एक मिती आहे. मायाचे वडील हॉकी क्लबचे मॅनेजर, गतकाळातले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू. मायाची आई वकील, आईला हॉकीत फारसा रस नसतो. मात्र नवर्‍याच्या हॉकीप्रेमाबद्दल तिला आदर असतो. याव्यतिरिक्त गावातली अनेक प्रौढ पात्रंही आहेत. पण मुख्य हायलाइट आहेत ती मुलं, आणि अर्थात आइस-हॉकी!

सेमी-फायनल होते, त्याच रात्री गावात न भूतो अशी एक घटना घडते. त्याला एका परीने हॉकीच कारणीभूत ठरते. त्या घटनेचे पडसाद वेगवेगळ्या पातळीवर उमटतात. गावातल्या कोवळ्या हॉकी खेळाडूंचं स्वच्छंदी जगणं त्या एका घटनेमुळे संपून जातं. मुलं एका रात्रीत जणू प्रौढ होतात. त्यातही Benji आणि Amat या दोन पात्रांचं transformation फार सुंदर पद्धतीने उलगडत जातं. पण एकूण त्या घटनेमुळे सर्वात मोठा तडाखा बसतो तो गावच्या हॉकीला.

खेळावर प्रेम असणार्‍या वाचकांसाठी हा प्लॉट पुरेसा रोचक आहेच...
पण कादंबरीची सुरुवात त्याहून खूप वेगळी आणि नाट्यमय आहे- Late one evening toward the end of March, a teenager picked up a double-barreled shotgun, walked into the forest, put the gun to someone else's forehead, and pulled the trigger. This is the story of how we got there.
या एका वाक्यामुळे आपण पुस्तकभर ते टीनएजर मूल कोण असेल, त्याने कुणावर गन रोखली असेल, याचे अंदाज बांधत राहतो.
या वाक्यामुळेच कथानकाच्या इंट्रो चित्रात काय काय येतं आणि वाचकांनी पुढे आपल्या डोक्यात संबंधित तुकडे कसकसे बसवत जाणं अपेक्षित आहे, ते पाहा-
‘आर्क्टिक भागातली मार्चची अखेर’, या टाइमस्टॅम्पने फार मजा आणली आहे. आर्क्टिक भागात या काळात सगळीकडे बर्फच बर्फ असतो. प्रचंड थंडी, लहान दिवस, मोठ्या रात्री. पण हाच काळ आइस-हॉकीसाठी सर्वोत्तम. थंडीमुळे एरवी सगळं सुम्म असू शकतं, पण बेअरटाऊनमध्ये हॉकीच्या सीझनमुळे चहलपहल आहे. थोड्याच दिवसांत थंडी कमी होईल, बर्फ वितळायला लागेल, मग आइस नाही आणि हॉकी नाही. पण तोपर्यंत हे हवामान, वातावरण गावाला आणि कादंबरीलाही घेरून राहतं. त्यात एक गूढपण, थंडपण आहे. बेअरटाऊनसाठी ते सवयीचं आहे, मात्र आपल्यासारख्या वाचकांसाठी आव्हानात्मक, दमवणारं आहे. ती कुंद वातावरणनिर्मिती आपणच आपल्या डोक्यात करतो, पण जसजसं आपण पुढे वाचत जातो तसतसं तो sub-zero गारठा आपल्याला अधिकाधिक बोचत जातो. गावात घडणार्‍या घटनांचा ताण वाढत जातो तेव्हा आपणही मार्च संपण्याची, स्प्रिंगच्या खाणाखुणा दिसण्याची वाट बघायला लागतो.

दुसरं, ‘फॉरेस्ट’ - गावालगतचं हे जंगल म्हणजे कादंबरीतलं एक प्रमुख पात्र असल्यासारखं आहे. गावातली मुलं-माणसं या जंगलाच्या साथीने लहानाची मोठी झाली आहेत. प्रौढांसाठी या जंगलाचा वेगळा आधार आहे, तर तरुण मुलांसाठी जंगल म्हणजे आपली वेगवेगळी सिक्रेट्स जपून ठेवणारी जागा आहे. अशा आधारासाठी किंवा सिक्रेट्ससाठी सहज जंगलात चालत किंवा गाडी घेऊन जावं, इतकं ते जंगल गावाच्या निकट आहे. जंगल आणि तिथले बर्फाचे थर गावात घडणार्‍या घटनांचे मूक साक्षीदार आहेत. कथानकात या जंगलाचा झकास वापर केलेला आहे.

तिसरं म्हणजे teenager - कथानकातली सगळी teenager पात्रं म्हणजे बेअरटाऊनची आणि या कादंबरीचीही ऊर्जा आहे. त्यांच्यात विविध आर्थिक स्तर आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबांच्या वेगवेगळ्या घड्या, चुण्या, सुरकुत्या आहेत. तरी जोडीला त्यांच्यातली घट्ट मैत्री आहे, दारू-सिगारेट आहे. हॉकीवरच्या त्यांच्या प्रेमाचेही वेगवेगळे स्तर आहेत.

a double-barreled shotgun - गावातलं अर्धवट वयातलं एक पात्र शॉटगन हाताळू शकतं, दुसर्‍या कुणावर तरी रोखू शकतं, ट्रिगर दाबू शकतं, यावरून गावाच्या संस्कारांबद्दल, वातावरणाबद्दल काही अंदाज बांधले जातात... आणि ते सपशेल चुकतात. शॉटगन त्या टीनएजरच्या हाती कशी आणि का येते तो प्रवास खूप नाट्यमय, गंभीर आणि त्याच वेळी अतिशय तरलही आहे.
This is the story of how ‘we’ got there - हे गाव हॉकीपासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. हॉकीसाठी आणि हॉकीपायी गावात जे जे घडतं ते वय वर्षं ७० ते वय वर्षं ४, अशा सगळ्यांनाच आपल्यात लपेटून घेतं.

हे तुकडे आपल्या नकळत आपण जोडत, पुढे पुढे वाचत जातो.

सेमीफायनलच्या निमित्ताने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे फायदे दिसत असतात. ज्युनियर आणि सिनियर संघांचे प्रशिक्षक, निवृत्तीला आलेला एक तिसरा प्रशिक्षक, त्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात. त्यांची आपापली उपकथानकंही हॉकीभोवती गुंफलेली आहेत. संघाच्या प्रायोजकांना बिझिनेसच्या नवनव्या शक्यता दिसतात. संघात स्थान मिळालेल्या काही मुलांचे पालकही एकेकाळचे हॉकी खेळाडू आहेत. त्या जुन्या संघात स्थान मिळालेले, न मिळालेले, आता आपल्या मुलांच्या माध्यमातून आपली हॉकीस्वप्नं पुरी करू बघणारे, असे पालकांचे पदर आहेत. यातला आखाती स्थलांतरितांचा धागा खूप subtly येतो. कथानकात त्याचं विनाकारण भांडवल करून घेतलेलं नाही.

मार्चच्या त्या एका महिन्याभरात कादंबरीचं कथानक घडतं. त्यात दीर्घ flashbacks सुद्धा येतात, पण ते तुकड्या-तुकड्यात. ते वाचताना कुठेही अडथळा जाणवत नाही. आइस-हॉकीची थीम असली तरी ३५०-४०० पानी कादंबरीत प्रत्यक्ष हॉकीच्या सामन्यांचं वर्णन, थरार, हार-जीत यावर फार पानं खर्च केलेली नाहीत. तरी हॉकी या पुस्तकाच्या पानापानाला व्यापून राहते. कारण कथानकात हॉकी ऐहिक किंवा मनोरंजनाच्या पातळीवर नव्हे तर तत्वज्ञानाच्या पातळीवर येते. हॉकी नसानसांत भिनलेली असणं, हे निवेदनातून असंख्य प्रकारे आणि अतिशय लोभसवाण्या पद्धतीने समोर येतं. कित्येक ठिकाणी वाचताना आपली सहज दाद दिली जाते. ते निवेदन खर्‍या अर्थाने appreciate करायचं असेल तर मुळात वाचकाचं ‘स्पर्धात्मक मैदानी खेळ’ या गोष्टीवर प्रेम असायला हवं.

पुढे काय होतं, बेअरटाऊन तो तडाखा झेलतं का, तिथल्या हॉकीचं काय होतं, गावच्या हॉकीप्रेमाचं काय होतं, हे पुढच्या कादंबरीत येतं. ही तीन कादंबर्‍यांची मालिका आहे. त्यांतलं हे पहिलं पुस्तक. तीनही कादंबर्‍या मूळ स्विडीश भाषेतल्या आहेत.
खेळावर आधारित फिक्‍शन पुस्तक - हा प्रकार आपल्याकडे तसा कमीच दिसतो. त्यात आइस-हॉकीसारखा अनोळखी खेळ. पण पुस्तक मला प्रचंड आवडलं.
(मूळ पुस्तक फारच सुंदर आहे, त्यामानाने इंग्रजी अनुवाद गंडलाय, असं नेटवर काही ठिकाणी वाचलं. ही गोष्ट गाळून आपण पुस्तक वाचू शकतो, हे बरंच आहे, असं मला वाटलं.)

क्रिकेटमध्ये ‘शेवटचा बॉल, ६ रन्स’ किंवा ‘हॅटट्रिकवर कॅच सुटला’ या वाक्यांमध्ये निव्वळ तो क्षण येत नसतो, तर त्यासोबत स्पर्धा, इर्ष्या, खिलाडूवृत्ती, संघभावना, नियमांची चौकट, जीव तोडून खेळणं, हुकलेल्या संधी, हातातून सुटलेले क्षण, मेहनत फळाला येणं किंवा वाया जाणं, जुन्या सामन्यांचं बॅगेज, या सगळ्यासकटचं प्रत्येक खेळाडूचं अस्तित्व, व्यक्तिमत्व, अशा अनेक गोष्टी येतात. पुस्तकात आइस-हॉकी अशीच स्वतःच्या एकूण भवतालासह येते.

पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आधी आइस-हॉकीची ती परिभाषा नीट समजून घ्यावी असं मला वाटलं. मी नेटवर आइस-हॉकीचे नियम वाचले, हॉकीच्या मॅचचे १-२ व्हिडिओ सुद्धा शोधून बघितले. पण मग लक्षात आलं, की पुस्तकात हॉकी एवढ्यापुरती मर्यादित नाही. त्या खेळाचे नियम तुम्हाला माहिती नसतील तरी हरकत नाही. मुळात खेळावर तुमचं प्रेम हवं. स्पर्धात्मक खेळ ही एक आगळीवेगळी फिलॉसॉफी आहे, हे तुम्हाला मान्य असायला हवं. तरच या पुस्तकाचा तुम्ही पुरेपूर आनंद घेऊ शकाल.

Beartown (Fredrik Backman, अनुवाद : Neil Smith)

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३